अमेरिकेतील बालसंगोपनाचा अनुभव

मुलीच्या दोन बाळंतपणाच्या निमित्ताने अमेरिकेत सहा-सहा महिने वास्तव्य झाले. त्यावेळी गर्भारपण, प्रसूती, बाळाला तिसर्‍या दिवशी घरी आणल्यानंतर बाळाची काळजी, आई-वडील, त्यांचे सहकारी व मित्र यांची वागणूक, समाजाकडून मिळणारी मदत, बाळाच्या आजाराच्यावेळी केला जाणारा औषधोपचार, त्यासाठी उपलब्ध असलेली विविध उपकरणे, मुलांना वाढवितांना त्यांच्या मानसिकतेचा विचार, अशा अनेकविध गोष्टींशी जवळून संबंध आला. अमेरिका म्हणजे केवळ श्रीमंती, तंत्रज्ञान मात्र एकत्र कुटूंबपध्दती, कुटूंबाचे प्रेम याचा काही संबंधच नाही अशी अजूनही अनेकजणांची समजूत आहे. पण ही समजूत प्रत्यक्ष अनुभवाने पुसली गेली. त्या अनुभवांचा इतरांनाही लाभ मिळावा म्हणून हा लेखप्रपंच.

लग्न झाल्यावर (किंवा लग्न न करता एकमेकांजवळ वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर) मुलांची काळजी घेण्याजोगी आर्थिक व्यवस्था उपलब्ध झाली की अपत्याबाबत विचार सुरू होतो. ”लग्न होऊन इतकी वर्षे झाली अजून मूल कसे नाही?” अशी विचारणा कोणी उपस्थित करीत नाहीत. त्यामूळे वयाच्या ३५ किंवा ३७ व्या वर्षी पहिली गर्भधारणा हे वय कुणाला खटकत नाही. गर्भधारणा झाल्यावर वेळोवेळी विविध चाचण्या, सोनोग्राफ्री, बाळाची लिंग निश्चिती या गोष्टी नियमितपणे पार पाडल्या जातात. प्रसूतीचा काळ जवळ येत चालला की नवरा-बायको दोघांनाही प्रत्यक्ष प्रसूती कशी होते, त्यावेळी काय करायचे, नवर्‍याने कशी मदत करायची यासंबंधी तीन-चार लेक्चर्स व प्रात्यक्षिके दाखविली जातात. प्रसूतीच्यावेळी नवर्‍याने उपस्थित राहून बाळाच्या जन्मासाठी स्त्रीला मदत करण्याला उत्तेजन दिले जाते. याचा मोठा फायदा म्हणजे बाळाच्या जन्मामध्ये वडिलांचाही सहभाग हा एक व दूसरा म्हणजे बाळंतपणाच्या प्रत्यक्ष वेदनांचा जवळून अनुभव आल्याने वडिलांचा पत्नीच्या बाबतचा आदर व प्रेम वाढणे. जन्मानंतर अर्भकाला आंघोळ घालणे, बाळाची नाळ कापणे, बाळाचे कपडे बदलणे, डायपर बदलणे या गोष्टीही तिथेच वडिलांना करायला लावतात. काही पुरुषांना मानसिक दृष्टया प्रसूतीचा अनुभव घेणे शक्य नसते. काहींना घेरी येते. अशावेळी नर्सेस काम करतात.

स्तनपानाचे महत्त्व या समाजाने पूर्णत: मान्य केलेले असून हॉस्पिटलमधे असतानाच तज्ञ नर्सेस येऊन बाळाला कसे पाजायचे याची माहिती देतात. अर्भकाला मातेजवळ धरून बाळाने पहिले स्तनपान करण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. बाळाला स्तनपानासाठी कसे धरायचे, दुधाने भरलेल्या स्तनांमुळे बाळाला श्वास घेणे कसे अवघड होते. खूप वेळ त्या स्थितीत धरल्यास आईलाही कसा त्रास होऊ शकतो या बारीक सारीक गोष्टींसंबंधी व्हिडिओ फिल्मही दाखवितात. अर्भकाने केलेल्या पहिल्या स्तनपानामुळे उजळलेले आई-वडिलांचे चेहरे म्हणजे पालकत्वाच्या जबाबदारीतील एक मोठे पाऊल उचलल्याचे समाधान असते.

