भिकारी – यतीन सामंत

‘भिकारी’ ही संकल्पना बहुदा शहरी असावी कारण शहरात वाढलेल्या कुणालाही भिकारी परका नाही. महानगराच्या महासागरात अखंड वाहणा-या आपल्याला एकवेळ देव भेटेल की नाही हे सांगणं कठीण आहे पण भिकारी भेटणार नाही असं देवाच्याही बाबतीत होणार नाही. भिकारी म्हणजे ज्याला भीक मागण्यावाचून निर्वाहाचा दुसरा पर्याय नाही आणि पर्यायाने इतर लोक उदार झाल्याखेरीज ज्याचं उदरभरण होणार नाही असा. भिकारी हा आपल्या दैनंदिन शहरी वातावरणाचा जसा अपरिहार्य भाग असतो तसाच तो माझ्या लेखाचा आहे. भारतवर्षाच्या सुवर्णयुगी पूर्वकाळात भिक्षेला सात्विक स्वरूप होतं. जिथे भिक्षुक असायचे, माधुकरी मागून जेवणारे विद्यार्थी असायचे आणि मुंजीत बटूला समारंभपूर्वक ‘भिकेला लावणं’ हा तेव्हाही एक सर्वसामान्य प्रकार असावा. या भीक मागण्यामध्ये सन्मान नसला तरीही त्याला एक सात्विक प्रतिष्ठा असायची कारण हे भीक मागणारे एकतर विद्यार्थी किंवा गरीब विद्ववान असायचे. आता सुवर्णयुग धूर होऊन विरून गेल्यावरही ”भोकं गेली पण काम उरलं” या न्यायाने भिकारी आजही आहेतच.

माझ्या लहानपणी भिकारी प्रामुख्याने देवळापुढे किंवा ठराविक (गर्दीच्या) जागीच रेल्वेस्टेशन, मुबंई इ. असत. हल्लीच्या युगात जिथे गोळी, सिगारेट, मासिकांसारख्या अनेक गोष्टी विकल्या जातात, ट्रफिक स्गिनलला (Traffic Signal) तिथे भिकारीही आपली शैली बदलून थांबलेल्या गाडयांच्या काचावर टिचकी मारून आपले लक्ष वेधून घेण्याइतके धीट व तरबेज झाले आहेत. पूर्वी लोकल ट्रेनमध्ये नवीन हिंदी सिनेमातील गाणी भसाडया व अनुवंशिक आवाजात गाऊन भीक मागितली जायची. अगदी वीट येईपर्यंत गाण्याची वाट लावली जायची. मग ”भीक नको, कुत्रा आवर”च्या चालीवर ‘भीक देतो पण गाणे आवर’ म्हणून भीक दिली जायची.

पूर्वी भीक हा देण्याचा प्रकार आहे आज तो घेण्याचा प्रकार झाला आहे म्हणजे पूर्वी किती भीक द्यायची हे आपल्या इच्छा-ऐपतीनुसार ठरायचं. आज पैशाचं मूल्य घसरतांना किती किमान भीक योग्य आहे हे भिकारी ठरवतात. त्यामुळे अमुक अमुक पैशांच्याखाली भीक घेत नाही असं ठणकावून सांगणारा भिकारी भेटला तर आश्चर्य वाटू नये. एकदा पुण्यात रस्त्यावरून जाताना झाडाखाली एकानं मला हटकलं थोडक्यात आपली दशा वर्णन करून चहासाठी पैसे मागितले. मी पाच रूपये काढून दिले तर, “आम्ही पाच लोक असल्याने इतके पुरेसे नाहीत” असं सांगून बेदरकारपणे माझे पैसे परत केले. जणूकाही त्यांच्या ‘चहापान’ कार्यक्रमाचा मी पुरस्कर्ता (sponser) होतो.

या मानसिक द्वंद्वयुध्दातून सुटका करून घ्यायला मी एक पर्याय काढला. मी फक्त म्हाता-या भिकारीच्या बाबतीत उदारपणा दाखवतो. बाकीच्या भिका-यांसाठी (तसेच एअरपोर्टवरून परत येतांना अंगावर कोसळणा-या अनाहूत टॅक्सीवाल्यांच्या झुंडीसाठी) मी नम्रपणाने हात जोडून पुढे होतो. हल्लीच्या जमान्यात ‘छुट्टा नही है-आगे जाओ’ असं म्हणायची सोय उरली नाही’. कदाचित तो भिकारीच ‘मेरे पास छुट्टा है- आपके काम आयेगा’ असा बेमुर्दतखोरपणे म्हणून चक्क एक रूपया माझ्याच खिशोळीत म्हणजेच खिशाच्या झोळीत घालायचा.

