प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान
लेख १ | आमची 'नंदी' | लेख २ | देखणा कॉपर |
लेख ३ | मैत्री बच्चू व टिंग डिंगची | लेख ४ | श्री हरी |
लेख ५ | कृष्ण थिरथिऱ्या | लेख ६ | प्राणी,पक्षी संगोपन |
लेख ७ | निसर्गाचं शहाणपण | लेख ८ | सर्पप्रेम |
लेख ९ | सारसाचे प्रेमाराधन | लेख १० | भरारीमागील कष्ट |
लेख ११ | अनुभव – निसर्गाच्या सूक्ष्मतेचे |
सकाळी फिरायला जाताना आमच्या कॉलनीच्या रखवालदाराच्या खोलीपाशी एका पांढऱ्याशुभ्र, सुंदरशा स्पिट्झ जातीच्या कुत्र्याने माझे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावरील इतर कुत्री त्याच्यावर भुंकत होती आणि अचानक ४-५ कुत्रे अंगावर धावून आल्यामुळे घाबरून तो गाडीच्या खाली कुठेतरी लपून बसत होता.
दुसऱ्या दिवशी हा कोणाचा कुत्रा आहे याचा शोध घ्यावा असे ठरवले. पण तो मला कुठे सापडला नाही. तो त्याच्या घरी सुरक्षित पोचला असावा असा विचार करून मी माझ्या कामाला लागले. २-३ दिवसांनंतर परत कॉलनीतील कुत्र्यांची भुंकाभुंकी सुरू झाली. पहिले तर तोच स्पिट्झ परत आला होता व बाकीचे त्याला हैराण करीत होते. तो खूपच भेदरलेला होता. इतर कुत्र्यांना दूर करत, त्याच्याशी दोस्ती व्हावी म्हणून मी आणलेलं दूध-चपातीचं भांड त्याच्या समोर ठेवलं. पण कुत्र्यांना घाबरून तो त्याला तोंड लावेना आणि आपला बचाव करत अजून दूर पळून जाऊन गाडी खाली लपून बसला.
सगळीकडे विचारपूस केल्यावर समजले की हा कुत्रा कॉलनीतील कोणाचाच नाही. ह्याचा अर्थ की रस्ता चुकून तो इथे आला होता किंवा कोणीतरी त्याला मुद्दाम इथे सोडून गेले होते. त्या दिवशी अनेकदा प्रयत्न करूनही त्याने काही खाल्लं नाही आणि बोलवलं तरी तो गाडीखालून बाहेर निघाला नाही. त्याचे तसे तिथे राहणे खूपच असुरक्षित होते, पण त्याच्या सहकार्याशिवाय पुढची कृती नक्की ठरवता येत नव्हती.
सकाळी उजाडल्यावर त्याला बघावं म्हणून गेटचं कुलूप काढून वळते तर आमच्या गाडीखालून स्पिट्झच्या कण्हण्याचा आवाज आला. धुळीने आणि चिखलाने त्याचे अंग माखले होते, अंगावर जखमा होत्या. पहिल्याच दिवशी त्याला बघितल्यावर लक्षात राहणारे त्याचे बोलके डोळे मला खूप काही सांगून गेले. बाहेरील जगात अनेक ठोकरा खाऊन तो इवलासा जीव माझ्या आश्रयाला आला होता.
आज पासून तो माझा ‘बच्चू’ होता. त्याला जवळ घेऊन हलक्या हाताने थोपटत मी आश्वासन दिलं की तो इथे सुरक्षित आहे. मनातल्या मनात त्याला बरं करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असा निर्धार करत मी त्याच्या नजरेला नजर मिळवली. त्या डोळ्यातले भाव आजही आठवले की अंगावर रोमांच येतात. जेव्हा दोन जीव एकमेकांच्या मनातील विचार नक्की समजू शकतात, ते क्षण फारच विलक्षण असतात. त्या वेळची आपली ऊर्जा अगदी वेगळी असते. काही काळाची ही अनुभूती मात्र कायम लक्षात राहते.