बाळ-बाळंतीण शारिरीक दृष्टया व्यवस्थित आहेत असे पाहून तिसर्‍या दिवशीच त्यांना घरी पाठविले जाते. स्तन दुधाने भरले व बाळ अजून स्तनपानाला सरावले नाही ही अडचण बर्‍याच वेळी येते. स्तनातील दूध काढण्यासाठी हॉस्पिटलमधून ब्रेस्ट पंप भाडयाने मिळू शकतात. दूध वेळीवेळी काढून बाटल्यांमधे भरून रेफ्रिजरेटरमधे ठेवले जाते व आवश्यकतेनुसार गरम करून बाळाला देता येते.

बाळाला घरी घेऊन येण्यापूर्वी वाहनामधे बाळासाठी बेबीसीट आहे ना व ते व्यवस्थित काम करते आहे ना याची हॉस्पिटलतर्फे तपासणी होते मगच बाळाला घरी न्यायची परवानगी मिळते. बाळ घरी आल्यावर ते पहाता पहाता वाढणार, इकडे तिकडे फिरणार हे लक्षात घेऊन घर बाळाच्या दृष्टीने सुरक्षित आहे ना, कुठे अडकणार नाही ना, विजेच्या जमिनीजवळ असलेल्या स्विचमधे काही वस्तू घालून त्याला शॉक बसू नये यासाठीची खबरदारी घेतली आहे किंवा नाही या सर्व बाबतीत पालकांना प्रशिक्षण दिले जाते. घरात जागोजागी हँड सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या जातात. बाळाला घेण्यापूर्वी वारंवार हात स्वच्छ धुवून हात स्वच्छ धुवून हँडसॅनिटायझर वापरून निर्जंतुक केले आहेत ना याविषयी कटाक्षाने लक्ष दिले जाते.

बाळाला भेटायला कोणी मित्र मंडळी वेळी-अवेळी जात नाहीत. आधी वेळ ठरवून जातात. बाळाला हात लावण्यापूर्वी हँडसॅनिटायझर वापरतात. भेटायला येणार्‍यांना लहान मुले असतील व त्यांना सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार असतील तर ही भेटीची वेळ रद्द करतात. आपल्या मुलांच्या आजाराचा बाळाला त्रास होऊ नये याची दक्षता हे लोक अत्यंत डोळसपणे घेतात.

बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी हॉस्पिटलमधली नर्स घरी येऊन बाळ-बाळंतिणीची तब्येत कशी आहे, काही अडचणी आहेत कां, बाळाचे वजन इत्यादी गोष्टींविषयी चर्चा करते. दर दोन तासाने बाळाला पाजायचे व डायपर बदलायचा यासाठी आळीपाळीने हे काम दिवसा व रात्रीही करतात. अपत्य जन्मानिमित्त स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून प्रशिक्षित नर्सेस (त्यांना ”डयूला” (Doula) म्हणतात) त्या रात्री नऊ ते सकाळी ६ या वेळासाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यांना द्यावे लागणारे वेतनही चांगले महागडे असते. रात्रीच्या वेळी ब्रेस्ट पंपाने काढून ठेवलेले आईचे दूध बाळाला दिले जाते.

बाळाला स्तनपानासाठी लागणारी ताकद व कौशल्य येईपर्यंत त्याला बराच वेळ घरून ठेवावे लागते. शिवाय अगदी लहान असल्यामुळे मांडीवर ठेवले तरी आईला खाली वाकावे लागते. यासाठी उशीऐवजी ”ब्रेस्ट फ्रेंड” नावाचे कूशन विकत मिळते. ते आईने कमरेला लावायचे. बाळाला पाजण्यासाठी बाळ सुमारे चार-पाच महिन्याचे होईपर्यंत याचा फार उपयोग होतो.

