संस्कृतीक वारसा जपणारी जेठाभाईनी हवेली

अहमदाबाद मधील हवेली. अवघे चारशे वर्ष वयमान!
jethabhai ni aveli गुजरातमधील संक्रात म्हणजे उत्तरा्यणची मजाच न्यारी! दिवाळी संपते न संपते तोच पतंग उडविण्याची सुरुवात होते. मात्र त्याची खरी मजा येते १४ व १५ जानेवारीला म्हणजेच संक्रातीलाच. एकदा जर का संक्रात येथे येऊन साजरी केलीत की परत परत संक्रातीस यावेसे वाटणारच कारण उत्तरा्यणची खेच न्यारीच! गुजरातमधील लोकच नव्हे तर परदेशस्थ ही संक्रात साजरी करण्यासाठी येथे आवर्जून येतात.

‘काईट फेस्टिवल’ साबरमती नदीच्या काठावर होतो. संक्रांतीच्या सुमारास बघाल तर परदेशस्थांचे थवेच्या थवे विमानतळावर दिसतात. एकदा आले की दरवर्षी येण्याचा नियमच होऊन जातो. जणू सर्वत्र ”काटी ये, काटी ये, पकडयो छे” चा गजर आणि त्याच बरोबरीने गाणे वाजवणे याने वातावरणात उत्साहाचे भरते आलेले असते. आकाशात रंगीबेरंगी पतंगी, तर गच्चीवर रंगीबेरंगी वस्त्र परीधान केलेले तसेच डोक्यावर रंगीबेरंगी टोप्या, डोळयावर काळे चष्मे घातलेले माणसांचे थवे. त्यातून सर्वात जास्त मजा जुन्या अहमदबादमधील पोळेमध्ये येते.

या संक्रातीला एक परदेशस्थ पाहुणे बिपीनभाई मोदी यांना घेऊन आम्ही धोबी नी पोळ,खाडिया येथे गेलो. एका वळणावर एक सुंदर हवेली दिसली आणि तेथे नजर खिळून राहिली. बाहेर ‘काईट म्युझियम’ असा फलक होता. तेथे एक मध्यम वयाच्या घराच्या मालकीणबाई उभ्या होत्या. त्यांनी मोठ्या आपुलकीने आम्हाला आत बोलावले. हवेलीच्या पायर्‍या दगडाच्या होत्या आणि हवेली गुलाबी रंगाची होती. दर्शनी दरवाजा नक्षीकाम केलेला भव्य तसेच भक्कम, गडद रंगाचा होता. आत शिरलो तर, जुन्या वस्तू आकर्षक रीतीने मांडलेल्या होत्या. बोलता-बोलता समजले की ही हवेली चारशे वर्ष जुनी आहे. तेथे जुन्या काळातील जर्मन सिल्व्हरची भांडी, कपबश्या, प्रवासाचा तांब्या, बंब, वगैरे ठेवलेले होते. देवाला आंघोळ घालण्यासाठी गरम पाण्याचा छोटासा बंब व सुबक घंगाळे होते. जुन्या काळाची खेळणी मांडलेली होती त्यात पोपटाचा पिजंरा आणि खेळण्यातला पोपट, छोटया बाहुल्या-बाहुले, मातीची फळे, एका मोठया परातीत पाण्यात ठेवलेली फुले. अत्यंत आकर्षक होते. चबुतरा म्हणजे पक्षांना दाणे घालण्याची खांबावरील जागा. हा चबुतरा पूर्वी चौकात असे.

प्रवेशद्वार

ही हवेली जेठाभाई शेठ ह्यांची आहे. जेठाभाई शेठ रेशीम व अफूचा व्यापार करत असत. हा व्यापार त्यावेळी उंटावर होत असे. त्यांची हवेली पोळेच्या सुरुवातीस आहे. पोळ म्हणजे एखाद्या मुख्य रस्त्यास मिळणार्‍या छोटया छोटया गल्ल्या. ज्यात आत जातांना अगदी चिंचोळया होत जातात. तेथे फक्त छोटी वाहनेच जाऊ शकतात. आतील रस्ते दगडी असतात. हवेली म्हणजे श्रीमंतांचे घर. अशा एखाद दोन हवेल्या प्रत्येक पोळे मध्ये असायच्याच. त्यानंतर असायची छोटी छोटी घरे. ह्या पोळेमध्ये ५० घरे आहेत. जेठाभाई शेठ यांच्या जवळ बग्गी होती. येथील श्रीमंत व्यक्ती असल्याने त्यांचा मान राखला जाई. त्यांची हवेली देवदाराची आहे. हे लाकूड ७०० वर्ष चांगले राहते, चांगली निगा राखली तर १२०० वर्षही टिकते असे म्हणतात.

