झुक झुक आगीनगाडी

Train हल्ली आपल्या भारतात मामाच्या गावाला नेणा-या गाड्या भरपूर झाल्या आहेत. पण धुरांच्या रेषा हवेत काढणारी कोळशाची इंजिने मात्र केव्हाच मोडीत निघाली. इथे इंग्लंडमध्येही कोळशाची इंजिने ब्रिटीश रेल्वेने केव्हाच सेवानिवृत्त केली. फरक इतकाच की ती सगळीच काही मोडीत गेली नाहीत. या ब्रिटीश लोकांना जुन्या परंपरा आणि जुन्या गोष्टी टिकवून ठेवण्याची फारच हौस. मग त्या टिकवून ठेवण्यासाठी किंवा त्यांचं पुनुरुज्जीवन करण्यासाठी काय येईल तो खर्च किंवा पडतील तितके कष्ट करायला हे लोक एका पायावर तयार असतात. (हे फक्त स्वत:च्या आई वडिलांच्या बाबतीत लागू पडत नाही. ते जुने झाले की त्यांची रवानगी एखाद्या वृद्धाश्रमांत होते. पण तो विषयच निराळा आहे.). कोळशाची इंजिने फार सावकाश चालतात, कार्यक्षमता (Efficiency) कमी असते, आणि धुरामुळे होणारं प्रदूषण, यासारख्या अनेक कारणांमुळे ब्रिटीश आणि भारतीय अशा दोन्ही रेल्वे कंपन्यांनी, कोळशाऐवजी डिझेल किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी इंजिने वापरायला सुरुवात केली. आणि विचारांती तो निर्णय योग्यच होता असंच म्हणावं लागेल. पण इथे ब्रिटिशांचं जुन्या पुराण्या गोष्टींबद्दलचं प्रेम उफाळून आलं. खर्च कमी करण्यासाठी ब्रिटीश रेल्वेने अनेक रेल्वे लाईन्सच बंद करून टाकल्या. पण रूळ, स्टेशने, सिग्नल्स वगैरे तसेच ठेवून दिले होते. त्याचा फायदा घेऊन काही उत्साही श्रीमंत लोकांनी जे जे काही त्यांना परवडण्यासारखं होतं ते ते विकत घ्यायला सुरुवात केली. त्यातच जुनी इंजिने, रेल्वेचे डबे अशांसारख्या गोष्टीही आल्या. आणि मग ब्रिटनच्या काना कोप-यांतून अशा Steam Railways जन्माला येऊ लागल्या. पण या सगळ्या रेल्वेचं वैशिष्ट्य असं की या रेल्वे चालू करण्यांत आणि चालू ठेवण्यांत सिंहाचा आणि उल्लेखनीय वाटा आहे तो अगदी हौशीने आणि बिनपगारी सर्व प्रकारची मेहेनत करणा-या स्वयंसेवकांचा. ज्या कामाला खास कौशल्य किंवा मशिनरीची गरज असेल अशाच कामांसाठी पैसे खर्च केले जातात. एरवी प्लॅटफॉर्म साफ करण्यापासून ते थेट इंजिन चालवण्यापर्यंत एकूण एक कामे हे स्वयंसेवक करतात. स्वत:चा वेळ आणि प्रसंगी स्वत:चा पैसा खर्च करूनसुद्धा. अशाच एका रेल्वेचं २५ मे २०१२ रोजी उद्घाटन झालं. त्या रेल्वेचं नांव आहे. “Epping Ongar Railway”> किंवा थोडक्यांत (Efficiency)EOR.

लंडनला लागून असलेल्या एसेक्स (Essex) या काउंटीमध्ये ती चालते. १९९४ पर्यंत एपिंग ते ओंगार या मार्गावर लंडनच्या भुयारी रेल्वेच्या (London Underground), गाड्या चालत असत. पण फक्त गर्दीच्या वेळेतच (During rush hour only). पण ही वाहतूक तोट्यात जात होती. म्हणून (Efficiency)London Underground ने ती वाहतूक बंद करून टाकली. मग काही वर्षे ही लाईन अशीच पडून राहिली. कैक वर्षे दुर्लक्ष झालेल्या घराची जशी ओसाडवाडी होते तसंच या लाईनचंही झालं. स्टेशनच्या इमारतींची खूप तोडफोड झाली. काही हवामानामुळे, काही स्थानिक गुंडांच्या कृपेने. सिग्नल कॅबिनची अवस्था अशीच दयनीय झाली होती. रुळांमध्ये रानटी गवत आणि रोपटी (Weeds) भरमसाठ वाढली होती. मी 8 मे २०११ रोजी EOR च्या नॉर्थ वीळ्ड (North Weald) स्टेशनवर काम कसं काय चाललं आहे ते बघायला म्हणून गेलो होतो. एकंदर परिस्थिती पाहिल्यावर ही रेल्वे पुढच्या पाच वर्षांत तरी चालू होईल का नाही असं मला वाटलं होतं. त्यातून ह्या रेल्वेवर स्वयंसेवक म्हणून काम करणा-या ऍनमरी (AnneMarie) नावाची एक मुलगी, ती ज्या डब्याचं पुनुरुज्जीवन करीत होती तो डबा दाखवायला घेऊन गेली. तो डबा अशा काही अवस्थेत होता की, पदरचे पैसे खर्च करून तो (Efficiency)EOR ला दान करणा-या व्यक्तीची मला दया आली. त्यापेक्षाही जास्ती दया त्या AnneMarie ची आली. कारण तो डबा संपूर्णपणे साफसूफ करून, त्याला रंग लावून, आसनांची लक्तरे झालेली Seat covers बदलून तो डबा गाडीला जोडून प्रवासी वाहतुकीला योग्य अशा स्थितीत आणायची जबाबदारी ज्या गटाकडे होती त्या गटाची AnneMarie, पुढारी Leader) होती. खाली दिलेल्या फोटोवरून कल्पना येईल. डब्याच्या सर्व खिडक्यांच्या कांचा गायब होत्या.

Train पण २५ जून २०१२ ला मी जेव्हा तो डबा पाहिला तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्र्वासच बसेना. डब्याला आतून बाहेरून झकासपैकी रंग लावलेला होता. लक्तरे झालेल्या Seat covers च्या जागी नवीन Covers आली होती. आणि दरवाजाची Handles दुपारच्या उन्हांत लखलखत होती. डब्याचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. सिग्नल जुन्या पद्धतीचे दिसले तरी सायमन हॅने (Simon Hanney) ह्या EOR च्या जनरल मॅनेजरने दिलेल्या माहितीप्रमाणे, सिग्नल दिसायला मुद्दामच पूर्वीच्या काळात दिसत असत तसे ठेवले होते. पण त्यामागची यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान पूर्णपणे आधुनिक पद्धतीचं होतं. त्यामुळे जास्ती गाड्या जास्ती वेळा चालवता येतील. सांगायची खास गोष्ट अशी की EOR चालू करायची कल्पना जेव्हा रूप घ्यायला लागली तेव्हा काम करणारे सर्वजण बिनपगारी स्वयंसेवक होते. पेशाने Mechanical Engineer असलेला सायमनसुद्धा. पण पुढे कामाचा पसारा वाढला तेव्हा कामाकडे Full Time लक्ष द्यायला कोणीतरी जबाबदार आणि जाणकार माणसाची गरज होती. तेव्हा सायमनची EOR चा पहिला पगारी नोकर म्हणून नेमणूक झाली. आजसुद्धा पगारी नोकर फक्त दोन आहेत. बाकी सगळे स्वयंसेवक. ब्रिटनमध्ये आज चालू असणा-या सर्व Steam railways अशा स्वयंसेवकांच्या मदतीवरच चालतात.

ब्रिटन हा सृष्टीसौंदर्याने अतिशय समृद्ध देश आहे. इथल्या एकूण एक Steam railways सृष्टीसौंदर्याची रेलचेल असलेल्या प्रदेशातून धावतात. EOR ही त्याला अपवाद नाही. एसेक्स मधल्या Epping Forest या अतिशय निसर्गरम्य भागातून ही रेल्वे जाते. रुळांच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आहेत. Oil seed rape या पिकाला जेव्हा बहर येतो तेव्हा संपूर्ण शेत गर्द पिवळ्या मखमलीचं पांघरूण घातल्यासारखं दिसतं. रुळांच्या दोन्ही बाजूला अगदी चिकटून वेगवेगळ्या प्रकारची उंच उंच झाडे आहेत. हिवाळ्याच्या सुरुवातीला पानझड सुरू व्हायच्या अगोदर या झाडांची पाने, पिवळा, नारिंगी, गुलाबी आणि लाल असे वेगवेगळे रंग बदलत जातात.

Epping forest मध्ये उत्साही पादचा-यांसाठी अनेक पायरस्ते ठेवलेले आहेत. अशा पादचा-यांना अनेक वेळा हरणे आडवी जातात. North Weald ते Ongar या प्रवासांत बाहेर पाहिलं तर शेतांची हद्द जिथे संपते तिथे छोटी छोटी घरे असलेलं एखादं लहानसं गाव दिसतं आणि झटक्यात दृष्टीआड होतं. मुख्य म्हणजे या प्रवासांत कुठेही टोलेजंग इमारती (Tower blocks) किंवा भरधाव वेगाने जाणा-या मोटारी किंवा ट्रक्स दिसले नाहीत. परतीच्या प्रवासांत आमच्या इंजिनाने शिटी वाजवली आणि त्याच वेळी भट्टीत घातलेल्या कोळशाचा धूर बघितला आणि त्या धुराचा वास आला तेव्हा जवळ जवळ ६० वर्षांपूर्वी केलेल्या मुंबई ते नाशिक या माझ्या भारतातल्या पहिल्या रेल्वे प्रवासाची आठवण मन हालवून गेली.

– मनोहर राखे, लंडन