देशभर स्थानिक स्त्रियांचे ‘मदर्स ग्रुप’ प्रस्थापित झालेले आहेत. या ग्रूपचे सदस्यत्व अत्यंत उपयोगाचे ठरते. ग्रूपची वेबसाईट असून त्यावर विविध गोष्टींची माहिती अनुभव वाचायला मिळतात. एखाद्या मुलाचे रात्रभर रडणे घरदाराला कावून सोडते. अशावेळी काय करावे? असा प्रश्न आईकडून वेबसाईटवर उपस्थित केला जातो. त्याला उत्तर म्हणून अक्षरश: काही तासांच्या आत याच अनुभवातून गेलेल्या स्त्रीयांकडून त्यांनी हा प्रश्न कसा सोडविला, काय करून पहावे अशी माहिती देण्यार्‍या ई-मेल्स येतात. त्या परिसरातील चांगल्या ‘डयूला’ बाळाला वरच्या दुधासाठी दिल्या जाणार्‍या ‘फॉर्म्युला’चे चांगले वाईट परिणाम, डायपर वापरल्यामुळे बाळाला येणारी पुरळ, विशिष्ट ‘पारंपारिक’ औषध… अशा हजारो प्रकारच्या गोष्टी वेबसाईटवर असतात. त्याचा आयांना फारच आधार वाटतो. ‘पिंक आय’ म्हणजे डोळे येण्याचाच एक प्रकार असतो. एका स्त्रीच्या बाळाला ‘पिंक आय’ चा त्रास होत होता तेव्हा एका ब्राझिलियन स्त्रीने ”बाळाच्या डोळयात दुधाचे दोन थेंब घाला” असा सल्ला दिला होता व त्याचा खरोखरच उपयोगही झाला. एखादीचे बाळ मोठे झाले व त्याची रॉकिंग चेअर आता त्याला पुरेनाशी होते आहे. कपडे लहान होतात….याप्रकारच्या वस्तू कुणाला हव्या असल्यास जरूर कळवा अशी ईमेलही वेबसाईटवर दिसते. कपडे, खेळणी, पाळणे, बूट, स्वेटर्स, बाळाचे पलंग….अनेक वस्तूंची अशा तर्‍हेने देवाण घेवाण चालते.

‘रीसायकल’ हे तत्व उत्तम तर्‍हेने राबविले जाते. या वस्तू किंवा कपडे देताना ते अत्यंत स्वच्छ केलेले व उत्तम रित्या पॅक करून माहिती पत्रकासह दिले जातात. हे ग्रूप्स जवळपासच्या बालक्रीडांगणात ठरवून एकमेकांना बाळासह भेटतात, अनुभव व माहितीचे आदान-प्रदान करतात. स्थानिक लायब्रर्‍यामधूनही अगदी तान्हया बाळांपासून ते ७-८ वर्षांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यात कधी पपेट शो, कधी गाणी म्हणणे असे उपक्रम असतात. दोन-तीन वर्षांच्या मुलांना बालगीते ठाऊक झालेली असतात. लायब्ररीतील कर्मचारी या गीतांची ध्वनीफीत लावून मुलांना हातवारे करतात. पालंकाबरोबर आलेली बालकेही त्यानुसार हातवारे करीत मजा लुटतात. मुलांना हाताळण्यासाठी विविध रंगीबेरंगी, भक्कम पुस्तके, आकार रंग यांची माहिती देणारी खेळणी यांची लायब्ररीमधे चैन असते. मुलांना ते हाताळण्याची केवळ मुभाच नव्हे तर त्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

