मधल्या वेळचे पदार्थ

कांद्याची भजी

kanda-bhaji साहित्य – ४-६ मोठे कांदे, २ वाटया डाळीचे पीठ, २ चहाचे चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, ४ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, पाव चहाचा चमचा बेकिंग पावडर, भजी तळण्याकरता तेल.

कृती – कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत. त्यावर तिखट, हळद, मीठ व चार टेबलस्पून तेल गरम करून घालावे. हाताने थोडे कालवून १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. १५-२० मिनिटांनी मिश्रणावर डाळीचे पीठ घालावे व हलक्या हाताने मिसळावे. कांद्याला सुटलेल्या पाण्यात मीठ मिसळेल. वेगळे पाणी वापरू नये. पाव चहाचा चमचा बेकिंग पावडर घालावी. कढईत तेल तापायला ठेवावे व तापलेल्या तेलात कांदा हाताने मोकळा करून वेडयावाकडया आकाराची भजी घालावीत व खरपूस तळून काढावीत.

टीप – वरील प्रकारे कांदा बारीक चिरून तिखट-हळद, मूठभर चिरलेली कोथिंबीर, मीठ व डाळीचे पीठ घालून थोडे पाणी घालून पीठ सरबरीत करावे, व भजी काढावीत, ही काद्यांची भजीपण छान होतात.

पालक – मेथीची भजी

palak-methi-bhaji साहित्य – अर्धी गड्डी पालक आणि अर्धी गड्डी मेथी धुवून चिरून, २ वाटया डाळीचे पीठ, १ चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, २ टेबल स्पून तेल, १ टेबलस्पून पांढरे तीळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ, तळण्याकरता तेल.

कृती – चिरलेला पालक व मेथी एकत्र करावी. त्यात डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घालून २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. थोडे पाणी घालून पीठ कालवावे. फार पातळ करू नये. कढईत तेल तापवून वरील पिठाची भजी तळावीत.

बटाटयाची भजी

batata-bahji साहित्य – ३-४ मोठे बटाटे, २ वाटया भरून डाळीचे पीठ, २ टेबलस्पून तादुळाची पिठी, १ चहाचा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, ३ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, तळण्याकरता तेल.

कृती – बटाटे साल काढून गोल पातळ चिरावेत व मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे घालून ठेवून हाताने चोळून बाहेर काढावेत व चाळणीत निथळत ठेवावेत. डाळीच्या पिठात २ टेबलस्पून तांदळाची पिठी, ३ टेबलस्पून तेल कडकडीत करून घालावे. त्यात तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालावे. पीठ सरबरीत कालवावे, त्यात चिमूटभर सोडा घालावा. कढईत तेल तापत ठेवावे, तेल तापल्यावर बटाटयाची एक एक चकती पिठात बुडवून भजी घालावीत व खरपूस तळावीत.

टीप – वरीलप्रमाणे बटाटयाच्या ऐवजी कांद्याच्या गोल चकत्या, वांग्याच्या चकत्या, पिकलेली केळी, घोसाळयाच्या चकत्या, जाड बुटक्या मिरच्यांमध्ये पालकाची छोटी सबंध पाने, ओव्याची पाने, मायाळूची पाने ह्यांची डाळीच्या पिठात बुडवून भजी तळावीत. भज्याच्या पिठात कडकडीत तेल घालतांना त्यातच चिमूटभर सोडा घालून मग ते भज्यांच्या पिठात घालावे. भजी खूप हलकी होतात.

बटाटयाचे पॅटिस

aloo-patis साहित्य – ८-१० बटाटे, आलं, लसूण, मिरची, गरम मसाला, ब्रेडचा कुस्करा, रवा, पॅटिस साचा, कोथिंबीर, साँस इ.

कृती – बटाटे उकडून घ्या. ते कुस्करून घ्या, ताजा कुटलेला गरम मसाला, चवीप्रमाणे आलं, लसूण, मिरची यांचे एकजीव मिश्रण करा. हे मिश्रण कुस्करलेल्या बटाटयांत चांगले मिसळा. एक चवदार व एकजीव मिश्रण तयार होईल याची काळजी घ्या. वेगवेगळया आकाराचे पॅटिसचे साचे बाजारात मिळतात. शंकरपाळी, बदाम यासारखा आकार या मिश्रणाला द्या. पॅटिसचा साचा नसेल तर घरी देखील आपण निरनिराळे आकार देऊ शकतो. मिश्रणाला आकार दिल्यावर सुक्या पावाचा कुस्करा करा. त्यात थोडा रवा देखील मिसळला तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे रव्याचाच लेप कच्च्या पॅटिसला बाहेरून द्या. या मिश्रणामध्ये पॅटिस चांगले सर्व बाजूंनी घोळवा. एवढे झाल्यावर फ्राय पॅन किंवा तव्यावर थोडेसे तेल घाला. तव्याला आच द्या. एकाचवेळी थोडयाशा तेलावर पाच ते सहा पॅटिस भाजून काढा.

कुरकुरीत गरमागरम पॅटिस खावयास देताना, साँस किंवा कोथिंबीर चटणी सोबत द्यावेत. जास्त चवदार लागतात.