उगीच नाही म्हटलेलं की ‘लहानपण देगा देवा’. अजूनही ते दिवस आठवले की असे वाटते कशाला आपण मोठे झालो.
माझं बालपण सर्व खेडयात गेलं. आता खेडेगाव म्हटल की त्याविषयी लोकांची कल्पना अगदी वेगळी आहे. पण मी जे अनुभवलं ते अगदी एक सुंदर स्वप्न होतं. आम्ही चार भावंडं, त्यात माझा नबंर तिसरा, त्यात एकटीच मुलगी आणि तीन मुलं त्यामुळे घरात लाड जरा जास्तच असायचे.
शिक्षणासाठी काही दिवस मामांकडे मामाच्या गावाला रहावे लागले. तिथे मी माझा भाऊ व अजुन मावशीची दोन मुले, अशी आम्ही चार जण. मामा, मामी, आजी व मावशी सर्वजण आम्हासर्वांवर खुप प्रेम करायचे. सकाळी 10 वाजता शाळेत जायचो आणि 5 वाजता घरी यायचो. घराच्या समोरच मामांची शेती आहे, तिथे नेहमी काहींना काही हिरव पिकं असायचं. कधी ज्वारी, कधी गहू, कधी टोमॉटो, तर कधी शेवंतीची फुलं असे अनेक प्रकार तिथे असायचे. शाळा सुटली की शेतात मोकाट फिरायचे, तिथे असण्याऱ्या रानमेव्याचा मुक्तपणे आस्वाद घ्यायचा. केव्हा ज्वारीचा हुरडा, तर कधी हरबऱ्याचा हुळा, कधी भुईमुगाचे वेल उपटून त्याच्या ओल्या शेंगा तर कधी कोवळया काकडया, केव्हा मुगाच्या ओल्या शेंगा तर कधी शेतात जेवण करताना जेवणा बरोबर खाण्यासाठी उपटलेला पातीसहीत कांदा. किती मजा यायची हे सर्व करताना.
शेतात मामा जेव्हा काम करत असत तेव्हा पेरणी करताना जी पाभर वापरली जाते ती जेव्हा बैल जोडून शेतातून फिरवतात तेव्हा त्यावर बसून त्यातून मुठीने धान्य त्याच्या नळयांतून सोडताना केवढ़ा आनंद मिळायचा. सुट्टीच्या दिवसाची तर मजाच वेगळी असायची. मामांकडे गाई, म्हशी व शेळया असायच्या मग रविवारी त्यांना माळावर चरायला घेऊन जायचे काम आम्हा भांवडावर असायचे, तेवढ़ीच एक दिवस कामात मदत म्हणुन. तेव्हा सगळेजण खोडकर, कधी म्हशीवर बसायचो तर कधी शेळीचे पाय बांधून ती कशी चालते ते पहायचे, मग घरी हे सर्व उद्योग कळाले की बोलणी खायची कधी कधी मार पण मिळायचा.
एकदातर कहरच झाला, आमच्या आजीची एक मैत्रीण वडारी समाजातील होती. त्याच्या घरी जाणे येणे असायचे त्यामुळे त्यांच्या घरी व आजूबाजूला त्यांची भाषा कशी बोलतात त्याकडे लक्ष असायचे. अर्थ कळत नव्हता. अशीच दोनचार वाक्य आम्ही भांवडांनी पाठ केली. एक दिवशी आजीची ती मैत्रीण आम्ही भांवड मस्ती करत होतो म्हणुन आम्हाला रागावली तर आम्ही तिच्या भाषेतली जी पाठ केली होती ती वाक्ये बोलून पळून आलो. पण संध्याकाळी जेव्हा ती बाई घरी आजीकडे आली आणि आम्ही तिला तिच्या भाषेतून शिव्या दिल्या अशी तक्रार आजीकडे केली तेव्हा ती पाठ केलेली वाक्ये म्हणजे त्यांच्या भाषेत शिव्या होत्या हे कळाले आणि मग मात्र मोठी फजिती उडाली आणि फटके पण बसले.
कधी ओढयाच्या पाण्यातील मासे पकड्ण्याचा प्रयत्न तर कधी आंब्याच्या झाडावर सुर पारंब्या खेळायचो. झाडावर चढुन कैऱ्या किंवा पिकलेले पाड खाण्यात काय मजा असायची. सुट्टीला जेव्हा सगळे जमायचे तेव्हा जेवणाची मोठी पगंत ओटयावर बसायची, मोठया पातेल्यात केलेला आंब्याचा रस, शेवयाचा भात आणि त्यासाठीचे ते लहानपणीचे रुसवे फुगवे, ती मजाच काही वेगळी होती.
आज जीवन एवढं धावपळीचे झालयं की कशालाच पुरेसा वेळ द्यायला नसतो, मग मुलांकडे पाहिल्यावर वाटते कुठे आपले ते स्वछंदी बालपण आणि कुठे ह्यांची ही आजच्या धकाधकीच्या जीवनातली ओढाताण. यांना कधी मिळेल का आपल्यासारखे बालपण अनुभवायला? काही दिवसांनी तर मुलांना आपण जे खातो ते धान्य वगैरे कसे पिकते हे ही सांगता येईल की नाही माहिती नाही, कारण पुस्तकी ज्ञान घेणे आणि प्रत्यक्ष पाहण्या अनुभवण्यात खुप फरक आहे. म्हणुच वाटते की ह्या मुलांना आपल्यासारखे बालपण कधी उपभोगता आलं तर किती बरे हा ईल.
– सौ. मनिषा नवले, पुणे