खेळाडू


जगविख्यात निशानेबाज अंजलि वेदपाठक – भागवत

Anjali Vedpathak‘चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन्स’ अन् ‘महाराष्ट्राची शान’ जगविख्यात निशानेबाज अंजली वेदपाठक-भागवत यांची मुलाखत,

निशानेबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ‘चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन्स’ हा पुरस्कार २००२ साली म्युनिच येथे अंजलीला मिळला. जगातील सर्वोत्कृष्ट स्त्री व पुरूष नेमबाज जी स्पर्धा खेळतात, त्या पुरूष व महिला यांच्या मिश्र फेरीतून या स्पधर्चे पारितोषिक पटकावून आपला ‘जिनियस’ सिध्द करणा-या अंजलीस नुकताच ‘महाराष्ट्राची शान’ हा पुरस्कार मिळाला. जागतिक महिला दिन साजरा करताना अंजली वेदपाठक-भागवत यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळया गप्पा खास मराठी वर्ल्डच्या वाचकांसाठी सादर करीत आहोत.

‘ठरल्याप्रमाणे मुलाखत घेण्यासाठी दादर येथील अंजलीताईंच्या घरी मी पोहोचलो. सुरुवातीच्या औपचारिक गप्पांमधून, माटुंग्याच्या ‘राजा शिवाजी’ विद्यालयामधे त्यांचे शालेय शिक्षण झाले तर ‘बी कॉम’ची पदवी त्यांनी ‘किर्ती महाविद्यालया’तून घेतल्याचे सांगितले.

शूटिंगकडे कशी वळलीस?
लहानपणापासून खेळायची आवड होती. ज्यूडो व कराटे खेळायचे. नंतर मग यात काही विशेष मजा येत नव्हती. महाविद्यालयामधे असताना एन्. सी. सी. मधे दाखल झाले. त्या प्रशिक्षणात ‘रायफल शूटींग’चा एक भाग होता. आणि तिथूनच रायफल शूटींगची आवड निर्माण झाली.

पण मग यातच करियर करायचं हे केव्हा ठरलं?
रायफल शूटींगमध्ये आपल्याला गती आहे, हे कळल्यावर, त्याचाच करियर म्हणून विचार का करू नये, असा विचार डोक्यात आला. मग त्याप्रमाणे वरळी येथील ‘शूटींग रेंज’वर सराव करू लागले. सरावात सुसूत्रता आणण्यासाठी, ‘मुंबई रायफल असोसिएशन’ने खूप प्रयत्न केले.

हे सारे करताना कुणाची तरी मदत झाली असेलच …
हो. माझ्या कुटुंबियांनी मला खूप प्रोत्साहन दिले. खेळाबाबत म्हणाल तर माझे प्रशिक्षक श्री. विश्वराज बाम यांनी मला खूप मदत केली. तेच माझे ‘गॉड फादर’ आहेत. हा खेळ खेळण्यासाठी अत्यावश्यक असणारा मानसिक कणखरपणा (mental toughness) जो आज माझ्यामधे उतरला आहे, तो बाम सरांनीच मला दिलाय. श्री. बाम यांच्याकडे मानसिक कणखरपणाचे प्रशिक्षण घ्यायला स्नूकर वर्ल्ड चॅम्पीयन श्री. गीत सेठी तसेच श्री. राहूल द्रविड येतात. यावरूनच बाम सरांची ख्याती तुम्हाला समजू शकेल.

खेळातले बारकावे कसे काय आत्मसात केलेस?
Anjali Vedpathak हा खेळ बराच ‘टेक्नीकल’ आहे. मला श्री. संजय चक्रवर्ती यांनी याबाबत भरपूर प्रशिक्षण दिले. या प्राथमिक प्रशिक्षणाचा फायदा मला आजतागायत होतो आहे. मुंबई तसेच महाराष्ट्राच्या रायफल असोसिएशनची मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकले.

हा खेळ तसा शारिरीक दमछाक करणारा नाही. पण तरीही ‘फिटनेस’ आवश्यक असणारच. तो कसा काय राखतेस?
या खेळासाठी लागणा-या क्षमतांपैकी चाळीस टक्के क्षमता या शारिरीक असून साठ टक्के क्षमता या मानसिक असतात. सेल्फ टॉक व योग पध्दतींचा वापर मी मानसिक कणखरपणा जोपासण्यासाठी करते.

