नाटक – अवघारंग एकचि झाला

avagha rang ekachi jhalaनाटयसंपदा या संस्थेचे ‘अवघा रंग एकचि झाला’ हे नाटक १५० प्रयोगांचा टप्पा पार करून पुढे वाटचाल करीत आहे. मराठी नाटय अवघारंग एकचि झाला रसिकांना दर्जेदार नाटके सादर करून आनंद देण्याची नाटयसंपदाची परंपरा या नाटकानेही पुढे चालू ठेवली आहे. नाटयसंपदाची जबाबदारी श्री. पणशीकरांनी त्यांचे पुतणे श्री. अनंत पणशीकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतरचे हे पहिलेच नाटक. निर्माते श्री. अनंत पणशीकर याची पहिलीच निर्माती लोकप्रिय झाली आहे.

डॉ. मीना नेरूरकर या नाटकाच्या लेखिका आहेत. मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी त्यांची मुलाखत यापूर्वीच प्रसिध्द झाली आहे. मराठी संगीत नाटके आवडणारे प्रेक्षक या नाटकावर खूष आहेत. नाटकातील गाणी व संवाद परिणामकारक झाले आहेत.
अप्पा वेलणकर (प्रसाद सावकार) हे एक किर्तन करणारे गृहस्थ. त्यांच्या कुटूंबात घडणारे प्रसंग या नाटकात आहेत. आपल्या किर्तनावर, पारंपारिक रचनांवर प्रेम करणार्‍या अप्पांना नव्या पिढीचे विचार पटत नाहीत. त्यांची मुलगी मुक्ताला परजातीय तरूणाशी विवाह करायचा अवघारंग एकचि झाला आहे. त्यांचा मोठा मुलगा ज्ञानेश अमेरिकेत आहे. नाटकात त्यांचा दुसरा मुलगा सोपान (अमोल बावडेकर) तरूण पिढीचे प्रतिनिधीत्व करतो. त्याला आपले जुने संगीत नवीन पध्दतीने जतन करायचे आहे. त्याला त्यात आजच्या पिढीचे बदल करायचे आहेत. तो अप्पांना आपले विचार पटवू शकत नाही.

आपल्या किर्तनाच्या सीडी, कॅसेट्स तयार करण्यासही अप्पा सोपानला नकार देतात. दोन पिढयांतील हे मतभेद नाटकात अनेक नाटयपूर्ण प्रसंगात दिसतात. या घरात अमेरिकेहून जेनी नावाची मुलगी (स्वरांगी मराठे) येते. तीच्या येण्याने या कुटुंबातील प्रत्येक जण आनंदात आहे. तीला या घरातील मतभेद असह्य होतात. तीच्याच प्रयत्नाने अप्पा मुक्ताच्या विवाहास संमती देतात.

अप्पांची पत्नी (जान्हवी पणशीकर), अप्पांचे मित्र नाना (गौतम मुर्डेश्वर) ही नाटकातील अन्य पात्रे. नाटकातील सर्व कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. प्रसाद सावकार यांनी अप्पांची व्यक्तीरेखा छानच साकारली आहे. अमोल बावडेकर यांनी सोपानची भूमिका प्रभावीपणे केली आहे. त्यांची गाणीही प्रेक्षकांना आवडतात. स्वरांगी मराठेची जेनी या नाटकाची महत्वपूर्ण व्यक्तीरेखा आहे. स्वरांगीने अमेरिकेहून आलेल्या मुलीचे उच्चार, अभिनय उत्तम साकारले आहेत. स्वरांगीचे गाणे प्रेक्षकाच्या विशेष पसंतीस उतरते. नाटकातील गाणी छानच झाली आहेत. नाटकाचे दिग्दर्शन श्री अशोक समेळ यांनी केले आहे तर संगीत दिग्दर्शक आहेत श्री.रघुनंदन पणशीकर.

मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा संगीत नाटक आले आहे आणि त्याला आजच्या पिढीच्या प्रेक्षकांचीही चांगली दाद मिळत आहे.

– सुनील कुलकर्णी