प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान
लेख १ | आमची 'नंदी' | लेख २ | देखणा कॉपर |
लेख ३ | मैत्री बच्चू व टिंग डिंगची | लेख ४ | श्री हरी |
लेख ५ | कृष्ण थिरथिऱ्या | लेख ६ | प्राणी,पक्षी संगोपन |
लेख ७ | निसर्गाचं शहाणपण | लेख ८ | सर्पप्रेम |
लेख ९ | सारसाचे प्रेमाराधन | लेख १० | भरारीमागील कष्ट |
लेख ११ | अनुभव – निसर्गाच्या सूक्ष्मतेचे |
‘पशु पक्षी माझे सांगाती’ या सदराच्या निमित्ताने मी माझे काही अनुभव तुमच्या सोबत या वर्षी वाटले. शेवटच्या लेखात अनुभव न लिहिता ह्या सगळ्या सांगातींबरोबर वावरताना मला निसर्गाची सूक्ष्मता कशी अनुभवायला मिळाली यावर लिहावेसे वाटले . निसर्गाबद्दल मला नेहमीच खूप आश्चर्य वाटत आले आहे आणि हे आश्चर्य मनात घुसले की त्याचा शोध घेणे सुरू. हा शोध घेणे माझ्या सजगतेचा भाग आहे आणि असे शोध घेता घेता काय काय खजिने हाती लागले म्हणून सांगू!
मला आठवतंय शाळेत असताना पक्षाचे पीस पडलेले दिसले की मी ते उचलून घेतच असे. अलगद तरंगत, झुलत झुलत जमिनीकडे खाली येणाऱ्या पिसावर नजर ठेवत ते पळत पळत पकडण्याचा आनंद किती अवर्णनीय. किती नाजूक असते ते पीस. पण त्यातली ताकद समजून यायला तीन दशके लागली. किती बळ असते पिसांनी बनलेल्या पंखात. उगीच का त्यांच्या जोरावर पक्षी मैलोनमैलाचा प्रवास करतात?
घड्याळाच्या काटयावर जगणारी माणसे आपण! ह्या पक्षांचं जैविक घड्याळ ह्यांना कसे काय सांगते , कधी किलबिलाट करायचा, कधी गप्प बसायचे ? मला कुतूहलापोटी असे अनेक प्रश्न पडतात आणि त्याचा शोध घेताना खूप गोष्टी शिकायला मिळतात. स्थलांतरादरम्यान पक्षी नेमक्या दिशेला कसे जातात? माणसांचा प्रवास तर नकाशा आणि हल्ली “गुगल मॅप” शिवाय होत नाही. कितीदा वाट चुकतो आपण. मग पक्षी कसे मार्ग काढतात? आपल्या पेक्षा कित्येक पटीने लहान त्यांचा मेंदू. शिकारी पक्षी सोडले तर इतर पक्षांची दृष्टी पण फक्त भक्ष पकडण्यापुरतीच असणार. मग शास्त्रज्ञ म्हणतात उगवणारा, मावळणारा सूर्य, ग्रह, तारे यांवरून ते दिशा पकडतात. पण कुठे जायचं कसे लक्षात रहाते ह्यांच्या? माणसाच्या तुलनेत इवलासा तो जीव आणि एवढुसे त्याचे वजन..आणि प्रवासात न खाता-पिता अगदी समुद्र पार करण्याची जिद्द ह्यांची..आणि आपण अगदी ४-५ तासांच्या प्रवासाला निघालो की वाटेत खाण्याचे जिन्नस म्हणून एक बॅग घेतो!
आणि ह्या पक्षांची विलक्षण घरटी..शिंप्याचे व्यवस्थित टाके घातलेलं, सुगरणीचे लोंबते , सुबक, नाजूक विणेचे. तशीच लहानशी त्यांची अंडी! कसे बरे समजते पिल्लांना कधी नेमके बाहेर यायचे अंड्यातून? आपण योग्य वेळ साधून बाहेरून अलगद अंडे फोडलं तरी ते पिल्लू जगू शकत नाही. ते अंडे आतूनच आणि तेही पिल्लांना चोचीनेच फोडावे लागते. काय निसर्गाची रचना! केवढेसे ते पिल्लू आणि केवढीशी त्याची चोच..पण वेळ आली की त्यांना बरोबर समजते
गाई, कुत्र्यांच्या बाबतीतही तसेच. आता आपली वाढ पूर्ण झाली आहे , बाहेर जायची वेळ आली आहे हा निर्णय बाळ घेते. हा निर्णय त्याच्यापेक्षा प्रगल्भ मेंदू असलेली आई घेत नाही. किती ही सगळी आश्चर्ये !
तशीच झाडेही. प्रत्येकाचा डौल वेगळा, पानांचा पिसारा वेगळा, एवढंच काय प्रत्येक पानाचा आकार पण वेगळा. अगदी निरखून पहावं असं ते शिरांचं जाळं आणि प्रत्येक पानाचा हिरवा रंग पण वेगळा. किती अद्भुत छटा..पिंपळाची सळसळ करणारी पानं तर नारळाची वाऱ्यावर हेलकावे खाणारी. सगळा आश्चर्र्यांचा खजिना..
किडे, कोळी, अनेक कीटक त्यांच्या जगण्यातून किती विलक्षण गोष्टी शिकवतात. मधमाशीचे मेणाचे पोळे , तर कुंभारीणमाशीचे मातीचे मडक्या सारखे घर. कुंभारीण पिल्लू बाहेर येताच त्याला खाण्यासाठी एक जिवंत अळी बेशुद्ध करून घरात ठेवते आणि दार लिंपून निघून जाते. परत तिचा पिल्लांशी काहीच सबंध नाही. तर मधमाशा आपल्या पिल्लांचे संगोपन करतात आणि गुण्यागोविंदाने आयुष्यभर एकमेकांबरोबर राहतात. सुंदर फुलपाखरू, किळसवाणे झुरळ, अगदी विनाशकारी वाळवी आणि सध्या चर्चेत असलेले अनेक जिवाणू आणि विषाणू. एव्हढेसे हे जीव पण आश्चर्याने डोळे विस्फारायला लावतात.
अवघी सृष्टीच आश्चर्याने भरलेली आणि ह्या सृष्टीचा आनंद आपण ज्यामुळे घेऊ शकतो तीही निसर्गाची किमया —- म्हणजे आपले शरीर. त्यातली सूक्ष्म यंत्रणा पाहून मन चकित होते. मेंदू पासून हृदयापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, ह्याची उत्तरे विज्ञान शोधत राहणार. नवी नवी आश्चर्ये उजेडात येत राहाणार..आणि ती जाणून आपण स्तिमित होणार. निसर्गातील सर्व चक्रे आपल्या क्रमाने पुढे चालत राहतात. झाडे, प्राणी, पक्षी, कीटक आणि हे सर्वच निसर्गाची गती आपल्या बरोबर घेऊन जगतात. मग माणसाला एवढा प्रगत मेंदू असला तरी ते कां बरे अवघड होते?
वा निसर्गा! तुझ्या विश्वात अजून किती रहस्ये भरली आहेत कोण जाणे. सजीवांच्या जीवन प्रक्रियेचा शोध असाच चालू ठेवू या आणि आपले कुतूहल जपून ठेवू या , कारण ते आहे तोपर्यंत आपण शोध घेत राहणार हे नक्की!
लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com