प्रत्येकाच्या आयुष्यात तारूण्याच्या टप्प्यावर पडणारा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मोठं झाल्यावर आपण कोण होणार आहोत हा असतो. यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय व कशासाठी करायचं आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे सर्वात महत्वाचे. याचा निर्णय जितका स्वत:च्या विचाराने व जबाबदारीने घेतला जाईल तितका तो तडीस जाण्याची शक्यता अधिक. असे कार्यक्षेत्र निवडतांना ते आपल्याला मनाजोगे, मनाला समाधान देणारे व बुध्दीला आव्हान देणारे असावे. शक्यता आहे की काही संधी व क्षेत्रे मोहमयी, आर्कषक, लठ्ठ पगार देणार्या वाटतील. पण स्वत:ला प्रश्न विचारणे महत्वाचे की मला आयुष्यभर हेच करणे आवडेल का? माझ्या आवडीच्या इतर अनेक गोष्टी करण्यासाठी यात मला वेळ मिळेल का?
आयुष्याच्या अशा वळणावर जर आपल्याला शेतीपासून अवकाशापर्यंत केवळ एका ध्येयासाठी आपलं आयुष्य उधळलेली आभाळापेक्षा मोठी माणसं व त्यांनी उभे केलेल्या विश्वामध्ये जर डोकाऊन पाहाण्याची संधी मिळाली तर?
आजच्या तरूणाईला पूर्वी कधीही नव्हत्या एवढया असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण जर विचारांना योग्य दिशा नसेल तर अशा परिस्थितीत भांबावण्याची शक्यता अधिक. वास्तवतेचं भान ठेऊन सर्वच तरूणांनी कळत्या वयात वेगवेगळे अनुभव प्रत्यक्ष घेत आणि स्वत:चा शोध घेत, स्वत:बरोबरच समाजाच्या व देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत न्यावा या हेतुने डोबींवलीच्या अण्णासाहेब भुस्कुटे विचार मंच या संस्थेने दिड वर्षापूर्वी एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला. यामध्ये पहिल्या वर्षी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून, प्रामुख्याने महाविद्यालयीन, शंभर युवक-युवतींना मुलाखतीद्वारे निवडले गेले. संपुर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मुलभूत कार्य करणार्या व्यक्ति व संस्थांची भेट या युवकांना घडणार होती. शुभदा व विक्रांत भुस्कुटे यांच्या कल्पनेतुन साकार झालेल्या दोन आठवडयाच्या अभ्यास दौर्याचे नियोजन अतिशय काटेकोर व अर्थपूर्ण होते. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला एक महिना आधी एक फाईल घरपोच पाठवली गेली. त्यामध्ये संपुर्ण दौर्याची प्रत्येक तासागणिक कार्यक्रम पत्रिका, ज्यामध्ये संपुर्ण दौर्याची प्रत्येक तासागणिक कार्यक्रम पत्रिका, ज्या संस्थांना भेटी देणार त्यांच्या कार्याची माहिती, प्रत्येकाचे गट व त्या गटातील इतर सहभागी विद्यार्थ्यांची नावे, फोन नंबर व पत्ता, त्या गटाला दिलेला अभ्यासाचा विषय आदि सविस्तर माहिती त्यामध्ये दिली होती.