मदर्स ग्रूपमधला आमचा अनुभव अगदी अवश्य कथन करण्याजोगा आहे. आमच्या धाकटया नातीला जेव्हा आईचे दूध पुरेनासे झाले तेव्हा मदर्स ग्रूपमध्ये कोणी जास्तीचे दूध देऊ शकेल काय अशी विचारणा आम्ही केली. तातडीने एका अमेरिकन आईची मेल आली. दूध किती आहे, केव्हा उपलब्ध होईल, आईची आरोग्यविषयक माहिती, तिचा पत्ता, फोन क्रमांक सगळी माहिती त्यात होती. दूध स्वीकारण्यापूर्वी आईच्या प्रकृतीविषयी खात्री करावयाची असल्यास तिच्या डॉक्टरांचे नांव, पत्ता व फोन नंबरही दिलेला होता. फोनवरून वेळ नक्की करून जेव्हा तिच्या घरी दूध घेण्यासाठी गेलो तेव्हा तिने व्यावसायिक मिल्क बँकसारखे दूध बाटल्यांमध्ये भरून, फ्रीजरमधे गोठवून ठेवले होते. तिच्या घरातली एक मोठी मुलगी व पाच महिन्याचे गुटगुटीत बाळ पाहिल्यावर ते दूध स्वीकारण्यास काहीच हरकत नाही याची खात्री पटली. मातेच्या दुधाची किमंत पैशात करता येणे अशक्यच. तरीही आम्ही विचारणा केली असता तिने ते सर्व दूध विनामूल्य आम्हाला दिले. त्या दातृत्वाला कोणताही ‘उपकारा’चा वास नव्हता.

आई-वडील दोघेही नोकरी करीत असल्यावर मुलाचा सांभाळ करण्यासाठी दूसरी अत्यंत चांगली सुविधा येथे कार्यरत आहे. ती म्हणजे ‘नॅनी’. मुलांकडे व्यवस्थित पहाणे, त्यांना खायला घालणे, स्वच्छता करणे, खेळायला बाहेर घेऊन जाणे, वेळ पडल्यास डॉक्टरांकडे नेणे, शाळेतून मुलांना नेणे-आणणे, अशी सर्व प्रकारची कामे नॅनी करते. नॅनी पुरविणार्‍या त्यांच्या विश्वासर्हतेविषयी व शैक्षणिक तसेच नैतिक पार्श्वभूमीविषयी संपुर्ण माहिती मिळवून देणार्‍या संस्थाही येथे कार्यरत आहेत. या नॅनीना प्रथमोपचाराचे प्रशिक्षणही दिलेले असते. मुलाने काही गिळले किंवा घशात काही अडकून मुलाला श्वासच घेता येत नाही असे झाल्यास काय करावे, भाजले, कापले, तर काय करावे, कृत्रिम श्वासोच्छवास कसा द्यायचा याचे शिक्षण त्यांना दिलेले असते. गंभीर प्रसंगी तातडीने मदत मिळविणे, पोलीसांची मदत घेणे, अँब्यूलन्स बोलावणे ही कामेही त्या करू शकतात. अनेक पालक या विश्वासर्ह नॅनीवर आपली मुले सोपवितात. याचप्रमाणे ‘डे केअर सेंटर्स’ ही दुसरी उत्तम सोयही उपलब्ध असते. ही सेंटर्स अत्यंत व्यावसायिक निष्ठेने चालविली जातात. मुलांना विविध गोष्टी सांगणे, खायला घालणे, दुपारी विश्रांती घ्यायला लावणे, इतर मुलांबरोबर न भांडता खेळणे ही व अशा प्रकारची अनेक कौशल्ये मुलांना शिकविली जातात.

लहान मुलांच्या खेळण्यांची व कपडयांची आदानप्रदान करणारी ‘रीसायकल’ स्टोअर्स ठिकठिकाणी असतात. वापरून झालेली खेळणी, कपडे, झोपाळे, गरम कपडे, उपकरणे इत्यादी वस्तू अशी स्टोअर्स विकत घेतात व गरजूंना अत्यंत अत्यल्प दरात मिळू शकतात.

आयांना कामावर जायला लागल्यामुळे किंवा त्यांच्या दुधाचे प्रमाण बाळाच्या गरजेपेक्षा कमी असते अशावेळी आईचे दूध पुरविणार्‍या Mother’s Milk Bank नावाच्या देशभर कार्यरत असणार्‍या संस्था उपयोगाला येतात. या संस्थांना माता दूध ‘दान’ करतात. या संस्था हे दूध व्यवस्थित पाश्चराइज करून गरजू बाळांसाठी उपलब्ध करून देतात. दूध पुरविणार्‍या आयांची टी.बी. एच.आय.व्ही, मादक द्रव्य सेवनाची सवय इत्यादी घातक गोष्टी नाहीत ना यासंबंधी वैद्यकीय माहिती घरपोच पुरविले जाते. दूध पाश्चराइज करण्याचा, बाटल्यांमध्ये भरण्याचा इत्यादी खर्च गरजू बाळाच्या पालकांनी करायचा असतो. बाळाच्या गरजेच्या श्रेणीनुसार या दूधाचा पुरवठा केला जातो. उदा. आईला अजिबातच दूध नसेल तर अशा जन्मजात बालकाची गरज किंवा आजारी बाळाची गरज, ही सहा महिन्याच्या निरोगी बालकाच्या गरजेपेक्षा अधिक महत्वाची ठरते. या दुधाच्या बाटल्या इतक्या उत्तम तर्‍हेने पॅक केलेल्या व बर्फाच्या मोठया खोक्यात घालून पाठविल्या जातात याचे खरोखर कौतुक वाटते. अनेक बाळांसाठी ‘मदर्स मिल्क बँक’ ही अक्षरश: जीवनदायी ठरते.

बाळाला वाढवितांना विविध उपकरणांच्या संदर्भात सतत संशोधन, उत्पादन व गरजेनुसार त्यात बदल हा या देशाच्या सुबत्तेमागील महत्त्वाचा मुद्दा आहे. साधे बाळाला पाजायच्या दुधाच्या बाटलीचे उदाहरण घ्या. बाटलीने दूध पितांना दूध ठराविक प्रमाणात व सातत्याने बाळाच्या तोंडात जावे म्हणून बाटलीत एक फनेलसारखी नळी असते. ती बाटलीच्या बुचात बरोबर बसते. त्याच्यामुळे अति भुकेले बाळ घाईघाईने दूध पिऊ लागले तरी त्याला ठसका लागत नाही. या बाटल्या निर्जंतुक असणे बाळाच्या आरोग्याच्या द्ष्टीने अत्यंत महत्वाचे असल्यामुळे Milk bottle Sanitizer वापरले जातात.

सर्दीमुळे बाळाचे नाक चोंदणे ही नेहमीची अडचण. पण त्यासाठी एक जाड, रबरी फुग्यासारखे उपकरण दवाखान्यातून घरी जातानाच पालकांना दिले जाते. फुगा दाबून त्यातली हवा काढून टाकली व फुग्याचे टोक बाळाच्या नाकापाशी नेले की आत जमलेला शेंबूड आपोआप फुग्यात खेचला जातो. वारंवार हे करण्यामुळे बाळाला श्वास घेणे सोयीचे होते. याशिवाय अगदी लहान बाळापासून ते ६-७ वर्षापर्यंतच्या मुलांना होणारी सर्दी व शेंबडाने भरलेले नाक स्वच्छ करण्यासाठी एक सक्शन पंप मिळतो. याचा वापर हंगेरीमध्ये सर्रास केला जातो. व्हॅक्युम क्लीनरला हा पंप जोडून, व्हॅक्युम क्लीनर चालू करून एका टोकाला असलेल्या नळीचे मुख एकेका नाकपुडीत घातल्यास अगदी घट्ट झालेला शेंबूड सुध्दा मुलांना कोणतीही इजा किंवा त्रास न होता खेचला जातो. मुलांना याची इतकी सवय होते की कोणतीही कटकट न करता मुले नाक साफ करण्यासाठी छानपैकी आडवी पडून पालकांना हे काम करून देतात. सक्शन पंपात साचलेला शेंबूड किती प्रचंड प्रमाणात असतो व तो खेचून घेतल्यामुळे मुलांना कसे छान वाटते हा अनुभव पालकांना अत्यंत सुखद वाटतो.

