लोकलमधून प्रवास करताना तो अचानक समोर आला आणि एक अनपेक्षित धक्काच बसला. तसे आपण लोकलमध्ये गाणी म्हणून पैसे मागणारे अनेक प्रकारचे भिकारी बघतो. अंगावर नावालाच कपडे असणारी छोटी मुलं, कडेवर छोटं मूल घेऊन उभी असलेली एखादी स्त्री, जिचं हातात ऍल्यूमिनियमची वाटी घेऊन केविलवाण्या चेह-याने सर्व प्रवाशांच्या पायाला हात लावून पैसे मागणारं दुसरं मोठं मूल, किंवा हार्मोनियमलाही बेसूर आवाजात गायला लावणारे काही अंध भिकारी असे अनेक प्रकार बघायची सवय झालेल्या डोळयांसमोर अचानक तो वृध्द आला आणि मी आवाक्च झालो. प्रथम विश्वासच बसला नाही, हा गृहस्थ खरंच भीक मागतोय की आपलीच काही बघण्यात काही चूक होतेय. मी स्वत:लाच चिमटा घेऊन बघितला पण विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तो खरोखरच भीक मागत होता. स्वच्छ पांढरा शर्ट, निळया रंगाची किंचित मळालेली पँट, हातात एक काठी, चेह-यावर कमालीची व्याकुळता, आवाजात एक आर्त कंप, नजरेत एक असहाय लाचारी काठोकाठ भरलेली. हृदयाचा ठोकाच चुकला ते बघून. मनात विचारांचं प्रचंड तूफान उठलं. आजच असं का झालं. भिकारी बघणं, त्यांच्याबद्दल कणव वाटणं, कधी कधी खिशातून आपोआप नाणं त्यांच्या हातात असलेल्या वाटीत पडणं या गोष्टी आता सरावाच्या झाल्या होत्या. पण प्रथमच एखाद्या भीक मागणा-या व्यक्तीला बघून मनात अशी एक कळ उठली होती.
आपल्या सभोवती अशा कित्येक गोष्टी नित्य घडत असतात. भूकंप झाला की भूकंपपीडितांची हृदयद्रावक दृश्ये आपण टीव्हीच्या पडद्यावर, वर्तमानपत्रातून बघतो, हळहळ व्यक्त करतो, काही काळ आपल्यातलं संवेदनाशील मन अस्वस्थ होतं, डोळयांसमोर ती चित्रं भिरभिरत राहतात, हृदयात कालवाकालव होते. एक दोन दिवसांनतर आपण ते विसरूनही जातो. पण काही गोष्टींचा परिणाम मनावर दीर्घकाळ टिकून राहतो. आपण विसरू म्हटलं तरी ते विसरू शकत नाही. लोकल ट्रेनमधल्या त्या वृध्द भिका-याला बघून माझी अवस्था अशीच झालीय.
कुठल्या परिवारातला असेल तो माणूस?
चेहरा बरंच काही बोलतो असं जे म्हणतात ते त्याच्या बाबतीत मला अगदी पटलं. चित्रपटात आपण गो-यागोब-या चेह-याची, हाय-फाय कुटुंबाची माणसं चेह-याला काळं फासून, फाटके कपडे घालून भीक मागताना बघतो. मेकअप कितीही चांगला केलेला असला, आणि अभिनय अगदी जीव ओतून केलेला असला तरीही ती माणसं भिकारी वाटतच नाहीत. त्यांचा चेहरा आपल्याला खरं तेच सांगत असतो. अगदी तसंच या माणसाच्या बाबतीत वाटत होतं. ते एक कटु सत्य असलं तरीही. एखाद्या सुखवस्तु कुटुंबातला कुटुंबप्रमुख, किंवा एखादा दुकानदार, किंवा निवृत्त झालेली एखादी अधिकारी व्यक्ती दिसावी तसा तो दिसत होता. जर तो तसा असेल तर त्याच्यावर तशी पाळी का आली असावी? का म्हणून तो एवढा लाचार झाला असावा? अशी लाजिरवाणी, निर्धन अवस्था त्याच्या नशिबी का आली असवी?
घरातून त्याला हाकलून तर दिलं गेलं नसेल सुनेनं आणि मुलानं? की व्यापारात जबर फटका बसला म्हणून त्याची मानसिक अवस्था बिघडलीय? की नोकरीतून कमी केल्यामुळे त्याला धक्का बसला असावा? की एखाद्या अपघातात त्याच्या घरची सारी मंडळी निधन पावली म्हणून तो असा भरकटला असावा? काय झालं असावं? काही तरी नक्कीच, मनाची प्रचंड उलथापालथ करणारं त्याच्या आयुष्यात घडलं असावं? पण काय?
अनेक करणं उलथीपालथी करून झाली पण त्याच्या अवस्थेचं नक्की कारण समोर येतच नव्हतं. खरं तर हा विचार करायची मला काही गरजच नव्हती. पण मनाच्या कुठल्यातरी कोप-यातून सहानुभूतीचा हा झरा अचानक कसा काय स्त्रवला माझं मलाच कळलं नाही. मी त्याच्याकडे वारंवार बघत होतो. त्याच्या केविलवाण्या डोळयात माझ्या प्रशनाचं उत्तर शोधत होतो. पण व्यर्थ ! पुढच्या कंपार्टमेंटमधील गर्दीत तो नाहीसा झाला आणि कदाचित स्टेशन आल्यावर खाली उतरून पुढच्या डब्यात गेला देखील असेल. आर्त आणि व्याकूळ नजरेनं कदाचित माझ्यासारख्या अजून एखाद्याला अस्वस्थ करण्यासाठी.
माझ्या मन:पटलावर मात्र अनेक वृध्दांचे असेच केवेलवाणे चेहरे जाता जाता उमटवून गेला. माझं भावविश्व तळापासून अचानक ढवळून गेला.
– प्रकाश वैद्य