पिळदार शरीर, पाच फूट दहा इंच उंची, गोरा वर्ण, तरतरित नाक, निळसर डोळे, रुबाबदार चेहरा अशी सिंहासारखी देहरचना असणारी व्यक्तिच, ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेडीत अडकलेल्या तमाम भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पहिली डरकाळी फोडू शकते आणि फोडली ती वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाने. म्हणूनच त्यांना ‘भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक ‘ म्हटले जाते. थोर क्रांतिकारकाच्या जीवनाचा आढावा घ्यावयाचा ठरल्यास तो दोन पर्वात घ्यावा लागेल. एक म्हणजे सांसारीक जीवन जगत असतानाचे जीवन व दुसरे सशस्त्र क्रांतिकाराकाचे जीवन. या दोन्ही जीवनात वासुदेवांचे ध्येय मात्र एकच होते. आणि ते म्हणजे ‘स्वराज्य’.
अशा या महान देशभक्ताचा जन्म इसवी. सन. ४ नोव्हेबेर १८४५ रोजी पनवेलपासून ८ किमी. दूर असलेल्या ‘शिरढोण’, रायगड (महाराष्ट्र ) येथे झाला. इतिहासात डोकावले असता या गावाला ऐतिहासिक महत्त्व होते. इसवी.सन.१६६५ ला शिवरायांना औरंगजेबाला जे किल्ले परत द्यावा लागले होते त्यात शिरढोणच्या ‘कर्नाळा’ या किल्ल्याचा समावेश होता. विशेष म्हणजे या किल्ल्याची किल्लेदारी वासुदेवांचे आजोबा अनंत रामचंद्र फडके यांच्याकडे होती. म्हणूनच की काय शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावातून वासुदेवांना बालपणीच देशभक्ति, राष्ट्रप्रेम, स्वराज्य, बलिदान या गोष्टी मिळाल्या असाव्यात. वासुदेवांच्या संपूर्ण जीवनावर शिवरायांचा प्रभाव दिसतो.
वासुदेवांच्या घरची परस्थिति आर्थिकदृष्ट्या संपन्न होती. किल्लेदारी जाऊनही बळवंतरावांना लोक ‘सुभेदार’ म्हणत. आजोबा वासुदेवांना लाड़ाने ‘छकड्या’ म्हणत असे. लहान असतानाच १८५७ च्या उठावातील क्रांतिकारक घटना त्यांच्या कानी पडत असत, त्यात प्रामुख्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, मंगल पांडे यांच्या पराक्रमाच्या घटनांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्याच वेळी वासुदेव शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. सुरुवातीला नाना शंकरशेठ यांच्या शाळेत प्रवेश घेतला पण अवघ्या चार महिन्यात शाळा सोडली व पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठले, ‘पूना हायस्कूल ‘ येथे इंग्रजीचे उत्तम शिक्षण घेतले. शिक्षणानंतर लगेचच वयाच्या पंधराव्या वर्षी १० फेब्रुवारी १८६० मध्ये त्यांचे लग्न ‘गोपिकाबाई’ हिच्याशी झाले. विवाहानंतर लगेचच वासुदेवाना मुंबई येथील ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे (जी.आय.पी) नोकरी मिळाली. परन्तु हेडक्लार्कच्या त्रासाला वैतागून नोकरी सोडली. त्यानंतर लगेच ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला लेखनिक म्हणून नोकरी स्वीकारली. पण मुंबईचे हवामान न लाभल्याने पुण्याची वाट धरली. तिथे ‘सेनासामग्री निरीक्षक’ म्हणून नोकरी मिळवली. पुण्यात आल्यानंतर त्यांना पुत्ररत्न झाले. पण अवघ्या दोन महिन्यातच दगावाले. आधीच ज्वराचे दुखणे व् नंतर हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारला ते तासंतास ध्यानस्थ अवस्थेत बसत असत म्हणून त्यांना लोक भ्रमिष्ट समजायला लागले. कालांतराने त्यांना १८६८ मध्ये कन्या झाली तिचे नाव ‘मथुताई’ ठेवण्यात आले. नोकरी करत असतांनाच त्यांची आई (सरस्वती) आजारी पडल्या पण रितसर अर्ज करूनही त्यांना रजा नाकारली. त्यामुळे आईला अखेरचे भेटता आले नाही. त्यांचा ब्रिटिश राजवटीबद्दलचा रोष अजूनच वाढला. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांनी आपला राज्यविस्तार वाढवण्यास सुरुवात केली व दड़पशाहीचे धोरण स्वीकारले. याविरोधात १० में १८५७ ला पहिला देशव्यापी उठाव झाला. तो उठाव ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने चिरडून टाकला. हा उठाव दड़पल्यानंतर सर्वत्र पराभवाच्या शांततेची लहर पसरली होती. कोणीही ब्रिटिशांच्या विरोधात ‘ब्र’ देखिल काढत नसे. अशा पराभवाच्या छायेतून नवप्रेरणा घेत इंग्रजांच्या विरोधात पहिली ‘सिंहगर्जना’ केली ती वासुदेव फडके यांनीच.
