“जाणता राजा” – एक अनोखा अनुभव

janata raja आपला मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कानाकोप-यात असू दे. पण दोन गोष्टींबद्दल त्याचा प्रतिसाद कधीही बदलत नाही. कोणीही “गणपती बाप्पा” असा साद दिला की “मोरया” असा प्रतिसाद येतो. आणि “छ्त्रपती शिवाजी महाराज की” अशी आरोळी ठोकली की उजवी मूठ घट्ट बंद करून हात उंचावून “जय” अशी आरोळी हमखास येते. आणि हे दोन्ही प्रतिसाद अगदी बेंबीच्या देठापासून, घशाच्या असतील नसतील तेव्हड्या सगळ्या शिरा ताणून दिले जातात.

काही महिन्यांपूर्वी मी मुंबईला गेलो होतो. जाण्यापूर्वी, इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात “जाणता राजा” या नाटकाचा इथे हिंदीमध्ये प्रयोग होणार आहे हे मी ऐकलं होतं. पण त्यावेळी मी त्याबद्दल फारसा काही विचार केला नव्हता. मी १९ मे ला लंडनला परत आलो आणि २३ मे ला मला ईमेल आली की त्या नाटकासाठी स्थानिक कलावंतांची गरज आहे आणि त्यासाठी चाचण्या आणि निवड (Auditions & selection), त्याच दिवशी दुपारी होणार आहे. विचार केला की जाऊन तर बघू. मिळाला एखादा रोल तर ठीकच आहे. नाही तर नाही. मी स्वत: इथल्या मंडळाच्या थोड्याफार नाटकात कामे केलेली आहेत. पण माझ्या पत्नीला (सीमाला) काहीच अनुभव नव्हता. ती म्हणली की नुसती बघायला म्हणून आले तर चालेल का? म्हंटलं चालेल. आता वस्तुस्थिती अशी आहे की मी मुंबईला होतो तेव्हा माझ्या कुठल्याही मित्राने किंवा नातेवाईकाने या नाटकाचा उल्लेखसुद्धा केला नव्हता. सीमा आहे बडोद्याची. तिला मात्र तिच्या मित्र मैत्रिणींच्या सारख्या ईमेल आणि फोन येत होते की तुला जमलं तर हे नाटक तू अवश्य बघ. झालं. त्याप्रमाणे आम्ही दोघे जिथे चाचणी आणि निवड होणार होती तिथे जाऊन थडकलो. एका शाळेचं सभागृह भाड्याने घेतलेलं होतं. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. मग आता ते सभागृह कुठे आहे ते विचारायचं कोणाला? थोड्या वेळाने काही गुजराथी बायका आल्या. त्याही चाचणीसाठीच आल्या होत्या. थोड्या वेळाने शाळेचा रखवालदार उगवला. त्याने सभागृह उघडून दिलं. हळू हळू लोक यायला सुरुवात झाली. ब-याच वेळाने प्रशांत चव्हाण (दिग्दर्शक) आणि मंडळाचे कार्यकर्ते आले. ज्या संख्येने कलावंत अपेक्षित होते, त्यापेक्षा खूपच कमी लोक आले होते. म्हणून मग चाचणी अशी झालीच नाही. उपस्थित असलेल्या सगळ्यांची निवड झाली आणि आमच्या “जाणता राजा” च्या अनुभवाचा श्रीगणेशा झाला.

२३ मे ला श्रीगणेशा झाला. “ज्ञ” पर्यंत पोहोचायला जेमतेम चार आठवडे बाकी होते. कारण नाटकाचा पहिला प्रयोग १९ जूनला होणार हे अगोदरपासूनच जाहीर झालं होतं आणि त्याप्रमाणे तिकीटविक्रीला सुरुवातदेखील झाली होती. वेळ इतका कमी असल्यामुळे नाटकाच्या तालमी भरपूर आणि अगदी कसून कराव्या लागणार आहेत हे मी पूर्वानुभवाने जाणून होतो. पण नक्की कुठला पार्ट करावा लागणार आहे आणि त्यासाठी पाठांतर किती करावं लागणार आहे ह्याची काही एक कल्पना नव्हती. पण जसजशा तालमी सुरू झाल्या तसतसा एकेका गोष्टीचा उलगडा व्हायला लागला. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही (सगळे लंडनवासी) सर्वजण Extras होतो. आम्हाला कुठलाही विशिष्ट असा पार्ट नव्हता. सबंध नाटकात संवाद कोणालाच नव्हते. एकूणएक संवाद अगोदरपासूनच ध्वनीमुद्रीत केलेले होते आणि ती संवादफीत प्रयोगात वापरण्यात येणार होती. मावळ्यांपासून ते थेट छत्रपतींसकट सर्वांनी फक्त नुसते ओठ हलवीत त्याप्रमाणे फक्त आविर्भाव करायचे होते. इंग्रजीत त्याला Miming म्हणतात. मराठीत मूकाभिनय. हा प्रकार मला नवीन होता. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे एकस्ट्रा असल्यामुळे अभिनयाची गरज जवळ जवळ नव्हतीच. अहो, नदीच्या काठावर उभा राहून सूर्याला अर्घ्य देणारा आणि गायत्री मंत्र म्हंटल्यासारखे नुसते ओठ हलवणारा ब्राम्हण काय अभिनय करणार? पण जसजशा तालमी होत गेल्या तशी एक गोष्ट लक्षात आली. गरजेच्या मानाने पुरूषपात्रांची संख्या खूपच कमी पडत होती. प्रत्येक तालमीनंतर दिग्दर्शक प्रशांतराव सांगत होते की तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांनाही घेऊन या. नाटकाच्या अगदी शेवटच्या तालमीला एक गृहस्थ आले. त्यापूर्वीच्या एकाही तालमीला ते आलेले नव्हते. त्यांनाही सामील करून घेतलं गेलं. दिग्दर्शक म्हणाले ज्यांनी अगोदरच्या तालमी केलेल्या आहेत, त्यांनी ह्या नवीन गृहस्थाना स्टेजवर काय काय करायचं ते सांगा. “खोगीरभरती” हा शब्द मी ऐकलेला आहे. त्यादिवशी “म्हणजे काय” हे प्रत्यक्ष पहायला मिळालं. नाटकात काम करणा-यांसाठी वरची वयोमार्यादा होती ५० वर्षे. पण मी ७०+, माझे दोन स्नेही, डॉ. काणेगावकर ७५ + आणि श्री. रामभाऊ काळे ८०+, अगदी पहिल्या दिवसापासून तालमींना हजर रहात होतो. पण पुरूषपात्रांची कमतरता होती म्हणून म्हणा किंवा आमचा उत्साह बघून म्हणा, आम्हाला कोणीही आक्षेप घेतला नाही. नाटकातले इतर लोक आम्हाला “काका” म्हणत असत. प्रशांतरावांनी आम्हा तिघांना एकत्रपणे “काकालोक” म्हणायला सुरूवात केली. तीन काकांबरोबर नाटकात दोन मराठी काकूही होत्या; सीमा (माझी पत्नी) आणि सौ. जयश्री दंडवते.

तालमी जसजशा होत गेल्या तशी एक गोष्ट आमच्या लक्षात आली. एकूण तीन एक तास चालणा-या नाटकात आम्हाला (तीन काका आणि दोन काकू) स्टेजवर जास्तीत जास्त १५ मिनिटांपेक्षा जास्ती काम नव्हतं. वेळ कमी असल्यामुळे दर शनिवार आणि रविवारी ७ ते ८ तास तालमी चालायच्या. मग नुसतं बसून वेळ काढायचा म्हणजे कंटाळा यायचा. आणखी एक गोष्ट म्हणजे नाटकातले इतर उत्साही आणि तरूण कलाकार ह्यांनी सहकुटुंब सहपरी वार भाग घेतला होता. परीवार वय वर्षे ५ पासून वरचा होता. आता इतके सगळे लोक, त्यांचं काम नसताना आळीमिळी गुपचिळी करून रहातील हे केवळ अशक्य होतं. बरं तालमीच्या जागाही अशा होत्या की ज्यांचं काम नसेल अशा लोकांना वेगळं कुठे जाऊन बसता येईल अशीही सोय नव्हती. त्यामुळे तालमी चालू असतानाही प्रचंड कलकलाट होई. मग प्रशांतरावांना आरडाओरडा करून सगळ्यांना शांत बसवावं लागे. अशा वेळी मला त्या लहान मुलांची दया येई. त्यातल्या काही मुलांना मराठी येत नसे, काहींना इंग्लीश येत नसे, तर काहींना दोन्ही भाषा येत नसत. त्यामुळे ती मुले तर आमच्यापेक्षा जास्ती कंटाळून जात. मग आपसूकच त्यांची मस्ती सुरू होई. अशा वेळी मला प्रश्र्न पडे, इतक्या लहान मुलांना त्या नाटकात घेण्याची खरोखरच गरज होती का?

होता करता रंगीत तालमीचा दिवस उजाडला. नाटकासाठी वेंबली एरिना (SSE Arena, Wembley) हे १२५०० बुडं टेकू शकतील असं प्रचंड सभागृह भाड्याने घेतलेलं होतं. आमच्या मंडळाच्या नाटकांना जास्तीत जास्ती उपस्थिती म्हणजे २०० ते २५०. पहिल्यांदा त्या सभागृहात शिरलो आणि सभागृह पाहिलं तेव्हा थोडसं हबकूनच जायला झालं. दुपारी एक वाजता हजेरी लावली. सेट उभारण्याचं काम सुरू होतं. सगळे सेट आणि नाटकातले चाळीस एक मुख्य कलाकार दोन दिवस अगोदर भारतातून आले होते. भारतात सेट कसे उभारले जातात, काय काय खबरदारी घेतली जाते याची मला कल्पना नाही. या नाटकासाठी भारतातून आलेल्या मंडळींनासुद्धा नसावी. सेट उभारायला सुरुवात करण्यापासून तो संपूर्णपणे उभा होईपर्यंत इथल्या आरोग्य आणि सुरक्षा खात्याचे (Health & Safety Executive), अधिकारी जातीने उपस्थित होते. कुठलंही काम त्यांच्या परवानगीशिवाय होत नव्हतं. सेट उभे करणारे कारागीर तर सोडाच. पण नाटकाच्या दिग्दर्शकांनासुद्धा सेटवर जायचं असेल तर डोक्यावर हेल्मेट घालायची सक्ती होती. नाटकाच्या मधल्या एका भागात, स्टेज आणि प्रेक्षक यांच्या मध्ये असलेल्या जागेतून घोडे आणि उंट फिरवले जाणार होते. त्या जनावरांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, म्हणून त्या मधल्या जागेवर खास गालीचे घातले होते. घोडे किंवा उंट घाबरून उधळू नयेत म्हणून प्रत्येक घोडा आणि उंट यांच्या मागे एक एक मोतद्दार (हातात केराची टोपली आणि झाडू घेऊन!) चालत होता. प्रयोगाच्या वेळी एक गोष्ट लक्षात आली. स्टेजवर छत्रपतींच्या पायाखाली गालीचे वगैरे सोडाच, पण साधं जाजमही नव्हतं! हे सर्व सोपस्कार पूर्ण होऊन खुद्द रंगीत तालीम सुरू व्हायला संध्याकाळचे सात वाजले आणि इथल्या कडक नियमांचा आम्हाला पहिला धक्का बसला. आत्तापर्यंतच्या तालमीत असं ठरलं होतं की स्टेजवर येण्यासाठी चार मार्ग असतील. दोन स्टेजच्या मागून आणि दोन स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूने. तसे या स्टेजला होतेही. पण उजव्या आणि डाव्या बाजूचे जिने हे तात्पुरते बांधलेले होते. आरोग्य आणि सुरक्षा खात्याच्या अधिका-याच्या मते हे जिने लहान मुलांच्या दृष्टीने धोक्याचे होते. त्यांनी स्टेजवर यायचं असेल तर फक्त पाठीमागच्या किंवा पुढच्या जिन्यानेच आलं पाहिजे. झालं! इतके दिवस तालमीत जे घोटवून घेतलं ते ऐनवेळी बदलावं लागलं. हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण आम्ही तेही निभावून नेलं. आणि शेवटी नाटकाचा दिवस उजाडला. आज आम्ही प्रथमच नाटकातल्या पोषाखात काम करणार होतो आणि ते सुद्धा थोडाफार मेकअप लावून. इथे शंभराहून अधिक एक्स्ट्राना मेकअप करायचा होता आणि आपापले कपडे चढवायचे होते. हे काही येरा गबाळाचे काम नव्हतं. पण या बाबतीत हे भारतातून आलेले कलाकार पडलेल्या जबाबदारीला पुरून उरले. माझ्या ओठांवर अगदी शिवकालीन मिशा स्वत: प्रशांतरावांनी अक्षरश: एक मिनिटाच्या आत रंगवल्या. कपड्यांच्या बाबतीत तोच प्रकार. त्या पोशाख अधिका-याला (Wardrobe Manager), कुठला रोल आहे ते सांगायचा अवकाश, की लगेच पोशाख हातात पडायचा. कमरेला बांधायचे शेले हे मी नुसते नाटक सिनेमात बघितले होते. प्रत्यक्षात बांधायचा प्रसंग आत्तापर्यंत कधीच आला नव्हता. इथेसुद्धा या भारतीय कलाकारांची तत्काळ मदत मिळाली. पगड्यांचे इतके वेगळे वेगळे प्रकार असू शकतात आणि दरबारातल्या हुद्दयाप्रमाणे पगड्या बदलतात हे माझ्या गांवीही नव्हतं. माझ्या एका रोलमध्ये मी छत्रपतींचा हुज-या होतो आणि शेवटच्या प्रवेशात अष्टप्रधानांपैकी एक होतो. तो Wardrobe Manager तिथे हजर नसता तर मी हुज-याच्याच पोशाखात आणि पगडीत छत्रपतींना मुजरा करायला गेलो असतो! भारतातून आलेल्या त्या अनुभवी कलाकारांनी, माझ्यासारख्या अनेक नवशिक्यांना अगदी निस्वार्थपणे आणि तत्परतेने जी मदत केली त्याबद्दल त्यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत.