जरा मोठया झालेल्या बाळाला विविध प्रकारच्या भाज्या, फळे, चिकन, इत्यादींपासून बनविलेल्या पेजांच्या बाटल्या मिळतात. बाळे ते आवडीने खातात. घरी बनविलेले गरम पदार्थ, खिरी इत्यादी भरवितांना तो पदार्थ फार गरम असून चालत नाही. त्यासाठी बाळाला भरविण्याचे चमचे खास पध्दतीने बनविलेले असतात. त्याचा आकार बाळाला जेवढे घास घेता येईल तेवढाच अन्नपदार्थ सामावण्याचा असतो. ते अत्यंत गुळगुळीत असल्याने इजा होण्याचा संभव नसतो. याशिवाय चमच्याच्या मुखाचा मूळचा रंग तापमानानुसार बदलतो. त्यामुळे नक्की कोणत्या तापमानाचा पदार्थ त्या त्या बाळाला आवडतो त्यानुसार भरविणे सोपे होते.

दात यायला लागले की बाळाच्या हिरडया शिवशिवतात. अशावेळी अंगुस्तानासारखा बोटावर घालण्याचा ब्रश मिळतो. या ब्रशच्या दातांनी बाळाच्या हिरडयांना मसाज केला की बाळाला बरे वाटते. जरा मोठया झालेल्या मुलांना दात घासण्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध चवीच्या टूथ्पेस्टस्, विविध प्राण्यांचे आकार असलेले ब्रश मिळतात. मुलांनी किती वेळा दात घासणे आवश्यक आहे हे त्यांना कळण्यासाठी बेसिनजवळच्या भिंतीवर घट्ट बसू शकेल असे वाळूचे घडयाळ देतात. दात घासायला सुरूवात करण्यापूर्वी ते उलटे करायचे व वाळू पूर्णपणे खाली घसरेपर्यंत दात घासायचे. मुलांना हे घडयाळ खूप भावते.

बाळाला फिरायला नेताना त्याला छातीवर विसावता येईल अशी स्लिंग, बाळाला बाहेरचे सगळे पाहता येईल पण पालकांना आपल्या शरीरावर बांधून त्याला घेऊन फिरता येईल अशी स्लिंग, सोयीस्कर बाबागाडया (स्ट्रोलर), बाळाला झोपण्यासाठी लाकडी पिजंरा (क्रिब) , त्याच्या कडेला बांधलेली व बाळाचा पाय लागला की गाणी वाजणारी खेळणी, विविध आकार, रंग बाळाला ओळखता यावेत व त्यात त्याने रमावे म्हणून निर्माण केलेली असंख्य खेळणी…..या गोष्टींना अंतच नाही. बाळासाठी विविध प्रकारच्या पुस्तकांना फार प्राधान्य दिले जाते. रंगीबेरंगी चित्रांची, चित्रावर बोट ठेवले की विविध प्रकारचे आवाज करणारी, हात लावला की विविध प्रकारचे टेक्स्चर जाणवून देणारी, बोट घातल्यास मेंढी किंवा तत्सम प्राण्यांचे तोंड दिसणारी पुस्तके, त्रिमितीदर्शक पुस्तके, थोडया मोठया मुलांसाठी स्टिकर्स असलेली पुस्तके, ठिपके जोडून प्राणी किंवा पक्षी यांच्या आकृत्या निर्माण पुस्तके असे पुस्तकांचे अनंत प्रकार उपलब्ध असतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही खेळणी अत्यंत उत्तम तर्‍हेने बनविलेली असून त्यात बाळाच्या सुरक्षिततेला आतोनात महत्त्व दिलेले असते. कोणत्याही लाकडी खेळण्यांना खिळे नसतात. त्याच्या बिजागिर्‍या निखळून पडत नाहीत किंवा लाकडाच्या बारीक कपच्या निघून बाळाच्या शरीराला इजा पोचत नाही. श्रीमंतीमुळे हे परवडते हा एक भाग नक्कीच, पण ती बनविणार्‍या वैविध्यपूर्ण कल्पकतेला व उत्तम दर्जाला खरोखर तोड नाही.

