खेळाडू


क्रीडा मानसशास्त्राज्ञ भीष्मराज बाम हयांची मुलाखत

कणखर मन आणि कणखर शरीर खेळाच्‍या मैदानावरच तयार होते – भीष्‍मराज बाम
Bam Sir खेळांकडे दूलर्क्ष होत असल्‍याचे चित्र सध्‍या बघावयास मिळत आहे. अलिकडच्‍या काळात मात्र स्‍पर्धा म्‍हणजे काय याचे नीट आकलन होत नसल्‍याचे दिसते. अशा बिकट परिस्थितीत खेळांडूना घडविण्‍यात पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांच्‍यावरची जबाबदारी वाढली आहे. कणखर मन आणि कणखर शरीर हे खेळाच्‍या मैदानावरच तयार होत असल्‍याने खेळांडूमध्‍ये संघभावना अ‍ाणि स्‍पर्धात्‍मक जीवन यांचे संस्‍कार करण्‍याची गरज आहे. पुढची पिढी संस्‍कारक्षम आणि विदयार्थ्‍यांमध्‍ये खिलाडूवृत्‍ती निर्माण करण्‍यासाठी काय करणे आवश्‍यक आहे याबदल क्रीडा मानसोपचारतज्ञ भीष्‍मराज बाम यांच्‍याशी साधलेला संवाद…

१. अलिकडच्‍या काळात मुलांचे स्‍पर्धात्‍मक खेळांकडे दूलर्क्ष होत आहे. ही चिंताजनक बाब असल्‍याने याविषयी आपल्‍याला काय वाटते ? त्‍यासाठी काय करायला हवे ?
खेळांकडे अक्षम्‍य दुर्लक्ष करून आपण आपल्‍या पुढल्‍या पिढयांचा घात करीत आहोत. हार आणि जीत पचवू शकणारे कणखर मन आणि कणखर शरीर खेळाच्‍या मैदानावरच तयार होते. स्‍पर्धा म्‍‍हणजे काय याचे नीट आकलन न झाल्‍याने अनेक हुशार माणसं पूर्णपणे वाया गेलेली आणि संपलेली मी पाहिले आहे. स्‍पर्धा ही शत्रूशी कधीच नसते ती असते नेहमी आपल्‍या भावडांशी, नातेवाईकांशी आणि सहका-यांशी असते. उत्‍तम आणि श्रेष्‍ठ काय ते निवडायला दुसरा मार्गच नाही पण चुरूशीची स्‍पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्‍सर, शत्रूत्‍व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्‍हणजे मग आयुष्‍य ख-या अर्थाने संपन्‍न होत असते. हे सारेच स्‍पर्धात्‍मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्‍या वागण्‍याने पुढच्‍या पिढीवर संस्‍कार करायचे असतात. मुलांना खेळाविषयी आवड निर्माण करण्‍यासाठी पालक व शिक्षक यांनी प्रयत्‍न करायला हवे. खेळातही करिअर होऊ शकते ही भावना विदयार्थ्‍यांमध्‍ये निर्माण करायला हवी. यासाठी मात्र शासनस्‍तरावरूनही प्रयत्‍न व्‍हायला हवे.

२. खेळांडूच्‍या संपूर्ण विकासासाठी शासनाकडून कशा प्रकारची मदत व्‍हायला हवी.
चांगले खेळाडू निर्माण करण्‍याची महत्त्वाची जबाबदारी धनिक वर्गाकडे, व्‍यापारी आणि उद्योजकांकडे येते. शक्‍य असेल तिथे खेळ आणि खेळाडू दत्‍त्‍ाक घेऊन त्‍यांच्‍या पालनपोषणाची आणि विकासाची जबाबदारी त्‍यांनी घ्‍यायला हवी. खेळाडूंना शासकीय आणि खाजगी नोक-यांत करीयरची संधी मिळायला हवी. तशीच त्‍यांना आपल्‍या खेळातही सर्वोच्‍च विकासाची संधी असावी. त्‍यासाठी लागणारी साधनसामग्री आणि क्रीडांगणे शासनाने त्‍यांना उपलब्‍ध करून द्यायला हवीत.खेळांडूच्‍या संपूर्ण विकासासाठी शासनाने मोठे प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. खेळाडूंना शक्‍य तिथे अधिक सुविधा उपलब्‍ध करून दयायला हव्‍यात.

