होलिकोत्सव

होळी हा सण सर्व भारतात मोठया आनंदाने साजरा करतात. फाल्गुन मधील पौर्णिमेला होलिकोत्सव पाच दिवस मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. दुस-या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते तर पाचव्या दिवशी रंगपंचमी. किती सुंदर नाही!

पूर्वी होळीसाठी मुले लाकडं, गो-या ब-याच दिवस आधीपासून जमा करून ठेवत. जेवढी लाकडं जमतील तेवढा त्यांचा आनंद वाढे. आता वृक्षतोडीमुळे ही सर्व मजा अर्थातच कमी झालेली दिसते. मोठी होळी साजरी करण्यासाठी मोकळी जागा साफ केली जाते. मुले तर आपले घर जणू विसरूनच जातात. मध्यभागी एरडांची फांदी लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. सुंदर हाळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळपर्यंत होळी छानशी रचून तयार होते.

स्त्रिया स्वंयपाक घरात गुंतलेल्या असतात. पुरण पोळीचा गोड नैवेद्य चालू असतो. महाराष्ट्रात एकही घर असे नसेल की ज्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी नसेल. साधारण सात वाजता होळी पेटवली जाते. बायका पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा करतात. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. होळीत सबंध नारळही अर्पण केले जाते किंवा खोब-याच्या वाटया भाजून प्रसाद म्हणून होळीचे पूजन केले जाते.

असे म्हणतात की या होळीमधे वाईट गोष्टींचा नाश होतो. समाजातील वाईट परंपरा जाळण्याचा संदेशही होळी देते. वाईटातून नेहमीच चांगले निर्माण करण्यासाठी वाईट प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजेत. होळीभोवती मुलांचा आरडाओरड बराच वेळ असतो. साखरीचे हरकडे व कंगनही मिळतात. या हरकडयांची माळ होळीला घालतात. लहान मुलांच्या गळयातही कौतुकाने घालतात व हातात साखरेचे कंगनही घालतात. हे वेगवेगळया रंगात व आकारात, नक्षीत असते. सर्वजण ते खातातही.

होळीच्या दुस-या दिवशी ‘धुलीवंदन’ येते. रात्रभर होळी जळत असते. सकाळी धुगधुग असतेच पण बाजूच्या लाकडांची राखही खूप असते ही राखच मुले खेळतात. एकमेकांच्या अंगावर उडवतात व भरपूर मस्ती करतात. काही भागात धुलीवंदनाच्या दिवशीच रंगही खेळला जातो. मुलांचा संबंध दिवस धिंगाणा नि मस्ती यातच जातो. एकमेकांचे अवतार पाहण्यासारखे असतात.

होळीचा पाचवा दिवस म्हणजे ख-या अर्थाने रंगपंचमी. सर्व रंगांची उधळण म्हणजे रंगपंचमी. मोठी होळी असेल त्याठिकाणी अजून लाकडं पेटवून त्यावर मोठं टिपच ठेवतात. पाणी भरून त्यात रंग तयार करतात. मग काय रस्त्यावरून येणारे-जाणारे ही त्यांच्या तावडीतून सुटत नाही. पूर्वी वापरात येणारे रंग साधे असत. अंघोळीनंतर रंग निघून जाई. परंतू आता रसायने वापरून रंग तयार करतात. खरं तर हे रंग आरोग्याला धोकादायक आहेत परंतु उत्साहाच्या उधाणात आरोग्याकडे कोण पाहिल? मग अंगाचे हे रंग लवकर जात नाहीत. रंगपंचमीच्या दिवशी दुपारनंतर रात्रीपर्यंत मोठ-मोठे समुदाय मुलांचे नदीकडे जातांनाही दिसतात. त्यांच्या टोळया तेव्हा मोठया पाहण्यासारख्या असतात. रंगपंचमीचे रंग आपल्याला संदेश देतात हिरवा रंग भरभराटीचे प्रतीक आहे., लाल रंग उत्स्फूर्तता देतो, नारंगी रंग देशभक्ती सांगतो, पिवळा रंग वैभव व चैतन्य देतो तर निळा रंग मनाला शांती देतो. सफेद रंग सत्याचा मार्ग सांगतो तर काळा रंग अशुभही मानला जातो. या रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांमधील शत्रुत्व सोडून देऊन रंगांची उधळण करतात. जणू परत मैत्रीचे नाते नव्याने निर्माण होणार असते.

हा पाच दिवस वाजत गाजत चालणारा होलिकोत्सव मनाला उभारी देऊन जातो. ह्या सणामुळे आनंदाची वृध्दी होते, एकमेकांमधील वैमनस्य दूर होते. भारतभर हा सण सर्वच थरातून आनंदाने साजरा केला जातो. हा सण हळूच वसंताची चाहूल देतो. म्हणजे नंतर निसर्गातही झाडे सुंदर रंगीत फुलांनी डवरणार असतात. जीवनात प्रत्येक रंगालाच महत्त्व आहे. बाळाला नजर लागू नये म्हणून काळी तीट लावतोच ना आपण? इंद्रधनुष्यातील सप्तरंग आपल्या आयुष्यात असतात आणि रंगपंचमीमुळे ते आपण मनासोक्त उधळतो. प्रेमाचे प्रतीक म्णून नि प्रेम वाढावे म्हणून रंगपंचमी खेळल्याने मनही शुध्द व पवित्र होते कारण नको असलेल्या गोष्टींचे होळीकडे आपोआपच दहन होते.

मग करणार ना हा होलिकोत्सव साजरा. देहभान विसरूण रंगाची उधळण करा नि मन प्रसन्न करा टवटवीत फुलाप्रमाणे. खेळू द्या मनाला मुक्तपणे म्हणजे ते हलके होईल नवीन जीवन परत नव्याने जगण्यासाठी.

– अलका दराडे, नाशिक