या खेळाबद्दल थोडं सांगशील?
‘एअर रायफल’ आणि ‘पिस्तोल शूटींग’ असे या खेळाचे दोन प्रकार असतात. त्यात रायफल शूटींगचेही पुढे PT २.२, Prone postion, it three position असे प्रकार पडतात. तुम्ही एक रूपयाचे नाणे घ्या. त्याच्या मध्यभागी एक बिंदु उमटवा. त्याचा वेध एका ठराविक अंतरावरून एअर रायफलने घ्यायचा असतो. या खेळाची रंगत म्हणजे, ०.१ गुणाने सुध्दा पदक मिळविणे अथवा गमावण्याची वेळ येते. याच कारणांनी खेळ चित्तथरारक ठरतो.

एशियाड, कॉमन वेल्थ गेम्स इ. स्पर्धांमध्ये तू भारतीय संघाबरोबर खेळलीस. इतरही खेळडू तिथे आले होते. जेव्हा भिन्न प्रवृत्तीचे वेगवेगळया वातावरणातील खेळाडू तिथे एकत्र जमतात, तेंव्हा आपल्या संघाचे वातावरण कसे असते ?
खूप छान असते. आपला संघ एकदम ‘मोटिव्हेटेड’ असतो. स्पर्धेच्या पूर्वी सर्व खेळाडू आपापल्या सरावात गढून गेलेले असतात. सरावाच्या दरम्यान एकत्र येण्यास विशेष वाव नसतो. वेगवेगळया खेळांप्रमाणे खेळाडूंची सराव शिबिरे भरतात. ही शिबिरे वेगवेगळया ठिकाणी भरतात. तरीही वातावरण खास करून छान असते, ते म्हणजे, सारेजण खेळ खेळून एकत्र आल्यावर. अशाच एका स्पर्धेदरम्यान भारताची सर्वोत्कृष्ट जलतरण पटु निशा मॅलेट, आणि धावपटु सुनीता रानी व मी असे रूम पार्टनर्स होतो. मी त्यांना माझ्या खेळाबद्दल तसेच त्यांनी मला त्यांच्या खेळाबद्दल बरीच माहिती दिली. निशामुळे मला जलतरण स्पर्धांमधील विश्वविजेता खेळाडू इयन थॉर्प यालाही भेटता आले. स्पर्धांच्या या काळामधे देशोदेशीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. खूप शिकायला मिळते. आपसूकच तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण व्यापक होतो. व्यक्तीश: पदक जिंकल्यावर किंवा भारतीय चमूतील कोणीही पदक पटकाविल्यावर अभिनंदनांचा होणारा वर्षाव रोमहर्षक असतो. असे अनेक सुखद अनुभव …’इटस् ऑल ‘ग्रेट’! अनफरगेटेबल!!

‘स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया’, ‘इंडियन ऑलिंपिंक्स असोसिएशन’ या संस्थांची कशाप्रकारे मदत होते ?
Anjali Vedpathak आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या ‘ऍडमिनिस्ट्रेटिव्ह’ बाबी याच संस्था सांभाळतात. याचा खूप फायदा होतो. खेळाडूला खेळावर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. दुस-या देशाचे प्रशिक्षक तुम्हाला शिकवण्यासाठी या संस्था पुरवितात. ‘सिडनी ऑलिंपिक’च्या आधी मला देण्यात आलेल्या हंगेरियन प्रशिक्षकामुळे मला खूप फायदा झाला.

या खेळासाठी प्रायोजक पुढे येतात का?
पूर्वी अवस्था बिकट होती. पण आता परिस्थिती सुधारते आहे. हिंदुजा फाऊंडेशन, महिंद्र ऍण्ड महिंद्र, सॅमसंग इ. कंपन्यांनी वेळोवळी योग्य ती मदत आम्हाला केली आहे.

कारकिर्दीच्या तुझ्या या वाटचालीमधे, तुझ्या माहेरच्या व सासरच्या माणसांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? त्यांचे सहकार्य तुला लाभले का ?
माझ्या सर्व नातलगांनी मला कायम प्रोत्साहन दिले. त्यांचं सहकार्य तर लाभलेच. भरपूर पाठबळ मला मिळालं. माझे पती श्री. मंदार भागवत यांनी हा खेळ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रसारमाध्यमांतून त्याची माहिती देण्यासाठी खूप प्रयत्न केले. एक मात्र मला आवर्जून सांगावंसं वाटतं की, मी खरोखरीच भाग्यवान आहे. जो सपोर्ट मला माहेरी होता व आहे, तोच सपोर्ट मला सासरच्यांकडूनही मिळत राहिला आहे.