३. शालेय अभ्‍यासक्रमात खेळ या विषयाला कशा प्रकारचे महत्त्व दयायला हवे.
शालेय शिक्षणात खेळ आणि कला यांची आवड असणा-यांना त्‍यातच करीयर करता यावी. खेळ हा विषयच दहावी आणि बारावीपर्यंत परीक्षेसाठी ऐच्छिक असावा. राज्‍य अजिंक्‍यपद, राष्‍ट्रीय अजिंक्‍यपद किंवा आंतरराष्‍ट्रीय पदक मिळाल्‍यास त्‍याला पदवी देण्‍याची व्‍यवस्‍था व्‍हावी. खेळ या विषयातही पदवी घेता यावी आणि पुढे त्‍यात संशोधनही करता यावे. खेळासोबतच क्रीडा वैद्यक, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा मानसशास्‍त्र, क्रीडा व्‍यवस्‍थापन पदवी नंतरचे शिक्षण आणि संशोधन यांसाठी सोयी आणि सवलती उपलब्‍ध व्‍हाव्‍यात.

४. खेळांडूवर येणारे दडपण दूर करण्‍यासाठी काय करणे आवश्‍यक आहे.
योगशास्‍त्र ही भारतीयांची जगाला मोठीच देणगी आहे. योगासने, प्राणायम, सूर्यनमस्‍कार हे व्‍यायाम प्रकार शाळा कॉलेजातून शिकणे आवश्‍यक करायले हवेत. योगशास्‍त्र हे आपले मानसशास्त्र आहे. त्‍याचा वापर गेली कित्‍येक वर्षे खेळांडूच्‍या मानसिक तयारीसाठी करण्‍याचा माझा प्रयत्‍न सुरू आहे. त्‍यांचा त्‍यांना अतिशय उपयोग होत आहे. इतरही सर्व क्षेत्रातही हे प्रयोग यशस्‍वी झाले आहेत. याचा पाया शालेय जीवनातच घातला गेला तर स्‍पर्धात्‍मक खेळात येणारे दडपण हाताळणे सोपे जाऊन त्‍यांना उत्कृष्‍ठ कामगिरी तर करता येईलच पण जीवनातल्‍या इतर धकाधकीच्‍या प्रसंगांनाही उत्‍तम तोंड देता येईल.

५. क्रिकेट बरोबरच इतर खेळांकडे खेळांडूचा कल वाढविण्‍यासाठी काय करणे आवश्‍यक आहे.
फुटबॉल, अथेलेटिक्‍स, भारतीय खेळ यांचा सर्वाधिक प्रचार व्‍हायला हवा. हे सर्व अतिशय कमी खर्चाचे खेळ आहेत. विनाकारण स्‍टेडियम आणि हॉल बांधत न बसता क्रीडांगणे तयार करण्‍यावर शासनाने भर द्यायला हवा. आतापर्यंत जेवढी बांधकामे सुरू झाली असतील तेवढीच पूर्ण करून ती सर्वांत जास्‍त वापरली जातील हे पहावे. तसेच खासगी संस्‍थांकडेही जी क्रीडांगणे आणि सोयीसुविधा असतील त्‍याही सर्वा‍धिक वापरल्‍या जायला हव्‍यात. शाळांना व विद्यार्थ्‍यांना अल्‍पखर्चात या सोयी उपलब्‍ध करून द्याव्‍या त्‍यासाठी आवश्‍यक असतील तेथे कायदे करण्‍याची गरज आहे. देशात बांधलेली क्रीडासंकुले हे फक्‍त राज्‍य, राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय खेळांडूसाठीच वापरली जावी. तेथे क्रीडा विद्यापीठ तसेच प्रशिक्षकांचे खास वर्ग चालवले जावेत. त्‍याचा देखभालीचा खर्च शासनाने करावा.

६. क्रीडा क्षेत्रात होणारा भ्रष्‍टाचार कमी करण्‍यासाठी तसेच या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्‍यासाठी काय करणे गरजेचे आहेत ?
जनतेनेही संघटित होऊन तसेच माहिती अधिकाराचा वापर करून शासनावर दडपण आणायला हवेत. क्रीडाक्षेत्राचा योग्‍य विकास करायला शासनाला भाग पाडायला हवे. त्‍यामुळे येणा-या आणि पर्यायाने भावी खेळांडूचे आयुष्‍य अधिक चांगले होईल.

मुलाखत – गणेश डेमसे