सर्पप्रेम

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

पक्षी निरीक्षण करताना काही पक्षी त्यांच्या विशिष्ठ सवयींमुळे लक्षात राहतात. Crested serpent eagle हा पक्षी लक्षात राहिला त्याच्या साप खाण्याच्या सवयी मुळे. प्राण्यांच्या निवाऱ्यात (shelter मध्ये) काम करताना अनेकदा ह्या पक्षाला साप त्याच्या नख्यांमध्ये (claws मध्ये) पकडून उडताना, तर कधी झाडावर बसून साप खाताना बघितला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सापाचं अस्तित्व आहे ही जाणीव झाली. पुढे अनेकदा सापाची पारदर्शक कात पण सापडली. पण प्रत्यक्ष सापाशी अजून आमचा “सामना” झाला नव्हता.

माझ्या कुतूहलापोटी मी स्वतःचे सापाविषयीचे ज्ञान वाढवून घेताना काही संशोधक, काही निसर्गवेडे आणि सर्पमित्र ह्यांचे लेख वाचले. माझे आजोबा मुंबईच्या हाफकिन (Haffkine) इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर होते. ही संस्था विष विरोधी (anti venom) औषधे बनवण्यात अग्रेसर आहे. सर्पदंशावरील लस कशी बनवतात, ती कशी वापरली जाते हे मी आजोबांकडून ऐकले होते. मला मुळातच सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी अजिबात भीती नव्हती. पाल, सरडा यांच्या विषयी तर मला लहानपणापासूनच फार कुतूहल असे. ह्या मुळेच साप हा किती विलक्षण प्राणी आहे ते मला उमजले. हे सरपटणारे प्राणी अनेक अन्न साखळ्यांंचा भाग आहेत आणि त्यांची संख्या कमी किंवा जास्त झाल्यास अन्न साखळीवर परिणाम होऊन शेवटी मानवी जीवनावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतील. माणसाच्या भीती पोटी मारल्या जाणाऱ्या सापांची संख्या खूप मोठी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा खोलवर शास्त्रीय अभ्यास आजवर झालेला आहे व त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे माणसाला सोपे होते. सापांना न भिता जगभरात सर्पजागृती करणाऱ्यांविषयी मला खूप आदर आहे. उन्हातान्हात, काट्याकुट्यात, डोंगरदऱ्यात, अगदी वाळवंटातही जाऊन त्यांनी सापांची निरीक्षणे केली आहेत आणि कठीण प्रसंगी तग धरून राहण्याच्या सापाच्या क्षमतेची सगळ्यांना ओळख करून दिली आहे.

साप हा शीत रक्ताचा प्राणी असल्याने स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. उष्णता वाढली की थंडाव्याच्या शोधात साप अडगळीच्या जागेत लपून बसतात. असह्य हिवाळ्यात बिळा-भगदाडातून जमिनीत शिरून ते हिवाळा काढतात. २-३ महिने काहीही न खाता जमीनीच्या पोटात नुसतं पडून राहायचं! शीत रक्ताच्या प्राण्यांच्या वाटेला आलेली ही तपश्चर्याच नाही का? जणू निसर्ग त्यांंच्या आयुष्यातील काही महिने काढून घेतो. त्यामानाने आपण उष्ण रक्तवाले किती सुखी म्हणायला पाहिजेत. माणसाचं सुख तर काय सांगावं? थंडी पडली की आलं घातलेला चहा, जोडीला शाल, स्वेटर आणि उन्हाळा वाढला की आईस्क्रीम, सरबत, सोबत पंखे, कूलर यांची मदत . दोन वेळा जेवणारी, वेळच्यावेळी नाश्ता करणारी आपल्यासारखी माणसे जरासे इकडे तिडके झाले की कुरबुर करू लागतो.

