तारांगण – (ग्रहगोलांविषयी माहिती देणारे सदर)

राशींचा मानवी जीवनावर परिणाम

Rashi राशी या ग्रहाप्रमाणे १२ आहेत. फलज्योतिषविद त्यांना कुंडलीत स्थान देतात. ग्रहांप्रमाणे राशी ही फलज्योतिष्याचे आधारस्तंभ मानले जातात. वस्‍तुत: कुंडली ही भारतीय संस्कृतीत प्राचीनकाळी नव्हती कुंडलीचे (Horoscope) चे ज्ञान आपण ग्रीकांकडून घेतले. ”भारतीय ज्योतिष विद्येत फक्त नक्षत्रांचा उल्लेख असे” (भारताचार्य चि. वि. वैद्य महाभारताचा उपसंहार पृष्ठ ६४)

राशी म्हणजे काय?
चंद्र, सूर्य ग्रह व राशी ज्या वर्तुळाकृती आकाशमार्गावरून भ्रमण करीत असल्याचा भास होतो त्या आकाशवर्तुळाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वीभोवतीच्या वर्तुळाकृती आयनिक वृत्ताच्या दोन्ही बाजूला नऊ अंश अंतरावरील ता-यांनी मिळून एक पट्टा निर्माण होतो. या वर्तुळाकृती पट्टयाचे समान बारा भाग केल्यावर त्यातुन निर्माण होणा-या प्रत्येक भागातील तारका समुहाला राशी म्हणतात. राशी शब्द रास शब्दावरून बनला. रासचा अर्थ ढीग समूह (रासलीला लीलांचा खेळांचा समूह) सुर्याला राशी मंडळाच्या भ्रमणास बारा महिने लागतात. याचा अर्थ तो एका राशीत एक महिनाभर असतो. त्याकाळात जन्मलेल्यांची राशी सूर्य असते. ”पृथ्वीवरील ग्रह राशींच्या स्थितीत पृथ्वीवरील निरीक्षण स्थानांशी संबंध जोडलेला नसतो. पृथ्वीवरील निरीक्षण स्थानांचा संदर्भ न घेता, फक्त ग्रहांचे राशीतील स्थान दर्शविणा-या राशीचक्राला नक्षत्रिय (नक्षत्रांचे) राशीचक्र म्हणतात. यावरून भविष्य वर्तवता येत नाही. भविष्य वर्तविण्यासाठी व्यक्तिगत कुंडली मांडावी लागते. राशीच्या आरंभबिंदूचा पृथ्वीच्या संपात बिंदूशी संबंध जोडणे आवश्यक असते. मुलाच्या जन्मवेळी जन्मस्थानावरून दिसणा-या ग्रह व राशीच्या अंशात्मक स्थितीची माहिती आवश्यक असते.

पृथ्वीवरील निरीक्षकाच्या स्थानाभोवतालचे क्षितिज वेगवेगळे असते. जपानच्या क्षितीजावर सूर्य हा भारता आधी उगवतो. मुंबईपेक्षा इंफाळला सूर्योदय आधी होत असतो. म्हणून व्यक्तिगत कुंडली बनवण्यासाठी त्या त्या जन्मस्थानावरील क्षितिजाचा उपयोग केला जातो. बारा राशींचे अनुक्रम ठरलेले आहेत, मंगळ, शनी इत्यादी.

आपण ग्रीकांकडून कुंडली घेतली तर ग्रीकांनी आपणाकडून काही गोष्टी घेतल्या. उदाहरणार्थ वारांची नावे. सोमवार, मंगळवार, इत्यादी ग्रीकांनी सात दिवसांचा सप्ताहची कल्पना भारतात आणली. त्यापूर्वी वद्य पक्ष, पौर्णिमा अमावस्या, तिथी भारतात प्रचलीत होती.

