मराठी विवाहसोळा

सप्तपदी

saptapadi लाजाहोमानंतरचा विधी म्हणजे सप्तपदी. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल – व तेही उजवे पाऊल – ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. प्रत्येक पाऊल ठेवल्यावर वर पुढील मंत्र किंवा त्या अर्थाचे वाक्य म्हणतो.

पहिले पाऊल – हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे. तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.
दुसरे पाऊल – हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.
तिसरे पाऊल – हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.
चवथे पाऊल – हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखवर्धिनी हो.
पाचवे पाऊल – हे वधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
सहावे पाऊल – हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.
सातवे पाऊल – हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो.

सप्तपदी झाल्यानंतर वर वधूच्या मस्तकाचा आपल्या मस्तकाला स्पर्श करतो आणि मंगल कलशातील उदक आपल्या व वधूच्या मस्तकी लावतो. शांती असो, तुष्टी असो, पुष्टी असो असे म्हणतो. यानंतर वधूच्या पायात चांदीची जोडवी घातली जातात. त्यावेळी करवलीने वधूच्या पायाचा अंगठा हाताने दाबायचा असतो. सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाहविधी पूर्ण झाला.

यानंतर विवाहानिमित्त जमलेल्या सर्व पाहुण्यांना मिष्टान्न भोजन व त्यानंतर विडे दिले जातात. वधू-वर आणि वरमाई आणि वराचे वडील, बहीण, भाऊ इत्यादींची खाशी पंगत बसते. त्यावेळी वधूने वराला व वराने वधूला घास देण्याची पध्दत आहे. पूर्वीच्याकाळी स्त्रियांनी आपल्या पतीचे नाव उच्चारण्याची पध्दत नव्हती. परंतु लग्नामध्ये मात्र विविधप्रसंगी पतीचे नाव अर्थपूर्ण अशा दोन किंवा चार ओळींच्या उखाण्यात गुंफून घेण्याची प्रथा होती. आजही ही प्रथा पाळली जाते. घास देताना वधू – वर असे उखाणे रचून वधू वराचे व वर वधूचे नाव त्यात गुंफतो. यावेळी आसपासची तरूणमंडळी वधूवरांची चेष्टा-मस्करीही करतात.

वरमाई जेवायला बसलेल्या पंगतीला ‘विहिणींची’ पंगत म्हणतात. विहिणीच्या पंगतीच्यावेळी वधूची आई अथवा वधूची आत्या किंवा काकू किंवा मावशी एक गाणे म्हणते. त्याला ‘विहीण’ असे म्हणतात. या विहिणीमध्ये विहीण म्हणणारी स्त्री वरमाईला अशी विनंती करीत असते की ‘आम्ही आमची मुलगी तुमच्या मुलाला दिलेली आहे. तिचा नीट सांभाळ करावा.’ ही विहीण म्हणतानाच लग्नाचा आतापर्यंत चाललेला आनंद व उत्साहाचा भाग थोडा थोडा भावनाप्रधान होऊ लागतो. विहिणीचे जेवण संपल्यावर वरमाईला वधूच्या आईकडून चांदीच्या लवंगा व चांदीचा कार्ल्याचा वेल दिला जातो.

झाल धरणे

एका वेताच्या मोठया टोपलीत कणकेचे हळद घालून केलेले दिवे ठेवतात. त्यात तेल,वाती घालून ते पेटवितात. त्याला झाल म्हणतात. नंतर गुरुजी काही मंत्र म्हणून वराच्या वडीलधा-या मंडळीना बोलावितात. वधूचे आई-वडील वराचे आई-वडील, काका, मामा, आजोबा वगैरे ज्येष्ठ व्यक्तींच्या डोक्यावर झाल धरतात व सर्वांच्या साक्षीने आमची मुलगी तुमच्या घरात दिलेली आहे. तिची जबाबदारी आता तुमची आहे असे सांगतात. यानंतर वधू सासरी जाण्यास निघते. हा प्रसंग सर्वात भावनाप्रधान असतो. जन्म देऊन लाडाकोडाने वाढविलेली लाडकी मुलगी आपल्याला कायमची अंतरणार या कल्पनेने वधूच्या माता-पित्यांचा कंठ दाटून येतो. वधूपक्षातील सर्वच नातेवाइकांचे – विशेषत: स्त्रीवर्गाचे डोळे पाणावतात. वधूही माता-पित्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने कमालीची भावविवश होते. साश्रुनयनांनी सर्वांचा निरोप घेऊन ती पतीगृही जाण्यास निघते. जाण्याआधी वधूची मालत्यांनी ओटी भरतात व गौरीहर पूजेत ज्या बाळकृष्णाची व अन्नपूर्णेच्या मूर्तीची तिने पूजा केलेली असते त्या मूर्तीही तिला सासरी नेण्यासाठी दिल्या जातात.