तुझे आवडते खेळाडू कोण?
पी. टी. उषा ही धावपटु मला सर्वात जास्त आवडते. ऍथलेटिक्समध्ये भारतात काहीही नसताना तिने एशियाड व ऑलिंपिक्स गाजवून केलेली कामगिरी निश्चितच संस्मरणीय आहे. रायफल शूटिंगमधील आवडती खेळाडू सांगायची झाली तर, पोलंडची रायफल शूटर रेनेटा मायर! तिच्यातील ‘किलर इन्स्टिंक्ट’ प्रत्येक खेळाडूकडे असावं असं मला मनोमन वाटतं.

तुझ्या खेळासाठी इतर काय काय करायचं ठरवलं आहेस?
हो. ब-याच योजना मनात आहेत. मी व मंदारने त्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात देखील केली आहे. मुंबईतील तोलानी व प्रबोधनकार ठाकरे येथील शूटिंग रेंज उभारण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात भरलेल्या शूटिंगच्या शिबिराला मी भेट दिली. खूप मुलं शिकायला आली होती. त्यावरून शूटिंगच्या खेळाबद्दल लोकांना आवड वाटायला लागली आहे, याची कल्पना आली.

तुझ्या इतर आवडीनिवडींबद्दल काही सांगशील का ?
मराठी असूनही, नाटकं तेवढी काही पाहात नाही. पण कधीतरी चांगला हिंदी चित्रपट पाहते. आमिर खान व शाहरूख खान हे दोघे कलाकार आवडतात. मध्यंतरी आमिरचा ‘दिल चाहता है’ पाहिला. फार आवडला.

खेळामधून सवड मिळाल्यावर काय करावसं वाटतं ?
या खेळातून पूर्णपणे सवड मिळाली की, अकॅडमी वगैरे काढायचा माझा अजिबात विचार नाही. भारतासाठी चांगले, जगज्जेते रायफल शूटर निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करीन. एक चांगला भारतीय शूटिंग संघ बनविण्याचा मानस आहे.

मराठीवर्ल्डच्या वाचकानां काही सांगावं असे वाटतं कां ?
Anjali Vedpathak हो… सांगायचंय. सध्या मी बघते आहे, जो तो आपली टिव्ही समोरच बसतोय्. मुले तर लहानपणापासूनच टिव्ही एके टिव्ही. जरा देखील खेळताना दिसत नाहीत. या सगळया गोष्टींची खंत वाटते… आम्ही लहानपणी किती खेळायचो!! रोजच्या व्यापातून मुलांनी काही खेळ खेळला तर थोडं ‘डायव्हर्जन’ होतं. मुलांच्या व्यक्तीमत्त्वामधे आमूलाग्र बदल होऊ शकतात. व्यासंग वाढतो. फिटनेस वाढतो. स्पर्धेचं स्पिरीट मुलांमध्ये आपोआपच येतं. युरोपिय देशात कुटुंबातील प्रत्येक मनुष्य कुठला ना कुठला तरी खेळ खेळतोच. म्हणूनच त्यांच्याकडे क्रिडाप्रसार झाला आहे. आपल्याकडचं चित्र आपण बदललं पाहिजे.

१९९५ ते २००२ सालापर्यंत विविध आंतराराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल ४५ पदकं मिळविणारी, महाराष्ट्र आणि भारत सरकारचे गौरव पुरस्कार मिळविणारी, ‘चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन्स’ असणारी अंजली … तरीही अगदी साधी… ‘गर्ल ऍट नेक्स्ट डोअर’ वाटावी अशी…गर्वाचा मागमूस नाही… आहे ती फक्त सहजता व साधेपणा… अंजली तुझ्या प्रत्येक स्पर्धेसाठी व कामासाठी मराठीवर्ल्ड तर्फे तसेच मराठीवर्ल्डच्या वाचकांतर्फे तुला हार्दिक शुभेच्छा!!!

मुलाखत व शब्दांकन – मंदार माईणकर