मधल्या वेळचे पदार्थ

रवा ढोकळा

rava-dhokla साहित्य – दोन वाटी बारीक रवा, दोन वाटी दही, एक छोटा चमचा खायचा सोडा, चवीपुरते मीठ.

फोडणीसाठी – एक चमचा मोहरी, अर्धी वाटी तेल, थोडेसे जिरे.

कृती – रवा, दही, मीठ, आणि खायचा सोडा एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करावे. हे मिश्रण अर्धा तास भिजत ठेवावे. अर्धा तासानंतर ढोकळा पात्रात हे मिश्रण टाकून १० मिनिटे गॅसवर ठेवावे. ढोकळयाचे मिश्रण ताटात टाकताना ताटाला तेल लावावे म्हणजे ढोकळा चिकटत नाही. ढोकळयाला वरतून मोहरी व जिर्‍याची फोडणी द्यावी. नारळाची चटणी किंवा सॉस बरोबर ढोकळा छान लागतो.

रवा ढोकळा करायच्या वेळेस मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, गाजर, मिरची देखील टाकू शकतो.

भाजणीचे थालीपीठ

bhajniche-thalipith साहित्य – (प्रकार १) – १ फुलपात्र गहू, १ फुलपात्र तांदूळ, २ फुलपात्र जोंधळे, २ फुलपात्र बाजरी, ३/४ फुलपात्र हरभर्‍याची डाळ, ३/४ फुलपात्र उडदाची डाळ, १/२ फुलपात्र धने.

साहित्य – (प्रकार २) – १ फुलपात्र गहू, १ फुलपात्र तांदूळ, २ फुलपात्र जोंधळे, २ फुलपात्र बाजरी, ३/४ फुलपात्र हरभरे (पिवळे) ३/४ फुलपात्र काळे उडीद, १/२ फुलपात्र धने.

कृती – प्रत्येक धान्य वेगवेगळे भाजावे. वरील धान्यापैकी कोणतेही धान्य थोडेफार कमी जास्त असेल तरी चालेल. भाजणी थोडी जाडसर दळून आणावी. थालीपीठ करतांना आयत्यावेळी पीठ भिजवावे. पीठ भिजवतांना त्यात तिखट,मीठ,हिंग,हळद व मोहनासाठी तेल घालावे. कांदा घालायचा असल्यास अगदी बारीक चिरून घालावा. थंड तव्यावर १ चमचा तेल घालून त्यावर बेताच्या आकाराचा गोळा थापून घ्यावा. नंतर मध्यभागी १ व बाजूला ४ भोके पाडावीत. ह्या भोकात थोडे तेल सोडावे व तवा गॅसवर ठेवून त्यावर झाकण घालावे. चुर्र असा आवाज आला, की झाकण काढून उलथन्याने सर्व बांजूनी सोडवून उलटावे. बाजूंनी तेल सोडावे, उलटल्यावर झाकण ठेऊ नये. चांगले खमंग भाजले गेले की तव्यावरून काढून गरमच लोणी, दही किंवा लिंबाच्या लोणच्या बरोबर खायला द्यावे. छोटी थालीपीठे हवी असल्यास प्ल्यास्टिकवर थापून घ्यावीत. ह्या थालीपीठाला मध्यभागी भोक पाडू नये. भाजणी नसल्यास सर्व पिठे एकत्र करून थालीपीठ करावे चांगले लागते.

पौष्टिक सातुचे पीठ

साहित्य – ४ वाटया गहू, २ वाटया चणाडाळ, १ वाटी हिरवे मूग, गूळ, दुध, वेलदोडा, तळलेला डिंक.

कृती – गहू, चणाडाळ, हिरवे मुग मातीच्या भांडयात वाळवून घेऊन भाजावे. भाजलेले धान्य दळून पीठ करावे. या पिठाला सातूचे पीठ म्हणतात. या पिठात साखर, वेलची, तळलेल्या डिकांची पूड व दूध घालून खाण्यास द्यावे.

या पिठात गूळ, तूप घालून लाडूही करतात. प्रवासात हे पीठ बरोबर घेतल्यास कुठेही पाण्यात कालवून खायला देता येते. कमी वेळात, कमी खर्चात होणारी परंतु भरपूर पोषक द्रव्ये असलेली ही न्याहारी वरील प्रमाणे पाऊण किलो पीठ तयार होते.

हेल्दी ब्रेड पिझ्झा

bread pizza साहित्य – ४ गव्हाच्या ब्रेडचे स्लाईस,
१/२ कप कांद्याच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप टोमॅटोच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप ढोबळी मिरचीच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप बारीक किसलेला कोबी, गाजर, बीट (कमी प्रमाणात)
१/२ कप किसलेले पनीर (ऐच्छीक)
पाऊण कप किसलेले चीज
एक मूठ मोड आलेले हिरवे मूग
टोमॅटो सॉस, तिखट, मीठ.

कृती – १) टोमॅटो सॉसमध्ये आवडीनुसार मीठ व तिखट घालून वाटीमध्ये वेगळे मिसळून ठेवा.
२) आईच्या मदतीने ओव्हन योग्य तापमानावर प्रिहीट करायला ठेवा.
३) आता ब्रेडच्या स्लाईसवर तयार केलेले सॉस पसरवा.
४) त्यावर किसलेला कोबी, गाजर, बीट आणि मोड आलेल्या मूगाचा एक थर द्या.
५) त्यानंतर आपल्याला आवडतील त्याप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरचीच्या चकत्या ठेवा.
६) आवडीनुसार पनीर आणि चीज किसून घाला.
७) लगेचच ओव्हनमध्ये बेक करायला ठेवा. चीज किंचीत वितळले /
सोनेरी झाले की गरमागरम सर्व्ह करा.

टीप – भाज्या घालून झाल्यावर ब्रेड लगेचच ओव्हनमध्ये ठेवावा.
आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते.