मराठी विवाहसोळा

मंगलसूत्र बंधन

mangalsutra यानंतरचा विधी म्हणजे मंगलसूत्र बंधन. वधू-वरांना पूर्वेकडे तोंड करून बसवून वरपक्षाकडील ज्येष्ठ मानाच्या सुवासिनी वधूला कुंकू लावून एक भरजरी त्याचबरोबर साजेशी चोळी, दुसरे एक रेशमी भारी वस्त्र, व मणि-मंगळसूत्र देतात. मंगळसूत्र म्हणजे काळया मण्यांची पोत. (पूर्वी ही सुताच्या धाग्यात ओवत व ती नव-यामुलाच्या उंचीइतकी असे.) त्यात माहेरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी आणि सासरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी असे वराने काळया मण्याच्या पोतीच्या मध्यभागी गुंफायचे असतात. हल्ली मात्र मणीमंगळसूत्र हे काळया पोतीसह सोन्यात गुंफलेले असते. मग वधू नवीन दिलेली रेशमी साडी नेसून येते व परत वराशेजारी बसते. वर ते मणी-मंगळसूत्र तिच्या गळयात बांधतो व आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून म्हणतो

‘मांगल्य तंतुनानेन ममजीवनहेतुना कंठे बध्नामी |’

याचा अर्थ असा की ‘हे पतिव्रते, पतीच्या (म्हणजे माझ्या) जीवनाला कारण असे हे मंगलसूत्र मी तुझ्या गळयात बांधतो. तू माझ्यासह शंभर वर्षे सुखाने संसार कर’. वर हे वाक्य पत्नीला (नववधूला) उद्देशून म्हणतो. ह्यानंतर वधूसाठी सासरहून आणलेले सर्व अलंकार सासरच्या मानकरणी, करवल्या वगैरे तिच्या अंगावर चढवतात व नूतन विवाहित दांपत्याकडून पुरोहित गणपतीचे पूजन करवितात.

कुंकू

kunku एक सौभाग्यचिन्ह, सौंदर्यप्रसाधन व पूजाविधीतील एक आवश्यक मंगल पदार्थ. बव्हांशी हिंदू कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा वापर करतात. कुंकू कपाळावर लावतात, तसेच केसातील भांगामध्येही घलतात. इतर धर्मांच्या स्त्रियांत कुंकू लावण्याची प्रथा दिसत नाही.

कुंकूमम् या संस्कृत शब्दावरून मराठीत कुंकू हा शब्द आला. मूळ शब्दाचा अर्थ ‘केशर’ असा आहे. कुंकू लावण्याची ही प्रथा केव्हा सुरू झाली हे सांगता येणार नाही, तरी पण जुन्या वाड्मयातील उल्लेखांवरून ही प्रथा महाभारतकाली अस्तित्वात होती असे दिसते. काहींच्या मते ही प्रथा आर्येतरांकडून उचलली, असे मानतात. इतर काही लोक या प्रथेचा संबंध पशुबलीशी लावतात. पशूला मारून त्याच्या रक्ताचा टिळक नववधूस लावून गृहप्रवेश करण्याची प्रथा एके काळी दक्षिणेतील आर्येतर जातीत होती. या प्रथेचे रूपांतर कालांतराने कुंकू लावण्याच्या प्रथेत झाले असावे.

हिंदू धर्मात आणि हिंदू संस्कृतीत कुंकवाला सौभाग्यचिन्ह म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू स्त्रिया त्यास अहेव लेणे मानतात. देवपूजा, लग्नसमारंभ, मौंजीबंधन इ. विधींत कुंकवाचा वापर आवश्यक व मंगलदायक समजण्यात येतो. मंगल कार्य व देवपूजेच्या वेळी जोंधळयास किंवा तांदूळास कुंकू लावून मंगल अक्षता तयार करण्यात येतात. नव्या वस्त्रास तसेच घरातून बाहेर पडतेवेळी एक सुवासिनी दुस-या सुवासिनीस किंवा परस्परांस मंगलसूचक म्हणून कुंकू लावतात. ओवाळताना व मंगल कार्याच्या प्रसंगी पुरूषांनाही कुंकूमतिलक लावतात. लाल कुंकूमतिलक लावण्याने ध्यानधारणा करण्यास आणि चित्त एकाग्र करण्यास सुलभ जाते, असे काही लोक मानतात.

विवाहहोम आणि लाजाहोम

lajahom मंगलसूत्रबंधनानंतर लगेच वराने नवपरिणित वधूसह होम करायचा असतो. तोच विवाहहोम. विवाहहोमाच्या पाच देवता आहेत. त्यांना या होमाने आवाहन केले जाते. विवाहहोमानंतर केला जातो तो लाजाहोम. लाजाहोमाच्या तीन देवता असतात. या देवतांना आवाहन करून लाजाहोम केला जातो. या होमात लाह्यांची आहुती देतात म्हणून त्याला लाजाहोम म्हणतात. (लाजा म्हणजे लाह्या.)

