अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये
  • चांदोली राष्ट्रीय उद्यान
  • जायकवाडी अभयारण्य
  • ज्ञानगंगा अभयारण्य
  • टिपेश्वर अभयारण्य
  • तानसा अभयारण्य
  • दाजीपूर अभयारण्य
  • नरनाळा अभयारण्य
  • नान्नज अभयारण्य
  • नायगाव अभयारण्य
  • फणसाड अभयारण्य
  • भामरागड अभयारण्य
  • भीमाशंकर अभयारण्य
  • मालवण समुद्री अभयारण्य
  • मेळघाट अभयारण्य
  • यावल अभयारण्य
  • येडशी अभयारण्य
  • राधानगरी अभयारण्य
  • लोणार अभयारण्य
  • वान अभयारण्य
  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
  • सागरेश्वर अभयारण्य
  • गौताळा औटराम घाट अभयारण्य

कोयना – महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील सरताज

Tadoba Abhayaranya विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबाच्या जंगलाला ताडोबा हे नाव येथील घनदाट जंगलात राहणा-या आदिवासी जमातींच्या तारू किंवा ताडोबा या देवदेवतांच्या नावावरुन पडले असावे असे स्थानिक लोक सांगतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. 625 स्क्वेअर किलोमिटर इतके मोठे याचे क्षेत्रफळ आहे. याचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग असून 1955 पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 1986 मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेले 508 स्क्वेअर किलोमिटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेले आजचे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनही याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात. यात प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. ताडोबा रिझर्व्ह मध्ये चिमुरच्या टेकड्यांचा परिसर येतो तर, अंधारी अभयारण्यात मोहर्ली आणि कोलसा टेकड्यांचा परिसर येतो. अंधारी नदीच्या व्यतिरिक्त असलेल्या पाणथळ जागा अर्थातच कोसला तळे जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये मोडते. याचा 87 टक्के भाग अतिसुरक्षित आहे. जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेडहा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी वनसंपदाही आढळते.

प्राणीसंपदा

ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. सध्याच्या आकडेवारीनुसार येथे 80 वाघ आहेत. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे 195 विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.

या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घोषित झाल्यानंतरही आज इतक्या वर्षांनंतर जंगलाच्या आतील भागात सुमारे 60 लहान-सहान गावे आणि पाडे वसलेले असून विविध भटक्या विमुक्त जमातींचे लोक या ठिकाणी राहत आहेत. या सर्व गावांतील लोकांची संख्या आजघडीला 41 हजार पेक्षाही जास्त आहे. त्यांच्यासाठी चंद्रपूर जल्ह्यातून अनेक ठिकाणांहून ताडोबामध्ये येण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बससेवा उपलब्ध आहे. जंगलाच्या कोर आणि बफर झोन मध्ये केवळ पारंपरिक शेती करणा-यांनाच राहण्यास परवानगी आहे. आधुनिक पद्धतींच्या वापराने जंगल धोक्यात यायला नको हाच यामागे उद्देश आहे. येथील स्थानिक लोक मोहाच्या फुलापासून दारु बनवण्याचा धंदा करतात. त्यासाठी मोहाची फुले गोळा करताना तोडण्यात येणारी झाडे आणि उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे दरवर्षी 2 ते 15 टक्के जंगल जळून जाते.

ताडोबा सफरीचा अनुभव खास वाचकांसाठी

Tadoba Abhayaranya ताडोबा अभयारण्यात पहाटे साडेपाच वाजताच प्रवेश मिळते. एप्रिल महिना असल्याने पहाटेसच उजाडले होते. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे एप्रिलमध्ये उकाडा सुरू झालेला असतो. पण तरीही ती सकाळ मात्र प्रसन्न होती. मग भल्या पहाटे उठून आम्ही निघालो जंगल सफारीला. सुरुवातीलाच दिसला बहिरी ससाणा आणि मेन गेटजवळच्या तळ्यातील सुंदर बदके. त्यानंतर मग अनेक विविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, बारहसिंगे, नीलगायी, हत्ती असे अनेक प्राणी दिसत होते. मात्र ज्या साठी आमची नजर आसुसली होती तो जंगलचा राजा वाघोबा काही दिसेना. तशातच जंगलाचे दोन प्रमुख भाग पालथे घालून झाले आमची सकाळची पहिली राईड संपत आली होती, मात्र वाघाचे किंवा बिबट्याचेही दर्शन न झाल्याने आम्ही थोडे हिरमुसलेले होतो.

