चारोळ्या – कविता

कविता
काळीज भरभरून
सारखं लिहावसं वाटतं
इवलासा शब्द बनुन
कविता जगावसं वाटतं
– राजन पोळ
अस्तित्व
तुझं माझ्याजवळ असणचं
सुंदर आहे
नाहीतर! तुझ्याशिवाय
सुख दूर दूर आहे.
– राजन पोळ
प्रेम
साधं-सुधं असलं तरी
प्रेम केलं तुझ्यावर
चुकलं असेल कधी
राग नको माझ्यावर
– राजन पोळ
तू
खिडकीतून पाह्यलं
रातराणी फुलली होती
नुसत्या वासानेच तिच्या
तुझी आठवण झाली होती
– राजन पोळ
आयुष्य
आयुष्याचं ह्या
मला मोठं हसायला येतं
टिचभर पोटासाठी
काय काय करायला लागतं
– राजन पोळ
मुकप्रेम
आता मलाही जमतं
तुझ्या सारखं गप्प राहणं
काहीही न बोलता
नुसत्या डोळयांनीच प्रेम करणं
– राजन पोळ
प्रेमाचा कस
ठाऊक असता कानमंत्र काही,
तरीही तुला वश केलं नसतं
‘कस’ ठरवायचाय ना प्रेमाचा?
मग असलं ‘यश’ कामी येत नसतं
– राही साईराम
सत्य
स्वप्नांवर विचार करता करता
सत्य दूर दूर चालले आहे,
जाग आल्यावर स्वप्नं संपलेली,
आणि सत्य तरी कुठे ‘सत्य’ राहीले आहे?
– राही साईराम
शब्द
शब्दांनी कुणीतरी माझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे त्यामागची
भावना हवी होती
– राजेश कुलकर्णी
तुझंच
माझ्या मनात डोकावून बघ
तिथं फक्त तुझंच नाव दिसेल,
थोडं आठवणी जाऊन बघ,
तिथंही तुझ्याच नावाचं
एक गाव दिसेल.
– राजेश कुलकर्णी
देण
जिवनात मागण्यापेक्षा काहीतरी
देण्यात महत्व असतं
कारण मागितलेला स्वार्थ
अन् दिलेलं प्रेम असतं….
– राजेश कुलकर्णी
चारोळी
इथॆ प्रत्येक मनात एक चारोळी आहे
कुणाची प्रेमळ हाक तर कुणाची
आर्त आरोळी आहे…..
– राजेश कुलकर्णी
एकदा प्रेम वगैरे कवितेतून
एकदा थोडिशी भावूक होऊन पहा
माझ्या प्रेमाच्या पावसात भिजुन पहा
चिंब भिजल्याशिवाय
पावसाची मजा कळणार नाही
अन् रोम- राम भिजल्यावर सुध्दा
आडोश्याला उभं रहावसं वाटणार नाही
– राजेश कुलकर्णी
सुखात
सुखात सारेच सोबती काही
दुःखातही हवे असतात
एकटचं बसुन रडतांना
डोळे पुसणारेही हवे असतात
– राजेश कुलकर्णी
पियुष
अधरावरती अधर धरावे,
पियुष त्यातील चुबूंन घ्यावे,
बेधुंद होऊनी त्या धुंदीत,
हळुच शिरावे तुझ्या कुशीत
– उदय गोखले
बघता
बघता बघता माझं सारं
विश्वच तुझ्यात सामावलंय
आता कळतंय मला की,
माझं अस्तित्त्वंच मी गमावलंय
– मीनल जोगळेकर
मागणे
आजच्या दिवशी मला तुझ्याकडे एक मागणे मागायचे
माझ्या नावानंतर मला
तुझे नाव लिहायचे
– विभावरी खवळ
उगम
आयुष्याच्या मध्यावरती तुझा उगम झाला
आता पुर्वार्ध आठवत नाही, आणि उत्तरार्ध माहित नाही.
– संतोष माळणकर
हस्ताचा पाऊस
या जगात काही गोष्टींची बातच काही खास असते
म्हणूनच की काय…
एवढे जलाशय असूनही
चातकाला हस्ताच्या पावसाची आस असते
– संदीप बेडेकर
प्रेम
प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं
नजरेतून कळलं तरी,
शब्दांतून सांगावं लागतं…
– मंजुश्री लाड
शब्द
शब्दांतच सारं काही शोधू नकोस
नि:शब्द भावनाही समजून घे
कान बंद करून कधी तू
माझ्या अश्रुचे म्हणणे ऐकून घे
– अमीत गुगळे
दिवाळी
आली आली दिवाळी
लावू दारास तोरणे,
दिवाळीच्या दिव्याने
करू मन मोकळे
– वंदना मुसळे
प्रवासात
आयुष्याच्या प्रवासात
सगळयांनाच असते घाई
पण कोणाचा प्रवास संपता संपत नाही
तर…. कुणाचा सुरूच होत नाही
– राहुल सुदामे