सानिया मिर्झा, अंजली भागवत, अंजू जॉर्ज ह्या काही स्त्री खेळाडूंचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. त्याच बरोबर भारतीय महिला क्रिकेट कप्तान मिताली राज हिची ही कामगिरी लक्षणीय आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त मितालीशी झालेल्या मनमोकळया गप्पा….
सध्या रुढ अर्थाने बी.ए. चे शिक्षण घेत असलेल्या मितालीचे खरे कर्तृत्व क्रिकेट मैदानावर झळाळून उठते. चौकोनी संस्कारक्षम कुटूंबात वाढलेली मिताली पाचवीत असल्यापासून आपल्या मोठया भावाच्या बरोबरीने प्रशिक्षक श्री. ज्योती प्रसाद ह्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेऊ लागली. क्रिकेट बरोबर ‘भरतनाटयम’ नृत्यकलाही लहानपणापासून मिताली शिकत होती. पण क्रिकेटचा सतत सराव आणि दौरे ह्यामध्ये नृत्यसरावाकडे दूर्लक्ष व्हायचे त्यातच श्री. संपतकुमार ह्या प्रशिक्षकांनी प्रोत्साहन दिले. आणि मितालीने व्यवसायिक क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला.
क्रिकेटचे प्रशिक्षण चालू असताना तुला केव्हा वाटले की तू क्रिकेट एक व्यवसाय म्हणून खेळू शकशील?
प्रशिक्षण चालू असताना मी लहान होते मला तेव्हा यातली व्यावसायिकता कळण्याइतपत मी काही मोठी झाले नव्हते. पण क्रिकेटच्या निमित्ताने मी भटकंती खूप केली. खूप फिरले पण क्रिकेटबरोबरच मी ‘भरतनाटयम’ या नृत्य प्रकाराचेही शिक्षण घेत होते. मी भरतनाटयमचे क्रार्यक्रम टिव्हीवर सादर केले होते. दहावी इयत्तेत असतांना माझी विश्वचषकाकरीताच्या संभाव्य महिला संघात निवड झाली. मग आमचे शिबीर २० ते २५ दिवस चालायचे. तेव्हा मी नृत्याच्या सरावासाठी जाऊ शकायचे नाही. तसेच क्रिकेट सारावाने चेहेऱ्यावर थकवा जाणवायचा. त्यावेळेला क्रिकेटमध्ये बरीच प्रगती झाली होती. तसं पहायला गेलं तर माझ्या आईला मी एक व्यावसायिक नर्तिका होणं आवडलं असते. तर वडीलांनी नेहमी मला क्रिकेटपटू होण्यास प्रोत्साहन दिले. मला सुध्दा विचारांती असे कळले की, मी सध्या क्रिकेटच्या सरावाला नृत्यांच्या सरावापेक्षा जास्त वेळ देऊ शकत आहे. तसेच व्यावसायिक नर्तिकेसाठी तुमचे दिसणे, तुमचा त्या नृत्यासाठी लागणारा साजशृंगार तेवढाच महत्त्वाचा असतो. क्रिकेटच्या सततच्या सरावामुळे मी याकडे फारसे लक्ष देऊ शकले नाही आणि माझी क्रिकेटमधील प्रगती नृत्याच्या प्रगतीपेक्षा जास्त चांगली होती. मग मी व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला.
मिताली, तुझ्या आंतरराष्ट्रीय प्रवेशाबाबत थोडे सांगशील?
१९९९ साली वयाच्या सोळाव्या वर्षी मी इंग्लंड विरूध्द पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड येथे खेळले. संघात तेव्हा मी सगळयात लहान आणि आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अनुभवी नव्हते. माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती तरी भरपूर शिकायला व समजून घ्यायला मिळाले.
ह्या दौऱ्यानंतर मी सराव सामन्यात सातत्य दाखवत चांगली कामगिरी केली होती. मग पुढच्या विश्वचषकात मी उत्तम फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात चांगल्या धावा केल्या, दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केले. पण माझी परिक्षा होती ती तिसऱ्या सामन्यात…. इंग्लंडविरूध्द पहिल्याच षटकात आमची एक विकेट आम्ही गमावली होती. मी वन-डाऊन फलंदाजीसाठी आले. त्या सामन्यातही मी चांगली फलंदाजी केली. पण त्याच विश्वचषकात उपांत्य सामन्यासाठी माझी तब्येत बिघडली. मग २००० सालच्या त्या विश्वचषकात आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आलो.
पहिल्या शतकाबद्दल भावूक होऊन मिताली सांगते.., ‘माझे पहिले शतक मी आर्यलंड विरूध्द पटकावले होते. शतक झाल्यावर बॅट उंचवावून दाखवावी हेही ठाऊक नव्हते. पण सहकाऱ्यांनी मात्र खूप कौतूक केले.’
