दिवाळी आली घरांघरांत

अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी! सर्वांना हवीशी वाटणारी, नात्यांचे संबंध सांगणारी आणि जोपासणारी. दिवाळी म्हटलं की डोळयांसमोर येतो तो दिव्यांचा लखलखाट, फराळाचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी, मनाला आपोआपच उभारी येते. आनंदाने दिवाळीचं स्वागत अंत:करणापासून केलं जातं.

दिवाळीच्या तयारीसाठी लहानांपासून मोठयापर्यंत सर्वचजण लागतात. आजच्याकाळात घराची रचना व त्याचबरोबर त्याची अंतरबाहय सौदंर्यनिर्मिती आकर्षकरित्या करण्याकडे कल दिसतो. घराघरातील स्वच्छता व सुंदरता सर्वांचेच मन आकृष्ट करून घेते. त्यानंतर मग विविध आकारातले रंगीबेरंगी आकाशकंदिल लावलेले दिसतात. त्याबरोबर चमकणा-या लाईटच्या माळाही दिसतात. दारापुढील स्वच्छता व सुंदर रांगोळया मन मोहित करतात. दारावरील पवित्र तोरण सर्वांचे स्वागत करते. सगळचं कसं छान नि प्रसन्नता वाढवणारं.

खरी दिवाळी उंब-यावर येऊन ठेपते ती अश्विन वदय द्वादशीला म्हणजेच बसुबारसेला. द्वादशीपासून भाऊबीजेपर्यंत दिवाळी साजरी होते. सहा दिवस दिवाळी आनंद द्विगुणीत करून जाते. प्रत्येक दिवसच कसा आल्हाददायक आणि वेगळेपण जपणारा. वसूबारस या दिवशी गाईची तिच्या पाडसाबरोबर पूजा करतात. नव्या पिकाचा गोड घास गोमातेला मायेने भरवतात. तेहतीस कोटी देव आपण गाईच्या ठिकाणी मानतो व तिला पूजतो. गाईपासून मिळणारी ५ तत्वे सर्वांनाच उपयुक्त आहेत. अशी ही गोवत्स द्वादशी दिवाळीची सुरूवात करते.

अश्विन कृष्ण त्रयोदशी या धनतेरसला संपत्तीची पूजा करतात. व्यापारी लोकांच्या दृष्टीनेही या दिवसाला महत्त्व आहेच. पण अजून एक गोष्ट म्हणजे ‘यमदिपदान’. या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिणेकडे दिवा लावून ठेवतात. दक्षिण दिशा ही यम धर्मराजाची दिशा त्याची पूजा केल्यास अकाली मृत्यु येत नाही. दिवाळीत आपण सर्वांबरोबर यमालाही पूजतो हे फार महत्वाचे आहे.

नरक चतुर्दशीला जाग येते ती पहाटेच्या फटाक्यांच्या आवाजाने. मुलांना तर फार आवड असते. सर्वच लोक पहाटे उठतात नि घराघरांत सगळीकडेच दिवे लागतात. थंडीच्या गोड गारव्यात सुवासिक तेलरने मॉलिश करतात आणि सुगंधी उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ करतात. उटण्याचा हवाहवासा वाटणारा सुगंध दरवळत राहतो. एक वेगळीच प्रसन्नता मनाच्या गाभा-यात भरून राहते. मात्र जो आळशी असेल आणि लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करणार नाही तो नरकात जाणार असे म्हणतात. ह्या भितीमुळे तरी सर्वच लवकर उठून अभ्यंगस्नान करतात.

अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन येते. यावरून अमावस्येचे महत्त्व अजूनही लक्षात येते. प्रत्येक स्त्री मुहूर्ताप्रमाणे संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी करते. झेंडुच्या फुलांना ह्या दिवशी फार महत्व. झेंडूची फुले आणून माळा करतात. दरवाजासाठी, वाहनासाठी, देवांसाठी माळा तयार होतात आणि पूजेसाठीही फुले लागतातच. पिवळा सुंदर टवटवीत रंग मन वेधून घेतो. लक्ष्मीच्या फोटोची आरास रांगोळया काढून करतात. लक्ष्मीची पावले दाराबाहेरून पूजेच्या चौरंगापर्यंत काढतात. नवे अलंकार व नवे कपडे घालून सर्वच तयार होतात. साळीच्या लाह्या, बत्तासे, खोबरे नि या बरोबर दुसराही नैवेद्य करतात. मनोभावे लक्ष्मीची पूजा करून आरती करतात. पूजा होताच सगळीकडे फटाके वाजू लागतात. बालगोपाळांबरोबर मोठेही सामील होतात. आकाशात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी दिसते. प्रत्येकाच्या मनातील आनंद द्विगुणीत होतो.

कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा हाच दिवाळीचा पाडवा होय. अभ्यंग स्नानानंतर पत्नी पतीला ओवाळते. पती- पत्नीच्या नात्यातील हा एक रमणीय दिवस. व्यापारी लोक हा दिवस हिशोबासाठी नववर्ष दिवस म्हणून मानतात. याच दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता म्हणून श्रीकृष्णाचीही पूजा करतात. अजून एक प्रथा आहे ह्या दिवसाची. या दिवशी जुगार प्रेमी रात्री जुगाराचा डाव मांडतात नि पहाटपर्यंत जुगार खेळतात.

कार्तिक शुध्द द्वितीया म्हणजेच भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक. सासरी गेलेली बहीण ह्या दिवशी भावाच्या ओढीने माहेरी येते किंवा भाऊ मुद्दाम भेटण्यास जातो. पाटाभोवती छानशी रांगोळी काढून पवित्र मनाने औक्षण करते आणि परमेश्वराकडे त्याच्यासाठी दिर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊही प्रेमाने तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू, कपडे अथवा पैसे देतो. याच दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. याच दिवशी यम आपली बहिण यमुना हिच्या घरी जेवण्यासाठी गेला होता.
सख्खा भाऊ नसेल तर स्त्री चंद्राला आपला भाऊ मानून त्याला मन:पुर्वक ओवाळते.

अशी ही एकमेकांना शुभेच्छा देणारी दिवाळी नात्यांचे बंध जोडून, वाढवते. फराळ आणि मिठाईने गोड तोंड करून सर्वांचेच मन प्रकाशमान करते. प्रत्येकजणच वाट पहात असतो ह्या सुखमय दिवाळीची.

आपणा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

– अलका दराडे, नाशिक