पुढे पशुतज्ज्ञांच्या मदतीने त्याला शिरेमधून औषधे दिली, जखमांना टाके घातले, जखमांचे ड्रेसिंग केले. दीड महिन्यांनी बच्चूच्या जीवात जीव आला. त्याचे डोळे तजेलदार दिसू लागले. इतर कुत्र्यांबरोबर येऊन तो येऊन बसू लागला. त्याची तब्येत सुधारते आहे हे बघून मला फार बरं वाटलं.
आणि अचानक त्यानंतर एक दिवस बच्चूने मला भुंकून दाखवलं ते माझं लक्ष वेधून घेण्यासाठी! पहिल्यांदाच त्याचा आवाज माझ्या कानावर पडला होता. नंतर तो एक अवखळ, बागडणारा, आत्मविश्वासाने वावरणारा बच्चू झाला होता. त्याच दरम्यान दोन- अडीच महिन्यांचे गळ्यात छोटी घंटी बांधलेली एक कुत्र्याचे पिल्लू इलाजासाठी माझ्याकडे आले. मी त्याचे ‘टिंग डिंग’ नाव ठेवले . बच्चूची टिंग डिंग बरोबर खास मैत्री जमली. टिंग डिंगला परत न्यायला कोणी न आल्याने बच्चू बरोबर तोही माझ्याकडेच राहू लागला. बच्चू पांढरा शुभ्र तर टिंग डिंग काळा. दोघांना एकमेकांची खूप ओढ. उठणे, बसणे, खाणे, झोपणे सगळे एकत्रच.
त्यांची मैत्री जरा वेगळीच होती..टिंग डिंग आला तेव्हा पिल्लूच होता आणि बच्चू त्याला खूप जपायचा. कुत्र्यांची आपापसात दोस्ती असते, पण कधी कधी भांडणंही होतात. बच्चू मात्र कधीही टिंग डिंग बरोबर भांडला नाही. टिंग डिंग खूप उपदव्यापी होता. कुठे खड्डे खण, कुंडीतली माती उकर, पेनं, झाकणं, खुर्चीचे पाय, लाकडी वस्तू चावून ठेवणे! मी त्याला रागावून जरा शिस्त लावायचा प्रयत्न करीत असे. माझे चढलेल्या आवाजातील टिंग डिंगला रागावणे बच्चूला अजिबात आवडत नसे आणि तो भुंकून भुंकून मला गप्प करीत असे. टिंग डिंगला लस द्यायला आलेल्या डॉक्टरांना पण बच्चूने भुंकून हैराण केलं होतं, त्यांना एक शब्दही बोलू दिला नाही. शेवटी डॉक्टरांनी खुणेनेच म”ला नंतर फोन करून बोलूया” असे सांगून तिथून काढता पाय घेतला.
लखनऊला थंडीत मिळणारे “नये आलू” हा बच्चूचा जीव की प्राण. उड्या मारून मारून, मागून मागून उकडलेले बटाटे खाणारा बच्चू, आपल्या दोस्ताबरोबर त्याची आवडती गोष्ट नेहमी शेअर करीत असे. इतर कोणतेही कुत्रे बटाटा खात नसत पण हा टिंग डिंग मात्र बच्चूने प्रेमाने दिलेला बटाटा खायचा नसला तरी त्यासमोर बसून त्यावर पहारा देई. शेवटी त्याचे लक्ष दुसरीकडे वेधून मगच पटकन तो बटाटा तिथून काढून घ्यावा लागे. प्रेमात किती ताकद असते नाही? माझ्या आणि टिंग डिंगच्या आयुष्यावर प्रेमाचा ठसा सोडणाऱ्या बच्चूची आठवण “नया आलू”च्या घासागणिक आल्याशिवाय राहत नाही.
इतर सर्व देशी कुत्र्यांच्या संगतीत माझ्या विदेशी बच्चूने मजेत सात वर्षे घालवली. डिसेंबर २०२०मध्ये अल्पशा आजरानंतर बच्चू गेला.. माझ्या आणि टिंग डिंग च्या हृदयाचा थोडा हिस्सा घेऊनच.
लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com