या होमासाठी वर लग्नवेदीवर (बोहल्यावर) चढून पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसतो. वधू त्याच्या उजवीकडे पाटावर बसते. समोर स्थंडिल म्हणजे होमपात्र व पाण्याने भरलेला सुशोभित कलश ठेवला जातो. होमपात्राच्या पश्चिमेला पाटा व वरवंटा आणि ईशान्येला साळीच्या (भाताच्या) लाह्यांची परडी ठेवली जाते. उत्तरेला तांदुळाचे सात पुंजके पूर्वपश्चिम मांडले जातात. नंतर वर समिधा हातात घेऊन स्थलकालाचा उच्चार करून विवाहहोमाचा संकल्प सोडतो.

‘हे अग्ने, मी स्वीकारलेल्या या वधूला भार्यात्व यावे व गृहयाग्नी सिध्द व्हावा म्हणून मी लाजाहोम करतो. तू आम्हांला अन्न दे, बल दे, पुत्र दे, धन दे’ असे वर म्हणतो व होम प्रज्ज्वलित करतो. होमात तूप टाकून वर ‘अग्नये पवमानाय, इदं न मम’, असे म्हणतो. गुरुजी यावेळी अग्नीचे व प्रजापतीचे पाच मंत्र म्हणतात.

नंतर वर उठून वधूचा उजवा उताणा हात आपल्या उजव्या हातात घेऊन ‘मी तुझे पाणिग्रहण करतो आहे. त्याप्रमाणे भग, अर्यमा , सविता व पूषा या चार देवांनी गृहस्थाश्रमाकरता आपणांस एकत्र आणले आहे’ असे म्हणतो.

नंतर वर आपल्या आसनावर पूर्ववत बसतो. वधू ताम्हनात दोन्ही हात स्वच्छ धुते व पाटावर उभी राहून दोन हातांची ओंजळ करते. त्या ओंजळीत थोडे तूप व वधूच्या भावाकरवी दोन वेळा एकएक मूठ लाह्या टाकतात. वर ओंजळीतील लाह्यांवर तुपाने एक वेळ धार धरतो व पुढील वाक्य म्हणतो,’देदिप्यमान अर्यमा तुला मातृकुलातून मुक्त करून माझ्या कुलात समरस होण्याची प्रेरणा देवो.’ असे म्हणून आपल्या दोन्ही हातांनी वधूची ओंजळ तिरकी करून सर्व लाह्या होमात पडतील असे करतो. वधूच्या ओंजळीत लाह्या टाकणाऱ्या भावाला टोपी देऊन त्याचा मान करतात. याचवेळी वराचा कान पिरगाळून ‘माझ्या बहिणीची नीट काळजी घे’ असे वधूचा भाऊ वराला बजावतो. याला ‘कानपिळी’ चा विधी म्हणतात. कानपिळीबद्दल वराने भावाला काही बक्षीसी देण्याची पध्दत आहे.

अग्निप्रदक्षिणा

agnipradakshina अग्निप्रदक्षिणा हा स्वतंत्र विधी नसून लाजाहोमाचाच पुढील व मुख्य भाग आहे. होमासाठी वर व वधू विवाहवेदीवर बसतात त्यावेळी पुढे स्थंडिल म्हणजे होमपात्र व पाण्याने भरलेला आणि फुले आदींनी सुशोभित केलेला कलश असतो. त्यांतील उदक उपाध्यायांनीमंत्र म्हणून पवित्र केलेले असते. सर्व लाह्या धगधगत्या होमकुंडात पडल्यानंतर वर उठून उभा राहतो व होमकुंड आणि उदक-कलश यांना म्हणजेच अग्नीला प्रदक्षिणा घालतो. तो वधूचा हात आपल्या हातात घेऊन पुढे चालतो. वधू त्याचा हात धरून त्याच्या मागे चालते. प्रदक्षिणा पुरी झाल्यावर वधू होमकुंडाच्या पश्चिमेस ठेवलेल्या पाटयावर ( किंवा सहाणेवर) पाय ठेवून उभी राहते. वर मंत्र म्हणतो, ‘हे वधू, तू या पाषाणाप्रमाणे दृढ (घट्ट) हो. आपल्या हितशत्रूंचा सद्वर्तनाने नाश कर.’ (मैत्रीपूर्ण सोज्वळ वागणुकीने शत्रूंनापण जिंकून घे असा भावार्थ.)

हा अग्निप्रदक्षिणेचा संपूर्ण विधी तीन वेळा करतात. म्हणजेच मग अग्निब्राह्मणांच्या साक्षीने वधू-वरांचे लग्न लागले असे ती उभयता व उपस्थित इतरेजन मानतात. इतका हा महत्वाचा विधी आहे.