तीन वर्षांपूर्वी आम्ही भंडारा येथील घरीच, ‘संगणक साक्षरता केंद्र’ सुरू केलं. उद्देश हा की लहान मुलांना संगणकाची माहिती व्हावी आणि संगणकाचा उपयोग शिक्षणात करून घेता यावा. त्यावेळी संगणक नव्हतेच. आम्ही सुरू केलेलं हे केंद्र विदर्भातील पहिलं असं केंद्र होतं, ज्यात पाच वर्षांपासून पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांना हसत खेळत संगणक शिक्षण दिलं जातं. संगणकावर मुलं गोष्टी ऐकतात. अगदी आजोबा आजी गोष्टी सांगतात त्या गोष्टी. गाणी ऐकतात, चित्रे काढतात, रंगवितात, रंगांची माहिती मुलांना होते. सर्व मुलांना खुप गंमत वाटते. आणि हे सारं मराठी मातृभाषेतून (इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं सुध्दा वेगवेगळया शिबीरांतून सहभागी होत असतात.) हे सगळं संगणकावर शिकत असतांनाच मुलांना माऊस, त्याचा उपयोग, की-बोर्ड त्यावरील बटणं, त्यांचा उपयोग हे आपोआपच कळायला लागलं. ते वेगळं असं शिकविण्याची गरजच पडली नाही. मुलांनी आणि पालकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही ‘संगणक शिक्षण, संगणकाद्वारे शिक्षण’ या संकल्पनेवर दृढ राहीलेत.
या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग समाजातील दुर्लक्षिलेल्या, समाज ज्यांच्याकडे तिरस्काराने बघतो आणि ज्याचेकडून नकळत काही चुका घडल्या आहेत अशा मुलांसाठी करता आला तर….? हा विचार मनात आला आणि आम्ही भंडारा येथील शासकीय अभिक्षण (निरीक्षण गृह) गृहाचे (Remand Home) अधिक्षक श्री खरे यांना भेटलो. त्यांना आमची योजना सांगितली. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेवून हा उपक्रम घेण्यास सहमती दर्शविली. आम्ही मुलांची माहिती घेतली आणि आठ दिवसात एक प्रकल्प योजना तयार केली. शिबीर किती दिवसांचे असावे, काय शिकवायचे शिकविण्यास कुठली पध्दत वापरावयाची या सारख्या मुद्दयांवर चर्चा करून निर्णय घेतला आणि १५ सप्टेंबर २००२ ते १५ डिसेंबर २००२ या कालावधीत तीन महिन्यांपर्यंत संगणकीय संस्कार शिबीर घेण्याचं निश्चित केलं. या उपक्रमात लॉयन्स् क्लब, ब्रांझ सिटी, भंडारा यांचं सहकार्य मिळालं. उद्धाटन प्रसंगी भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री प्रमोद पनके यांनी, ‘चुका होतातच, परंतू त्याची पुनरावृत्ती होवू देवू नका’ असा मोलाचा उपदेश बालमित्रांना केला.
दि. १६ सप्टेंबर पासून नियमीत शिबीर सुरू झालं. वीस मुलांना दोन गटात विभागून वेगवेगळया वेळेत त्यांचे वर्ग सुरू झालेत. सारी मुलं अभिक्षण गृहातून आमच्या घरी म्हणजेच ‘संगणक संस्कार केंद्रात’ येवू लागली आणि तेच त्यांच्यासाठी एक नाविण्य ठरलं. तीन महिन्यांच्या कालावधीत आम्ही त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची, अथवा ते या अभिक्षण गृहात का व कसे आलेत याची कधी चौकशी अथवा वाच्यता केली नाही. परंतू वाईट कृत्यें करू नयेत, वाईट कार्यात मदत करू नये असे विचार त्यांचे पर्यंत जावेत याचा मात्र कटाक्षाने प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची, अथवा ते या अभिक्षण गृहात का व कसे आलेत याची कधी चौकशी अथवा वाच्यता केली नाही. परंतू वाईट कृत्यें करू नयेत, वाईट कार्यात मदत करू नये असे विचार त्यांचे पर्यंत जावेत याचा मात्र कटाक्षाने प्रयत्न केला.
दाररोज शिबीराची सुरूवात ‘वक्रतुंड महाकाय…’ या गणपती स्तवनाने होते. त्यानंतर प्रार्थना, निश्चय उच्चारण-(मी जीवनात यशस्वी होणारच असा संकल्प), ध्यान हा प्रकार होतो. नंतर संगणकावर गोष्टी ऐकणे, चित्रे रंगविणे, कविता ऐकणे यापैकी एखादा प्रकार घेतला जातो. यासाठी मराठी भाषेतली विविध सॉफ्टवेअर्स आम्ही वापरतो. मुलांना आवडलेली गोष्ट दोन दोन वेळा ऐकविण्याचा आग्रह मोडवत नाही. साभिनय गोष्ट संगणक सांगत असल्यामुळे आवाजातील चढऊतार, चेहऱ्यावरील हावभाव मुलांना चटकण लक्षात राहतात. मराठीच्या कविता मुलांनी ऐकल्या, रंगांची माहिती मराठीतून सांगितली. खूप सारी चित्रें संगणकावर काढून घेतलीत, रंगवून घेतलीत. पुढे पेंट ब्रश हा प्रकार शिकवितांना काहीही अवघड झालं नाही. माऊसचा सराव मुलांना आधीच भरपूर झाल्यामुळे संगणकावरील क्रिया मूलं सहज करू शकलीत. या सोबतच चांगल्या सवयी, आरोग्याची माहिती, नमस्कारचं महत्त्व, स्वच्छता स्वत:ची यावरची माहिती आणि कृती याला महत्त्व दिलं.
मुलांच्या शर्ट पँटच्या बटणं नीट रहायला लागलीत, कपडे स्वच्छ घालून यायला लागलीत. एकदा पाच सहा मुलं सकाळीच घरी येवून आमच्या आईबाबांना वाकून नमस्कार करून गेलीत. कारण त्या दिवशी त्यांचा पहिला पेपर होता. हे आमच्या दृष्टीनं नविन होतं परंतू उत्साह वाढविणारा प्रसंग होता.