पुनर्जन्माची खरी अनुभूती: अवयवदान

avayavadana कल्पना करा आपल्या पूर्ण शरीराची किंमत किती असू शकेल? आपला एखादा किंवा अनेक अवयव नादुरुस्त झाले तर? दोन्ही किडन्या निष्क्रिय झालेल्या किंवा अपघातात हात वा पाय गमावलेल्या व्यक्तीला विचारा. किंवा स्वतः अपघातातून सुखरूप वाचल्यानंतर काय वाटते याचे विश्लेषण करा. आपण स्वतःला नशीबवान समजतो. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या शरीराची किंमत कळते. देवाने आपल्याला पुनर्जन्म दिला असं आपण मानतो. तर हे इतकं मौल्यवान शरीर आणि त्याला अर्थ देणारे, त्याला चालवणारे आपले अवयव यांच मृत्यूपश्चात काय होते? प्रत्येक धर्माच्या प्रथेनुसार मृत मानवी देहाची ‘विल्हेवाट’ लावली जाते. इथेच आपण आपली किंवा जिवलगांची पुनर्जन्माची संधी हिरावून घेतो. होय….मृत्युपश्चात पुनर्जन्म शक्य आहे. अवयवदानाच्या माध्यमातून! आपला अवयव किंवा पेशी एखाद्या गरजू व्यक्तीचे जीवन घडवते त्यात आपलही योगदान ठरत. मरुनही जगण्याची सुवर्णसंधी आणि कोणालातरी जगण्याचं बळ दिल्याचा आनंद, पुण्य पदरात पडून घेण्याइतकं सुख नाहीच!

भारतात अवयवदानाची गरज आणि परिस्थिती

दरवर्षी शेकडो लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडतात. कारण प्रत्यारोपण करण्यासाठी लागणाऱ्या अवयवांची कमतरता.

 • देशात जवळपास १.५ लाख लोकांना किडनीची गरज आहे. पण फक्त ३००० लोकांनाच किडनी मिळणे शक्य झाले आहे.
  ३० पैकी फक्त १ व्यक्तीला एक किडनी मिळते.
 • ९०% लोक अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात.
 • भारताची वार्षिक यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे २५०००; पण प्रत्यारोपण केले गेले फक्त ८०० जणांवर!
 • ७०% यकृत प्रत्यारोपण जिवंत व्यक्तीच्या यकृतदानामुळे शक्य होते तर उरलेले ३०% मात्र मृत व्यक्तीच्या यकृतदानावर अवलंबून राहावे लागते.

अवयवदात्यांच्या कमतरतेची कारणे

 • माहिती नसणे. आपल्या देशात अवयवदानाविषयी फारशी माहिती माही. सध्याच्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की लोक यासाठी तयार असतात; पण त्यांना त्याबद्दल योग्य माहिती न मिळाल्याने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहते.
 • मृत्युपत्रात अवयवदानाची नोंद न करणे.

गैरसमज

 • मी अवयवदान करण्यासाठी खूप वृद्ध आहे. डोळ्याचे पडदे, काही पेशी यांच्या उपयुक्ततेवर वयाचा कोणताही परिणाम होत नाही.
 • माझे अवयव गरजू व्यक्ती जी प्रतीक्षेत आहे तिला न देता श्रीमंत व्यक्तीला देण्यात येतील. अवयवाची गरज असलेली प्रत्येक व्यक्ती समान असते. याठिकाणी कोणाचाही दर्जा, श्रीमंती यावरून अवयव प्रदान न करता प्रतीक्षा यादीतील क्रमानुसारच सगळी पूर्तता केली जाते.
 • माझा धर्म अवयवदानाला मान्यता देत नाही. कोणत्याही धर्मात अवयव दान करू नये, असे म्हटलेले नाही.
  जर माझा मेंदू मृत घोषित झाला असेल तरी माझी पूर्वीप्रमाणे आयुष्यात येण्याची, बरे होण्याची शक्यता असते. असे होऊ शकत नाही.
 • एकदा मेंदू मृत झाला की व्यक्तीला कृत्रिम श्वसन प्रणालीवर जिवंत ठेवले जाते. त्यामुळेच व्यक्तीच्या शरीरात रक्ताभिसरण चालू असते. ही प्रणाली बंद करताच व्यक्तीच्या हृदयाचे ठोके काही मिनिटात बंद पडतात.

अवयवदानासाठी आपण काय करू शकतो?

यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. आपल्या पेशी, अवयव आपण दान करू शकतो. काही बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे व्यक्तीचा मृत्यू कुठे, कसा झाला, त्याचे अवयव, पेशींची सद्यस्थिती कशी आहे?

आपले वय, वैद्यकीय इतिहास पाहून आपण अवयवदानासाठी खूप लहान किंवा वृद्ध आहोत हा (गैर)समज आहे. आपल्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपली इच्छा आधीच व्यक्त करून अवयवदानासाठी नोंदणी करणे गरजेचे ठरते.

अवयवदानासाठी नोंदणी कशी करायची?

 • Donor Card डाऊनलोड करा. त्यातील माहिती भरा आणि ते सतत सोबत ठेवा.
 • त्यानंतर प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करा. त्यातील माहिती भरून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवून द्या.
 • आपल्या कुटुंबियांना आपल्या निर्णयाबद्दल माहिती द्या.

याशिवाय www.donatelifeindia.org या संकेतस्थळावर अवयवदानाविषयी तुमचे प्रश्न, शंका विचारू शकतात. याठिकाणीही तुम्ही आपली नोंदणी अवयव दानासाठी करू शकता.

संदर्भ – www.donatelifeindia.org

– विशाखा एस. ठाकरे