विविध खेळ

कबड्डी

kabbaddi कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातला मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

पुरूषांच्या तुलनेत आता महिलांच्या कबड्डीलाही व्यावसायिकदृष्ट्या चांगले दिवस आलेले आहेत. पण तरीही अजूनही महिलांचा खूप जास्त सहभाग कबड्डीमध्ये दिसत नाही. कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. इतर खेळांना जसा सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो तसा कबड्डीला मिळत नसल्याने चांगला आणि लोकप्रिय खेळ असूनही हा खेळ काहीप्रमाणात मागे पडतो आहे, हे नाकारता येत नाही. अस्सल भारतीय खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. भारताच्या गावागावात हा खेळ मोठया जोमाने खेळला जातो. खेळाची लोकप्रियताही मोठी आहे. पण तरीही हा खेळ हवा तसा प्रसिद्धीस आलेला दिसत नाही.

पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवतांना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. जोशपूर्ण असणारा हा खेळ, त्याच्या सामन्यांची चुरस बघतांना मजा येते.

खो खो

kho-kho एक लोकप्रिय भारतीय खेळ. या खेळास केव्हा सुरुवात झाली, याची माहिती मिळत नाही. आटयापाटया वा मृदंगपाटी यांचा उल्लेख जसा संत साहित्यात आढळतो, तसा खोखोचा उल्लेख सापडत नाही. गेल्या शतकाच्या अखेरीस खोखो खेळला जात असावा, असे म्हटले जाते.

शिवाशिवी या खेळाला जगातील एक प्राथमिक खेळ मानतात. पाठलाग करणारा एक खेळाडू दमल्यानंतर त्याला विश्रांती देऊन दुस-याला हे काम करावयास सांगावयाचे, ही या खेळातील मूळ कल्पना आहे.

इतर खेळांप्रमाणेच खोखोचेही प्रारंभी काही नियम नव्हते. १९१४ साली पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने भारतीय स्वरूपाचे खोखोचे सामने प्रथम सुरू केले आणि खेळाला नियमबध्दता व शिस्त आणली. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने १९३५ साली खोखोचे नियम छापून प्रसिध्द केले. त्यांत खेळाडूंच्या अनुभवांनुसार व संबंधितांशी विचारविनीमय करून त्यानंतर अनेक सुधारणा केल्या व हिंदी आणि इंग्रजी भाषांत हे नियम प्रसिध्द करून अखिल भारतात या खेळाचा प्रसार केला. आता हे नियम सर्वत्र मान्य झालेले आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या साहाय्याने गेली काही वर्षे दरवर्षी क्रीडामहोत्सव होतो. त्यात खोखो समाविष्ट झाल्यामुळे खेडोपाडी या खेळाचा प्रसार झालेला असून खोखोच्या स्वतंत्र संस्थाही निघालेल्या आहेत. अखिल भारतीय खोखो फेडरेशन ही खोखोची प्रातिनिधिक संस्था आहे. तिने केलेले नियम सर्वत्र पाळले जातात.

या खेळाचे सामने अखिल भारतीय पातळीवरही होतात. अखिल भारतीय शारीरिक शिक्षण महामंडळ, आंतरविद्यापिठीय क्रीडासंस्था इ. संस्थांतर्फे हे सामने घेतले जातात.

खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३.६ मी.) लांब व ५१ फूट (१५.५ मी.) रूंद असते. मध्यपाटीची रूंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४.६८ मी.) असते. खुंटाची ऊंची ४ फूट (१.३६ मी.) व परीघ १३’ ते १६’ (३३.०२ ते ४०.६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८१/२ फूट (२.५४ मी.) असते. बाकी सर्व पाटयांचे मधील अंतर ८ फूट (२.४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५’*५१’ (४.५६ मी. ८१५.५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२.४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुध्द बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळाला प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानला ही गोष्ट सांगावी लागते.

बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून ‘खो’ देणारा त्याची जागा घेतो. खो मिळयावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणाराला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.

खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठयांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २१/२ मिनिटे आणि दोन डावानंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरूध्द संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.

खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो. पळताना जरूरीप्रमाणे वेग कमीजास्त करणे, हुलकावणी देणे, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मधली पाटी ओलांडून पलीकडे जाणे इ. कौशल्ये आत्मसात करण्याकरिता चापल्य, समयसूचकता व पाठलागाच्या वेळी योग्य अंतर ठेवण्याची समजूत या गोष्टींची खेळाडूंना पुष्कळच तयारी करावी लागते. या खेळात वैयक्तिक आणि सांघिक कौशल्याला वाव मिळतो. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये या खेळात अग्रेसर आहेत. खोखोच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडूला एकलव्य पारितोषिक दिले जाते. १९७५ साली बडोद्याला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हा मान मुलांपैकी हेमंत जोगदेव व मुलींत कु. मेढेकर हीस मिळाला. हे दोघे खेळाडू महाराष्ट्राच्या संघातील होते.

उभा खोखो आणि चौरंगी बैठा खोखो असे खोखोचे दोन प्रकार आहेत. ते शाळकरी मुलांना थोडया जागेत खेळण्यासाठी व खोखोच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत.