डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा, एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सीमेच्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावात झाला. हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मैट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली चिकित्सा शिक्षण घेण्यासाठी ते कोलकत्त्याला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले.
पुढील काळात नागपुरात परतल्यावर कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.या सर्व काळात डॉक्टरांनी हिंदू समाज जवळून पाहिला, अनुभवला. हिंदू समाजाला एवढी प्राचीन परंपरा, प्रदीर्घ इतिहास व सांस्कृतिक वारसा असताना हा देश गुलाम का झाला, या प्रश्र्नाने डॉक्टरांना अंतर्मुख केले. या देशातील हिंदू समाज परस्परांतील, जाती-जातींतील भेदांनी दुभंगला आहे. राष्ट्रीय हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जाते आहे. या दुर्गुणांमुळेच देश गुलाम झाला. देशात इतर अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही यंत्रणा नाही. या भूमिकेतूनच डॉक्टरांनी इ.स. १९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी (दि. २७ सप्टेंबर, इ.स. १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. इथे हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. याच राष्ट्रीय समाजाला संघटित करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला. स्थापनेच्या क्षणापासून डॉक्टरांचे संघटना बांधणी, विस्तार, मुनष्यबळ नियोजन, संघटनेची रचना, विचारधारा, एकूण कार्यपद्धती – या सर्व गोष्टींबाबतचे चिंतन व प्रत्यक्ष कार्य चालूच होते.
दरम्यान इ.स. १९२९ मध्ये डॉ. हेडगेवार यांची औपचारिकरीत्या ‘सरसंघचालक’ (राष्ट्रीय प्रमुख किंवा प्रमुख संघटक) या पदावर नियुक्ती झाल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केले. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते – कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते. सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून, इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार झाली व जणू आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठीची शिदोरीच त्यांनी संघाला अर्पण केली.
भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व.संघामध्ये रुजवली.