मराठी विवाहसोळा

ग्रहमख व केळवण

सर्व साधारणपणे मुंज, विवाह यासारख्या मंगलकार्याच्या आधी घरी ग्रहमख हा विधी करण्याची पध्दत आहे. (वेळेअभावी ग्रहमखाचा नुसता संकल्प सोडून कार्य झाल्यानंतरही तो करता येतो.) या विधीमध्ये मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता (शांती) मिळविणे हा उद्देश असतो. हा पूर्णतः धार्मिक विधी असतो व लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी घरीच केला जातो. ह्या दिवशीच वधूला चुडा भरण्याची प्रथा आहे. हिरवा चुडा भरल्यावर वधूने घराबाहेर पडायचे नसते. ‘केळवण’ हा कार्यक्रमही याच दिवशी होतो. केळवण म्हणजे वधू अथवा वराला लग्नाआगोदर दिलेली मेजवानी.

मेंदी काढणे व बांगडया भरणे

mendi कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे हा खरा राजस्थानातला रिवाज. पण आता तो महाराष्ट्रातही अमाप लोकप्रिय झाला आहे. मेंदीची पाने वाळवून वाटून केलेल्या पावडरीमध्ये निलगिरीचे तेल घालून ती पाण्यात भिजवून त्याचे कोन तयार करतात. या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोटयापर्यंत नाजुक कलाकुसरीची मेंदी काढली जाते. वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा आहे. मेंदी काढणा-या खास स्त्रिया असतात. तसेच सौंदर्यगृहातूनही अशा प्रकारची सेवा उपलब्ध होते. मेंदीचा कार्यक्रम हा बहुधा लग्नाच्या दोन दिवस आधी केला जातो. वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या व-हाडातील स्त्रियांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगडया, त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. चुडा भरताना एकेका हातात सात-सात किंवा नऊ-नऊ बांगडया घालतात. त्यासाठी लग्नाच्या मंडपात कासारालाच बोलाविण्याची पध्दत आहे. वधूचे चुडा भरणे झाल्यावर व-हाडातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार हिरव्या बांगडया भरतात. हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगडया व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.

घाणा भरणे

ghana लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला ‘घाणा भरणे’ असे म्हंटले जाते. हा समारंभ वधूच्या घरी तसेच वराच्या घरीही ghanaलग्नाच्या दिवशी साजरा केला जातो.हल्ली हा समारंभ कार्यालयातच होतो. आंब्याच्या पानांनी तसेच हळदीत बुडविलेल्या स्वच्छ चिंधीने किंवा जाड धाग्याने मुसळ सुशोभित केले जाते. पाच सुवासिनी व वधू/वर यांचे मातापिता मिळून उखळात तांदूळ, गहू , तीळ अशाप्रकारचे धान्य घालून कांडतात व कांडताना वधू व वर यांच्या मातापित्यांना उद्देशून मंगल ओव्या म्हणतात. खेडेगावातून, हे कांडलेले धान्य पुन्हा सुशोभित जात्यावर दळून वडयांच्या पिठात घालण्याची पध्दत आहे. यानंतर घाणा भरणा-या सुवासिनींना हळदी-कुंकू लावून त्यांची खणानारळाने ओटी भरण्याची पध्दत आहे. घाणा भरून झाल्यावर वधू-वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना पाटावर बसवून सुवासिक तेल-उटणे लावतात. हा विधी लग्नाच्या दिवशीच सकाळी सुरुवातीला होतो. या कार्यक्रमापासून सनई, चौघडा अशी मंगल वाद्ये वाजविण्याची पध्दत आहे.

हळद लावणे

halad यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे हळद लावणे. हा विधीही लग्नाच्या दिवशीच सकाळी करतात. तेल उटणे लावून झाल्यावर वधू व तिचे आई-वडील यांना हळद लावतात. हळदीची पूड पाण्यात कालवून ती चेहरा व हातपायांना लावण्याची पध्दत आहे. त्यावेळी प्रसंगानुरूप गाणीही गातात व नंतर त्यांना मंगल स्नान घालतात. त्यानंतर कालवलेल्या हळदीतील उरलेली हळद ( उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वाजत-गाजत वराच्या

बि-हाडी जातात. तिथे वराला व त्याच्या आई-वडिलांना हळद लावून स्नान घातले जाते. वधूपक्षाकडून हळद घेऊन येणा-या सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरून , फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य होते. वरपक्षाकडून वधूला हळदीची म्हणून उंची साडी देण्यात येते.

शेतकरी वर्गामध्ये हळदी समारंभाला फार महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा विधी खूप वेळ चालतो व तो आदल्यादिवशीच करतात. यावेळी काही विनोदी, वधु-वरांची मस्करी करणारी, किंवा भावनोत्कट अशी गाणी म्हंटली जातात. वधू- वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना मध्ये बसवून त्यांच्याभोवती फेर धरून थोडेसे नाचून गाणी म्हंटली जातात व त्यांना ओवाळतात. आरतीत मुलीचे किंवा मुलाचे आई-वडील पैसे घालतात व ते ओवाळणा-या सुवासिनींमध्ये वाटून घेतले जातात. हळदीसाठी जमलेल्यांना मटणाचे जेवण देतात.