राशींना विशिष्ट नावे कशी मिळाली ते पाहू या
ख्रिस्तपूर्व सुमारे सहाशे वर्षे सुमारास ग्रीकांनी आकाशात एक तारकापुंज पट्टा पाहिला त्याला त्यांनी झोडियाकस क्लिक्लोस (Zodaikas kyclos) नाव दिले. याचा अर्थ प्राण्यांचे वर्तुळ झोडियाकसचा अर्थ आहे. अंतराळातील एक काल्पनिक वर्तुळ, जे बारा भागात विभाजित केले जाते. या भागांना राशीचक्राच्या चिन्हांनी ओळखले जाते. (An Imaginafy circle in the heavens, divided into twelve equel parts called signs of Zodiac) मेष (मेंढा), वृषभ (बैल), कर्क (खेकडा), वृश्चिक (विंचू), मीन (मासा), सिंह या प्राण्यांची नावे तसेच वस्तुंची नावे कुंभ (घट), धनू (धनुष्य) इत्यादी राशींना दिलेली आहेत. सिंहरास, मेषरास हजारोवर्षांपूर्वी माणसाने अंतराळात विशिष्ट आकाराचे तारकापुंज पाहिले व त्या तारकापुंजाची सांगड आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनातील परिचित वस्तू व प्राणी यांच्याशी सांगड घालून त्यांना विशिष्ट नावे दिली. उदाहरणार्थ बैलासारखा दिसणारा तारकापुंज वृषभ, त्यामुळे राशी चटकन ओळखता येऊ लागल्या नंतर या राशींचे महत्त्व वाढले. त्याचे श्रेय ख्रिस्ताब्द दुस-या शतकातील टॉलेस्टी राजाला आहे. भाकीत वर्मवण्यासाठी बारा राशी व बारा ग्रह यांचा अनुक्रम लक्षात ठेवावा लागतो. जसे मेष, दोन वृषभ इत्यादी तसेच एक मंगळ दोन शनी इत्यादी. ग्रह व राशी अस्थिर असतात. अंक हे स्थांनाचे नसतात ते ग्रहांचे व राशींचे असतात.

एक उदाहरण पाहू – श्रीकृष्णाच्या कालखंडात मार्गशीर्ष महिन्यात वसंतऋतुचे आगमन होत असे. (मासानाम् मार्गाशीर्षोsहम् ऋतुनाम: कुसुमाकर: – भगवत गीता) आज वसंतऋतुचे आगमन चैत्र महिन्यात होते हा बदल होण्याचे कारण परग्चंन गती (Precession.) सुमारे ७२ वर्षांनी पृथ्वीचा अक्ष एका अंशातून सरकतो याचा संबंध ऋतू व महिना यांच्यात फरक पडणे. २१०० वर्षांनंतर वसंतऋतुचे आगमन वैशाख महिन्यात होऊ लागेल.

ग्रिफीथ वेधशाळेचे शास्त्रज्ञ जॉन मोसले (John Mosley) यांनी १९८८ मध्ये एक निरीक्षण नोंदवले आहे. मे महिन्याच्या प्रथम दोन महिन्यात २६०० वर्षांपूर्वी सूर्य वृषभ राशीत असे. आज तो मेष राशीत असतो. याचा अर्थ मे च्या प्रथम दोन सप्ताहात जन्मलेली मुलेही मेषराशीची असतात. पण ज्योतिषी मात्र त्यांना वृषभ राशीची मानतात. तूळ राशीचे अनेक लोक याच कारणाने वस्तुत: कन्याराशीचे ठरतात. व्यक्तीची रास ठरविण्यात चूक होत असेल तर त्यांचे भविष्यही चूकच ठरणार.

ज्योतिषी काही राशी सबळ व काही निर्बळ मानतात. राशी राशीत मित्रत्व व शत्रुत्व संबंध असतात असेही सांगतात. हे सर्व काल्पनिक आहे. कल्पनेवर आधारित भविष्य कसे खरे ठरणार? राशींची गुणवैशिष्टेही असतात. उदाहरणार्थ कर्करास असलेली व्यक्ती ही कल्पक, संकोचशील, हट्टी, अत्तिथ्यशील, अविश्वसनीय, आतल्या गाठीची, सहानुभूती बाळगणारी असते. ही गुणवैशिष्टे कोणत्याही निकषावर अथवा सर्वेक्षणावर आधारित नाहीत हे सर्व कल्पित आहे.