पूर्वी ज्यांना उदरनिर्वाहाची अगतिकता असायची ते भिकारी व्हायचे. आज भरभराटीला आलेला भाईगिरीचा व्यवसाय एक समर्थ पर्याय म्हणून पुढे आल्याने आजच्या भाईने न जाणो उद्या भाई म्हणून नशीब काढलं तर निदान माझा नमस्कार लक्षात राहून आपला हात मला दाखवणार नाही. म्हणून माझ्या नम्रतापूर्वक हात जोडण्याला भविष्यकालीन तरतुदीची झालर असते. तसा भाईगिरीचा नि भिकारीगिरीचा एक व्यावसायिक संबंधही आहे. भिकारी प्रत्यक्षात भीक मागतात तर भाईचे संबंधित बांधव मोबाईल नि फोनचा वापर करतात इतकाच फरक. नशीब काढण्यावरून लक्षात आलं कुठेतरी वाचण्यात आलं होतं की अमुक अमुक ठिकाणचा भिकारी मेला तेव्हा त्याच्या गाठोडयामध्ये म्हणे (भीक मागून) साठवलेलं बरच धन मिळालं. पण कंजूषवृत्तीने पै-न-पै साठवून आपल्या जीवनात नाही स्वत:ला, नाही जवळच्या इतर कुणाला ते लाभू देणा-या, धनावर बसलेल्या या पंपूशेटांमध्ये नि या ‘श्रीमंत भिका-यांमध्ये’ फरक काय आहे ?
पैशाची नाहक उधळमाधळ असू नये, त्याचा विचारपूर्वक विनियोग करणं, भविष्यकाळाची तरतूद करणे हे शहाणपणाचं लक्षण आहे. पण भविष्यकाळात मिळावं म्हणून आवश्यक बाबतीतही जीवाला नको इतका चिमटा घेण्याने त्या जमलेल्या पैशाचा आपल्याला मेल्यानंतर तर उपयोग होत नाही, पण जगण्यासाठीही जर त्या धनाचा उपयोग होणार नसेल तर मग ते कमावण्याचा उपयोग काय?

काही महाभाग यांच्या अगदी विरूध्द टोकाचे पण तितकेच करंटे असतात. कंजूष मंडळीना चिंता असते, पैसा खर्च होईल म्हणून तर या मंडळींना पैसा जास्त कसा मिळेल याची! जुगा-याच्या आज्ञेसारखी यांची हाव कधी संपत नाही वा सुटत नाही. मग वाळवंटातल्या मृगजळासारखं ही माणसे अधिकाधिक पैशासाठी धावत सुटतात. एक रशियन गोष्ट लहानपणी ऐकली होती. एका राजाने एका शेतक-यावर खुष होऊन सांगितलं की आजच्या दिवसात तू जेवढी जमीन चालशील तेवढी मी तुझ्या नावाने करून देतो. शेतकरी बिचारा जास्तीत जास्त जमिनीच्या आशेने दिवसभर झपाझप चालत राहिला न खातापिता, न थांबत. दिवस अखेरीस आपल्याला आणखी थोडी जमीन मिळावी या हावेपोटी तो धावत सुटला, इतका की शेवटी दिवसभराच्या श्रमाने तो कोसळला व तत्काळ मृत्यु पावला. अखेर त्याच्या देहाने व्यापलेली केवळ साडेतीन हात जमीनच त्याला पुरेशी होती. आयुष्यभर हावेच्या पाठी धावणारे, हे लालसेने ग्रासलेले नि आयुष्यात कितीही धनसंपदा पाठीशी असली तरी समाधान न पावणा-यांच्यात नि रस्त्यावरच्या भिका-यांत फारसा फरक तो काय? एकाची शारीरिक/तात्कालीक गरज आहे तर दुसं-याची (अखंड) मानसिक गरज! यामुळेच भिकारीपण हे केवळ सांपत्तिक स्थितीच द्योतक असण्यापेक्षा जास्त ती एक मानसिक अवस्था आहे.