त्यांनी प्रथम ‘स्वदेशी’ हे व्रत हाती घेतले. विदेशी मालावार बहिष्कार टाकला. स्वदेशी वस्तुचा प्रसार व् प्रचार करण्यासाठी त्यांनी ‘फडके स्वदेशी संस्था’ काढली. याच बरोबर नुसते भाषणबाजी ऐकून व् स्वदेशी वस्तुचा वापर करून उपयोग होणार नाही. त्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने ‘ पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. तसेच ‘भावे स्कूलची’ स्थापना केली. केवळ ‘स्वदेशी’ व् ‘शिक्षण’ इतकेच नव्हे तर संपूर्ण ‘स्वराज्य’ प्राप्ति हेच ध्येय असावे या विचाराने प्रेरित होउन त्यांनी ‘व्याख्याने’ देण्यास सुरुवात केली. भर रस्त्यात ते व्याखाने देऊ लागले. इंग्रज भारतीयांची आर्थिक लूट कशी करत आहेत हे अनेक उदाहरणे देऊन लोकांना पटवून देत असत.
अशातच १८७० च्या सुमारास भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यात हजारो माणसे मृत्यूमुखी पडली. इंग्रजांना त्याची पर्वा नव्हती. लोक अन्नपाण्या वाचून तडफड़त असताना इंग्रज मात्र ऐष-आरामत जगत होते. त्यातच सोलापूरला एकाच दिवशी २५ लोक भुकेने मृत्यूमुखी पडले. या घटनेने वासुदेव अस्वस्थ झाले. दुर्दैवी बांधवांची स्थिति पाहण्यासाठी त्यांनी बैराग्याचा वेश धारण करून बड़ोदा, इंदूर, उज्जैन, अकोला, नागपुर, अहमदनगर, नाशिक, कोल्हापुर, मिरज, सांगली, सोलापुरचा दौरा केला. जनतेची दु:खे प्रत्यक्ष् पाहली. सरकारी यंत्रणाची ढिलाई पाहून प्रतिशोधाची भावना अधिकच तीव्र झाली. अशातच दुष्काळावर उपाय करण्याऐवजी राणी व्हिक्टोरियाला ‘हिन्दुस्थानची साम्राज्ञी’ ही पदवी देण्यात आल्याने दिल्लीत एक सोहळा आयोजित करण्यात आला त्यावर करोडो रुपये खर्च करण्यात येणार असल्यामुळे हे पाहून त्यांचा देशाभिमान अधिकच वाढत गेला.
व्याख्याने, लेखनबाजी करून देशावरील संकट दूर होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. आता शस्त्र उचलल्या खेरीज पर्याय नाही. ते शस्त्र चालविण्यात पटाईत होते. बन्दुक, दांडपट्टा, भाला, बरची, चालविण्याचे कसब त्यांनी लहुजी वस्ताद साळवे या मातंग तर घौड़दौड़ व् मल्लविद्या रणबा या महार जातीतील वस्तादा कडून घेतले होते. तसेच त्यांनी पत्नी गोपिकाबाई हिलाही सशस्त्र शिक्षण दिले होते. याचाच अर्थ ते जातीयतेचे विरोधक तसेच स्त्री सुधारणावादी होते. याचकाळात त्यांनी ‘दत्तमहात्म्य’ हे ५१ अध्याय व् ७१७४ ओव्यांचे लेखनही पूर्ण केले. स्वराज्यप्रप्तिच्या ध्येयाने पुरते झपाटलेल्या वासुदेवांनी मार्ग बदलून शस्त्र हाती घेण्याचा निश्चय केला आणि कुटुंबाचा त्याग करुन स्वराज्यप्राप्त करण्यासाठी निघाले. दुसरी पत्नी गोदुबाई हिला जुन्नर येथे माहेरी सोडले. आता तेथूनच ख-या अर्थाने त्यांचे सशस्त्र क्रांतिचे जीवन सुरु झाले. देवभक्त असलेल्या वासुदेवांनी या कामासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यास गेले असता त्यांना स्वामींनी निराश हाताने पाठवले. वासुदेवांनी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी सशस्त्र सैन्य उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही सहकारी तयार केले. त्यात दौलतराव, गोपाळराव, गणपतराव घोटवडेकर, अप्पा वैद्य, अण्णासाहेब पटवर्धन, परशुराम पाटनकर, भिकाजी पंथ हर्डीकर, माधवराव नामजोशी, सितारामपंत गोडबोले, विष्णु खरे ,बाबु जोशी अदि तरुण होते.