नवीन ग्रहाचा सेडना प्लूटोच्या पलीकडे असलेल्याचा शोध लागत आहे. नुकताच तेराव्या राशीचा शोध लागला आहे. ही तेरावी राशी वृश्चिक व धनू या राशींमध्ये आहे. तिला रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने १९९५ मध्ये मान्यता दिली आहे. ती ऑफिकस (Ophychus) नावाने ओळखली जाते. (The discovery of 10th planet has hardly created a vipple among astrologers – The 13th aphiuchus and the sand witched between Scorpio and sagitvarius and the Royal Astronomical officially acknowledged its existence in 1995 -Times of India 18/08/2005) या राशीला सर्पधारकाचे चिन्ह दिले आहे. ही राशी १५ नोव्हेंबर व १५ डिसेंबरच्या दरम्यान दिसते. याचा अर्थ असा की अर्धी धनूराशी ही वस्तुत: ऑफिकस आहे. या राशीच्या शोधामुळे राशीचक्रात व भाकित करण्यात प्रचंड गोंधळ उडणार आहे. गणित करणा-यांचा मेळच बसणार नाही.

जन्मवेळेवरून कुंडली मांडली जाते पण निश्चित जन्मवेळ मिळणे शक्य नाही. उदाहरणार्थ एखाद्या मुलांचा जन्म सूर्योदयसमयी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी झाला आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की सूर्याचीकिरणे दर सेकंदाला ३००००० (तीन लाख) कि.मी. प्रवास करून पृथ्वीवर पोहचतात. पृथ्वीपासून सूर्य हा पंधरा कोटी कि.मी. दूर आहे. हे अंतर पार करून येण्यास सूर्यकिरणांना आठ मिनिटे लागतात. याचा अर्थ असा की आपण जो सूर्योदय पाहतो तो आठ मिनिटांचा शिळा/जुना असतो. सकाळी ६ वाजून १५ मिनिटांचा पृथ्वीवरून दिसणारा सूर्योदय हा ६ वाजून ७ मिनिटांचा असेल. म्हणजेच जन्मवेळ अचूक नसते. त्यामुळे जन्मवेळेवरून बनवलेली कुंडली त्यातील राशी व त्यावरून केलेले भविष्यकथन हे कितपत विश्वासार्ह ठरणार? आजकाल ‘सिझर’ बाळंतपण होतात हे सिझर डॉक्टर व स्त्रीच्या प्रकृतीनुसार/सोयीनुसार निसर्ग नियमाआधी अथवा नंतर होतात. (म्हणजे नऊ महिने होण्यापूर्वी अथवा त्यानंतर काही दिवसांनी) त्यावेळेस जन्मलेले बाळ याची अचूक वेळ कशी ठरविणार? डॉक्टरांनी शुभ वेळी, शुभ मुहूर्तावर सिझर केले तरी शुभदिन व शुभमुहूर्त असा नैसर्गिक नसतोच. सर्व पृथ्वीच्या भोवती सूर्याभोवती फिरणे यावर अवलंबून असते. त्यावरून रास ठरविणे अयोग्यच. फलज्योतिष Placebo आत्मिक समाधान मात्र आहे.

आणखी एक गोष्ट आज प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साहय्याने मानवाने प्राण्यांचे क्लोन निर्माण केले आहेत. काही दिवसातच मानव हा आपणासारखा मानव निर्माण करू शकेल आणि ही शक्यता फार दूर नाही अशा निर्माण केल्या जाणारा मानव हा मानवाच्या निर्मितीच्या इच्छेवर असणार आहे. त्याची जन्मवेळ ही कशी ठरवणार? आणि कितीही शुभदिन, शुभमुहूर्तावर हा माणूस जन्मला आला तरी त्याची राशी व ग्रह त्याला काय मदत करणार? आज रोबोचे राशी व ग्रह सांगितले जातात का? त्यांची कुंडली मांडली जाते का? असे असंख्य प्रश्न उदभवणार आहेत.

मानवी जीवन दु:ख, असुरक्षित, भय, चिंता, संकट आजार, गरीबी यांनी ग्रस्त आहे. मानव हा शांत, समृध्द, सुखी, प्रसन्न जीवन इच्छितो. राशी ग्रह नक्षत्रांची मदत घेऊन ते सुखी होणार नाही. कारण राशी ग्रह नक्षत्रावरून कथन केलेले जीवन अथवा भाकित हे सर्व कल्पित आहे. तिथे खंबीर मनाने संकटांचा सामना करणे हाच सुखी जीवनाचा निर्विवाद मार्ग आहे.

– डॉ. सुधाकर कलावडे