विविध आजारांसाठी अँटिबायोटिक देणे ही प्रथा येथे नाही. बाळांना व लहान मुलांना शक्यतो अत्यंत माइल्ड अशी औषधे देतात. पण काही कारणासाठी अँटिबायोटिक द्यावे लागलेच तर त्याच्या बरोबरीने प्रो-बायोटिक्सही दिले जाते.

या सर्व भौतिक गोष्टींबरोबरच मुलांच्या वाढीमध्ये त्यांच्या मानसिकतेचा खूपच विचार केला जातो. पहिले लहान मूल घरात आहे. अशावेळी दुसर्‍या भावंडाचे आगमन ही गोष्ट मुलाला पसंत पडत नाही. इतके दिवस फक्त आपल्याकडे लक्ष दिले जायचे ते आता या बाळामुळे नाहीसे झाले आहे. हे जाणवल्यामुळे नवीन बाळाविषयीची असूया मुलांमध्ये निर्माण होते. त्यासाठी या मुलांना नवीन बाळाच्या आगमनाविषयी कसे तयार करायचे, वेगवेगळे प्रसंग कसे समजुतीने हाताळायचे याची माहिती डॉक्टर पालकांना देतात. मदर्स ग्रूपही यासाठी खूपच मदत करतात. अगदी लहानमुलांच्या शाळांपासून Sharing या भावनेला प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यामुळे आपल्या भावंडाबरोबर खेळणी किंवा इतर गोष्टी वाटून घेणे याचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबविले जाते. जरासे समजू लागलेल्या बाळाच्या हातातून कोणतीही वस्तू (फारच धारदार किंवा धोकादायक नसल्यास) पालकांनीही जबरदस्तीने हिसकावून घेऊ नये असे शिकविले जाते. त्याऐवजी “Give me, give me please” असे सांगून मुलांना ते देण्याची व दिल्याबद्दल शाबासकी मिळविण्याची सवय लागते. अगदी लहान मुलालासुध्दा व्यक्तिमत्व असते व त्या व्यक्तिमत्वाचा आदर करण्याची शिकवण येथे दिली जाते. येथे पु. ल. देशपांडे यांनी वर्णिलेल्या ”गप्प बसा” संस्कृतीऐवजी ”विचारा”, अधिक विचार करा” या संस्कृतीवर भर दिलेला असतो. एखादी गोष्ट ”मी सांगतो म्हणून करू नका” अशा दमदाटीपेक्षा हे का करायचे नाही व केल्यास काय वाईट परिणाम होईल याची सोप्या भाषेत मुलांना माहिती देण्याकडे कल असतो. त्यामुळे ‘लॉजिकल’ विचारसरणी मुलांमध्ये रुजते.

शाळांमधून तसेच घरीही पालकांच्या देखरेखीखाली मुले स्वयंपाकात, कपडे, धुणे, कपडयांच्या घडया घालणे, बागेत काम करणे, झाडांना पाणी घालणे अशा अनेक गोष्टी शिकवितात. धारदार सुर्‍या सुरक्षितपणे वावरायला शिकतात. त्यांना बरे नसल्यास डॉक्टरांच्याकडे न्यायचे झाल्यास त्याची पूर्वकल्पना मुलांना दिली जाते. दवाखान्यातही विविध खेळणी असतात. मुलांना घरी जाताना स्टिकर देतात. त्या स्टिकरचे मुलांना प्रचंड आकर्षण असते.