मग सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही रिसॉर्टवर परतलो. चहा-नाश्ता करुन मग दुपारी थोडा निवांत वेळ होता. कारण त्या मधल्या वेळेत जंगलच्या नियमांनुसार कोणाही पर्यटकाला जंगलात प्रवेश करता येत नाही. दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपयर्यंत अशी आणखी एक जंगल सफारी आम्ही बूक केली. पुन्हा एकदा देवाचे नाव घेतले आणि निघालो वाघाचे दर्शन घ्यायला.

त्या राईडमध्येही सुरुवातीचा एक तास खूप भटकलो. पण वाघाची काही चिन्हे दिसेनात. एकदा आम्हाला हुलकावणी देऊन तो जवळूनच निघून गेला असे कळले. त्यामुळे तर आणखीनच दु:ख झाले. तरीही आमचा विश्वास होता, की आम्हाला दर्शन होणारच. मात्र बाकी बरेचसे प्राणी दिसत होते. अगदी कोल्हा, रानडुक्कर, एका तळ्याकाळी छान पहुडलेल्या मगरी, सुसरी, विविध पक्षी, साप सारे काही. पण वाघ मात्र दिसण्याचे नाव नाही. अखेर सायंकाळी 5 वाजता एका सफारीच्याच जीपवाल्याने कळवले की, जंगलच्या मध्यावर असलेल्या तळ्यात दोन वाघ बसले आहेत. ते कळले मात्र तातडीने आम्ही आमच्या गाड्या तिकडे वळवल्या. कारण तिथे पोहोचायला आणखी 10 मिनिटे, म्हणजे तेवढ्यात ते निघून गेले तर.. पण यावेळी आमचे सुदैवच. अगोदरच त्या ठिकाणी गाड्या पोहोचलेल्या होत्या. लोकांची गर्दी झाली होती. पण आम्ही पोहोचलो आणि काय वर्णावे त्या राजबिंड्या रुपाचे वर्णन.. पहिले काही मिनिटे तर आम्ही आ.. वासून पाहात राहिलो. आजवर केवळ चित्रात किंवा टीव्हीत पाहिलेल्या वाघाला प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि तेही अगदी 15 फुटांवरुन पाहतानाचा आनंद तो काय वर्णावा.. केवळ अप्रतिम.. पुढे मग त्याच्या सर्व लीला आम्ही हरखल्यागत पाहात होतो. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. ते ऐटीत उठणे, ती डौलदार चाल, शिकारीसाठी धरलेला दबा, मनसोक्त फोडलेली डरकाळी.. सर्व काही अगदी लाजवाब.

ब-याच वेळानंतर मग भानावर आलो. कारण आता निघावेच लागणार होते. अर्थातच जंगलचा कायदा. तेथे आपण पाहुणे. त्या दोन्ही वाघांना अगदी डोळे भरुन पाहून घेत हळूहळू आमच्या जीप गाड्या मागे वळवल्या. पार दिसेनासे होईपयर्यंत सतत त्या तळ्याकाठी नजर जात होती. मग परतताना सुनिताबाई देशपांडे यांचा दर्शनमात्रे आठवला. चार दिवसांच्या ताडोबा सहलिचे सार्थक झाल्याचे भाव सर्वांच्या डोळ्यात होते. शेवटच्या दिवशी का होईना पण जंगलच्या राजाने आपल्याला निराश केले नाही याचाच काय तो आनंद.

ताडोबाला कसे जाल ?
रस्त्याने – धुळे-जळगाव-अकोला-यवतमाळ-चंद्रपूर- ताडोबा
रेल्वेमार्ग – वर्धा स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, किंवा मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसने थेट चंद्रपूर गाठावे. तेथून महामंडळाची बस किंवा कारने थेट ताडोबात प्रवेश करता येतो.
रहावे कुठे – ताडोबात एमटीडीसीचे लॉज आहेत. तसेच प्रायव्हेट रिसॉर्टही अनेक आहेत. Location Icon

– चेतन रिसबूड