प्रत्यक्ष लग्न जिथे लागणार त्या जागी दोन लाकडी पाट समोरासमोर (पूर्व व पश्चिम दिशेस) मांडून त्यावर तांदुळाच्या राशी घालतात. त्यावर कुंकवाने स्वस्तिके काढतात. या जागेला लग्नवेदी म्हणतात. एका पाटावर वरास पुष्पहार देऊन उभे करतात. वधूचा मामा वधूस हाताला धरून घेऊन येतो व दुस-या पाटावर उभे करतो. लग्नाचे वेळी मुलीला मामाने आणण्याचे कारण असे सांगतात, मामा हा मायेचा असतो. लग्नकार्याच्या दिवशी मुलीचे आई-वडील, काका हे आल्या-गेल्याचे स्वागत करण्यात व्यग्र असतात. त्यामानाने मामा मोकळा असतो. शिवाय मुलीला आजोळची ओढ ही जास्त असते. आणि सर्वसाधारणपणे काकापेक्षा मामाच अधिक माया करतो.
वधू-वरांच्यामध्ये एक वस्त्र आडवे धरून दोन्हीबाजूला भटजी उभे रहातात. या वस्त्राला अंतरपाट म्हणतात. अंतरपाटाच्या दोन्हीबाजूलाही कुंकवाची स्वस्तिके काढलेली असतात. गुरुजी मंगलाष्टके म्हणावयास सुरूवात करतात. लग्नासाठी जमलेल्यांना रंगीबेरंगी तांदुळाच्या अक्षता वाटतात. मधून मधून, एक मंगलाष्टक संपले की जमलेले सर्व लोक वधू-वरांवर अक्षतांचा वर्षाव करतात. वधू-वराच्यामागे त्यांच्या त्यांच्या करवल्या हातात करा (पाण्याने भरलेला कलश त्यामध्ये आंब्याची पाने व कुंकू लावलेला नारळ) व प्रज्वलित दीप घेऊन उभ्या राहतात. लग्नघटिकेच्यावेळी गुरुजी मंगलाष्टके संपवतात. मंगलाष्टकांची सांगता नेहमी खालील श्लोकाने होते.
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||
याचा अर्थ असा की ‘आजच्या दिवशीचे हे लग्न, हा दिवस चांगला आहे, चंद्र व तारांचे बलही चांगले आहे, विद्या व दैव यांचेही चांगले बल पाठीशी आहे. परंतु यातील काही जर चांगले नसेल तर, हे महाविष्णू (लक्ष्मीपती) तुमच्या स्मरणाने हे सगळे चांगले होवो (जी काही उणीव आहे ती तुमच्या नामस्मरणाने भरून काढली जावो.)’
‘शुभमंगल सावधान’ चा दणदणीत गजर होतो. वराचा मामा अंतरपाट दूर करतो. वधू वराला पुष्पमाला घालते आणि वर वधूला पुष्पमाला घालते. वधूवरांनी एकमेकांना हार घातल्यानंतर अक्षतारोपण होते. अक्षतारोपण म्हणजे वधू-वरांनी दूध व तुपात भिजवलेली अक्षत परस्परांच्या मस्तकावर टाकणे. त्यावेळी खालील श्लोक म्हंटला जातो.
यज्ञोमे काम: भगोमे काम:|
श्रीयोमे काम: समृध्यताम् ||
याचा अर्थ असा की ‘चतुर्विध पुरुषार्थ सिध्द करताना, यज्ञयागादी कार्य करताना, द्रव्यार्जन करीत असताना, कल्याणकारी कार्यक्रम करीत असताना मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे’. हे विधान वधू व वर या दोघांनीही एकमेकांना उद्देशून म्हणायचे असते.
आता लग्न लागले. मंगल वाद्ये वाजू लागतात. हल्ली बहुदा बॅंड आणविला जातो व बॅंडवर गाणी वाजविली जातात. आता करवल्या आपापल्या हातातील मंगल कलशाचे पाणी वधू-वरांच्या डोळयांस लावतात. वधूची आई व वराची आई वधू-वरांना प्रेमाने ओवाळतात. वधू-वरांना आपापल्या जागा बदलून उभे करतात. वधूवरांना शुभेच्छा व भेट देण्यासाठी जमलेल्या लोकांची झुंबड उडते. जमलेल्या पाहुण्यांचे पेढा व गोटा (फुलांचा छोटासा गुच्छ) देऊन स्वागत केले जाते.
हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे व त्यावर आधारित कायद्यानुसार कन्यादान, विवाहहोम व सप्तपदी हे तिन्ही विधी झाल्याशिवाय विवाहविधी पूर्ण झाला असे मानले जात नाही. विवाह सनातन धर्मविधीप्रमाणे झाला की वैदिक पध्दतीने झाला त्यानुसार या विधींचे क्रम मागेपुढे होतात.
शास्त्रोक्तपध्दतीनुसार या तीन विधींपैकी कन्यादान हा विधी प्रथम केला जातो. कन्यादानाच्या विधीच्या आधी वधूच्या मातापित्याकडून वराची ‘मधुपर्क’ पूजा म्हणजे शोडषोपचारे पूजा केली जाते. त्याला सोवळे नेसायला दिले जाते व त्याने ते सोवळे नेसून पुढील विधीसाठी यावयाचे असते. हल्ली सोवळे न देता वराचा खास लग्नासाठी तयार करविलेला पोषाख दिला जातो. धार्मिक विधींसाठी मात्र सोवळे नेसूनच वराला यावे लागते. वधूपिता व माता वधूस शेजारी बसवून घेऊन वरास आपल्या डाव्या हाताकडे किंवा समोर बसवतात. एका मंगल कलशामध्ये पाच रत्ने व सुवर्ण घालून त्यात पाणी घातले जाते. सुवर्ण-रत्नांनी अभिमंत्रित केलेल्या कलशातील उदकाने कन्यादान केले जाते. मग एक काशाचे भांडे जमिनीवर ठेवून त्यावर वर, वधू व वधूपिता आपापली ओंजळ धरतात. वधूमाता कलशातील पाण्याची संततधार वधूपित्याच्या ओंजळीत धरते. तेथून ती वराच्या, वधूच्या ओंजळीत व नंतर काशाच्या भांडयात पडते. हे करताना वधूपिता पुढील मंत्र म्हणतो.
धर्मप्रजा सिध्यर्थं कन्यां तुभ्यं संप्रददे |
याचा अर्थ असा की ‘धर्मपालन व उत्तम प्रजानिर्माण करण्यासाठी या कन्येला मी तुमच्या गोत्रात समर्पण करतो.’
त्यानंतर वधूपिता खालील अर्थाचे मंत्र उच्चारतो.
‘अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांस होण्याकरता व त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी अमुक नावाची अमुक गोत्रोत्पन्न, सौभाग्यकांक्षिणी, लक्ष्मीरूपी कन्या मी ह्या विष्णुरूपी वराला ब्राह्यविवाहविधीने अर्पण करतो. हिचा वराने स्वीकार करावा.’
असे म्हणून उजव्या हाताने दर्भ, अक्षत व पाणी वराच्या हातावर सोडायचे. त्यावर वराने ‘ओम् स्वस्ति’ म्हणजे ‘मान्य आहे’ असे म्हणायचे. त्यानंतर दानावर दक्षिणा देतातच, त्या न्यायाने कन्यादानावर वरदक्षिणा म्हणून ज्या वस्तू किंवा धन देण्यात येणार असेल त्यांचा मंत्रपूर्वक उच्चार वधूपित्याने करावयाचा. ‘धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पत्नीच्या परवानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ असे वचन वराने वधूपित्याला द्यावयाचे व ‘धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पतीच्या परवानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ असे वचन वधूनेही आपल्या पित्याला द्यावयाचे असते.
त्यानंतर वधू-वरांनी दूध व तुपात भिजवलेली अक्षत परस्परांच्या मस्तकावर टाकून ‘आमचा संसार सुखाचा होवो, आम्हांला उत्तम संतती प्राप्त होवो, उत्तम यश मिळो व हातून सतत धर्माचरण होवो’ असे म्हणायचे असते. साखरपुडयाच्यावेळी, ही वधू या वरास देण्यासंबंधीचे तोंडी दिलेले वचन, अशा रीतीने वधूपिता शास्त्रोक्त विधीने अग्नि-ब्राह्मणांच्या साक्षीने पूर्ण करतो.
हा विधी लग्नाच्या इतर सर्व विधींमधील अत्यंत भावविवशतेचा असतो.