तारांगण – (ग्रहगोलांविषयी माहिती देणारे सदर)

ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम – एक वैज्ञानिक दृष्टिकोन

Graha आपण ग्रह शुभ किंवा अशुभ मानतो. रवी, गुरू यांना शुभ तर मंगळ शनी, राहू, केतू या ग्रहांना आपण अशुभ मानतो. ग्रह, राशी, नक्षत्रे ही जन्मापासून मरेपर्यंत आपली पाठ सोडत नाहीत. ग्रहांच्या मानवी जीवनावर भला बुरा प्रभाव पडतो असे ज्योतिषी सदैव प्रतिपादन करीत असतात. ज्योतिषी ग्रहांना अंतराळाचा आरसाच मानतात व त्यात मानवी जीवन पाहतात.

आकाशातील सूर्य, मंगळ, चंद्रादि बारा ग्रह व बारा राशी व नक्षत्रे यांना कुंडलीमध्ये बारा स्थानात बसविल्या जातात. ज्योतिषांचा हा दावा आहे की आकाशात जे ग्रह आहेत तेच कुंडलीत आहेत. पण हा दावा खरा नाही. आकाशात राहू व केतू हे ग्रहच नाहीत. खगोल शास्त्रातही नाहीत. ते कल्पित आहेत. स्वप्नातील अजगर जसे जागेपणीच्या माणसाला विळखा घालून गिळू शकत नाहीत तसेच हे कल्पित ग्रह माणसाचे बरे वाईट भवितव्य घडवू शकत नाहीत. सूर्य हा बारा राशीतून फिरणारा ग्रह मानला जातो. वैज्ञानिक दृष्टीने सूर्य हा ग्रह नाही तर अंतराळातील ब्रम्हाडांतील एक अचल तरूण तारा आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरत त्याच्याभोवती फिरते. पृथ्वी हा नीळा ग्रह (Planet Earth) असूनही तिचा समावेश कुंडलीत नाही. काही ग्रहांचा शोध हा अलीकडील आहे. हर्षल (१९८१), नेपच्चून (१८४६), प्लूटो (१९३०). शास्त्रज्ञांच्या नवीन नियमानुसार प्लूटो आता ग्रह मानले जात नाही. हा प्रश्न अद्याप ही वादग्रस्त आहे. विशेष हे की आमच्या परंपराप्रिय पंडितांचे अलिकडचे प्रतिपादन आहे की यांचे ज्ञान आमच्या पूर्वजांना होते. या पण ह्यांची समजूत कोण काढणार ?

हर्षलच्या शोधापूर्वी म्हणजे १७८१ च्या पूर्वी पृथ्वी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी हे सातच ग्रह मानवाला ज्ञात होते. पृथ्वी सोडून सहाहीना स्थान दिले गेले आहे. म्हणजे ख-या अर्थी ग्रहांच्या संदर्भात निम्मी कुंडली रिकामी होती. या अर्ध्या अर्धवट कुंडलीवरून केलेले भविष्य कथन ही खोटेच असणार. तसेच राहू, केतू, शनी, मंगळ, गुरू ग्रह हे सबळ तर नेपच्चून निर्बळ हे सारे कल्पित आहे. ह्या विधानाला विज्ञानाचा पाया नाही. केवळ अनुमान व कल्पनेवर विज्ञान उभे राहत नाही. त्यासाठी प्रयोग मूल्य आवश्यक असते म्हणून ग्रहांवर आधारित ज्योतिष हे शास्त्र ठरत नाही.

नवीन सिध्दांताकडे कानाडोळा करणारे ज्योतिषविद भविष्य कथनासाठी व भाकितांसाठी विज्ञान सिध्दांताचा आधार घेतांना दिसतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या गुरूत्वाकर्षणामुळे, चुबंकीय आकर्षणामुळे समुद्राला भरती येऊन उंच-उंच लाटा उठतात. ज्योतिषविदांचे म्हणणे आहे की मानवी शरीरात ही ऐंशी टक्के पाणी आहे व त्यामुळे चंद्राचा मानवी शरीरावरही परिणाम होतो. पौर्णिमेच्या चंद्रामुळे वेडे लोक बेभान होतात. चंद्रग्रहाचा जसा मानवी शरीरावर व जीवनावर परिणाम होतो तसाच शनी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र यांचाही परिणाम होतो. सूर्य तर सृष्टीचा पोषणकर्ताच आहे. सूर्य हा तारा आहे व त्याच्यापासूनच सूर्यमालिका निर्माण झाली. तो प्रचंड व अतिविशाल आहे. त्याचा परिणाम होणारच तरीही सहाशे मीटर नंतरच्या खोलीवर समुद्रात गडद अंधकार असतो. सूर्याचा एकही किरण तेथे पोहचू शकत नाही. अशा घनदाट अंधारात महासागराच्या तळाशी वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टी निर्माण होते व जगते. समुद्राच्या तळाशी सुनामीसारखे भूकंप सतत होत असतात ते झाल्यावर अति उष्णता जाऊन प्राण्यांना व वनस्पतींना सुसह्य असे वातावरण निर्माण होते व तिथे वनस्पती व जीवसृष्टी वाढते.

आता ज्योतिषविदांचा दावा तपासून पाहू या.
पौर्णिमेच्या चंद्राचा परिणाम हा प्रचंड मोठया अशा विशाल जलसाठयांवर होतांना दिसतो उदा. महासागरावर, नदी, नाले, ओढे, तलाव सरोवर यांच्या जलसाठयावर परिणाम होतांना दिसत नाही. तसेच दगड, खडक, पर्वत इत्यादींवरही परिणाम होतांना दिसत नाही. गुरूत्वाकर्षण संबंधात न्यूटनचा नियम आहे. –
Objects in the universe attract each other with a force that varies directly as the product of their masses and inversely as the square of their respective distance from each other.

अर्थात दोन वस्तुमानातील गुरूत्वाकर्षण बल हे वस्तूमानाच्या गुणोत्तराच्या समप्रमाणात आणि अंतराच्या समप्रमाणात असते. या नियमानुसार कोटयावधी किलोमीटर दूर असणा-या ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होणे शक्य नाही. जितके अंतर जास्त तितके गुरूत्वाकर्षण बल कमी. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही. याविषयी प्रख्यात शास्त्रज्ञ टेड न्यूमन म्हणतात की ”समजा सर्व ग्रह एका रांगेत एका बाजूला आले तर त्यांच्या एकत्रित गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू त्यांच्याकडे खेचल्या जातील. जर ते ग्रह पृथ्वीच्या विरूध्द बाजूला असतील तर आपले वजन कमी होईल. किती प्रमाणात कमी होईल? तर आपण बसलेल्या स्थितीतून उठून उभे राहिलो तर आपले वजन कळत नकळत जितके कमी होईल तितके कमी होईल. सर्व ग्रहांचा एकत्रित गुरूत्वाकर्षण प्रभाव याहून कमी पडतो. दुसरे असे की चंद्र हा पृथ्वीचा १/६ आहे व त्याचा गुरूत्वाकर्षण प्रभाव पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणापेक्षा किती तरी कमी आहे. पृथ्वीवरील मानव चंद्रावर हवेत तरंगतो याचे तेच कारण आहे. सारांश ग्रहांचा मानवी जीवनावर किंचितही प्रभाव पडत नाही. तेव्हा ग्रहशांती शनीची साडेसाती, मंगळ असणे, शनीची वक्रदृष्टी हे सर्व निरर्थक विचार आहेत. ज्योतिषी कुंडली संबंधात आकडेमोड करतात तरी त्यात वैज्ञानिकता नाही. अचूक आकडेमोड कशी असते ती पाहूया –

खगोलशास्त्रज्ञ हैलेने १७०५ मध्ये भाकीत केले होते की १७५८ मध्ये धुमकेतू दिसेल. हे भाकित त्याने न्यूटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम व केपलरचे भ्रमणाचे नियम यांची सांगड घालून केले होते. या धुमकेतूची भ्रमणकक्षा, प्रकाशक्षमता किती असेल हे ही त्याने तपशीलवार लिहून ठेवले. हॅलेच्या मृत्यूनंतर एक वर्षाने म्हणजे १७५८ साली हॅलेने वर्णन केल्याप्रमाणे धुमकेतू दिसला. त्याला हॅलेचा धुमकेतू म्हणू लागले. इतके तंतोतंत, काटेकोर नेमके अचूक भाकित ज्योतिषी कधीही करू शकत नाहीत.

तेव्हा ग्रह हे शुभ अथवा अशुभ फल देतात ही गैरसमजूत निग्रहाने दूर सारून निर्धाराने निर्भय जीवन जगणे हे अधिक श्रेयस्कर आहे.

– डॉ. सुधाकर कलावडे