ही सापासारखी मंडळी त्यांच्या जगण्यातून किती विलक्षण गोष्टी शिकवतात. सापाचा संयम, त्याची जगण्याची, तग धरून राहण्याची धडपड सगळंच काही विशेष. दृष्टीला मर्यादा असून आणि कान नसूनही सापाचे काही अडत नाही. विष असलं तरी त्याचा अयोग्य वापर ते करीत नाहीत. निसर्गाने ठरवून दिलेले भक्ष मिळवण्यापुरताच त्याचा वापर ते करतात आणि अगदी कमीत कमी गरजात ते जगतात. सापाचा जबडा, त्यातील दात, जीभ हे सगळंच इतरांपेक्षा वैशिष्ठ्यपूर्ण. त्यांचं अंडी घालणं, पिल्ले जन्माला येऊन त्यांनी आपले आपणच जगायला शिकणं हे ही आश्चर्य. त्यांचे रंग, त्यांच्या शरीरावरील खवले, त्यातली नक्षी आणि त्यांची सळसळत चालण्याची पद्धत! किती प्रचंड विविधता आहे ह्या प्राण्यात. आणि इतक्या क्षमता असून सुद्धा इतर कुठल्याही प्राण्याबद्दल नाहीत तेवढे गैरसमज सापांबद्दल आहेत माणसांच्या मनात.

प्राण्यांच्या निवाऱ्यात (shelter मध्ये) मध्ये कामासाठी असणारे कामगार रात्री तिथे राहत असत. त्यांच्या पैकी अनेकांनी तिथे बरेचदा साप पाहिले होते. पण दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे जाऊन बघायचो तर मात्र आम्हाला साप तिथे कधीही आढळत नसत. प्राण्यांच्या निवाऱ्यात (shelter मध्ये) असलेल्या अनेक प्राण्यांपैकी कोणाचाही सर्पदंश होऊन मृत्यू झाला नव्हता. पण त्यांची पारदर्शक कात, प्रत्येक खवला दाखवणाऱ्या नक्षीचा सुंदर नमुना तिथे कामाला असलेल्यांना अनेकदा सापडलेला आहे व हे कामगार सापांची कात, खवले आणून दाखवायचे. लहानपणी गोष्टीच्या पुस्तकातील चित्रात शंकराच्या गळ्यातील साप आणि यमुनेच्या डोहातील कालिया मनात पक्के ठसले होते.

त्यादिवशी सकाळी प्राण्यांच्या निवाऱ्यात (shelter मध्ये) पोचल्यावर तिथली नेहमीची काम उरकताना “चम्पा” गाईकडे मी लक्ष ठेवून होते. तिला प्रसूती वेदना होत होत्या. तासाभरात तिची सुटका झाली. गाय आणि वासरू दोन्ही सुखरूप आहेत ह्याची खात्री झाल्यावर आता थोडा चहा घ्यावा म्हणून मी ठरवले. गाईच्या गौशाले बाहेरच शांतपणे चहाचे घोट घेत आम्ही २-३ जण उभे होतो. समोरच्या गवतावर सकाळचं ऊन्ह पडलं होतं. अचानक अवघ्या ५-६ फुटावरून साप येताना दिसला. पिवळट-हिरवट चमकता रंग, चालताना पुढचा भाग जमिनीपासून वर उचललेला. तो साप नव्हे तर नाग होता. त्याच्या या अनपेक्षित भेटीने मी गोठूनच गेले! अनपेक्षित आश्चर्याने की भीतीने? माहिती नाही. पण आम्ही सगळेच निश्चल झालो. तो आमच्याच दिशेने सळसळत आला. त्याचे चमकते डोळे मला आजही आठवतात. आता काय, हा प्रश्न मनात येतो ना येतो तोच एक फुटावर आल्यावर त्याने अचानक दिशा बदलली आणि सळसळत तो दूर निघून गेला. जाणाऱ्या नागाचे दृश्य काही क्षणच पाहायला मिळालं. जणू काही समोरून काही तरी ओघळत गेलं! मी थक्कच झाले. सुस्कारा सोडला. उरलेला चहा संपवून मी माझ्या कामाकडे वळले ती एका वेगळ्याच उत्साहात. आज त्याची माझी भेट झाली…… पहिली वहिली !

आता हे लिहिताना विचार येतोय, आयुष्य तेच, तसंच जगण्यापेक्षा अधून मधून सापासारखी आपणही कात टाकायला शिकलो तर.. ? आपलंही आयुष्य तसंच झळाळून उठेल.

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com