कृष्ण थिरथिऱ्या

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

पहाटे लवकर उठून पक्षांच्या किलबिलाटासोबत वाफळणाऱ्या चहाचे घोट घेत सूर्योदय बघणे हा माझा माझ्या दिनक्रमातला सगळ्यात आवडता भाग. वर्षानुवर्षे माझी ही सूर्योदयाबरोबरची मीटिंग ठरलेलीच आणि त्या बरोबरीने रात्रीच्या विश्रांती नंतर सक्रीय झालेले प्राणी, पक्षी, किडे यांची लगबग बघणे, त्यांचे आपापसातले संवाद ऐकणे आणि त्यांचा निसर्गाशी असलेला थेट संपर्क बघून मला रोज ऊर्जा मिळते. अशा प्रकारे रोज ठराविक वेळेला निसर्गाचे निरीक्षण केल्याने झाडे , पक्षी, प्राणी, किडे यांचे ऋतुमानानुसार जीवनचक्र समजून घ्यायला सोपे झाले. ही सगळी मंडळी निसर्गाकडून पाहिजे तेवढंच घेतात आणि कुठल्याही प्रकारे निसर्गाचा ऱ्हास करीत नाहीत.

कुत्रे, मांजर, गाई अनेक वर्षे माणसांंच्या बरोबर निवास करीत आहेत. त्यामुळे त्यांचा खूप अभ्यास झाला. आता तर “Animal Whisperer” असा एक उद्योगही निर्माण झाला आहे. परंतु कोणी “bird whisperer” असल्याचं ऐकण्यात नाही. पक्षांबद्दल ज्या काही गोष्टी माणसाला माहिती आहेत त्या त्यांच्या निरीक्षणातून समोर आल्या आहेत. आजूबाजूला पक्षी असतातच पण जेव्हा मी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहायला सुरवात केली, तेव्हा मला एका ‘अनंता’ चा साक्षात्कार घडला आणि माझ्या जीवनातले पक्षीपर्व सुरू झाले.

नोव्हेंबर महिन्यात लखनऊमध्ये थंडीची चाहूल लागते. उन्हाची तीव्रता कमी होते, सकाळी धुकं दिसू लागते आणि जणू सगळा निसर्गच आता ह्या थंडीला सामोरं जायच्या तयारीमध्ये गुंततो. पक्षीही ह्या थंडीचा सामना करायला तयार होताना दिसतात. आपली पीसे फुलवून त्यात गरम हवेची ऊब ठेवत तेही थोडा काळ टिकणाऱ्या उन्हाचा आनंद घेताना दिसतात. ऋतुचक्राप्रमाणे होणाऱ्या बदलात एक गोष्ट अजून घडते ती म्हणजे स्थलांतरित पक्षांचं आगमन.

२०१४ मधील नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अशीच एक सकाळ. मी आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत असताना एका वेगळ्या पक्षाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याचं ते ताठ बसणं, त्याची चमकदार काळी पाठ, पोटाकडील उठावदार विटकरी रंग आणि आधी कधीही कुठल्या पक्षात न बघितलेली अशी शेपटीची थरथर. पुढची काही मिनिटे तो बसला होता तोवर मी त्याच्या कडे बघत होते. ही आमची पहिली भेट. काही वेळातच तो उडून गेला. मी दिवसातून अनेकदा गच्चीत जाऊन तो दिसतो का म्हणून त्याचा शोध घेतला पण नाही दिसला. पण दुसरे दिवशी सूर्योदयाच्या वेळी तो परत समोर आला, तसाच काही वेळ बसला आणि उडून गेला. पुढील ४-५ दिवस हे असंच चालू राहिलं आणि मग तो दिसेनासा झाला. मी रोज सकाळी त्याचा शोध घेत राहिले..आणि काही दिवसांनी मला त्याचा विसर पडला.

महिन्या मागून बरेच महिने गेले. आणि अचानक २०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात एका सकाळी तो पक्षी मला परत तिथेच दिसला. तब्बल एक वर्षाने! त्याला बघून मला फारच आनंद झाला. अगदी आपली कोणी आवडती परिचित व्यक्ती अचानक आपल्याला पुन्हा एक वर्षाने भेटलीकी होतो तसाच.

आधीच्या वर्षीचा अनुभव ताजा होताच. हा पाहुणा ४-५ दिवसाच्या मुक्कामाला येतो असं आठवत होत. इतर वेळी क्वचित दिसणारा पण सूर्योदयाच्या वेळी हमखास नजरेस येणाऱ्या ह्या पक्षाचे मी ह्या वेळेला मात्र ना विसरता फोटो काढले. तो कोण, कुठून येतो, कुठे जातो हा सगळा अभ्यास करता यावा म्हणून. यावेळीही हा पाहुणा जसा आला तसाच अचानक आपल्या पुढल्या प्रवासाला निघून गेला. इथेच माझ्या शोधकार्याला गती मिळाली.

हा होता Black Redstart ( कृष्ण थिरथिरा) पक्षी. तो हिवाळ्यात मध्य आणि दक्षिण युरोपातून भारतात येतो आणि चार पाच महिने मुक्काम करून परत मायदेशी रवाना होतो. आपल्या वास्तव्यादरम्यान तो संपूर्ण भारतभर दिसून येतो.

ह्या वर्षीही अनेकदा त्याची आठवण येत राहिली. केवढा लांबचा प्रवास करून तो माझ्या भेटीला येणार ह्या आशेवर मी वर्ष काढलं. आला! नोव्हेंबर २०१६च्या पहिल्या आठवड्यात त्याने आपली वेळ पाळली आणि ह्या वेळी मादीला सोबत घेऊन आला होता. एक आठवडाभर थांबून ते जोडपं पुढील प्रवासाला रवाना झालं.

आठवड्याभरात आमच्या ज्या भेटी झाल्या त्यावेळी मी त्याला अभिमानाने सांगू शकले की तो कोण आहे हे आता मला माहिती आहे आणि आपली ओळख वाढली की कशी भेटीची जास्त मजा येते तसेच झालं.

२०२० च्या नोव्हेंबर मध्ये झालेली भेट आमची सातवी भेट होती..दरवर्षी तो येणार ही खात्री बाळगून मी त्याच्या भेटण्याची वाट पहाते. मैलो न मैलाचा प्रवास करायला तो निघतो तेव्हा त्याला तरी कुठे माहिती असतं की तो गंतव्याच्या ठिकाणी पोचणार की नाही. पण तो धोका पत्करून तो निघतोच. त्याला आशा असते त्याच्या आवडत्या ठिकाणी पोचण्याची. हजारो पक्षी अशा प्रकारे भीती न बाळगता दर वर्षी स्थलांतर करतात, वाटेतील अनेक अडचणींवर मात करत, अनेक आव्हानांना सामोरं जातात.

सद्य परिस्थितीत हवामानात अतिशय बदल होताना दिसत आहेत. पक्षी, प्राणी हा बदल स्वीकारून त्यांना प्रभावीपणे तोंड देताना दिसतात. हे आपणही शिकायला पाहिजे.

जसजसा माझा ह्या विषयावरील अभ्यास व निरीक्षणे वाढू लागली तसतसे पक्षी सृष्टीतील एक वेगळं आणि समृद्ध विश्व मला खुणावू लागलं. पु. ल. म्हणतात की काही माणसांच्या वर्षानुवर्षे भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी बसत नाहीत आणि काही माणसे क्षणभरात आपलीशी होऊन जातात. तसंच काहीसं माझं आणि ह्या कृष्ण थिरथिऱ्याच्या बाबतीत झाले आहे.

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com