मी आणि माझा मित्र निलेश दरवर्षी एक कॉर्पोरेट टेबलटॉप दिनदर्शिका बनवतो, ज्यात १२ महिन्यासाठी निलेशने टिपलेले उत्कृष्ट फोटो आणि त्याला साजेशी; एखादा विचार मांडणारी माझी मराठी कविता, आणि इतर ४ पाने असे एकूण १६ पानाचे ल्यामीनेटेड रंगभोर टेबलवर ठेवता येईल असे क्यालेंडर छापतो आणि व्यक्तिश: अथवा आय.टी. कंपनीत स्टाल लावून ते विकतो, त्यातून मिळणारे नफा आणि इतर पैसे आम्ही वनवासी कल्याण आश्रमाला मदत म्हणून दान करतो. आमच्या कलेचा अश्या कामासाठी उपयोग होतो आणि ती संधी आम्हाला मिळाली याबद्दल परमेश्वराचे आभार, या उपक्रमाचे यंदाचे हे ४ थे वर्ष असेल.
मी हिंजवडी मध्ये काम करीत असताना २०१२ साली आम्ही क्यालेंडर विक्रीचा स्टाल मांडला होता, व आश्रमाचा एक प्रतिनिधी म्हणून अनिल वाघमारे या मुलाला बोलावले होते. अनिल मारुती वाघमारे, मुळचा राहणार मु. पो. पोयंजे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील आदिवासी विद्यार्थी, घरचा मूळ व्यवसाय छोटी शेती अथवा मोलमजुरी. १ ली ते ४ थी शिक्षण पोयंजे येथील प्राथमिक शाळेत, ५ वी ते १० वी चे शिक्षण वनवासी कल्याण आश्रमाच्या चिंचवली वसतिगृहात, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे झाले आहे.
आम्ही माझ्या कंपनीच्या “सी.एस.आर.” म्हणजे “कोर्पोरेट सोशल रीस्पोनसीबीलिटी” या योजने अंतर्गत हा उपक्रम कंपनीच्या उपहारगृहात ठेवला होता, नाष्टा व जेवणाच्या वेळेत लोक येउन आमच्या स्टालला भेट देत होते; क्यालेंडर घेत होते, मी त्यांना आश्रमाच्या एकूण कामाबद्दल विस्तृत माहिती सांगत होतो, अनिल तसा फार बुजरा मुलगा, तो क्यालेंडर विक्रीची पावती बनवून झाली कि कागदावर काहीतरी चित्र काढत असे, थोड्यावेळाने सगळे कर्मचारी तिथून गेल्यावर मी पाहिले, अनिलने सुट्ट्या कागदांवर पेनाने काही चित्रे काढली होती, त्याने वारली चित्रकलेच्या अनेकविध छटा, प्रसंग काढले होते. मी अक्षरश: अवाक झालो. वारली चित्रकला हा मुलगा विनासायास इतक्या पटकन काढतोय हे क्षणभर मला आश्चर्य देणारे ठरले. त्याने लग्नाची वरात, काम करणारा लोकांचा समूह , पारंपारिक नृत्य करणारे लोक हे सर्व प्रसंग प्राचीन वारली चित्र पद्धतीतून कागदावर उतरवले होते, त्याने काढलेला मोर तर थक्क करणारा होता, मी अनिलकडून अजून माहिती घेतली कि तो कशाप्रकारची चित्रे काढतो आणि त्याने मला थोडे संकोचानेच माहिती दिली. एकूणच आय.टी. च्या चकाचक दुनियेत हा लहान कातकरी मुलगा थोडा अजूनच बुजला गेला.
मी त्याला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो, त्याच्यात एक विलक्षण कलाकार दडला आहे हे मला जाणवले, त्याची पेन पकडायची पद्धत, रेषा मारण्याचे कसब म्हणजे एखाद्या वादकाने सह्जेच तार छेडून अत्यंत मधुर सूर झंकारावा इतके रंजक होते. मी त्याला समजावून सांगितले , कि अरे इथे उपस्थित सगळ्या लोकांच्यात नाही अशी एक ईश्वरीय देणगी तुला मिळाली आहे, तू आम्हा सर्वांपेक्षा वेगळा आणि दखल घेण्याजोगा कलाकार आहेस. मी त्याला बरेच काही सांगत होतो, त्याच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या आणि बदलणाऱ्या भावनांवरून मला प्रतिसाद मिळत होते. तिथेच त्याच टेबलवर मी मनात ठरवले कि अनिलच्या चित्रांचा स्टाल आपण येत्या काही दिवसात ठेवायचा. मी त्याला म्हणलो कि तुला जी काही चित्रे काढणे शक्य आहे ती काढ, वेगवेगळ्या रंगसंगतीची, प्रसंगांची आणि ती तयार झाली कि मला कळव. आमचा क्यालेंडर स्टाल संपला. मी घरी जात असताना हाच विचार डोक्यात होता कि काय विलक्षण कला आहे या मुलाच्या अंगात पण याला ती कला सर्वांसमोर आणण्यासाठी काय करता येईल !!!.
पुढचे थोडे दिवस अनिल बरोबर संपर्क ठेवून त्याने चित्रे किती काढली वगैरे माहिती घेत राहिलो. त्याने काढलेल्या चित्रांसाठी आश्रमाचे नरेंद्रजी पेंडसे व ऋषभजी मुथा यांनी लगेचच फ्रेम करून देण्याची व्यवस्था केली. दिवस ठरला अनिलकडे एव्हाना ६”x ९”, १२”x १५” व इतर काही आकाराची चित्रे/फ्रेम तयार झाल्या होत्या. मी सी.एस.आर. कमिटीशी बोलून अनिलसाठी एक गुरुवारचा दिवस निवडला,अनिलची कंपनीत आत येण्यासाठी व चित्रे आणण्यासाठीची “एस.ई.झेड.” परवानगी प्रक्रिया पूर्ण केली.
ठरलेल्या दिवशी सकाळी ९ वाजताच अनिल आला होता. मी कंपनीत पोचताच अनिलला स्वागतकक्षातून उपहारगृहात घेऊन गेलो. तिथे वारली चित्रे विक्री संदर्भाची काही माहिती पत्रके छापून चीटकवली. गर्दी जमेपर्यंत चहा-नाष्टा झाला. आम्ही टेबल मांडून त्यावर वेगळ्या वेगळ्या आकाराच्या चित्रांच्या फ्रेम, सुट्टी क्यानव्हास / कापडावर काढलेली चित्रे मांडून ठेवली. अनिलने एकूणच चित्रे काढताना खूप मेहनत घेतली होती. त्यात एक १९” x ३०” या आकाराचे कापडावर काढलेले गणपतीचे आणि इतर वारली रेखाटनाचे लक्षवेधी सुबक चित्र होते. एकूण फ्रेमचा अंदाज घेता बराच खर्च झाला होता हे समजत होते, फायबरच्या स्टेपल्ड फ्रेम आणि काच यांचीच किंमत खूप होती. बाहेर आर्ट ग्यालरी मध्ये किमतीपेक्षा अनिलने ठेवलेल्या किमती खूप कमी होत्या. अनिलच्या चेहऱ्यावर थोडा ताण दिसत होता, आपण काढलेली चित्रे या आय.टि कंपनीत कोण कशाला घेईल! अशा प्रकारच्या भावनांची सरमिसळ मला त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती, त्याने एकदा तसे बोलूनही दाखवले, मी त्याला त्याक्षणी थोडा वेळ वाट पहा इतकेच म्हणू शकलो.
काही कर्मचारी येउन लांबूनच बघून जात होते , काही जण नुसतीच चौकशी करून जात होते, अनिलचा थोडा धीर सुटत होता, तेवढ्यात एक दोन जण हे काय आहे? , कोणी काढले वगैरे विचारू लागले, अनिलनेच काढले म्हणल्यावर; अजून उत्साहाने त्याच्याशी हात मिळवून अधिक चौकशी करू लागले, आता मला अनिलच्या चेहऱ्यावर बदल दिसू लागला. पहिली २०० रु. ची फ्रेम विकली गेली, अनिलच्या भावना संमिश्र होत्या. इंग्लिश बोलणाऱ्या; एकूणच दडपण वाटणाऱ्या वातावरणात, लोकांशी कसे बोलावे याची चिंता असले ला अनिल, “आय.टी.” कंपनीतच आपले कौतुक होते आहे या अनुभवाने आनंदी होण्याएवढाच थोडा हळवा देखील झाला होता. मी त्रयास्थासारखा त्या प्रसंगाकडे पाहत होतो. हळूहळू बरेच लोक येउन गेले दुपारी २ पर्यंत १८००रु. च्या फ्रेम विकल्या गेल्या. लोक स्टाल वर आले कि काय बोलायचे,आपली ओळख कशी करून द्यायची, कुणी फ्रेम घेतल्या अथवा नाही घेतल्या तरीही काय बोलायचे, अशा बारीकसारीक गोष्टी मी त्याला मधेमधे सुचवत होतो.
दुपारी गणपतीची मोठी फ्रेम विकली गेली, अनिलच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे समाधान होते, ते केवळ काही पैसे मिळाल्याचे नव्हते ,तर त्याच्या कलेला जी दाद प्रत्येकाकडून मिळत होती त्याचे द्योतक होते. या सर्वात सुखद क्षण म्हणजे, त्याच गणपतीच्या मोठ्या फ्रेमच्या त्याला पुढील २ तासात अजून ३ बुकिंग मागण्या मिळाल्या, एका बाजूने लहान फ्रेम विकल्या जात होत्याच. मध्ये एकदा “सी.एस.आर.” कमिटीचे सभासद आणि अड्मीनचे श्री कुलकर्णी साहेब स्वत: येउन अनिलचे व्यक्तिश: कौतुक करून व फ्रेम विकत घेऊन गेले, एकूणच आज या लहान मूर्तीने मोठी कीर्ती केली होती. काही जणांनी अनिलचा मोबाईल नंबर घेऊन अजून फ्रेम लागणार आहेत;आम्हाला मागणीप्रमाणे बनवून देशील का? अशी चौकशी करून घेतली.
एकूणच पूर्ण दिवस हा उत्कंठा, चर्चा, विक्री, गप्पा, आनंद यात कसा गेला कळला देखील नाही. विश्वास बसणार नाही अशी गोष्ट झाली अनिलच्या सगळ्या फ्रेम विकल्या गेल्या. हिशोब झाला, अनिलला ४६००रु./- मिळाले, मोजताना त्याच्या हातांची थरथर मला जाणवत होती, त्याच्या कलेला मिळालेली हि व्यवहारातील एक उत्तुंग दाद होती, अनिल गेटपास घेऊन जाताना पार्किंग मध्ये गेल्यावर तो जास्तच हळवा झालेला जाणवला, स्टालच्या निमित्ताने व्यक्तिश: इतका वेळ एकत्र घालवण्याची आमची ती पहिलीच प्रत्यक्ष भेट होती, पण तो निरोप घेऊन बाहेर जाताना त्याक्षणी एक जो “शब्देविण संवादू” झाला तो माझ्या मनालाही चटका लावून गेला, अनिलचे किंचित भरले डोळे सगळे काही बोलून गेले होते. मी त्याला परत काही वेळ थांबवून काही गोष्टी बोललो व लवकरच असाच एक स्टाल इथेच किंवा इतर कंपनीत ठेवू असे आश्वासन दिले. अनिलची पाठमोरी आकृती पाहून त्याक्षणी मलाही फार गलबलून आले. आज खऱ्या अर्थाने एका कलाकारची स्वत:शीच ओळख झाली होती.
हा प्रसंग आजही माझ्या स्मरणात जसाच्या तसा आहे. वनवासी कल्याण आश्रमाची समर्थ साथ अनिलला आहेच, पण त्याच्या चित्रे विकण्याची एक जबाबदारी मी स्वत:हि कायमस्वरूप घेतली आहे. गेल्या काही महिन्यात अनिलने स्वत: लाकडी वस्तू बनवण्याचे कामही चालू केले आहे, याच वस्तूंवर तो सुंदर वारली चित्रे काढतो आणि विकतो. यातूनच त्याच्या मुळ गावी अजून २ मुलांना वस्तू बनविण्याच्या कामातून थोडा रोजगार मिळाला आहे. अनिलच्या या निर्मिती केंद्राला “रंगावधूत” हे साजेसे नाव दिले आहे.
अनिल लाकडाच्या किचेन, किल्ल्या अडकवण्याचे होल्डर, लीफापे/कागदपत्र ठेवायचे होल्डर इत्यादी अनेकविध वस्तू बनवून विकतो. वारली चित्रे/फ्रेम कागदावर , कापडावर, भिंतीवर, टाईल्सवर देखील काढतो. आता गेल्या ३ वर्षात तो चांगलाच तयार झाला आहे, स्टालची नोंदणी एकदा करून दिली तो तिथे जाऊन; सर्व लोकांशी व्यवस्थित बोलून विक्रीचे सर्व काम एकटा सांभाळतो. आश्रमाच्या छायेत वाढलेल्या या कलाकाराला माझ्या मनापासून शुभेच्छा !!! त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो आणि त्याच्यामुळे इतर अन्य कातकरी बांधवांचेहि सार्थ कल्याण होवो हि परमेश्वरचरणी मन:पूर्वक प्रार्थना.
अनिल हा पारंपारिक आदिवासी चित्रकला “वारली” याचा जन्मजात कलाकार आहे. १० वी नंतर त्याला याच क्षेत्रात कायम काम करण्याची इच्छा असल्याने, आश्रमाने त्याला त्या संदर्भात पुढे जाण्यासाठी मदत करायचे ठरवलेच आहे. अनिलला छायाचित्रण (फोटोग्राफी) करण्यात देखील रस असल्याने, आश्रमातर्फे त्याला मागील वर्षी अडव्हांस फोटोग्राफी कार्यशालेतही पाठविले होते, माझे मित्र श्री. स्वप्नील माणेकर यांनी त्याला एक क्यामेरा घेऊन दिला आहे, व वेळ मिळेल तसा तो सराव करतो आणि केलेल्या चित्रकलेचे फोटो काढून ते संग्रह करतो.
आपण अनिलकडून वारली चित्रे विकत घेऊन त्याला मदत व एक जुनी भारतीय आदिवासी चित्र कला पुढे नेण्यात आणि जपण्यात आपले मोलाचे योगदान करावे अशी नम्र विनंती. आपण आपल्या कंपनीत/ सोसायटीत त्याच्या फ्रेमचे/ वस्तूंचे प्रदर्शन लावून त्याचे पेंटिंग विकण्यास मदत करू शकता. तूर्तास इतकेच म्हणू शकतो, लहानगी जरी आकृती, तत्व मूळ राहणार l चिमुकली ती पणती, तिमिर काही उजळवणार ll
– सचिन कुलकर्णी
आपले नम्र,
वनवासी कल्याण आश्रम (www.vanvasi.org)
नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२ (7709013232)
ऋषभ मुथा – ९३२५०९३८४० (9325093840)
सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८ (9921574108)