अहमदाबाद येथे थंडी तसेच, गरमीही जास्त असते, त्यामुळे बाहेरील वातावरणाचा आत परिणाम होऊ नये म्हणून घराच्या भिंती अडीच ते तीन फुटाच्या असून त्यात पोकळी असते, त्यामुळे घरातील वातावरण थंडीत उबदार आणि गरमीत थंड राहते. हवेलीत मुख्य दारावर झरोखा असतो,त्यावर नक्षीकाम केलेले असते. ही मोगल काळातील असल्याने त्यात फुले-पाने, वेलीची नक्षी आहे. दारातून आत आले की येते ओसरी, मग चौक, तेथेच झोपाळा व त्यास लावलेल्या पितळाच्या नक्षीदार कडया. झोपाळा सुध्दा पाठ असलेल्या बाकासारखा व त्याच्या वर सुंदर नक्षीकाम केलेले असून मध्ये चित्रे लावलेली आहेत. तेथे रात्री दिवे लावण्यासाठी हंड्या आहेत ज्यात पूर्वी दिवे लावत असत. तेथेच पोपटाचा सुंदर पिजरा व आत पोपटही असत.

परसाळ

मग येते परसाळ त्यात दोन खोल्या एक गोजार तर दुसरी म्हणजे ओरडो. गोजरात नेहमी लागणारे सामान तर ओरडो ह्यात अन्न-धान्य पैसे वगैरे. चौकाच्या डाव्या बाजूने माडीवर जाण्याचा लाकडी जिना. वर गेले की येते बैठकीची खोली, त्यास म्हणतात मेडो. तेथून वर गेले की येते बेडरुम. हे घर इकोफ्रेन्डली आहे. त्याच्या खाली एक मोडा पाण्याचा हौद आहे, त्यात पावसाचे पाणी साठवले जाते. पावसाचे पाणी छपरावर पडते ते पाइप वाटे खाच खळग्यातून स्वच्छ होत टाकीत पडते त्यात जवळ जवळ २००० हजार लीटर पाणी राहते.

पोळाचे अस्तित्व १४११ पासून आहे. प्रथम पोळ होती महुरत पोळ. पोळ गुजरात मध्येच पहायला मिळते. प्रत्येक पोळेत एक पंच असतो. पोळ म्हणजे कुटूंब व पंच म्हणजे कुटूंब प्रमुख. पोळेच्या प्रवेश द्वारातच कार्यालय असते. त्यात पोळीयो राहतो. अर्थातच रखवालदार. तो येणार्‍या जाणार्‍यावर लक्ष ठेवतो. पोळे मधून बाहेर जाण्याचा एक गुप्त रस्ता एखाद्या घरातून जात असतो. त्याचा उपयोग पंच्याच्या सहमतीनेच होऊ शकतो. प्रत्येक पोळेचे स्वत:चे असे कायदे असतात. पोळेच्या बाहेरच्या बाजूस एक पाण्याचा हौद मुक्या जनावरासाठी असतो. चौकात पक्षासाठी चबुतरा असतो. तसेच एक दगड असतो त्यावर गाय-कुत्र्यासाठी प्रथम चपाती ठेवली जाते. त्यास चाटण म्हणतात. पोळमध्ये एक विहीर असते, त्यातील पाणी सर्वजण वापरू शकतात. अशी ही पोळ जुन्या अहमदाबादची ओळख आहे. अहमदाबाद तेरा दरवाज्यांमध्ये वसलेले होते. प्रेम दरवाजा, दिल्ली दरवाजा, सारंगपूर दरवाजा, वगैरे. आता मात्र चारही बाजूस प्रचंड पसरलेय.

जेठाभाई शेठ ह्यांचे वारसदार श्री.राहीलभाई ह्यांनी वारसो नामक संस्था उभी केली आहे.वर्ल्ड हेरीटेज डे च्या दिवशी प्रभामफेरी,रॉक शो आयोजित केला होता. तसेच अहमदाबादला ६०० वर्षे झाली तेव्हा एक मोठा केक तयार केला त्यावर अहमदाबादचे ऐतिहासिक चित्र उभे केले होते. जुनी वस्तू नव्या स्वरूपात दर्शविणे ही त्याची आवड आहे. परंतु त्या निमित्ताने हा अनमोल वारसा ते जतन करत आहेत. www.vaarso.com ह्या साइटवर फोटो व माहिती बघायला मिळतील.

– वंदना चिटणीस, अहमदाबाद