साहित्य – १ वाटी तांदूळ, ३ वाटया मूगडाळ, मिरच्या, आले, २ ते ४ कांदे, थोडेसे तेल, मीठ.
कृती – कोमट पाण्यामध्ये तांदूळ व मूगाची डाळ साधारणपणे चार ते पाच तास भिजू द्यावी. त्यानंतर ती मिक्सरमधून किंवा रगडयाने बारीक करून घ्यावी. पीठ सरसरीत असू द्यावे. फार पातळ वा फार जाड नसावे. चवीपुरते मीठ घालून सारखे करावे. आवडत असल्यास त्यातच आले व मिरची बारीक करून घालावी. कांदा बारीक चिरून घालावा. नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून त्यावर डोसे करून दोन्ही बांजूनी खमंग परतावे. छान लालसर जाळी पडते. ओल्या नारळाची चटणी, साँस किंवा कोथिंबीरीची चटणी असे व्यंजन खाताना जोडीला द्यावे.
साहित्य – १ वाटी ज्वारी पीठ, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मक्याचे पीठ (मक्याच्या रोटीसाठी जे दुकानात मिळते ते), तीळ दोन चमचे, ओवा अर्धा चमचा, लसूण, आले व जिरे पेस्ट १ चमचा मीठ, मिरची पावडर, हळद पाव चमचा.
कृती – सर्व पीठे व इतर वस्तू एकत्र भिजवून पळीने ओतता येईल इतपत पातळ भिजवणे, नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी खमंग परतणे. खाताना गोड चटणी, दही व कांद्याबरोबर खाणे.
साहित्य – १ वाटी तांदूळाचे पीठ, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, ५ हिरव्या मिरच्या, साखर अर्धा चमचा, फोडणीसाठी तेल २ चमचे व जिरे-मोहरी एक चमचा प्रत्येकी, कढीलिंब १ डहाळी, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, वरून घेण्यासाठी कच्चे गोडेतेल २ चमचे.
कृती – मिरच्यांचे बेताच्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी टाकावी. कढीलिंब, मिरच्यांचे तुकडे टाकावेत व नंतर त्यात पाणी घालावे. फोडणीत हळद घालू नये. नंतर त्यात ताक घालावे. त्यानंतर तांदूळाचे पीठ पाण्यात कालवून घ्यावे व ते पातेल्यात ओतावे व डावाने व्यवस्थित ढवळावे मग पातेले खाली घेऊन डावाने त्याच्या गुठळ्या मोडाव्यात व परत बारीक गॅसवर ठेवून ४-५ वाफा आणाव्यात. प्रत्येक वाफेनंतर उकड खाली घेऊन ढवळावी. खायला त्यावर कोथिंबीर व कच्चे तेल घालावे.
साहित्य – २ वाटया बाजरी, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी हरभरा डाळ, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळया, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीलिंब,एका लिंबाचा रस व फोडणीसाठी तेल ३ चमचे, मोहरी व हळद, चवीनुसार मीठ व एक चमचा साखर, २-३ चमचे ओले खोबरे.
कृती – बाजरीला जरा पाण्याचा हात लावून ती सडावी. नंतर पसरून ठेवावी, खिचडा करण्याआधी ४-५ तास सडलेली बाजरी, डाळ व दाणे भिजत ठेवा व तीत दुप्पट पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवा. मिरच्यांचे तुकडे करून घ्या, कांदा बारीक कापून घ्या. तेलाची फोडणी करून त्यात लसूण, मिरची, कढीलिंब, कांदा व दाणे घालून मीठ साखर घालून परता व दोन वाफा येऊ द्या. खाण्यास देतांना ,खोबरे, कोथिंबीर, लिंबू पिळून द्या हा पदार्थ गरम चांगला लागतो.
साहित्य – १ वाटी तांदूळ,अर्धी वाटी मसूरडाळ, अर्धी वाटी गाजराचे तुकडे,अर्धी वाटी कोबी ४-५ छोटे कांदे, १ टोमॅटो, अर्धा चमचा जिरे, १ हिरवी मिरची, हळद , मीठ , बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तूप व ओले खोबरे.
कृती – डाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून ठेवावेत. पातेल्यात तुपावर जिरे व मिरची फोडणीस टाकून त्यावर भाज्या, मीठ, हळद, टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे. त्यात डाळ घालून ५ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी आली की तांदूळ घालावे दहा मिनिटांनंतर आंच कमी करावी व झाकण ठेवावे. मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी. पाच मिनिटांनंतर कडेने चमचाभर साजूक तूप सोडावे. वाढताना कोथिंबीर व खोबरे घालावे. पापड, लोणचे, दही व ताक याबरोबर ही खिचडी खावी.