नमस्कार,
मराठी दिनाच्या शुभेच्छा. कै. कुसूमाग्रजांना अभिवादन करुन आज मराठीवर्ल्ड डॉट कॉम नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. मराठीवर्ल्ड डॉट कॉमची उभारणी करण्याचे आमच्या चमूने ठरवले त्या काळात मराठी वाचायचे म्हणजे इंटरनेटवर फक्त स्कॅन केलेली पानेच वाचायला मिळत. फॉंटच्या असंख्य अडचणींना तोंड देत आणि सहा महिन्याच्या संशोधनानंतर मराठीवर्ल्डची रुपरेषा निश्चित झाली. मराठी आणि महाराष्ट्र म्हणजे काय हो ? नऊवारी साडी, तमाशा, कुस्ती, मल्लखांब, पिठलं-भाकरी, आमरस-पुरणपोळी, गुढीपाडवा-गणेशोत्सव, कुसूमाग्रज-पु.ल. देशपांडे, आशा-लताची अवीट गाणी… यादी लाबंत जाणारी आहे. मराठीवर्ल्डवर ह्या सर्व विषयांना स्थान होतेच परंतु नवीन पीढीला आपली वाटावी म्हणून मराठीवर्ल्डवने स्वत:ची खास ओळख तयार केली. तरुणांना आणि कुमारांना भावतील असे अनेक विषय, त्यावर चर्चा, प्रतिक्रियांना आमंत्रण दिले. ह्या सर्व प्रक्रियेत मध्यमवयीन आणि बूजूर्ग शामिल होतेच. त्यामुळे अल्पावधीतच मराठीवर्ल्ड सर्व वयोगटात अत्यंत लोकप्रिय होत गेली. अभिमानाने सांगावेसे वाटते की दर महिन्याला दोन लाखांहूनही अधिक पाहुणे (युजर्स) मराठीवर्ल्डच्या भेटीला येतात.
सुरुवातीला मराठीवर्ल्डचे बीज पेरतांना माझ्या बरोबर अनुराग केंगे, विनय-वैशाली हिंगे, कल्याणी गाडगीळ, सुर्वणा घुले, गौरी राजपाठक, मकरंद महादेवकर, अनघा दिघे, दीपक अभ्यंकर, मिलींद गोरांबेकर असे काही मोजके साथीदार होते. पण ह्या बीजाची मशागत करुन त्याचा वृक्ष करण्यासाठी जगभरातून मराठी मंडळी मदतीला आली आणि परिवारातलीच एक झाली.
लंडनचे मनोहर राखे, रविंद्र गाडगीळ, ईझ्रायिलचे नोहा मसिल, बंगलोरचे यतीन सामंत, मुंबईचे डॉ. सुधाकर कलावडे, मंदार माईणकर, सुभाष छेडा, सुनील कुलकर्णी, कूंदा कुलकर्णी, पुण्याचे डॉ. अरुण गद्रे, मधुरा डहाणूकर, राहूल सुदामे, मनिषा नवले, नाशिकचे सुधाकर जोशी, अरुंधती जोगळेकर, इंदूरचे अश्विन भागवत, इचलकरंजीची माधुरी केस्तीकर, दिल्लीचा प्रदीप नाटेकर, कोरियाचा कौंतेय देशपांडे, कौरोचा संदीप कुलकर्णी …. यादी मोठी असल्याने प्रत्येकाचे नाव घेणे केवळ अशक्यच. ही मंडळी कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ मराठीच्या प्रेमापोटी मराठीवर्ल्डवर आपले योगदान देत असतात. इतकेच नव्हे तर आपल्या असपासच्या मराठी मंडळींनाही ह्या सांस्कृतीक कटटयावर येण्याचे आमंत्रण देत असतात. त्यामुळे आमचा परिवार साखळी पध्दतीने वाढतच आहे. त्याचा परिणाम असा की प्रत्येक वयोगटासाठी विषयाचे वैविध्य हे मराठीवर्ल्ड वैशिष्टय ठरले आहे.
मराठीवर्ल्डच्या प्रवासात आम्हाला अनेक मान्यवरांचेही आशिर्वाद आणि प्रेम लाभले कै. कुसूमाग्रज, गुलजारसाहेब, अभिनेता अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सचिन-सुप्रिया, शरद पोंक्षे, निलकांती पाटेकर, सुकन्या कुलकर्णी, मंगला खाडीलकर, दिग्दर्शक सुमित्रा भावे, केदार शिंदे, संगितक्षेत्रातल्या वैशाली सामंत, श्रीनिवास खळे, राजेंद्र वैशंपायन, नंदकिशोर मुळे … ही यादीपण लांबत जाणारी असल्यामुळे प्रत्येकाचा उल्लेख करणे कठीण आहे. मराठीवर्ल्डवरसाठी आपले योगदान देणारा प्रत्येकजण सन्मानिय आणि ह्या कुटूंबातला खास आहे. त्यामुळेच अमेरिका, युरोप, न्युझिलंड ते अगदी इंदूर, सातारा, रत्नागिरी, बीड, नागपूर, डोंबिवली, दादर, गिरगाव, बंगलोर, हैद्राबाद अश्या जगभर विखूरलेल्या मराठी माणसांना मराठीवर्ल्ड ‘आपली’ साईट वाटते.
नऊ वर्षांच्या ह्या काळात अनेक तांत्रिक प्रयोग मराठीवर्ल्डने यशस्वी करुन दाखविले. ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीनहजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फॉंट आणि बरेच काही. त्यामुळे मराठीवर्ल्डने कायमच जुन्या संस्कृतीला जपत नव्या तंत्राचे स्वागत केले आहे.
आमच्या ह्या प्रवासात भेटलेल्या आणि परिवारात सामिल झालेल्या लेखक, कवी, वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृतपत्रे, वृतवाहिन्या, प्रकाशक, सायबरएजचे तंत्रज्ञ ह्यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. ह्या सर्वांमुळे ही वाटचाल खरोखरच सुकर झाली आणि मराठीवर्ल्ड डॉट कॉम अधिक समृध्द झाले. आपला हा ई-सहवास आणि प्रेम अधिक वृध्दीगंत होवो हीच मराठी मातेच्या चरणी प्रार्थना.
वेब-संपादक, मराठीवर्ल्ड परिवार