पारंपारिक रांगोळ्या व प्रांतीय रांगोळ्या

पारंपारिक रांगोळ्या

केशवसुत, अर्थात कृष्णाजी केशव दामलें. मराठीतील पहिले आधुनिक कवी होण्याचा मान यांना लाभला, याचे कारण त्यांची काळाच्या पलिकडे पाहण्याची अभिनव दृष्टि. ज्या काळात नलराजा व दमयंती यांचा आधार घेऊन प्रेम हा विषय कवितेत येत होता, जेंव्हा पौराणिक आशयाचे प्रस्थ होते, त्याला लोकांची मान्यता देखील होती, शिव-पार्वतीच्या आडोश्याने शृंगारावर भाष्य करायच्या दिवसांत व्यक्तिस्वातंत्र्याला वाव देणारे, प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करण्याचा, अनुभवण्याचा अधिकार आहे, हे आपल्या कृतीतून सादर करणारे, असे ‘लोकोत्तर’ कवी म्हणजे, केशवसुत.

१८ डिसेंबर १८९६ रोजी केशवसुतांनी ‘रांगोळी घालताना पाहून’ ही कविता लिहीली. गायीच्या शेणाने सारवलेले सुंदर अंगण व त्या ठिकाणी दोन बहिणी उभ्या असलेल्या कवीला दिसतात. त्यातील एक मुलगी, रांगोळी घालू लागते. ती सूर्य, चंद्र, नक्षत्रे, स्वस्तिक, गोपद्म, सुदर्शन चक्र, बेल, फुले, तुळस, अशी सुबक रांगोळी काढते. रांगोळी काढताना, ती गुणगुणते आहे. उत्तम चित्रे, व कविता यांच्यात मिळणार नाही असे सुंदर मर्म कवीला ती रांगोळी पाहून सापडते. आकाश व जमीन यांचा अगदी थोडक्या जागेत किती मोहक मेळ त्या मुलीने साधला असे कवी आपल्याला सांगतो.

सूर्य म्हणजे दिव्यत्त्व, स्वस्तिक म्हणजे – धर्म, अर्थ, आणि काम या पुरूषार्थांची सफलता, गोपद्मातून पावित्र्य तर चक्रावरून या घरात साक्षात हरी नारायण राहतो, हा संकेत त्या रांगोळीत कवीला सापडतो. कुण्या दुष्टाची वाकडी नजर जर या घरावर पडली तर, रांगोळीमधील सुदर्शन चक्राने घराचे रक्षण होईल.

त्या मुलीच्या रांगोळीमधून मांगल्याचा संकेत कवीला मिळतो. ‘साध्या विषयातही किती मोठा आशय सामावलेला आहे’ – हे सांगून केशवसुत वाचकांना सांगतात की, रांगोळी बघून आता तरी शाहाणे व्हा आणि जिथे जिथे समक्ष स्वर्ग प्रगटतो ती ठिकाणे डोळे भरून पाहा. कवी केशवसुतांची प्रस्तुत कविता, आमच्या मराठी वर्ल्डच्या वाचकांकरिता, सादर करीत आहोत.

रांगोळी घालताना पाहून

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर
बालाके अपुली प्रभा वितरली नेत्रोत्त्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली,
रांगोळी मग त्यास्थळीं निजकरें घालावया लागली.

आधीं ते लिहीले तिनें रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्यें स्वस्तिक रेंखिंले मग तिने आलेंखिलें गोष्पदां,
पद्मे, बिल्वदलें, फुलें, तुळसही चक्रादिके आयुधें,
देवांची लिहीली; न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काहीतरी,
गेला दाटुनी शान्त तो रस अहा तेणे मदभ्यन्तरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अन्तदॄष्टि पुढूनिया सरकल्या, सन्तोष झाला मना !

चित्रें मी अवलोकिली रूचीर जीं, काव्ये तशी चांगली,
त्याहीं देखिल न स्मरेच इतुकी मद् वृत्ती आनंदली;
लीलेने स्वकरे परन्तु चतुरे ! तूं काढिल्या आकृती,
त्या त्या पाहुनी रंगली अतिशये आहे मदीया मति

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये ! मला वाटतो,
स्पष्टत्वें इतुक्या अशक्य मिळणे काव्यांत चित्रांत तो;
स्वर्भूसंग असा तयात इतक्या अल्पावकाशीं नसे –
कोणीं दाखविला अजून, सुभगे ! जो साधिला तू असे.

आदित्यादिक आकृती सुचवित दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसें स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकार्यातील;
पावित्र्याप्रत गोष्पदें तुळसही, शोभेस ही सारसें,
पुष्पें प्रीतिस, चक्र हें सुचवितें द्वारी हरी या असे !

तत्त्वें मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या, अये
आर्ये ! तूं उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वयें;
नातें, स्नेह निदान ओळख जरी येथें मला आणिती,
होतों मी तर पाद सेवुनि तुझे रम्य स्थळी या कृती !

चित्तीं कल्मष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमें मन्मनी :
‘ जा मार्गे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडें वाकडी
पापेच्छूवरि हें सुदर्शन पहा आणील की सांकडीं !’

‘आहे निर्मल काय अंतर तुझे? मांगल्य का जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयीं व्हायास का इच्छिसी?
ये येथें तर, या शुभाकृति मनीं घे साच अभ्यासुनी.’
आर्यें! स्वागत हे निघे सरल या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधीं मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकनें जन परी होती पहा अंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणें तयीं शाहणे,
कोंठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमीं पाहणें!

केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

आपले निवासाचे ठिकाण ही माणसाची मूलभूत गरज तर खरीच. पण ती एकदा भागल्यावर त्याच्या सौंदर्याकडे त्याचे लक्ष जाऊ लागले. आदिमानवानेसुध्दा राहण्याच्या गुहा विविध चित्रांनी सुशोभित केलेल्या सापडतात. भारतात घर आणि अंगण या दोन्हींच्या सजावटीसाठी रांगोळीने विविध आकार रेखाटायची पध्दत आहे. त्यांत रंग भरून ती अधिकच देखणी केली जाते. रांगोळीचे प्रकार सुध्दा किती विविध. कुठे कुठे गारगोटीचे दगड भाजून त्याची भुकटी करून त्या भुकटीचे रांगोळी काढली जाते तर कुठे कुठे ‘अल्पना’ म्हणजे तांदुळाच्या पिठाने काढली जाते. या रांगोळया व त्यांची विशिष्ट चिन्हे, आकार इत्यादींची विविध सणावारांशी सांगड घातली गेली. उदा. गौरी येतात तेव्हां घरभर तिची पावले काढणे, चैत्रमहिन्यात चैत्रांगण, शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक इत्यादी. या खास भारतीय कलेविषयी माहिती या विभागात घेऊ या.