प्रत्येक संस्थेच्या व व्यक्तिच्या कार्याची ओळख प्रत्यक्ष स्थळांना भेटी देऊन त्याच्यांशी झालेल्या संवादातून साधली गेली. या दौर्यामध्ये टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेस, बाबा आमटे यांचे आनंदवन व सोमनाथ येथील कार्य, डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प, डॉ. अभय व राणी बंग यांचे गडचिरोलीचे ‘शोधग्राम’, औरंगाबाद येथील वहान निर्मिती कारखाना, अहमदनगर येथील मिलीटरीचे आर्मर्ड कोर सेंटर ज्यामध्ये सैनिकांना रणगाडा प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे अण्णा हजारे यांचे राळेगणसिध्दीचे पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्य, पुणे येथे विद्यापीठ परिसरातील अवकाश विज्ञान संस्था ‘आयुका’, फिल्म व टेलीव्हिजन इन्स्टीटयुट सांगली येथील आधुनिक पध्दतीने फुलशेती करून रोज एक लाख फुलांची निर्यात करणारा ‘श्रीवर्धन’ फार्म, कोल्हापूर’ची ‘वारणा डेअरी’, देवरूखची मातृमंदिर संस्था याबरोबरच अंतिम टप्प्यात विक्रांत युध्द नौका भेट असा भरगच्च कार्यक्रम होता. याबरोबरच औरंगाबादला दौलताबादचा किल्ला व वेरूळ लेण्यांना भेट, गुहागरला समुद्र किनारा सहल, चिपळुणला ट्रेकिंग तसेच संगीत रजंनी व कॅम्प फायर असा विरंगुळा देखील होता.
प्रत्येक गटाला दिल्या गेलेल्या विषयावर दौर्याच्या शेवटी प्रबंध सादर करायचा होता. त्यामध्ये मुल्य, कला, शेती, पर्यावरण, जागतिकीकरण, स्त्रियांचे कार्य तसेच शिक्षणाशी निगडीत विषय देण्यात आले होते. मान्यवरांशी झालेला मनमोकळा संवाद, त्याच्या कार्याची जवळून झालेली ओळख याबरोबरच त्यांच्या मौलिक विचारांची शिदोरी प्रत्येकाला मिळाली. या दौर्यातून मिळालेली सकारात्मक उर्जा प्रत्येक सहभागी व्यक्तिला जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोन देणारी, त्याचे आयुष्यातील ध्येय ठरविण्यासाठी नक्कीच मोलीची ठरली असेल यात शंका नाही.
या सर्व आधुनिक तिर्थरूथळांची यात्रा करण्याचा योग मलाही मिळाला ही मी माझी पुण्याईच समजतो.
हा अनुभव पुन्हा घेण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध केली आहे. यावर्षी अशाच प्रकारच्या दौर्याचे आयोजन १२ ते २५ नोव्हेंबर २००९ दरम्यान गुजरात राज्यात केले आहे. यामध्ये अमुल, टाटांचा नॅनो कार प्रकल्प, सरदार सरोवर प्रकल्प, साबरमतीला दांडी स्थळ, गिर अभयारण्य, एक महत्वाचे बंदर अनेक ठिकाणांच्या भेटीचा समावेश आहे.
या प्रवासात तुमचे सहप्रवासी असणार आहेत तुमच्यासारखे प्रयोगशील, नाविन्याबद्दल कुतूहल असणारे, वेगवेगळया पार्श्वभूमीमधुन येणारे अनेकजण या संपूर्ण सामाजिक उपक्रमाचे आणखी वैशिष्ठय म्हणजे हा अनुभव सामान्यांबरोबरच विशेष व्यक्तिंना (ज्यामध्ये अंध, अपंग यांना) पण संधी दिली जाते. अशा अनोख्या सामाजिक कार्याची योग्य जाण व निकड ओळखून आय.आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चर्स या संस्थेनी आर्थिक पाठबळ उपलब्ध केल्यामुळे अतिशय वाजवी खर्चात ही यात्रा सर्वसामान्यांच्या आवाक्यातील झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २००९ आहे.
तारूण्याच्या या वळणावर हा दुर्मिळ योग चुकवू नये असाच आहे.
”स्वत: पलिकडे पहा व आपल्याला लाभलेला ठेवा समाजाकडून आलेला आहे, तेव्हा तो समाजापर्यंत परत पोहोचवण्यासाठी कार्यरत रहा.- ” हा पुण्यकर्म्यांच्या कार्यातून मिळणारा संदेश खुप मोलाचा आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. डॉ. विंदा भुस्कूटे
अध्यक्ष – विचारमंच
मातृमंदिर, डोबिंवली (पू)
दुरध्वनी – ०२५१-६४५३६४५
भ्रमणध्वनी – ९३२३२३२५३५
www.aarohan-vicharmanch.org
– अजित बर्जे, नाशिक