माझ्या नातीचे टाँन्सिल्सचे ऑपरेशन होते. तेव्हा पालकांना ऑपरेशनची सर्व माहिती आली. पण नातीलाही (वय वर्षे साडेचार ) नक्की काय होणार याची माहिती असावी म्हणून एक सचित्र पुस्तक घरी पाठविण्यात आले. हे पुस्तक पाहिल्यावर या लोकांच्या कल्पकतेची व मुलांच्या मानसिकतेला जपण्याच्या कृत्याविषयी प्रचंड कौतुक वाटले.

मुले ही शेवटी मुले. ती हट्ट करणारच. पण त्याला शारिरिक मार देण्याऐवजी Time Out ही शिक्षा दिली जाते. टाइम आऊट म्हणजे जिथे कुणीही नाही अशा खोलीमध्ये भिंतीकडे तोंड करून काही काळासाठी उभे करणे. या वेळात मुलांने आपले काय चुकले याविषयी विचार करावा व शांत व्हावे ही संकल्पना आहे. मारामुळे मुले कोडगी बनतात. पण टाइम आऊटमुळे त्यांच्या अहंकाराला व आत्मसन्माला धक्का पोचू शकतो. त्यामुळे मुले टाईम आऊटला फार घाबरतात.

मुलांच्या सर्जनशीलतेला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची खेळाणी मिळतात. त्यात मण्यांपासून दागिने बनविणे, प्लेडो नावाच्या मातीपासून विविध आकाराच्या वस्तू करणे, पपेट (कठपुतली) करणे अशा विविध प्रकारची खेळणी असतात. मुलांना रेघोटया मारणे, चित्रे काढणे मनापासून आवडते. काही घरांमधे एखादी भिंतच संपूर्णपणे काळया फळयासारखी करून घेतात. मुले त्यावर गिरगोट काढण्यात मनापासून रमतात.

एकंदरीत पहाता स्त्री-पुरूष दोघेही नोकरी-व्यवसायात गुंतलेले असल्यामुळे एकूण आयुष्य खूपच धकाधकीचे असते. पण त्यातूनही मुलांसाठी वेळोवेळी रजा घेणे, त्यांच्या शाळेतील पालक सभेला आवर्जून हजर रहाणे, सुट्टीच्या दिवशी मुलांना क्रीडागंणावर खेळायला घेऊन जाणे. मुलांच्या मित्र-मैत्रिणींना सिनेमाला नेणे किंवा एखाद्या रात्री घरी रहायला बोलावणे या गोष्टी पालक आवर्जून करतांना दिसतात. सुट्टीच्या दिवशी क्रिडांगणे, समुद्रकिनारे, बागा, प्राणी संग्रहालये, विविध प्रकारची म्युझियम्स लहान मुलांनी व त्यांच्या पालकांनी बजबजलेली दिसतात. काही पालक (आई तसेच वडीलही) कित्येकदा गरजे नुसार नोकरीतून एखाद दुसरे वर्ष पूर्णपणे रजा घेऊन मुलांकडे पहातात. त्यांना पोहोणे, सायकल चालविणे, स्कीइंग करणे, विविध प्रकारची प्रोजेक्टस् करायला मदत करणे अशा गाष्टी करतात. बालवाडयांमध्ये शिक्षकांबरोबरच आळीपाळीने एखाद्या पालकाने मुलांबरोबर दिवसभर वेळ घालविणे हा उपक्रमही अनेक ठिकाणी राबविला जातो. त्यामुळे आपले पाल्य शाळेत काय करते, काय शिकते हे पालकांना समजते तसेच पालकांच्या तसेच समाजाच्या ‘सजग’ पालकत्वाचे कौतूक न वाटले तरच नवल. स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैज्ञानिक, औद्योगिक, सामाजिक शैक्षणिक अशा अनेक स्तरांवर या समाजात नवनवे उच्चांक का नोंदविले जातात यांचे मूळ कुठे आहे याचे मर्मही उमगते. यामधल्या अनेक गोष्टींचे आपणही अनुकरण करावे असे मला वाटते. तुम्ही यास सहमत आहात काय?

– कल्याणी गाडगीळ, न्यूझीलँड