मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

छत्रपती शिवरायांचा पोवाडा

करवीरनिवासिनी अंबामाता । जेजुरी गडच्या खंडोबाराया।
आदिशक्ती भवानी तुळजापूर गावा । पंढरपूरीच्या कानडया विठ्ठला ।
माहुरची रेणुका वेरूळच्या घृष्णेशा । गोदातटीच्या त्र्यंबकेश्वरा ।
प्रथम नमन तुम्हा सर्वांना । करीतो शाहीर विनम्र भावा ।
द्यावा आशीर्वाद तुम्ही मजला । शिवशाहीचा इतिहास गावया ।

पाऊणे चार शतकांच्या पूर्वी । महाराष्ट्र देशी पसरली होती ।
काळरात्र भीषण बहु मोठी । तीनशे वर्षांच्या गुलामीची ।
राजवट होती इथे सैतानांची जीजी ।…………१

अहमदनगरात निजामशाही । अदिलशाही होती विजापूरी ।
बादशहा मोगला जुलमी । होते दिल्लीत सत्ताधारी ।
महाराष्ट्र सापडला होता चक्रव्यूहात जी जीजी ।…………२

सुलतानी टोळधाड येई चोहोबाजूंनी । जाळपोळ लुटालूट होई ।
बाटवाबाटवीला ऊत येई । पोरीबाळी भ्रष्ट किती होती ।
जन्मला येणे वाटे शिक्षा मोठी जीजी ।…………३

नाईक, निंबाळकर, जेधे, मोरे । मोहिते, घोरपडे, आणि भोसले ।
मर्द मराठे शूरवीर । होते आपसात हाडवैर ।
चाकरी बादशहाची मानिती थोर जी जीजी ।………..४

संत एकनाथ पैठण नगरी । आदिशक्तीस करीती विनवणी ।
देहूचा तुकोबाराया । साकडे विठ्ठला घाली।
महाराष्ट्रभैरवी अंती प्रसन्न जाहली जी जीजी ।……….५

फाल्गुन वद्य तृतिया उगवली । सोळाशे तीस साली शिवनेरीवरी ।
आई शिवाईची कृपा झाली। पुत्रजन्म झाला गडावरी ।
माता जिजाबाईचेहो पोटी । नाव त्याचेच ठेवले शिवाजी जी जीजी ।……….६

दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली । दिसामासाने शिवबा वाढी ।
त्याने घोडेस्वारी तलवारबाजी । अल्पात आत्मसात केली ।
हरखून जाई जिजाई बाळलीलांनी ।…………७

तानाजी बाजी सूर्याजी । येसाजी त्र्यंबकजी सवंगडी सारे ।
खेळ खेळिती लढायांचे । उभारून किल्ले दगड मातींचे ।
भावी स्वराज्य साकारत होते जी जीजी ।…………८

शिवबाने जमवून सवंगडी । पालथा घातला अवघा सह्याद्री ।
गडकोट कडेकपा-या । चोरवाटा काढल्या शोधूनी ।
स्वराज्याच्या घेतल्या आणाभाका रायेश्वरी जी ।………..९

कानद खो-यात तोरणगड । अभेद्य बळकट घेतला जिंकून ।
स्वराज्याचे तोरण बांधियले । डागडुजी उत्खनन सुरू केले ।
जगदंबा पावली लक्ष्मीरूपाने जी जीजी ।……………..१०

विजापूर दरबार हादरला । अली अदिलशहा कोपला ।
जेरबंद करण्या शिवाजीला । खान अफजल सरसावला ।
विध्वंस करीत स्वराज्याचा आला क्रूरकर्मा जी जीजी ।…….११

शिवाजीने धूर्तपणाने खानास आणिले । जावळी खोऱ्यात ।
प्रतापगडी भेटीस बोलावुनी । पोटी तीक्ष्ण बिचवा खुपसूनी ।
खानास गाडले कायमचे थडगे बांधुनी जी जीजी ।………१२

संकटांची मालिका सुरू झाली स्वराज्यावरी । सिध्दी जौहर आला फौजेनिशी ।
राजांस अडकविले पन्हाळगडी । चार मास गडास वेढूनी ।
हुलकावणी शराणागतीची । देवूनी वकिलाच्याकरवी ।
गाफिल बनविले सिध्दी जौहरास जी जीजी ।…………१३

रातोरात सोडुनी पन्हाळगड । दुसरे दिवशी गाठला विशाळगड ।
वाटेत गजापूर खिंड । झुंजविली मर्द बाजीनं ।
प्राणार्पण करूनी तिला केली पावन जी जीजी ।………१४

इकडे लाल महालात । आला औरंग्याचा मामा । शाइस्तेखान बहादूर ।
एकलाखावर फौज । त्याने दिमतीस ठेवून । पुण्यभूमीची केली धूळधाण ।
स्वातंत्र्यासूर्याला लागले घोर ग्रहण ।…………१५

चैत्र शुध्द अष्टमीच्या रात्री । सोळाशे त्रेसष्ठ साली ।
शिवाजी राजाने संधी साधूनी ।
धाडसी छापा घातला महाली । हाताची बोटे तीन छाटूनी ।
खानास कायमला केला थोटका हो जी जीजी ।…………१६

मिर्झाराजे जयसिंहाच्याकरवी । औरंग्याने डाव खेळला ।
वाढदिवसाच्या कारणे आग-याला । बोलाविले शिवाजी राजाला ।
अवमान करूनी दरबारी कैंदेत टाकिले जी जीजी ।………..१७

आजाराजे सोंग वठवूनी । साधूसंतांना दानधर्म केला सुरू राजाने ।
मिठाईचे धाडूनी पेटारे । आशीर्वादाचा बहाण्याने ।
नाटक छान रंगविले आग-यात जी जीजी ।……….१८

वरचेवर पेटारे तपासून । गाफिल बनला फौलदखान ।
मोक्याची हीच संधी साधून । पलायन केले पेटा-यातून ।
दख्खनचा शेर निसटला तुरी देऊनी जी जीजी ।………१९

ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी । आली सोन्याच्या पाऊली । सोळाशे चौ-याहत्तर साली ।
आनंद नाम संवत्सरी । रायगडाच्या माथ्यावरी । वेदघोष घुमू लागले ।
महाराज शिवाजी छत्रपती जाहले ।……….२०

जिजाऊचे स्वप्न साकारले शिवाजी राजाने । चार पातशाह्या पार बुडवूनी ।
गरीब मावळयांची साथ घेऊनी । निर्मिले आनंदवनभुवनी ।
सव्वा तीन शतके लोटली त्यास जी जीजी ।……..२१

ऐसा अद्बूत जाज्वल्य इतिहास । लाभला महाराष्ट्रास ।
धन्य राष्ट्रमाता जिजाई । धन्य राजा शिवछत्रपती ।
गुणगान करावया त्यांचे । तोकडी आहे शाहीरी वाणी ।
मराठयांच्या मानबिंदूला । मानाचा विनम्र मुजरा ।
शाहीर विवेक करीतो त्रिवार जी जीजी ।…………२२
विवेक पुराणिक