मधल्या वेळचे पदार्थ

कोथिंबीरीचे वडे

coriander-vada साहित्य – २ जुड्या कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले बारीक वाटून, १ वाटीभर डाळीचे पीठ, २ टेबलस्पून बारीक रवा, मीठ, १ चिमूट खायचा सोडा, तळण्यासाठी तेल.

कृती – कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपडयावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत.

चटणी सोबत वाढावेत.

डाळीचे वडे

daliche-vade साहित्य – १ वाटी चणा डाळ, १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अधी वाटी मसुराची डाळ, आल्याचा तुकडा, ७-८ हिरव्या मिरच्या, १ वाटी ओल्या खोब-याचा किस, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा जिरे, २ चमचे मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, तळण्यासाठी तेल.

कृती – सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. चार तासांनंतर डाळी वाटून घ्याव्यात . वाटलेल्या डाळीत आले-मिरची-जिरे वाटण, खोबरे, कोथिंबीर, मीठ व मसाला घालावा. जास्त तिखट हवे असल्यास थोडे लाल तिखट घालावे. चमचाभर तेल घालून मिश्रण कालवावे. त्याचे छोटे गोल किंवा चपटे वडे करून तळावे.

बटाटे वडे

batata-wada साहित्य – १ किलो बटाटे उकडून, ४ मोठे कांदे बारीक चिरून, १०-१५ मिरच्या, एक मूठ कोथिंबीर, १ इंच आले, थोडे कढीलिंब, १ वाटी डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हिंग, हळद.

कृती – बटाटे उकडून घ्यावेत, नंतर साले काढून, चिरून घ्यावेत. थोडया तेलावर कांदा परतून घ्यावे. नंतर मीठ मिरची, आले, कढीलिंब व बटाटयाच्या फोडी घालून भाजी करून घ्यावी. डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, हिंग घालून पीठ भिजवून घेणे. पिठात थोडे कडकडीत मोहन घालावे. आता नेहमीप्रमाणे वडे करायचे आहेत, तळून झाल्यावर कागदावर निथळत ठेवावेत. वरील प्रमाणात २०-२२ वडे होतात. पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्यावेत.

आलू चाट

aloo-chat साहित्य – ४ उकडलेले बटाटे, १ कांदा, १ टोमॅटो, १ लिंबू, चाट मसाला, साखर-मीठ चवीनुसार.

कृती – १. गार झालेल्या, उकडलेल्या बटाटयाच्या मध्यम फोडी कराव्यात.
२. कांदा व टोमॅटो चिरुन घ्यावेत.
३. मोठया बाऊलमध्ये सर्व एकत्र करावे, चवीनुसार चाट मसाला, मीठ, साखर घालून लिंबू पिळून चांगले कालवावे.
४. फ्रीजमध्ये थोडावेळ थंड करायला ठेवून मग खायला घ्यावे.

शेवयांचा उपमा

shevya upma साहित्य – २ वाटया शेवयांचा चुरा,२ कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, थोडासा कढीलिंब, १ टे. चमचा दही, चवीनुसार मीठ, ३ चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, २ वाटया उकळीचे पाणी, २ चमचे तूप, फोडणीसाठी २ चमचे तेल, अर्धा चमचा प्रत्येकी हिंग, मोहरी.

कृती – कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत, कढईत तूप घालून तूपावर शेवयांचा चुरा बदामी रंगावर परतून घ्यावा. एका पातेल्यात तेलाची हिंग, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात कांदा, कढीलिंब व मिरच्यांचे तुकडे घालावेत. जरा परतून झाकण घालावे. कांदा बदामी रंगाचा झाला व शिजला की त्यात शेवयांचा चुरा घालावा. जरा परतून थोडे पाणी घालावे, मीठ, व दही धालावे व परत थोडे पाणी घालावे व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. शेवया शिजायला फारसा वेळ लागत नाही. खायला देतेवेळी उपम्यावर कोथिंबीर व खोबरे घालून द्यावे.

रव्याचा उपमा

rawa upma साहित्य – १ वाटी रवा, २ वाटया उकळलेले पाणी, उडदाची डाळ, ३-४ लाल मिरच्या, १ बारिक चिरलेला कांदा, २-३ चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, ८-१० पाने कढीलिंब, चवीनुसार मीठ, अर्धा इंच आले, फोडणीसाठी २-३ चमचे तेल, १ लहान चमचा प्रत्येकी मोहरी व हिंग, लिंबाच्या फोडी.

कृती – प्रथम रवा कोरडाच चांगला भाजून घ्यावा. तेल, मोहरी व हिंग घालून फोडणी करावी. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे, किसलेले आले, उडीदाची डाळ, कढीलिंब व कांदा घालून चांगले परतावे. कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. एकीकडे पाणी उकळत ठेवावे. नंतर परतलेल्या कांद्यात उकळते पाणी घालावे, त्यात भाजलेला रवा घालावा वर झाकण ठेऊन वाफ काढावी. उपमा खायला देतेवेळी उपम्यावर खोबरे व कोथिंबीर पेरुन खायला द्यावी. आवडत असल्यास लिंबाची फोडही द्यावी.