वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरूमे देव सर्व कार्येशू सर्वदा ॥
भारतीय संस्कृती ही एक भव्य दिव्य संस्कृती आहे, आणि या संस्कृतीत गणेश पूजन हे आद्य पूजन मानलं आहे. गणेश ही विद्येची देवता. महाराष्ट्रातील सर्व श्रेष्ठ संत, महंत, उपासक हे गणेशाला प्रथम वंदन करतात. ज्ञानेश्वर माऊलीने तर ज्ञानेश्वरीची सुरवातच मुळी ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जयजय स्वसंवेघा आत्मरूपा देवा तुचि गणेश, ओंकारा तुची गणेशु – अशी केली आहे. भंडारा हे विदर्भातील एक जिल्ह्याचं ठिकाण. वैनगंगा नदीच्या तिरावर वसलेलं, राष्ट्रीय महामार्ग ६ वर तांबे, पितळीच्या भांडयांसाठी प्रसिध्द असणारं ठिकाण भंडारा जिल्हा हा जंगल – तलावांचा जिल्हा म्हणूनही प्रसिध्द आहे. आणि या शहराला लाभलेलं वैभव, आध्यामिक वैभव म्हणजे येथील भृशुंड गणेश मंदीर. भंडारा शहराला लागून असलेली वस्ती – मेंढा. अत्यंत प्राचीन काळापासून नागलोकांची वस्ती इंथं होती. भृशुंड ऋषी हे अत्यंत प्रज्ञावंत ऋषी होते. त्यांनीच या गणेशाची स्थापना केली. भृशुंड ऋषी हे नागवंशीय होते.
महाराष्ट्रातील अष्टविनायक आज प्रसिध्दीच्या झोतात आहे.
विदर्भात सुध्दा अष्टविनायक आहेत.
१. श्री महागणेश – आदासा ता. सावनेर, जि. नागपूर
२. श्री चिंतामण गणेश – कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ
३. श्री एकचक्रा गणेश – केळझर ता. केळझर जि. वर्धा
४. श्री अष्टदशभुज गणेश – रामटेक, जि. नागपूर
५. श्री वरद गणेश – भद्रावती, जि. चंद्रपूर
६. श्री टेकडी गणेश – नागपूर
७. श्री भृशुंड गणेश – भंडारा, जि. भंडारा
८. श्री पंचानन गणेश – पवनी ता. पावनी, जि. भंडारा
भंडा-याचा भृशुंड गणेश हा तेथील प्रतिमेच्या प्राचिनतेमुळे तसेच भव्यतेमुळे ग्रामवासी जनतेचे श्रध्दा स्थान आहे. भृशुंड गणेश मूर्तीत जणू ऋषींचा भास होतो. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभा-यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाचे जागी नाकपुडया, डोळे, मिशा व दाढी दिसत असून चेहरा भव्य व स्पष्ट आहे. सोंड डाव्या हातावरील मोदकाकडे वळलेली आहे.
भृशुंड गणेशाचं मंदीर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थापना ११३० मध्ये झाली असावी असा अंदाज आहे. तसे मेंढा परिसरात गिरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. आजही या भागात हेमाडपंथी शैलीतील स्मारके बघायला मिळतात.
तसेच कित्येक वर्ष हे भृशुंड गणेशाचे मंदीर दुर्लक्षीत होते. परंतू भंडारा येथील ग्रामजोशी श्री विश्वासराव जोशी यांचे पुढाकाराने १९८६ पासून तिथे पूजा सुरू केली गेली.
आज मंदीराची भव्यता वाढली असून सभामंडप भव्य व सुंदर परिसर गणेश भक्तांना आध्यात्मिक सुख देण्यात हातभार लावत आहे. भृशुंड गणेशमेंढा – परिसरातील ग्रामवासियांनी पुढाकाराने साकारलेली एक वस्तू असून त्यांच्याच सहकार्याने विविध कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर असते. आज दर चतुर्थीला अभिषेक व महापूजा असते. गणेशोत्सवाचा दहा दिवस कार्यक्रम चालतो. आणि पौष संकष्ट चतुर्थी ते माघ चतुर्थी पर्यंत एक महिनाभर कार्यक्रम असतो. पूजापाठात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होवून कार्यक्रम व उत्सव थाटात पार पाडतात. संस्कारक्षम वातावरण निर्मीतीसाठी ग्रामीण महिलांना गणपती अथर्वशिर्ष शिकविण्यात आले. त्यामुळे आवर्तनाभिषेकात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.
या देवस्थानाला आजवर अनेक संतमहंतांनी भेटी दिल्यात श्रृंगेरी पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होत. नुकतीच बडोद्याचे प. पू. श्री. जनार्दनस्वामी खेर यांनी सुध्दा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले. याच मंदीर परीसरात श्री. महावीर हनुमानाची मूर्ती सुध्दा आहे. परंतू त्यावर मंदीर अथवा छत नाही हे विशेष.
भाविकांची मनोरथे पूर्ण करणा-या श्री. भृशुंड गणेशाची आरती त्याची महती गाणारीच आहे.
आरती श्री गणेशा, देवा मंगळमूर्ती
नामले रामस्वामी, वेद वर्णिती कीर्ती ॥१॥
भृशुंड ॠषीवर दे तुला प्रसन्न केले
दिधले ते निज स्वरूपा अपूले ॥२॥
नादा: बिंदू सुधा न भी कर्पुरा देते
तिन्हींचा संगम झाला, प्रभू नांदसी तेथे ॥३॥
कामना पूर्ण होती, तुझे दर्शने देवा
गोसाची नंदन तुझे चरणी सेवा ॥४॥ आरती श्री गणेशा ॥
श्री भृशुंड ॠषींनी वैनगंगेच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करून या क्षेत्राला पावन केले आहे. गणेश व मुदगल पुरांणांतून भृशुंड गणेशाचे आख्यान दिलेले आहे.
अशा या पावन भृशुंड गणेश मंदीरातून प्रज्वलीत झालेली संस्काराची ज्योत समाजाच्या तळागळापर्यंत जावून सामाजिक एकात्मतेची बंधूभावाची एक अखंड महाज्योत व्हावी अशी प्रार्थना श्री भृशुंड गणेशाचे चरणी करूया.
संकलक : श्रीकांत भास्कर तिजारे