जनतेच्या पैशाची वैयक्तिक स्वार्थापायी उधळ माधळ करून आपल्या राज्याला किंवा राष्ट्राला भिकेला लावणार राजकारणी येतात. किंवा व्यवस्थित पगार घेऊनही ‘टीपेला लावलेले किंवा टीपेच्या सुरात’ भीक मागणारे (टीप मिळण्याची अपेक्षा असणारे) जसा भिका-यांचा ससेमिरा आपण जाऊ तिथे असतो. तसेच या ‘टीपिकल लोकाचं असतं’ अगदी आपल्या पैशावर टपलेले असतात. अगदी तोंडावरच्या हास्यासकट डोंगळयासारखे चिकटलेले. काही देशात (अपेक्षेनुसार) टीप न देणं हा जणू काय गुन्हा असल्यासारखी हिस्त्र नजर व शिव्यांची भरघोस टीप मिळते. हुंडा मागून आपल्या मुलाची हुंडी वटवण्याची महत्वकांक्षा बाळगणारे व आपल्या हाकेनुसार न मिळाल्याने आपल्याच सुनेच्या आयुष्याची माती करणा-या अल्पमतींना भिकारीसुध्दा आपल्या कळपात सामील करण्याच्या विचाराने शहारतील.
काही असतात वेळेचे भिकारी ज्यांच्याकडे साधन संपत्ती असते, शिक्षण विचार असतात, इच्छा असते पण (त्यांच्या समजूतीप्रमाणे) वेळ नसतो. पण आपल्या माणसांसाठी, स्वत:साठी किंवा स्वास्थ-समाधानासाठी वेळ नसेल तर आयुष्यामध्ये दुसरं असं काय आहे ज्यासाठी वेळ घालवणं जास्त महत्वाचं आहे! काही लोक शब्दांचे भिकारी असतात ज्याचा सढळवापर दुस-यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकेल. कुणाच्या चेहे-यावर हास्याची लय, कुणाच्या मनावर समाधानाची साय पसरू शकेल. पण ज्याचा आपल्याला कधीच खर्च नाही असे गुणी शब्दही आपण सहजपणे नि जिथे आवश्यक तिथे वापरत नाही. एवढया शब्दकंजूषीने आपल्या भविष्यकाळाची तरतूद कधी होत नाही. मग का बरं आपण कुणाच्या मग का बरं आपण कुणाच्या मनावर फुकंर घालणारे, कुणाला उमेद देणारे, कुणाला मोहोवून टाकणारे मोरपिसांचे शब्द वापरत नाही. मग आयूष्याच्या वाळवंटात आपल्यावर माणुयकीचा पाऊस पडला नाही तर आपण दोष कुणाला देणार?

भौत्तिक किंवा लैकिक अर्थाने आपण संपन्न नसलो तरी मनाचं किवा माणुसकीच दारिद्रय न येऊ देणं हे आपल्याच हातात आहे.’परिस्थितीजन्य भिकारीपण’ ही अवस्था तुम्ही कदाचित ऐकली नसेल पण ती असणं शक्य आहे जेव्हा संपत्ती हाताशी असूनही निरूपयोगी असते. जेव्हा हाताशी असलेली सारी साधनसामुग्री मृत्युशय्येवर झुंजणा-या आपल्या प्रिय व्यक्तीच्या घडपडीत कामी येत नाही, तेव्हाचा असहय्यपणा, अगतिकता तुम्ही कधी अनुभवली असेल तर आपल्या सा-या संपदेला फोलपणा नग्न करून आपल्याला ख-या अर्थाने कंगाल अवस्थेची अनुभूती देणारा असा निर्णायक दु:खद क्षण आपल्या आयुष्यात कधी येऊ नये….पण येऊ शकतो याची तुम्हाला कल्पना असेल. असेच परिस्थितीजन्य भिकारीपण, इतरवेळा चांगल वर्तन करणारे आपण काही परिस्थितीत वा मनस्थितीत का कुणास जाणे मनाचं किंवा विचाराचं दारिद्रय दाखवतो तेव्हा येत.

आपल्या मराठी भाषेतलं भिकारीपणावरच्या म्हणीचं दालन कितीतरी समृध्द आहे. भिकेचे डोहाळे लागण्यापासून ते भिकेला लागण्यापर्यंत नि ”भीक नको पण कुत्रा आवर” यापासून कशालाही ”भीक न घालण्यापर्यंत” भाषेच्या झोळीत बरीच भिक्षा आहे. या सर्व भिकारी अवस्थेतही काळजाला जास्त हात घालणारी नि आयुष्यात ‘अनंत काळची’ पोकळी निर्माण करणार अवस्था आयुष्यात आईच्या नसल्याने येते. कवी यशवंतांचे बोल याबाबतीत फार अर्थकारी आहेत. ”स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”. तुमच्याकडे नोकर – चाकर, घर-गाडी, पैसा-अडका, जमीन-जुमला भलेही, खुप असेल पण आपली माणसं, आपली आई आपल्याबरोबर नसेल तर हा सारा व्याप, प्रपंच, असून नसल्यासारखाच आहे. अगदी हात लावल्यावर सा-या (सजीव) गोष्टी सोन्याच्या (निर्जीव) पुतळयात परिवर्तीत करू शकणा-या बिचा-या मिडास राजासारख्या!

– यतीन सामंत, बंगलोर