सृष्टिरंग

१) सृष्टिरंग (सूर्यरंग)
srushtirang सूर्य रोज नवी पहाट घेऊन येतो आणि संध्याकाळही नवी करून जातो. सकाळच्या सप्तरंगी किरणांसोबत आलेल्या या नव्या दिवसात आनंद शोधत आपण दिवस घालवत असतो, प्रत्येक दिवसाच्या नव्या आनंदात हरखून जातो. ‘आहे हा क्षण आपला’ यानुसार प्रत्येक क्षण सोन्याचा करून जातो. मिळालेल्या नव्या आनंदात रममाण होऊन जातो. सप्तरंगी वस्त्र धारण केलेल्या सूर्यदेवाच्या रथातून नाना रंगांची उधळण करत अंशुमान जात असतो. त्यातील नवकण वेचत आपणही नाना रंगात भिजून जातो. नवनवीन रंगांचं लेणं सावरत नव्या रंगात रंगून जातो. चुकून पाय लागून सांडलेल्या घडयातील रंग आणि संध्याकाळी अस्ताचलावर जाणाऱ्या सूर्यदेवाच्या स्वागतासाठी नवरंगाच्या अंथरलेल्या पायघडया घालून निशादेवी सज्ज असते. पश्चिम क्षितिजावर पाश्चात्य लोक आसुसलेले असतात रविकरांना कवेत घ्यायला! सूर्य पश्चिम क्षितिजावर जाऊन सप्तरंगांची बरसात करू लागतो व जो तो रंगून जातो नवरंगात!

ज्याला जे हवे ते ते निसर्ग भरभरून देत असतो. निसर्गात आपल्याचा भावनांचं प्रतिबिंब पाहण्याचा संकेत पाश्चात्त्य लोकांचा! ते आपलं जीवन झाडा-माडांत, दगड-धोंडयात पाहण्याचा प्रयत्न करतात.

२) सूर्य व पृथ्वी

सूर्य जेंव्हा मावळू लागतो तेंव्हा पृथ्वी व आकाश यांच्या मीलनाचा सोहळा पाहण्यास झाडे, पाने, फुले, सर्व एकत्र येतात. आपले दिवसभराचे थकले भागले मन मिटवून मीलनाचा सोहळा पाहण्यास झाडं, पानं, फुलं, पशू, पक्षी उत्सुक असतात.

पृथ्वीशी आकाशाचे मीलन होणार या कल्पनेनेच पश्चिम दिशा आरक्त होते. त्यांचे मीलन होणार या कल्पनेनेच पश्चिम दिशेवर क्षितिज मोहरून जाते. रविकराच्या आगमनासाठी लाल गुलाबी पायघडया पसरल्या आहेत, असे चित्र दिसू लागते. चंद्राच्या आगमनासाठी तयार केलेले रंगांचे घडे जणू सूर्याचाच पाय लागून सांडले आहेत व अंथरलेल्या पायघडया नवरंगांनी रंगून गेल्या आहेत. रवि स्वर्गाच्या दारातून जसजसा आत येत जातो, तसतशी चांदण्यांची तोरणे अधिक प्रकाशमान होत जातात व रजनीदेवीचे साम्राज्य सुरू होते. जसजसा रवि पुढे जात जातो, तसतसा सारा प्रकाश कमी कमी होत जातो. व तिथे साम्राज्य पसरते दिनकराचे. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे असे दिनकराचे वत्याच्याच तालावर निशाकराचे भ्रमण सुरूच असते. पण पृथ्वी व आकाश मात्र रोज त्याच क्षणांची आतुरतेने वाट बघत असतात, जो क्षण केवळ कल्पनेतच अनुभवावा लागतो. कारण क्षितिज हा केवळ आभास आहे. कधीही सत्यात न उतरणारा. रोज तीच स्वप्नं, त्याचा आशा उराशी बाळगून क्षितिज दुसऱ्या दिवसाची स्वप्नं बघत राहते. ते देखील अखंड, चिरकाल…

३) मोर
peacock मोराचं दु:ख माहीत आहे कुणाला? जगातील उत्तमोत्तम पक्ष्यांकडून सुंदर सुंदर गोष्टी घेऊन जन्माला आलेला मोर पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जातो पण या राजाचं दु:ख माहीत आहे कुणाला? त्याचे ते काळेकुट्ट बारीक पाय! आकाशातून पावसाच्या सरी धरित्रीवर कोसळू लागल्या की, याच पायांनी नाचून मोर त्यांचं स्वागत करतो. व याच पायांच्या तालावर आपल्या पाठवरील तो सुंदर, मोहक पिसारा फुलवितो. वरून सुंदर दिसणाऱ्या या मोराचे पाय मात्र किडकिडीत आहेत. त्यामुळे राजा असूनही तो उंच भराऱ्या घेऊ शकत नाही. पृथ्वीवरून जमिन पाहण्यापेक्षा आभाळातून पाहणे कुणालाही आवडेल. मग या मोराला काळया कावळयाचाही हेवा वाटू लागतो. गरूडभरारी नाही तरी कोंबडयासारखी जमिनीवरून छोटया फांदीवर मात्र उडी मारता येते. पण उंच आभाळातून जमीन पाहण्याची त्याची इच्छा पुरी होऊ शकत नाही. सर्व काही सुंदर असूनही तो या कुरूप पायांमुळे उंच उडू शकत नाही. हेच काळे किडकिडीत कुरूप पाय घेऊन मोर राजा म्हणून सर्वोच्च स्थानावर उभा राहतो. व पक्ष्यांचा राजा म्हणून मान मिळवितो.

४) सृष्टिचक्र
आभाळातील काळया मेघांना कोण साद घालत असतं? एका तीव्र ओढीने मेघ धावत असतात. अतिशय व्याकुळ होतात. त्यांना लागते आस कुणाला तरी भेंटण्याची. क्षितिजावरून निघालेले मेघ. त्यांना लागते ओढ अनंताच्या समेला भेटण्याची! ते जसजसे पुढे जातात तसतसा आपला आकार मोठ करू लागतात. जणू त्यांना लागते आस भेटण्याची! अतिशय व्याकुळ होऊन पुढे जात असतात आणि एका भावव्याकुळ क्षणी आपलं सारं प्रेम या धरणीवर रिक्त करतात. जेवढं म्हणून देता येईल तेवढं दान ते या धरणीवर रिक्त करतात. पावसाचं हे दान धरती आपल्या दोन हातांनी कवेत घेते. ज्यातून चाहूल लागते सृजनत्वाची! या धरतीतून सुंदर झोकदार झाडं बाहेर येतात. धरतीचा आनंद अनावर होतो. आपल्या सर्व सेंद्रिय शक्तींनी ती इवल्या इवल्या रोपांना वाढवते. त्यांना योग्य आकार देते व एक दिवस ही झाडे फुलतात, फळतात व पुन्हा त्याच मातीत मिसळून जातात.

– वैजयंती विंझे