मिताली पुढे सांगत होती, ‘२००३ विश्वचषका आधी शुभांगी कुलकर्णी ह्या मंडळाच्या कार्यवाह होत्या. त्यावेळी ‘वर्ल्ड चँपियन’ असणाऱ्या न्युझिलंड, श्रीलंका, वेस्टइंडिज विरूध्दही खेळलो. शुभांगीजींनी फिर्झायोही नेमला. योगाचे वर्गही नेमले होते ह्या सर्व गोष्टींमुळे संघाची कामगिरी सुधारण्यात मदत झाली.’
मिताली, तुझ्या कर्तृत्वाला आगळीच झळाळी देणाऱ्या द्विशतकाबद्दल सांग?
‘२००२ साली इंग्लंड, न्यूझिलंड व हिंदूस्थान एक तिरंगी मालिका खेळत होतो. या सामन्यांआगोदर माझ्या धावा होत नव्हत्या. एका कसोटी सामन्यात ४५ धावांवर आम्ही २ बळी गमावले व मी फलंदाजी करायला गेले. मी ठरवलं होतं की चांगलं खेळायच या सामन्यात मी अंजूम चोप्रा, हेमलता काला यांच्या समावेत मोठया भागीदाऱ्या रचल्या. त्या सामन्यात आम्ही चार फलंदाज खेळात होतो. हेमलता काला बाद झाल्यावर संघाची जबाबदारी माझ्यावर आली. त्याच वेळी २०० धावांचा माझा विक्रम घडला. पुरूषांच्या क्रिकेटसारखे महिलांच्या खेळात तितके चांगले स्टेटीस्टीक्स उपलब्ध नसतात. त्याच सामन्यात त्यादिवशी शेवटचं षटक सुरू व्हायच्या आधी मला तंबुतून चिठ्ठी पाठवण्यात आली. मला सांगण्यात आलं की २०० धावांचा विक्रम आहे. तुला विक्रमाची बरोबरी करण्यास एक धाव हवी आहे व विक्रम मोडण्यास दोन धावा. मी त्या धावा केल्या विश्वविक्रम केला, पण आय वॉज टोटली ब्लँक ऍट दॅट टाईम.’
मिताली, कप्तानपदाच्या जवाबदारी बद्दल सांग?
कर्णधार असतांना तुम्हाला वयाने तसेच अनुभवाने लहान मोठे असणाऱ्या सगळयाच खेळाडूंबरोबर खेळीमेळीने वागावे लागते. काही खेळाडूंबद्दल issues असतील तर त्याला विश्वासात घेऊन ते सोडवावे लागतात. काही ताठर आणि इगोइस्टीक खेळाडूंना सांभाळून घ्यावे लागते. कारण संघात त्यांचे कर्तृत्व असते. तुमचा view point स्पष्टपणे सांगावा लागतो. तसेच कर्णधार हा प्रथम खेळाडू असतो त्यामुळे त्याच्या स्थानासाठी त्याला झटावेच लागते. ‘यू निड टू बी अ लीडर टू बी रेकोन विथ?’
भारतीय पुरुष संघाची भेट कधी झाली आहे का?
मैदानावर आमची कधीच भेट झाली नाही. पण पुरस्कार वितरण समारंभात पुरुष आणि स्त्री संघाची भेट झाली आहे. सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड ह्यांनी भेटल्यावर आमचे अभिनंदन तर केलेच पण प्रोत्साहन आणि मार्गदर्शनपर शब्दही सांगितले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये मला रॉजर फेडरर आणि पिट सॅप्रस ह्यांना भेटायचे आहे.
तसेच चित्रपट क्षेत्रात मला अमिताभ बच्चन, अमिरखान व माधुरी यांना भेटायला आवडेल.
क्रिकेट म्हटले की जाहिराती, प्रसारमाध्यमे आणि पैसा असे समीकरण झाले आहे.?स्त्री संघाला असा काही फायदा झाला आहे का?
मला काही जाहिरातींच्या ऑफर आल्या होत्या पण तितक्याश्या पटल्या नाहीत म्हणून स्वीकारल्या नाहीत. प्रत्येक सामन्यांचे आम्हाला अत्यंत कमी पैसे मिळतात. माझी भारतीय सरकारला, नागरिकांना विनंती आहे. त्यांनी महिला संघाला पाठबळ दयावे. प्रशिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाल्यास आमचा खेळ अधिक दर्जेदार होण्यास मदत होईल.
महिला दिनानिमित्त मिताली सांगू इच्छिते की, ‘आपल्या मर्यादा ओळखून आपले बलस्थान ओळखायला शिका स्वातंत्र्याचा उपभोग घ्या पण गैरवापर टाळा.’
मुलाखत व शब्दांकन – मंदार माईणकर