लंडनची ‘भारतीय ऐतिहासिक’ सहल

लंडनला येणारे बहुसंख्य भारतीय इथे आले की इथल्या एखाद्या स्थानिक सहल कंपनीबरोबर लंडनची सहल करतात आणि मग बिग बेन (Big Ben) इथलं लोकसभा भवन (Houses of Parliament) टॉवर ब्रिज (Tower Bridge) तुर्सोद बाईचं मेणाच्या पुतळयाचं प्रदर्शन (Madame Tussaud’s wax work exhibition) इ. ठिकाणं पाहून झाली की ”चला झालं लंडन एकदाचं” असं समजून एक सुस्कारा सोडून पुढे कुठेतरी रवाना होतात. पण याच लंडनमध्ये एक अत्यंत वेगळया प्रकारची सहल, आपला मराठी माणूस, श्री. वासुदेव गोडबोले, स्वत:चा कुठल्याही प्रकारे फायदा न करून घेता, ऊन, पाऊस, वारा, थंडी, बर्फ यासर्वांना तोंड देत, गेली २२ वर्षे चालवीत आहे. अशी कोणती अनोखी सहल आहे ही? ज्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य सैनिक राहिले, शिकले किंवा फाशी दिले गेले, ती ऐतिहासिक ठिकाणे. गेल्या महिन्यात अशाच एका सहलीला जाण्याचा मला (पुन्हा एकदा) योग आला. मला वासूची मेल आली की १७ आँगस्टला मदनलाल धिग्राला फाशी दिल्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपण पेंटनव्हील तुरुंगापाशी जाऊन त्यांना श्रद्धांजली दिली पाहिजे. १७ तारखेला सोमवार होता. त्यादिवशी जाणं सगळयांना शक्य झालं नसतं म्हणून मग आमचा दहा बारा लोकांचा एक ग्रुप १६ तारखेलाच निघाला. या ग्रुपमध्ये ५ वर्षाच्या अक्षितापासून ते ६८ वर्षाचे तरूण वासूदेव गोडबोले असे विविध वयाचे लोक सहभागी झाले होते.

लंडन अंडरग्राऊंडच्या युस्टन स्क्वेअर स्टेशनहून आम्ही निघालो. 185 North Grower Street मार्गे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पोहोचलो. 185 North Grower Street मध्ये मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक १८३७ ते १८४८ मध्ये इटलीतून तडीपार केल्यामुळे रहात होता. त्याच्या क्रांतिकारक विचारांपासून वीर सावरकरांनी स्फूर्ती घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चळवळ सुरु केली. युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मदनलाल धिंग्रा डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींग शिकत होता. तिथून आमचा मोर्चा

krishnavarma house निघाला 60 Muswell Hill Road कडे. या घरात शामजी कृष्णवर्मा रहात असत. या गृहस्थांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळेच वीर सावरकर बॅरिस्टरचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला येऊ शकले. या गृहस्थांनी जवळच एक घर विकत घेतलं आणि तिथे भारतातून येणार्‍या विद्यार्थ्यांची कमी खर्चात रहाण्याची सोय केली. हे घर त्यावेळी इंडिया हाऊस म्हणून ओळखलं जात असे. (त्याचा सध्याच्या इंडिया हाऊसशी काही एक संबंध नाही. सध्याचं इंडिया हाऊस ही भारताची वकीलात (High Commission) आहे. शामजी पुढे लंडन सोडून पॅरिसला स्थायिक झाले. या इंडिया हाऊसमध्ये वीर सावरकर आणि त्यांचे इतर सहअध्यायी यांच्यात, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक विषयांवर अत्यंत गहन खलबते होत असत. अशा मेळाव्यात स्वत: महात्मा गांधीसुध्दा सामिल झाल्याची नोंद इतिहासात आहे. असं हे ‘इंडिया हाऊस’ (सावरकरांच्या वेळचं) आहे.

६५ क्रॉमवेल ऍ़व्हेन्यू, या घरात वीर सावरकर रहात. शीख लोकांना आपले विचार

Veer Savarkar House समजावून देता यावेत म्हणून ते गुरुमुखी शिकले. त्यांनी काही रशियन क्रांतिकारकांशी घनिष्ट संबंध जुळवले आणि बॉम्ब कसे बनवायचे ते शिकून घेतले. या सगळया गोष्टी चालू असताना त्यांचा बॅरिस्टरचा अभ्यासही 108 Ledbury RoadGrays inn मध्ये चालूच होता. ते यथावकाश बॅरिस्टरची परिक्षा पासही झाले. पण त्यांच्या स्वातंत्र्यलढयाशी निगडीत असलेल्या हालचालींमुळे, ब्रिटीश सरकारने त्यांना सनद देण्याचं नाकारले. श्री. गोडबोले पर्यटकांना 108 Ledbury RoadGrays Inn ही दाखवतात.

 Lokmanya Tilak House लोकमान्य टिळक लंडनला आले असतांना ते दोन वेगवेगळया घरात राहिले. ते ज्या घरात प्रथम उतरले होते ते घर लंडन महानगरपालिकेच्या शहर सुधारणा योजनेत पाडले गेले पण १९१९ ते १९२० मधले काही महिने टिळक 108 Ledbury Road10 Howeley Place या घरात रहात होते. वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक ज्या घरात रहात होते, त्या घरावर लंडनच्या

महानगरपालिकने निळे स्मृती फलक लावलेले आहेत. १६ ऑगस्टला आमचा चमू तेथे पोहोचला. सकाळपासून ऊन अगदी रणरणतं होतं. मंडळीनी घरून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या केव्हाच रिकाम्या झाल्या होत्या. वाटेतल्या दुकानातून विकत घेतलेल्या बाटल्याही संपत आल्या होत्या. आम्हा सर्वांचे पायही तक्रार करू लागले होते. अपवाद फक्त स्वत: गोडबोल्याचा. त्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता.

Madan Lal Dhingra टिळकांच्या घरापासून मग जथ्था निघाला तो 108 Ledbury Road कडे. या घरात मदनलाल धिंग्रा रहात असत. येथून जवळच 23 Aldridge Villas या पत्यावर सरदार पटेल रहात असत. याच्या पुढचे दोन पत्ते आजच्या दृष्टीने खूपच महत्वाचे होते. 10 Onslow Square इथे सर कर्झन वायली रहात असत आणि इंपिरियल इन्स्टिटयूट (आत्ताचं इंपिरियल कॉलेज), जिथे मदनलालने कर्झन वायलीची परलोकांत बदली केली. १९०९ साली सगळयात शेवटच्या ठिकाणाला भेट दिली तो होता पेंटनव्हील तुरुंग. इथे मदनलाल धिंग्राला १९०९ साली फाशी दिली गेली. तसेच १९४० साली, जालियनवाला बागेच्या हत्याकांडाच्या वेळी पंजाबचा गव्हर्नर असलेल्या सर मायकेल ओडवायर यांच्या हत्येबद्दल उधमसिंघला फाशी दिली गेली. आम्ही सर्वजण ह्या पवित्रस्थानी नथमस्तक झालो.

dhingra post stampअशी ही सहल श्री वासुदेव गोडबोल्यांच्या सहकार्याने संपन्न होते. अश्या ह्या देशप्रेमी गोडबोल्यांविषयी मी जर चार शब्द लिहिले नाहीत तर हा लेख अपुरा राहील. श्री. गोडबोले हे मुळचे पुण्याचे. इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन ४० पेक्षा जास्ती वर्षे झालेली आहेत. मूळ पेशा सिव्हील इंजिनिअरींगचा. आता सेवानिवृत्त. पण छंद एकच तो म्हणजे भारतीय इतिहासांतले सत्य, संपूर्ण सत्य शोधून काढायचं तसेच आपल्या इतिहासात ज्यांनी अजाणतेपणे किंवा जाणूनबुजून खोटी माहिती दिली त्याचं पितळ उघडं पाडायचं. पण हे सर्व करायला चिकाटीने इतिहास संशोधन करावं लागतं, त्यासाठी वेळही तितकाच लागतो. संगणक आणि इंटनेटच्या यायच्या आधीच्या काळात नोकरी चालू असताना गोडबोले आठवडयातून ५ दिवस लंडनला नोकरी करीत आणि शनिवारी संशोधनच्या कामासाठी लंडनमध्ये ब्रिटीश लायब्ररी किंवा इंडिया ऑफीसमध्ये दिवस घालवीत. ते रहातात लंडनपासून ४० मैलांवर बेडफर्ड या गावी, म्हणजेच आठवडयातले ६ दिवस बेडफर्ड ते लंडन ये-जा करायची. आपल्याकडच्या हिशोबांत सांगायचं म्हणजेच रोज विरार ते चर्चगेट परतीचा प्रवास करण्यासारखं आहे आणि हे सर्व परिश्रम त्यांनी वर्षानुवर्ष केले. ह्या त्यांच्या परिश्रमातून वेगळी पुस्तके लिहीली गेली. ताजमहाल हा शहाजहानने बांधलेला नसून अगोदरपासून अस्तित्वांत असलेली इमारत घशात घातली आहे हे सिध्द करणारे पुस्तक (Efficiency)’Taj Mahal-The Great British Conspiracy’ हे पुस्तक. ते आज ब्रिटीश लायब्ररीमध्ये सुध्दा उपलब्ध आहे. त्याशिवाय वीर सावरकरांवर एक इंग्लिश पुस्तक आणि त्याचं मराठी भाषांतरही प्रसिध्द झालेले आहे.

गोडबोल्यांनी ही अनोखी सहल १९८७ साली सुरू केली. सहलीची आखणी आणि त्या आखणीसाठी लागणारं सर्व संशोधन कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी एकटयाने केलेले आहे. पण त्यांना खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते. त्यांच्या या अनोख्या सहलीला जितका प्रतिसाद मिळायला हवा तितका भारतीयांकडून आजपर्यंत कधीच मिळाला नाही. एका सहलीवर आत्तापर्यंत एकावेळी जास्तीत जास्त फक्त ३० लोक आले आहेत. याचं कारण प्रसिध्दी अपुरी पडते का आजकालच्या भारतीयांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल अनास्था वाढत आहे हे एक कोडं आहे. अश्या ह्या अनोख्या सहलीला जायचे असल्यास श्री. गोडबोल्यांशी v.godbole3@ntl.com या ई-मेलवर संपर्क साधावा. सहलीवर निघायच्या अगोदर ते सर्व कार्यक्रमाची रूपरूषा सहलीवर जाणार्‍यांना पाठवतात. त्याच बरोबर इच्छा आणि आवड असल्यास संबंधित इतिहासाची सखोल माहितीही पाठवतात.

– मनोहर राखे,लंडन