ब्रम्हकमळ

फुल म्हटलं की पहिल्यांदा डोळयासमोर येतो तो फुलांचा राजा ‘गुलाब’. आपल्या वेगवेगळया रंगांनी आणि सुवासानी तो आपल्याला आकर्षित करतो. कोणत्याही फुलांनी केलेले सुशोभिकरण गुलाबाशिवाय पूर्णच होत नाही. गुलाब,ऑस्टर,निशिगंध,जाई-जूई,अबोली ही फुले आपण नेहमीच पाहतो पण काही फुलांबद्दल आपल्याला एक वेगळंच आकर्षण आणि कुतूहल असते. ‘ब्रम्हकमळ’ हेही एक असंच फुल. हे फुल आपल्याला सहजच कुठेही बघायला मिळत नाही. हे फुल खुप सुंदर असतं आणि ते बघायला मिळावे अशी ब-याच जणांची इच्छा असते. त्यामुळे ज्यांच्याकडे हे फुल येतं, ते त्या परिसरात प्रसिध्द असतात. ब्रम्हकमळ उमललं की ते पाहायला बरेच जण येतात.

त्यादिवशी ही असेच झाले. रात्रीचे बारा वाजले होते. गाढ झोपेत होतो. फोन खणखणला. मित्राचा फोन होता, “अरे अमोल, आमच्याकडे ब्रम्हकमळ आलंय. तुला फोटो काढायचे होते ना ? ” मी उत्साहाने कॅमेरा घेऊन निघालो. ब्रम्हकमळ हे फुल अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. पांढरेशुभ्र आणि मंद सुगंधाचं हे फुल पाहणे ही पर्वणीच होऊन जाते. हे फुल मध्यरात्री पूर्णपणे उमलते. फूल प्रत्यक्षात पाहून मी थक्क झालो. इतकं सुंदर फुल मी माझ्या कॅमे-यात टिपलं नसत तर नवल !

ब्रम्हकमळाचा पांढरा शुभ्र रंग आपल्याला पटकन आकर्षित करतो. हे फुल मोठं पण खूपच नाजूक असतं. या फुलाच्या मऊ मुलायम आणि काहीशा पारदर्शक पाकळया मन मोहून टाकतात. फुलाच्या मध्ये असंख्य पुंकेसर आणि त्याचे तंतू असतात या पुंकेसरांच्या मधोमध असतो कुक्षीवृंत. कुक्षीवृंताच्या टोकाशी असणा-या चांदणीसारख्या कुक्षी पण फुलासारख्याच वाटतात. ब्रम्हकमळ रात्री पूर्णपणे उमलतं, हे त्याचे मुख्य वैशिष्टय आहे. पूर्ण उमलल्यावर त्याचा मंद सुगंध सगळीकडे पसरतो. काहीजणांकडे या फुलालाच हळद-कुंकू वाहण्याची पध्दत आहे.ब्रम्हकमळ हे खरं तर मूळचं वाळवंटातलं फुल. याच नाव जेरूसलेम लीली किंवा बेथलहॅम लीली. ब्रम्हकमळ हा निवडुंगाचा एक प्रकार. या झाडांची पानं खोडात रूपांतरित होतात आणि त्यांनाच कळया येतात. फुलांचा देठ लाल रंगाचा असतो. हे
खोडच अन्न तयार करण्याचं काम करतं म्हणूनच ब्रम्हकमळाला शास्त्रीय भाषेत फायलोकॅक्टस किंवा एपिफायलम म्हणतात. वाळवंटात रात्रीचे तापमान थोडेसे थंड असते. त्यामुळे हे फुल रात्री उमलते. रात्रीच्या अंधारात लक्षात यावे म्हणून त्याचा रंग पांढरा असतो. हा रंग आणि मंद वास किटकांना आकर्षित करतो. पण जेरूसलेत लीली हे अनिवासी फुल खरं ब्रम्हकमळ नाही बरं का! काय आश्चर्य वाटलं ना! अहो, ज्या फुलाला आणि सगळे ब्रम्हकमळ म्हणून ओळखतो ते खरं ब्रम्हकमळ नाही. अस्सल ब्रम्हकमळ हिमालयात उगवंत. हे फुल झेंडू, शेवंतीच्या प्रकारातले असते आणि त्याचे शास्त्रीय नाव सॉसारिया लापा असे आहे. ब्रम्हकमळाची झुडपं साधारणत: एक मीटर उंचीची असतात. फुलांबरोबर या झुडपांची पानं पण सुगंधी असतात. ख-या ब्रम्हकमळाचं दर्शन खूपच मोहक असतं. खरं ब्रम्हकमळ दिवसेंदिवस खूपच दुर्मिळ होत चाललंय. त्यांचे जतन आणि संवर्धन होणं खूप गरजेचे आहे.

– अमोल आगवेकर, मुंबई