सुनेचा नवरा की…..

‘काही नको तुम्हाला ज्यात त्यात नाक खुपसायला. मी आणि माझा नवरा पाहू काय ते’ ‘अग वा ! नवरा काय माहेरून आला का ? मी वाढवलाय त्याला कष्ट काढून readymade नवरा मिळत नाही असा’ अशी, नांदी, व ‘एकतर मी तरी या घरी राहीन किंवा ती तरी’.. अस भरतवाक्य ऐकलं की मधलं – Action और Emotion से भरपूर’ – रोमांचकारी महाभारत, प्रमुख पात्रे व विदुषकासव (मुलगा) आपल्या डोळयांसमोर अगदी जिवंत चित्र उभं रहात. सासूचा मुलगा की सुनेचा नवरा हा अतिगहन व प्राचीन प्रश्न आहे. सुदैवाने (!) जसे मुलाला थपडा खायला दोन गाल असतात तसेच या नाण्यालाही दोन बाजू असू शकतात का ?

सासूचा मुलगा :- का नसावा?
कार्यकारणभावानुसार सासूला मुलगा नसता तर सुनेलाही नवरा नसता. कालानुक्रमाने सुध्दा सासूचा मुलगा, सुनेचा नव-याच्या आधी येतो. भावनिक तराजूतसुध्दा सासूचेच पारडे अमंळ जड आहे कारण मुलाच्या वाढीमध्ये, एकंदर जडणघडणीत सासूचे मुलाच्या आयुष्यातील अह्म स्थान मानायला काय हरकत आहे? नाहीतरी गरजेच्या फूटपट्टीने मोजलं तर वयस्कर सासूलाच, तरूण सुनेपेक्षा आधाराची जास्त गरज आहे.

सुनेचा नवरा – का नसावा?
अखेर मुलाला आपलं उभ आयुष्य कुणाबरोबर काढायचं आहे? नि, सुनेचा आपल्या नव-यावर, आपल्या संसारावर जर हक्क नसेल तर त्यांच लग्न करून देण्याचं कारणच काय? लग्न होऊन सासरी येणारी मुलगी आपलं पूर्वायुष्य, आपली माणसं पाठी ठेवून येऊन, एकप्रकारे त्याग, तडजोड करते. नव्या अनोळखी वातावरणात तिच्या विश्वासाला भावनांना नव-यानेच नाही तर कोणी सांभाळायच? अखेर सासूच्या भूतकाळासमोर सुनेचा भविष्यकाळ बळी का जावा?

माझ्यामते ‘सासू की सून’ प्रश्न अप्रस्तुत आहे. या प्रश्नाचा अर्थ शोधने म्हणजे – सासूचा मुलगा नि सुनेचा नवरा या दोन विभक्त, परस्परविरोधी गोष्टी आहेत असं मानणं आहे. या, ‘नाण्याच्या दोन बाजू आहेत’, असं का म्हणत नाही? म्हणजेच प्रश्नाचं मूळ प्रश्नात नसून आपल्याच मनात आहे. नाती हा विषयचं मुळी जोडण्यासंबंधीचा आहे, मग सासू-सूनेचं नातं हे विभाजनाचं मूळ होऊ देणंच अप्रस्तुत नाही का? यात एक मोठा अंतर्भूत विरोधाभास आहे. पुन्हा मुलगा हा काही मालमत्ता नाही की ज्यावर हक्क प्रस्थापित करता येईल किंवा त्याची वाटणी करता येईल.

अर्थात केवळ अप्रस्तुत आहे असं म्हणून प्रश्न सुटत नाही. कुणीतरी याची जबाबदारी स्वीकारायलाच पाहिजे, जर सासूला सासू नि सुनेला सून होण्याच कारण ‘मुलगा’ असेल तर त्यांना जवळ आणण्याचं दायित्वही त्यानेच पत्कारलं पाहिजे. मुलानेच भूतकाळाची साक्षीदार (आई) नि भविष्यकाळाची साथीदार (बायको) यांच्यात वर्तमानकाळातला दुवा बनून आनंद निर्माण केला पाहिजे. याचबरोबर मुलाच्या आयुष्यातल्या या दोन बायकांनीही आपली जबाबदारी उचलली पाहिजे. त्यांनी त्यंच्यातला हा एकमेव सांधा दोन्ही बाजूंनी खेचून खिळखिळा करण्यपेक्षा आपल्या भावनांच्या ओलाव्याने त्याला रोपासारखं जोपासलं पाहिजे. तरच त्या फोफावलेल्या वृक्षाची सुनेसाठी फळं नि सासूसाठी निवांत ऐकण्यासाठी सावली मिळू शकेल. अन्यथा त्या मुलाच्या, त्यांच्या नशीबासारखा, सुकून निष्पर्ण वृक्ष होण्यास वेळ लागणार नाही !

– यतीन सामंत

सासू-सून ह्या नातेसंबंधाविषयीचे अनुभव, आठवणी मुक्तांगणला जरूर पाठवा.