प्रत्येक पैलूचा, बारीकसारीक मुद्दांचा सर्वांगीण विचार करून ग्रथित केलेलं ज्ञान म्हणजे वेद. समाजधारणा, सुप्रजानन, माणसाची स्वत:ची, पर्यायानं समाजाची शारीरिक व मानसिक सुदृढता अशा अनेक कारणांसाठी अवघड अशा शास्त्रांचे पालन अत्यावश्यक आहे. प्राचीन ऋषींनी अवघड शास्त्रांची धार्मिक संस्कारांशी सांगड घातली. धार्मिक संस्कांरांच्या अवगुंठनाखालची ही अवघड शास्त्रे विनासायस पाळली जातील. त्यासाठी धर्म एक बडगा म्हणून वापरला गेला.
काश्मीर ते कन्याकुमारी भारत एकच असल्यामुळे हे धार्मिक संस्कार मूलत: एकच आहेत. फक्त त्या त्या प्रांताच्या वातावरणानुसार, निसर्गानुसार थोडासा फरक पडतो, एवढंच. मूळ तत्व तेच! दिनचर्येत सर्वप्रथम येते ते प्रात: स्मरण:
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती|
करमुले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्||
प्रभातसमयी झोपून उठल्यानंतर अंथरूणातच बसून तळहाताचे दर्शन घेता घेता देवाच्या स्मरणाने दिवसाची सुरूवात होते. हाताचा अग्रभाग म्हणजे बोटे, तळहात व मूळ भाग निरखून पाहिले जातात. निरनिराळया देवांचे दर्शन म्हणून यावेळी हाताचा रंग ध्यानात येतो. तो गुलांबी असेल तर सुदृढ, पांढुरका असेल तर अँनिमिक अवस्था व सुरकुत्या असतील तर निर्जलीकरणाची समस्या, असे निष्कर्ष काढता येतात. तब्येत बिघडण्याच्या प्रथमावस्थेतच निदान झाल्यामुळे थोडक्या उपचारांत काम भागते. शिवाय मानसिकदृष्टया करदर्शनाचा असा उपयोग होतो, की कराग्रांचा (म्हणजे बोटांचा) उपयोग केल्यास, म्हणजे काम केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. तळहाताचा उपयोग केल्यास म्हणजे मनाची एकाग्रता केल्यास सरस्वती प्रसन्न होते.
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले|
विष्णुपत्नी नमस्तुर्भ्य क्षमस्व मे||
हे म्हणतांना वाकून जमिनीला स्पर्श करून थोडा वेळ अंथरूणात स्वस्थ बसतो. नंतर अंथरूणाबाहेर येऊन चालू लागतो. या सर्व छोटया छोटया क्रिया आपल्या कानातील तोल राखणार्या यंत्रणेस मदत करतात. नपेक्षा अंथरूणाबाहेर पडून एकदम चालू लागल्यास तोल जाऊन पडण्याचा संभव असतो.
रात्रीच्या शांत झोपेनंतर निर्माण होणार्या आमवातामुळे शरीर जड होते. ब्राह्ममुहूर्तावर उठणे व फिरणे ह्यामुळे नंतरच्या वाढत्या तापमानाबरोबर शरीराचे तापमान राखणे शक्य होते. सूर्योदयानंतर उठल्यास ही तफावत दिवसभर कायम रहाते व निरूत्साह निर्माण करते. फक्त या वेळेस मोकळया हवेत असणार्या ओझोनचा फायदा मिळतो.
अग्निहोत्र : दररोज होणारा हा छोटा यज्ञ वातावरणातील जंतूचे प्रमाण कमी करतो.
वातावरणाच्या शुध्दतेबरोबरच या यज्ञाचा सहवास माणसाच्या रक्तवाहिन्यांचा कोलेस्टोरॉलमुळे कमी झालेला व्यास पूर्णपणे करतो व त्यामूळे रक्ताभिसरण पूर्ववत होते.
सूर्यनमस्कार : आरोग्यासाठी सर्वांगीण व्यायाम
स्नानोत्तर पूजा : स्नानोत्तर आलेला उत्साह स्वल्पकाळ एकाग्रतेने स्वस्थ बसल्यामुळे दिवसभर दिवसभर टिकतो.
भस्मविलेपन : स्नानानंतरच्या आर्द्र शरीरासाठी जंतूघ्न पावडर शरीराच्या ठराविक अवयवांवर लावल्याने थंडीचे नियमन होते.
चित्राहुती : भोजनाच्या ताटाचे किड्यांपासून रक्षण व आचमनामुळे शरीराची भोजनपूर्व तयारी.
भोजन : मेनू, रांगोळी, नैवेद्य, वैश्वदेव, षडरसयुक्त चौरस आहार, रांगोळी, उदबत्तीमुळे प्रसन्न वातावरण जेवतांना आवश्यक आहे.
वामकुशी : पाचक रसाचे योग्य स्त्रवण.
शुभंकरोति : तुपाचे निरांजनाने दृष्टीस फायदा
शतपावली : शतपावली न करता झोपल्यास येणारी निद्रा ही स्वल्पकाळ टिकते व नंतर निद्रानाश संभवतो.
पितृदेवो भव मातृदेवो भव : आई वडिलांच्या अनुभवाचा फायदा मुलांना मिळतो.
सण उत्सव, चार्तुमास, व्रतवैकल्ये ऋतूनुसार सणांविषयीच्या परंपरा, उदा : कोजागिरीच्या सणाला चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. चांदण्यात ठेवलेल्या दुधामध्ये प्रतिजैविके तयार होतात. त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती वर्षभर पुरते. कोरडया दम्याचा त्रास होत नाही.
व्रतवैकल्ये मनाचा निर्धार वाढवितात. नूतन परिणीती स्त्रीला संसारोपयोगी वनस्पतींची माहिती होते. सासरच्या नवीन वातावरणाची ओळख होते व त्यात रमते.
ज्योतिषशास्त्र : मानसिक उभारीला मदत
कुंडलिनी तेजोवलयशास्त्र : आजाराच्या खूपच पूर्वकलात रोगनिदान.
हस्तस्पर्श चिकित्सा, ध्यानस्पर्श चिकित्सा : सध्या ‘रेकी’ या नावाने प्रसिध्द असलेली उपचार पध्दती.
योगशास्त्र : शरीरसंवर्धन
मंत्रचिकित्सा : आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यातील आकाशतत्वांवर आधारलेली उपचारपध्दती आकाशतत्वात निर्माण झालेला दोष आकाशतत्वानेच ठीक करणे, हे यामागील तत्व आणि ‘शब्दगुणम् आकाशम्’ नुसार शब्दांचा वापर केला आहे. दन्त्य, ओष्ठय, तालव्य वगैरे वर्गीकरण असलेल्या वर्णमालेतील विशिष्ट वर्ण विशिष्ट उपचारासाठी वापरला, तर ‘मननात् त्रायते इति मंत्र:’ या व्याख्येनुसार होणारा फायदा मिळतो.