गृहप्रवेश

gruhapravesh घरात येणा-या नववधूला हिंदुधर्मानुसार लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे वराच्या घरी तिचे अत्यंत उत्साहाने व आदराने स्वागत होते. वधू- वरासह व-हाडातील इतर सर्व मंडळी वरगृही आली की वधूवरांवरून दहीभात ओवाळून त्यांची दृष्ट काढतात. प्रवेशद्वाराच्या उंब-याजवळ तांदूळ भरून एक माप ठेवलेले असते. नववधूने ते आपल्या उजव्या पायाने लवंडून देऊन मग आत जावे अशी पध्दत आहे. त्यामागे कल्पना अशी की’ हे वधू, लक्ष्मीच्या रूपाने तू या घरात आलीस. धान्याच्या रूपाने या घरात तू समृध्द हो, हे घर समृध्द कर.’ मग त्या जोडप्यास देवघरात नेऊन देवाच्या पाया पडवितात. घरातील वडील मंडळींच्या पाया पडवितात व वधूस घरातील कोणास – अगदी लहान मुलांसह – काय हाक मारायची वगैरे सांगतात. मग दोघांकडून लक्ष्मीपूजन करवितात व नवरीचे नाव बदलून दुसरे ठेवायचे असल्यास ह्याच वेळी ठेवतात. ताम्हनात तांदुळाची रास घेऊन सोन्याच्या अंगठीने वर ते नाव लिहितो. उपस्थित मंडळींस साखर वाटून नवीन नाव सांगतात.

या वेळी उपाध्येबुवा हजर असल्यास ते व इतर वडील मंडळी उत्तमोत्तम आशिर्वाद देतात. ते म्हणजे ‘अखंड सौभाग्यवती भव’, ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ वगैरे वगैरे. नंतर वरपक्षीयांनी वधूपक्षीयांचे मानपान करून त्यांची पाठवणी करायची असते.

सूनमुख

सासूने सुनेचे मुखानलोकन करण्याचा हा विधी आहे. हिंदू धर्मात कोणत्या मांडीवर कोणी बसावे याचे विवेचन आहे. उजवी मांडी ही अपत्यासाठी असते. घरात नव्याने आलेली सून हे अपत्य म्हणून सासूने स्वीकारायचे असते. यावेळी सासूच्या एका मांडीवर सुनेला बसवितात आणि एका मांडीवर मुलाला बसवितात. सासू दोघांचेही काहीतरी गोड पदार्थ मुखात घालून आनंद दर्शविते. त्यानंतर सासूने आरशात सुनेचे मुखावलोकन करायचे असते. तिला आरशात पहाण्याचे कारण म्हणजे अलंकृत केलेल्या मुलीच्या रूपाला दृष्ट लागण्याची शक्यता असते, परंतु प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही. याचवेळी सासूने पूर्णत: नव्या वातावरणात व घरा-माणसात आलेल्या सुनेला आपल्या नजरेतून धीर द्यायचा अशी पध्दत आहे. आता सुनेला आईची माया देण्याची जबाबदारी सासूवर आली असाही याचा अर्थ आहे.

हा कार्यक्रम संपला की लग्नाचा सर्व कार्यक्रम पार पडला. यानंतर वधू कायमची वराच्या घरी – म्हणजेच सासरी रहावयास येते.