त्यांनंतर त्यांनी मुंबई, पुण्यातील धनिक लोकांकडे आर्थिक मदत मागितली परंतु त्यांना कोणीही मदत केली नाही, परिणामी त्यांनी मार्ग बदलला. शिवरायांनी ज्या तंत्राने शत्रुचा नायनाट केला त्याच मार्गाने ब्रिटिशांचा खात्मा करण्याचे ठरले व त्यासाठी ‘गनिमी कावा’ स्विकारला. आर्थिक मदतीसाठी समाजातील धनिक लोकांची लुट करण्याचे ठरले. या कार्यासाठी त्यांनी ‘रामोशी’ या शूरवीर व् प्रामाणिक जातीतील तरुणांची सेना उभारली. त्यात व-हाड व खांदेशातील कोळी, भिल्ल व धनगर जातींच्या तरुणांचाही समावेश केला. त्यानंतर लुटालुटीचे सत्र सुरु झाले. ब्रिटिशांचे सरकारी खजिने लुटले गेले, तसेच २३ फेब्रुवारीला ‘धामारी’ या गावावर पहिला छापा पडला. त्यापाठोपाठ मल्हारगड, वाल्हेगाव, मंगदारी, सोनापुर, सावरगाव, नेरेगाव, चांदखेड, चौल, चिखले, पळस्पे आशा अनेक गावावर छापे टाकून लाखो रुपये लुटले. या लुटीतून सैन्याच्या पगार व् शस्त्र खरेदी करण्यात येई. त्यावेळी सर्व वर्तमानपत्रांनी त्यांना ‘दरोडेखोर’ म्हणून प्रसिद्धी दिली. त्यात मुंबई टाइम्स, लंडन टाइम्स, पूना हेरॉल्ड, डेक्कन हेरोल्ड, इंडियन डेली न्यूज, यांनी तर अग्रलेखातूनही टिका केली. याच सुमारास मुंबईच्या गवर्नरने वासुदेवरावाच्या त्रासाला वैतागून त्यांना पकडणा-यास चार सहस्त्रे पारितोषिक जाहिर केले. दोनच दिवसांनी वासुदेवांनी गवर्नरला मारणा-यास पाच सहस्त्रे देण्याचे जाहिर केले. शेवटी मेजर डॅनियल या अधिकारयाने वासुदेवांचा पिछाच पुरवला. कसारा घाटात वासुदेवांचे उजवे हात असलेल्या दौलतरावांचा लुटीसह खात्मा केला. हा धक्का त्याना सहन झाला नाही त्यानी प्रसंगी आत्म दहनाचाही प्रयत्न केला पण मल्लाच्या ब्राम्हणाने त्यांचे मत परिवर्तन केले. पुढे शिवरायांची प्रेरणा घेउन पुन्हा कार्याला लागले. प्रसंगी त्यांनी रोहिल्यांच्या इस्माइल खानची मदत घेतली. तसेच लिंगायत व कोळी समाजातील नाईकांची मदत घेतली व पुन्हा सशस्त्र सैन्य उभे केले. या सैन्याच्या पगार व उदरनिर्वाहासाठी पैसा मी पडत असल्याने ते स्वतः गोपाळरा्वांसोबत पुण्याला निघाले. दुर्दैवाने हाच त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. निजामाचा मुख्यमंत्री सलारजंग व् सय्यद अब्दुल हक़ याची मदत, रंगोपंत महाजनाची फितूरीने रोहिले व इस्माइल खान पकडले गेले. नारायणपुर मार्गे पंढरपुरला निघालेल्या वासुदेवांच्या मागावर मेजर डॅनियल होताच, त्याने मोठ्या सावधगिरिने खिंबिखुद्द या गावातील बुद्धविहारत थकून शांतपणे निजलेल्या वासुदेवरावांवर घाला घातला. बंदिस्त केले.
वासुदेवांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना सुरुवातीला सिटिजेल, नंतर ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे डांबण्यात आले, पुढे त्यांचे वकिलपत्र सार्वजनिक काका व नंतर महादेव चिमनाजी आपटे यांनी घेतले. परंतु राजद्रोहाचा आरोप असलेले पहिले भारतीय असलेल्या वासुदेवांना ते वाचवू शकले नाही, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली. अंदमानचे काम सुरु असल्याने त्याना यमन देशातील ‘एडन’ येथील तुरुंगात डांबण्यात आले. तेथून निसटण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न होता. अखेर तुरुंगातील त्रासाला वैतागून त्यांनी अन्नत्याग केला. अशक्तपणाने १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ‘प्रजाकसत्ताक’राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारे ‘झंझावती वादळ’ अखेर शांत झाले. वासुदेवांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांची प्रेरणा घेउनच पुढे अनंत कान्हेरे, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, सुभाष चन्द्र बोस अदि क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतले. या सर्वांचे मूळ मात्र ‘भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक’ वासुदेव बळवंत फडकेच होते.
संकलन-नितीन जाधव