काही गोष्टी तालमीत ठरविल्याप्रमाणे झाल्या. काही अगदी शेवटच्या क्षणी बदलल्या गेल्या. मला महाराजांच्या हुज-याचं काम दिलेलं नव्हतं. पण ऐनवेळी मी आणि काकालोकांपैकी दुसरे एक काका केवळ आम्ही स्टेजच्या पाठीमागे हजर होतो, म्हणून आम्हाला महाराजांबरोबर पाठवलं गेलं. आम्ही काय करायचं हे खुद्द छत्रपतींनी आम्हाला खुणा करून सांगीतलं. महिनाभर तालमीत ज्या “काकांनी” (श्री. काळे) यांनी संत तुकारामाचं काम केलं ते आणि ज्या “काकांनी” (डॉ. काणेगांवकर) बडतर्फ झालेल्या मुख्य प्रधानांचं काम केलं त्यांच्या ऐवजी ऐनवेळी ती कामे दुस-यांना दिली गेली. एक गोष्ट अगदी आवर्जून लिहावीशी वाटते. ह्या प्रयोगामध्ये इथल्या एका मुलाने छोट्या बहिर्जी नाईकाची भूमिका केली होती. त्याचं नांव मला माहीत नाही. पण तो ते काम इतकं झकास करीत होता की तालमीच्या वेळीसुद्धा आम्ही सर्वजण घोळका करून ते बघायला उभे रहात असू.

आता हे इतकं सगळं भारूड लावल्यानंतर उद्या जर मला कोणी विचारलं की प्रयोग कसा झाला? तर मला त्याचं उत्तर देता येणार नाही. कारण आम्हाला कोणालाच विंगमध्ये उभं राहून नाटक बघायची परवानगी नव्हती. कारण? स्टेजला विंगच नव्हत्या!

या नाटकामध्ये मला आत्तापर्यंत कधी न पाहिलेली एक गोष्ट पहायला मिळाली. स्टेजवर चालू होता खंडोबापुढे करतात तो खराखुरा गोंधळ आणि स्टेजच्या पाठीमागे चाललेला “सावळा गोंधळ”!

– मनोहर राखे, लंडन