महाराष्ट्रातील व्यक्तीमत्वे

डॉ. जयंत नारळीकर

Dr. Jayant Narlikar“आकाशगंगा” या आयुकाच्या (म्हणजे Inter University Centre for Astronomy and Astrophysics – IUCAA) हाउसिंग कॉलनीमधे रहायला गेले तेव्हां माझ्या घरासमोरच डॉ. जयंत नारळीकार व सौ. मंगला नारळीकर यांचे घर होते. असा दुर्मिळ शेजार आमच्या नशिबी होता. डॉ. नारळीकरांची एक्झीक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून काम करताना त्यांच्याशी सुमारे दहा वर्ष खूपच जवळून काम करण्याची संधी मिळाली तसेच त्यांचे शेजारी म्हणून राहण्याचीही। यांमुळे त्यांच्या अनेकविध रूप-गुणांचे जवळून दर्शन घडले. कित्येक प्रसंग कायमचे मनावर कोरले गेले व लक्षावधी गोष्टी शिकायला मिळाल्या. १९ जुलै या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यातील काही आठवणी वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी हा लेख व नारळीकर सरांनाही त्यानिमित्ताने त्यांनी माझे आयुष्य कसे संपन्न केले आहे याची पुन्हा एकदा केलेली मानवंदना. इथून पुढे त्यांचा उल्लेख “सर” म्हणूनच असेल.

सरांचे नांव व कीर्ती इतकी मोठी होती की नव्याने कामाला सुरुवात केली तेव्हां त्याचे दडपणच मनावर अधिक होते. पण सर वागायला इतके साधे की कित्येकदा त्यावर विश्वासच बसत नसे. ऑफिसमध्ये ते वेळेआधी दहा मिनिटे पोचलेले असत. घड्याळाच्या काट्याबरहुकूम मेल पहाणे, मेलला उत्तरे म्हणून डिक्टेशन, पत्रे टाइप झाली की सह्या, रोज कोणत्यावेळी कोण येणार यासंबंधीचा दिवसाचा आराखडा त्यांच्यासमोर दिला जाई. त्यानुसार ते त्या त्या संबंधीचे कागदपत्र मागवून स्वत:जवळ ठेवून घेत.

भेटीला येणाऱ्या लोकांमध्ये देशोदेशीचे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, विद्यापिठातील मान्यवर, देशी- परदेशी विद्यार्थी, त्यांच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी, आयुकातील अधिकारी यांच्याबरोबरच वृत्तपत्रे, मासिके, दूरदर्शन यांचे प्रतिनिधी आणि खेडेगावातून आलेले प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेतले विद्यार्थी व त्यांचे पालक अशी विविधता असे. पण सर्वांना सारख्याच इतमामाने वागविले जाई. त्यासंबंधीचा हा किस्सा ऐका.

एकदा सरांनी एका खेडेगावातल्या विद्यार्थ्याला दुपारी ४ ची भेटीची वेळ दिलेली होती. विद्यार्थी व त्याचे पालक साडेतीन वाजताच येऊन पोचले होते. सर आयुकातील एका प्राध्यापकाच्या लेक्चरला गेले होते. ते ४ ऐवजी ४ वाजून ५ मिनिटांनी संपले. पहिल्या मजल्यावरीत स्वत:च्या कचेरीकडे येताना आपल्याला ५ मिनिटे उशीर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते म्हणूनच की काय ते जिन्याच्या पायऱ्या चढताना एक एक पायरी गाळून भराभर वर आले. खरे तर त्याआधी दोन दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना चांगलाच दम लागला होता. पण पाच मिनिटे उशीर ही गोष्ट त्यांच्या शिस्तीत बसणारीच नव्हती. यथावकाश ती भेट व्यवस्थित पार पडली. पण खेडेगावातील चवथीच्या विद्यार्थ्यासाठीही वेळ पाळणारे सरांसारखे किती जण भेटतील?

विविध वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी ठिकाणी त्यांचे लेख छापून येत. त्यांनी लेख देण्याचे कबूल केले की ठरलेल्या तारखेच्या आधी सुमारे १५ दिवस लेख पूर्ण झालेला असे व तो पाठविण्यासाठी मजकडे येई. अक्षर इतके सुंदर व लेखात एकाही ठिकाणी – अक्षरश: एकाही ठिकाणी कधीही खाडाखोड नसे. खरे तर कित्येकदा वाटे लेख मराठी असो वा इंग्रजी – टाइप करण्याऐवजी त्यांच्या अक्षरातच छापावा!

पत्राची उत्तरे डिक्टेट करताना त्यांचे बारकाव्यांकडे असलेले लक्ष मला चकित करीत असे. उदा. एखादे “जोशी” स्वत:च्या नांवाचे स्पेलिंग नेहमीप्रमाणे “Joshi” असे न करता “Joshee” असे करीत असले तर सर आवर्जून ते सांगत. पत्राचा विषय काहीतरी मोठ्या शास्त्रीय संदर्भात असला तरी सरांना नांवातील बारकाव्याचे भान कसे रहाते मला अचंबा वाटे. त्याना पूर्ण भगवद्गीता तोंडपाठ आहे हे ऐकून मी चकित!

सरांचे मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत सर्वच भाषांवर प्रभुत्व. केंब्रिजमधे ते शिकवीत असल्याने तेथील इंग्रजी भाषेतील बारकावेही नजरेस येत. एकदा त्यांनी मला सांगितले कोणताही शब्द संक्षिप्त स्वरूपात वापरण्यासंबंधीचा एक नियम आहे – उदा. “Professor” या शब्दाचे संक्षिप्त रूप “Prof.” करताना त्याच्यापुढे पूर्णविराम दिलाच पाहिजे कारण त्या संक्षिप्त स्वरूपात त्या शब्दाची पहिली काही अक्षरेच घेतली आहेत, पण “Doctor” या शब्दाचे संक्षिप्त रूप “Dr” करताना पुढे पूर्ण विरामाची गरज नसते कारण त्यात Doctor या शब्दातील पहिले “D” व शेवटचे “r” हे स्पेलिंग वापरलेले असते. हे मी शाळेत किंवा विद्यापिठातही कधीच शिकले नव्हते.

त्यांना कामासाठी देशी-विदेशी दौरे करावे लागत. त्यावेळी त्यांचे संपूर्ण वेळापत्रक तारखेनुसार व त्या त्या दिवसाच्या वेळेनुसार टाइप करून मी देत असे. त्यातही त्यांनी केलेली एक अप्रतिम सोयीची गोष्ट विसरणे केवळ अशक्य. जिथे जिथे भेट ठरलेली आहे त्या त्या संस्थेचा पत्ता, फोन क्रमांक, ई मेल पत्ता, गांवाचॆ पूर्ण नांव व पिन कोड , तसेच ज्या व्यक्तीला भेटायचे आहे त्या व्यक्तीचेही पूर्ण नांव, अधिकारपद, कार्यालयाचा तसेच असल्यास घरचा फोन क्रमांक, ई मेल इत्यादी गोष्टी टाइप करून ते सर्व कागद कापून त्याला जरासे जाड कागदाचे कव्हर करून त्याचे शर्टाच्या खिशात किंवा पाकिटात सहजपणे मावेल अशा आकाराचे लहानसे पुस्तक त्यांनी मला करायला सांगितले. त्याची नंतर सवयच होऊन गेली. कोणताही पत्ता, फोन शोधण्यात विलंब लागू नये म्हणून ही खबरदारी. मी देशोदेशी हिंडले तेंव्हा त्यांनी लावलेल्या या शिस्तीने किती फायदा होतो याची मला पूर्ण कल्पना आहे.

गंमत म्हणजे ते प्रवासाहून परत आले की पत्त्याच्या संदर्भातील काही बदल असेल तर त्यांच्या छोटेखानी पुस्तकात तो टिपलेला असे व त्यामुळे माझ्या जवळ असलेल्या पत्त्यात त्यानुसार बदल करणेही सोपे जाई व सर्व माहिती अद्ययावत राही. प्रवासाच्या वेळी कधी विमान किंवा ट्रेन उशिरा निघणार आहे म्हंटले तर सर त्यांच्याकडे असलेल्या पोस्टकार्डावर किंवा इनलॅंड पत्रांवर त्यांना आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे लिहायला सुरुवात करीत. आयुका सारख्या संस्थेचे डायरेक्टर म्हणून काम करणे, सकाळी दणकून टेनिस खेळणे, शिकविणे, विविध ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाणे, स्वत:ची पुस्तके लिहिणे, लेख लिहिणे, मराठी विज्ञान परिषदेचे काम पहाणे, समाजात विज्ञानदृष्टी यावी यासाठीचे अव्याहत प्रयत्न, “पंचमहाभूते” यांसारख्या विषयावर आयुकात आंतरराष्ट्रीय शिबीर घेणे, स्वत:च्या विषयासंबंधी व्याख्याने देणे ——त्यांच्या कामांची यादी करणे हाच एक लेखाचा विषय होईल. मग हे सगळे त्यांना कसे जमते? त्यांनाही आपल्यासारखेच दिवसाचे २४ तासच आहेत. त्यांचे क्षण अन् क्षण वापरणे, ही “टाइम मॅनेजमेण्ट” ची सर्व करामत. सरांचे नांव झाल्यामुळे कधीतरी विद्यार्थी किंवा पालक येत व भेटले की त्यांची स्वाक्षरी मागत। सर त्यांना सांगत “नुसती सही देण्यापेक्षा तुम्ही मला पत्राने एखादा प्रश्न विचारा व त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवीन व त्यावर माझी सही असेल.” हा सुद्धा शास्त्रशुद्ध विचारांचे बीज लहानपणापासून रुजविण्यासंदर्भात केलेला सततचा आग्रहच!

सर कधी “ओव्हर टाइम” ऑफिसात थांबल्याचे मला आठवतच नाही. क्वचित कधी इतर आलेल्या अधिकाऱ्यांमुळे विलंब झाला तरच! सरांची मॅनेजमेंट फारच उत्तम. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या गव्हर्निंग बॉडी किंवा कौन्सिलची मीटींग आयुकामधे असेल तर मीटींग संपल्या संपल्या जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी मीटींगचे मिनिट्स पाठविले जात याचे मुख्य कारण म्हणजे सर मीटींगचे मिनिट्स स्वत:च आधी लिहून ठेवीत. यातील कौशल्य म्हणजे मीटींगमधील विषयाबाबात कोण काय म्हणणार याची त्यांना खूपच चांगला अंदाज असे. प्रत्यक्षात बहुधा तसेच घडे. चर्चा वेगळी झाली तरच त्यात बदल करावे लागत व त्यासाठी फारच कमी वेळ लागे. त्यामुळेच ही तत्परता!

आयुकामधे असताना आकाशगंगेत होळी, दिवाळी सण साजरे होत. सरांना गुलाल माखताना संकोचल्यासारखे होई पण ते मात्र एकदम शांतपणे उभे रहात असत. दिवाळीचे जेवण आयुकाच्या कँटीनमधून तयार होऊन येई. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ते असल्यामुळे ताटे- वाटी -पेले ज्याचे त्याचे घरून आणणे आवश्यक होई कारण भांडी धुवायला कँटीनमधली मुले नसत. ८ वाजता जेवणाची वेळ ठरलेली असेल तर ८ ला पाच कमी असतानाच सर हातात ताट-वाटी घेऊन इतर सर्वांसारखे हजर. गर्वाचा लवलेशही त्यांच्या वागण्यात कधी नसे.

आयुकात काम करणाऱ्या लोकांच्या व्यक्तिगत छंदांविषयीसुद्धा ते जागरूक असत। त्यांना देशोदेशीहून येणाऱ्या पत्रांवर परदेशी तिकिटे असत। त्यातील तिकिटे ते न विसरता कापून आणून माझ्याकडे देत व अमुक अमुक व्यक्तीला हे द्या असे आवर्जून सांगत। कचेरीतील कोणाच्या मंगल कार्याला बोलाविले व त्यावेळी ते पुण्यातच असले तर आवर्जून जात। माझ्या मुलीच्या लग्नाला सर व मंगलाताईंची हजेरी हा एक मोठा कौतुकाचा विषय आमच्या नातेवाइकांच्यात व मित्रमैत्रिणींमध्ये झाला होता। एखाद्याचे एखाद्या वाचनासंबंधीचे वेड त्यांना ठाऊक असे व त्यासंबंधी काही लेख, माहिती आल्यास ते ती त्या व्यक्तीपर्यंत न विसरता पोचवीत।

एकदा त्यांच्या घरी निरोप सांगायला गेले तेव्हां सर किंवा मंगलाताई दोघेही घरी नव्हते. सरांच्या सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांच्याकडे निरोप दिला. तेव्हां त्या भांडी जागेवर लावण्यात गुंतल्या होत्या व म्हणाल्या “पाहिलीत कां आमच्या जावईबापूंची करामत?” म्हंटल “काय झाले?” त्या म्हणाल्या “काल आमच्या घरी १५-२० माणसे जेवायला होती. सरांना कामानिमित्त बाहेर जावे लागल्यामुळे त्यांना मंगलाला कोणतीच मदत करता आली नाही. म्हणून रात्री जेवणे उरकल्यानंतर त्यांनी ही सगळी कांचेची , नाजूक भांडी , प्लेट्स धुवून ठेवली आहेत.” “एल” आकाराच्या दोन ओट्यावर केवढी मोठी भांडी, प्लेट्स इत्यादी धुवून ठेवलेली होती! आपला कामाचा वाटा चुकवू नये हे त्यांच्या रक्तातच भिनलेले! आपला कामाचा काही वाटा घरकामातही असतो हे मानणारे किती पदाधिकारी तुम्हाला भेटतील?

त्यांचे राहणीमानही अगदी साधे. सुती, कित्येकदा खादीचा शर्ट व लेंगा, एरवी शर्ट-पॅंट, चपला, प्रसंगानुसार सूट,बूट. हातात एक कातडी बॅग व त्यात हवी ती पुस्तके व कागदपत्रे. कधी ते त्यांनी पाळलेल्या “हिरा” नांवाच्या कुत्रीला फिरवून आणताना दिसत. संथ चालीने रस्त्याने जाताना त्यांना कोणी पाहिले तर ते आयुकाचे डायरेक्टर असून भारताच्या पंतप्रधानांनी त्यांचे शास्त्रीय सल्लागार म्हणून यांना भारतात निमंत्रित केले होते यावर कोणाचा सांगूनही विश्वासच बसणार नाही. केस कापण्यासाठी औंध रस्त्याच्या कडेला असलेल्या साध्या टपरी दुकानाच्या जवळपास आयुकाची गाडी दिसली तर हमखास सर तिथे कटींगला गेले आहेत असे समजावे. सरांच्या या संदर्भातील साधेपणाने मी जाम चकित झाले. त्यांच्या साधेपणाचा मला झालेला फायदा सांगितला तर तुमचा विश्वासच बसणार नाही.

मी “आकाशगंगा” या आयुकाच्या हाउसिंग कॉलनीत रहायला आल्यावर पूर्वीच्या पत्त्यावरून घरच्या गॅसचे कनेक्शन बदलून घेण्यासाठी पुणे विद्यापिठाच्या जवळील गॅसच्या दुकानात गेले होते. रांग खूपच मोठी होती. तेथील एक माणूस कोणाला काय पाहिजे याची चवकशी करायला आला. मी आयुकाचा पत्ता सांगितल्यावर ते म्हणाले, “अहो तुम्ही लायनीत कशाला उभ्या राहिलात? या सरळ पुढे या.” मला काही समजेना पण त्यांनी पांच मिनिटात माझे काम पूर्ण करून दिले.” मग दुकानाचे मालक म्हणाले अहो “तुमचे साहेब (म्हणजे सर) असेच एकदा लायनीत उभे होते. त्यांना कुठेतरी टी.व्ही.वर पाहिल्याचे आमचा पोऱ्या मला म्हणाला. चवकशी केली तर ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आहेत हे कळले. काय साधे हो? हातात कार्ड घेऊन इतरांसारखेच लायनीत उभे राहिले होते. मलाच फार शरमिंदे वाटले. तेव्हांपासून आयुकामधले कोणी म्हंटले की आम्ही लगेच नंबर लावून देतो!”

आयुकाच्या प्रतिष्ठापना दिनानिमित्त (फाउंडेशन डे) संस्थेत वेगवेगळ्या स्पर्धा होत. शेजारीच असलेली जी.एम.आर.टी. (Giant Metrewave Radio Telescope – GMRT) या संस्थेबरोबर क्रिकेटचा सामनाही होई. टेनिसमधे विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा खेळतानाही सर नेहमीच जिंकत! सरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणतीही शंका – अगदी कोणतीही शंका विचारली तर त्यासंबंधी उपहास न करता ते अत्यंत सोप्या पद्धतीने त्याचे उत्तर देत.

पुण्यामधे एकदा एक बातमी – खरे तर अफवा – पसरली की एका गणपतीने म्हणजे गणेश मूर्तीने दूध प्यायले. अफवा अर्थातच भराभर पसरत गेली व गणपती पहायला गर्दी जमू लागली. काही लोकांना मात्र ही मातीची मूर्ती प्रत्यक्षात दूध कसे पिऊ शकेल अशी शंका वाटू लागली. आयुकामधे सरांना यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी एकावर एक फोन येऊ लागले. शेवटी सरांनी गणपतीच्या मूर्तीच्या सोंडेने प्रत्यक्ष दूध कसे खेचले जाऊ शकते यासंबंधीची शास्त्रोक्त माहिती सांगणारे छोटेखानी भाषण केले व ते लोकांपर्यंत पोचविण्यात आले. हा वैज्ञानिक विचारांचा समाजासाठी केलेला पाठपुरावा. ग्रहणासंबंधीचे अनेक गैरसमज, अमावस्या ही वाईट तिथी असते व त्यामुळे कार्याची सुरुवात या दिवशी करायची नाही ही अंधश्रद्धा, जन्मपत्रिका व त्यासंबंधीचे समाजातील समज, पुणे विद्यापिठात फलज्योतिशशास्त्र शिकविण्याला वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेला विरोध अशी हजारो उदाहरणे त्याबाबत सांगता येतील.

आयुकाच्या इमारतीचे बांधकाम चालू असताना आयुकाच्या आवारात न्यूटन, आइनस्टाइन, आर्यभट्ट, गॅलिलिओ इत्यादी पुतळे ठेवण्यात आले. फूको पेंड्यूलम (foucault pendulum), सौरघड्याळ इत्यादी शास्त्रीय माहिती देणारी उपकरणेही ठेवली गेली. अनेक विद्यार्थ्यांच्या या गोष्टी पाहण्यानेसुद्धा ज्ञानात भर पडते. या सर्वांमध्ये सरांनी दाखविलेली खरी रसिकता म्हणजे आयुकाच्या कँटीनमध्ये लावलेला एक बोर्ड – “The discovery of a new dish does more for human happiness than the discovery of a star.” by Brillat Savarin हे ते वाक्य, जीवनाबाबतीतले सत्य सांगणारे! कँटीनमध्ये लावण्यासाठी हे वाक्य निवडण्याबाबत सरांचे कौतुक करावे तेवढे थोडे असे मला वाटते.

साधेपणा, वेळेचा सदुपयोग, अत्यंत विनम्र बोलणे, दिलेला शब्द पाळणे, विविध मॅनेजमेण्ट कौशल्ये, भाषांवरील प्रभुत्व, कोणत्याही कामाला कमी न लेखणे, सामाजिक भान, अंधश्रद्धा निर्मूलन, जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याबद्दलचा सततचा आग्रह, सतत विविध कामांमध्ये मग्न राहणे———- किती विविध गुण पैलू. माणसे मोठी होतात ती उगीच नाही. आणि अशा व्यक्तींबरोबर काम करण्यासाठीचे भाग्य लाभणे हेही दुर्मीळच! शब्दमर्यादेमुळे लेख आवरता घ्यावा लागत आहे! क्षमस्व! कारण यापलीकडेही सांगण्याजोगे पुष्कळ काही राहूनच गेलेले आहे!

– लोकमत, १५ जुलै २०१८

कल्याणी गाडगीळ, न्यूझीलंड

kalyani1804@gmail.com