गड-किल्ले


वाईचा पांडवगड

निसर्गाचे सौंदर्य लाभलेला पांडवगड

Pandavgad वाई ऊर्फ विराटनगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, केंजळगड, अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाई जवळ आले की, सारी दुर्गशिखरे त्यांच्या माना वर करत डोकाऊ लागतात. यातच त्यांच्या विशिष्ठ आकाराने उठून दिसतो तो पांडवगड!

या पांडवगडाकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक म्हणजे वाईजवळच्या मेणवली गावातून, तर दुसरी धावडी गावाच्या हद्दीतून. या दोन्हीही वाट अंगावर येणाऱ्या पण त्यातही धावडीकडची तुलनेने थोडी कमी श्रमाची आहे. वाई मांढरदेव मार्गावर धावडी हे गाव. वाईहून याचे अंतर सात किलोमीटरचे. पांडवगडाला खेटून चार-पाच घरांची वस्ती लागते. इथून हा गड आणि त्यचा कातळ अगदी अंगावर येतो. येथे गिर्यारोहण करतांना बूट, पाठीवरची सँक घट्ट करायची आणि खंबीर पावलांनी गड चढू लागायचे.

पांडवगडची उंची सुमारे ४१७० फुट म्हणजेच १२७३ मीटर आहे. शिलाहार राजाभोज याने सातारा जिल्यात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक! निसर्गाचे सौंदर्य घेऊन जन्माला आलेला. छातीवर येणारा चढ आणि घनदाट झाडी… पांडवगडचा हाच अनुभव ट्रेकर्सला सुरुवातीला अनुभवायला मिळतो. गिर्यारोहक सोडले तर मुळात इकडे कोणी येत नाही. चार गुरख्यांच्या वर्दळीने पडलेली पायवाट, पण पावसाला उलटला की या गडावर बेसुमार गवत माजते आणि आहे ती पाऊलवाटही झाकून जाते. हे गवतही अगदी डोक्याहून उंचीचे. अशा दाटीतून मार्ग काढत, गडाकडे सरकावे लागते. साऱ्या अंगाला गवताची कुसळे टोचू लागतात. सरपटणाऱ्या जीवांचे भय ते वेगळेच! त्यामुळे इकडे फक्त साहसी ट्रेकर्सच येतात. परंतु पांडवगडचा प्रवास कठीण असला तरी मात्र या प्रवासात निसर्गाचे सौंदर्य मिळते. याठिकाणी कारवी, तेरडा, सोनकी, हळुंदा, लाजाळू कवळा, कोंबडतुरा व तालीमखाना अशा कधीही ण पाहिलेल्या रानफुलांचे दर्शन होते.

गडाच्या अगदी पायथ्याजवळ पायऱ्यांचे काही अवशेष दिसतात. गडाचा पहिला धागा या पायऱ्यामधूनच जुळतो. इथे माचीत शिरण्यापूर्वी एखादा दरवाजा असावा असे वाटते. माचीवरून पुढे निघताच वाटेत दोन पाण्याच्या टाक्या आहेत. गडावर एकूण दहा ते पंधरा खोदीव टाक्या, एक-दोन मोठाली तळी आहेत. पुढे निघताच बालेकिल्ल्यातील प्रवेशमार्ग येतो. एक खणखणीत बुरुज, त्याला लागून कड्याला प्रवेशद्वाराची कमान आणि त्यालगत काही अंतरावर चीराबंदी तट! त्याच्याकडे पाहताच पांडवगडचे दुर्गपण जागे होते. पांडवगडाला चहूबाजूंनी ताशीव खोल कडे यांमुळे तटबंदीची आवश्यकता आहे तिथेच ती घातलेली. प्रवेशद्वाराच्या पुढे मारुतीचे मंदिर आहे. मारुती मंदिराच्या पुढे गडावरील चुन्याची घाणी आहे. ठिकठिकाणी रंगबिरंगी बेढभ मंदिरे आणि चौका-चौकात धूळखात पडलेले पुतळे. पांडवगडावर गडदेवता पांडजाई देवीचे पडलेले मंदिर आहे. मंदिरासमोर शिवलिंग, नंदी, पादुका, वीर पुरुषाची एक मूर्ती आदि शिल्प दिसतात. गडांवर दिसणारे पाण्यासाठीचे दगडी भांडेदेखील इथे आहे. हे सारे पाहत असतानाच झाडीतल्या या मंदिरात जागोजागी मोठाल्या जाडजूड पाली नजरेस पडतात. यांचे रानटी रूप पाहून एकक्षण अंगाला काटा उमटतो.

पांडवगडाचा इतिहास पाहिल्यास समजते की पांडवगडही शिलाहार राजा भोजची निर्मिती! साधारणपणे इसवी सन ११७८ ते ९३ दरम्यान याला हे गडाचे रूप दिले गेले. पुढे आदिलशाही इथे आली. छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६७३ हा गड स्वराज्यात आणला. त्यानंतर औरंगजेबाच्या वावटळीत १७०१ मध्ये तो मुघलांकडे गेला. यातून त्याची सुटका केली ती छत्रपती शाहूंनी. मराठ्यांकडील हा वारसा अखेर एप्रिल १८१८ मध्ये मेजर थॅचरने हिसकावून घेतला.

पांडवगडाचा हा प्रवास गवत-झाडींचे ते जंगल बाजूला सारत, वाट काढत सुरु असतो. यातून एक टोकाला यायचे आणि मग पुन्हा सारा मागचा गड आणि भोवतालच्या दऱ्याखोऱ्यांवर नजर फिरवल्यास सुरुवातीला उत्तरेकडील मांढरदेवीची डोंगररांग आणि तिच्यावर चमचमते देवस्थान दिसते. पूर्वेला खंबाटकी घाटाचा डोंगर,त्यापलीकडे नांदगिरी, चंदन-वंदन, वैराटगड रामराम करतात.दक्षिण अंगाला पाचगणी, महाबळेश्वरचे पठार त्याला जोडूनच पश्चिम अंगाला कमळगड आणि त्याअलीकडचा केंजळगड. या साऱ्यांच्या मधोमध चमचमते पात्र घेऊन संथ वाहणारी कृष्णा येते. तिच्या काठावरची ती धोम, मेणवली आणि प्राचीन वाईनगरी… आणि जणू या साऱ्या देखाव्यावर लक्ष ठेऊन असलेला हा पांडवगड! Location Icon

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : महाबळेश्वर डोंगररांग
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम