प्रिय सौरव, मंदारचा नमस्कार. ए तुझं टोपणनाव किती छान आहे… दादा… या दादा शब्दाला जशी तुमच्यात आपुलकी, जवळीक आणि आदराची दृष्टी लाभलीय ना तशी आमच्यातसुध्दा आहे बर! अर्थात दादा या शब्दाला दुसराही अर्थ ‘भाई’ असा होतो हे तुला माहित असेलच. गेल्या काही वर्षात तू भारतीय संघात भाईसारखा वागायचास असं तुझं चित्र प्रसारमाध्यमांनी रंगवलं हे सुध्दा तुला चांगलच ठाऊक असेल. अरे आणि त्या चॅपलकाकांच्या लीक झालेल्या ई-मेलमुळे तर त्याच्यावर अगदी शिक्काच बसला. मी म्हणतो काकांना एवढं सेन्सिटिव्ह मेल पाठवायचा तर फेव्हिकॉल किंवा एम-सीलची स्पॉन्सरशिप घेऊन तरी पाठवायचा. म्हणजे मेल लीक होण्याचा प्रश्नच नाही. हे वाचतांना तू म्हणशील हाऊ सिली… कुछ भी बॉत करता है. असं नाही रे, पण तुझा संघात स्थान मिळवण्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास किती नाटयपूर्ण होता हे तर तुलाही ठाऊक असेल. 1992 साली तुझी संघात सर्वप्रथम निवड झाल्याचे तुला आठवत असेलच. सारखा तुला संघात बारावा म्हणून खेळवला. तुला पाणी घेऊन जायला सांगितलं म्हणून तू चिडला होतास म्हणे आणि तू पाणी न्यायला नकार दिला होतास. महाराजा हे नाव तुला त्यावरूनच पडलं असावं बहुतेक! ऑस्ट्रेलियाच्या त्या दौ-यावरून भारतात परतल्यावर तू नित्यनियमाने पुन्हा भारतात बंगालच्या तुझ्या संघाकडून खेळायला सुरुवात केलीस. पण तुला संघात पुन्हा प्रवेश मिळाला तो १९९६ साली. १९९२ ते १९९६ या चार वर्षात. विनोद कांबळी नामक एक वादळ सतत भारतीय संघासाठी धावा करीत होतं. पण 1996 साली तुला संधी देण्यात आली आणि इथून सुरू झाला तो तुझा ‘वा! गांगुली’ बनण्याचा प्रवास. अगदी पुनर्पदार्पणाच्या त्या सामन्यातून तू लॉर्डस् वर शतक ठोकलसं. त्या संपूर्ण दौ-यात तू छान खेळ केलास. तुझ्या त्यावेळच्या निवडीनंतर ज्यानी प्रश्नचिन्ह ठेवले होते त्या सर्व टीकाकारांना तू बॅटने उत्तर दिलसं. ‘वा! गांगूली’ १९९२ ते १९९६ या चार वर्षात एक खेळाडू म्हणून तू चांगलाच सुधारला होतास असं सर्व जणांच मत झालं.
त्याचदरम्यान, म्हणजे साधारण १९९६ ते २०००-२००१ पर्यंत आमच्या क्रिकेटविश्वाला मॅच-फिक्सिंगच प्रकरण ग्रासलं होतं. पण तुझं नाव कसल्याही अशा प्रकरणांशी जोडलं गेलं नाही. याच काळात वन डे क्रिकेटमध्ये तू आणि सचिन ही सर्वात यशस्वी सलामीची जोडी ठरली. सचीनने २००० साली कर्णधारपद सोडल आणि मग कर्णधारपदाची माळ तुझ्या गळयात पडली. मग सुरू झाला तुझा कर्णधारपदाचा प्रवास. आम्हा मुंबईकरांसाठी प्रवास हा तसा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आता प्रवासात कटकट, दगदग, ट्रॅफिक जॅम, काही सुखद प्रसंग, जसे आमच्या मुंबईकरांच्या वाटेला रोजच्या रोज येतात ना तसे, ते तुझ्याही वाटयाला आले असतील म्हणा. तुझ्यासाठी कटकट म्हणजे सतत निवड समितीच्या सदस्यांचे प्रेशर, दगदग म्हणजे भारतीय संघाचे दौरे आणि सतत फॉर्ममध्ये राहण्यासाठी तू केलेले प्रयत्न, ट्रॅफिक जॅम म्हणजे अगदी मोक्याच्या क्षणी किंवा अंतिम सामन्यात आपल्या संघाची कच खाण्याची प्रवृत्ती आणि सुखद प्रसंग म्हणजे तू कर्णधार म्हणून जिंकलेल्या मालिका, तुला मिळालेले जाहिरांतीचे पाठबळ म्हण हवंतर. पण तू एक चांगलं केलस. ‘टीम इंडिया’ हा कन्सेप्ट भारतात रुजवलास. तरुण रक्ताला सतत वाव दिलास. म्हणून तर २००३ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघ वन डे क्रिकेटच्या नामांकनात क्रमांक दोनवर होता. तू निवड केलेल्या सर्व शिलेदारांनी, हरभजन, सेहवाग, युवराज, कैफ, झहीर, इफरान, पार्थिव या सर्वांनी तुला चांगलीच साथ दिली. तुझ्यातली आक्रमकता तू संघात रुजवलीस. आपल्याला कोणी ‘अरे’ म्हटलं तर ‘कारे’ म्हणा हे तू तुझ्या सर्व तरूण सहका-यांना सांगितलस. २००१ साली स्टीव वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाला तु भारतात कसोटी सामन्यात धूळ चारलीस. ज्या आक्रमकतेने ऑस्ट्रेलियन्स खेळतात तशाच आक्रमतेने तू संघसहका-यांना खेळायला सांगितलस. नॅटवेस्ट ट्रॉफी जिकल्यावर तू लॉर्डस् च्या गॅलरीत तुझा शर्ट काढून गरागरा फिरवला होतास. तुला याबद्दल विचारलं गेलं तेव्हा तू वानखेडे स्टेडियमवर काय झालं होतं याची आठवण करून दिली होतीस. आपला संघ तसा बऱ्यापैकी जिंकत असल्याने तुझ्या या ऍटिटयूडचं सर्वांनी कौतूकच केलं. हे सर्व होत असतांना तुझा फॉर्म तू घालवून बसतो आहेस हे तू विसरलास. 2003 सालच्या विश्वचषकात तू शतके ठोकलीस पण ती दुबळया संघाविरूध्द असं बऱ्याच टीकाकारांचं मत झालं. मला विचारलस तर मी म्हणीन की तू मारलेले केनियाविरुध्दचे शतक उल्लेखनीय होते. आपण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोचलो. पण पुन्हा हरलो. परंतु आपला संघ अंतिम सामन्यात हरल्याने तशी टिकेची झोड कमी झाली. नंतर 2003 साली आपण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलो असताना पहिल्याच कसोटीत भारताची अवस्था 62 धावांवर 3 बळी अशी झाली होती. एवढी प्रतिकूल परिस्थिती आणि त्यात तोंडावाटे आग ओकणारे ते ऑस्ट्रेलियन्स यांचा योग्य समाचार घेत तू शतक ठोकलंस. सर्व जाणकारांच्या मते या शतकाने आपल्या या दौऱ्याची सर्व समीकरणे बदलून गेली. ही मालिका स्टीव वॉची शेवटची मालिका होती. भारतात तो त्याच्या नेतृत्वाखाली आला तेव्हा तुझ्या संघाने त्याच्या संघाला २-१ असे पराभूत केले आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका आपण् १-२ अशी बरोबरीत आणली. भारतीय संघाची विदेशी दौऱ्यावरची ही सर्वात चांगली कामगिरी होती.. परंतु पहिल्या कसोटीतले शतक वगळता तुझा खेळाडू म्हणून या विजयातला (ऑस्ट्रेलियाशी १-१ अशी बरोबरी म्हणजे नैतिक विजय असा हा युक्तिवाद आहे अस समज हवतर) तुझा सहभाग तसा उल्लेखनीय नव्हता. एकदिवसीय सामन्यांची मालिका आपण हरलो.
नंतर आला तो पाकिस्तानचा दौरा. आपल्याकडील सर्व प्रसारमाध्यमांनी तेथील सुरक्षाव्यवस्था, तेथील वातावरण याचा किती बाऊ केला होता. तुला याबद्दल मेल टाकल्यावर तू म्हणाला होतास की याबाबत काळजी करायला सुरक्षा समिती सक्षम आहे. आम्हाला जाऊन फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. तब्बल 11 वर्षानंतर तुझ्या संघाने पाकिस्तानात जाऊन कसोटी आणि एकदिवसीय सामने या दोहोंतही विजय मिळवले आणि खूप वर्षांनी आपलं एक स्वप्न पूर्ण झालं. इथपर्यंत तुझा ‘वा! गांगुली’ चा प्रवास पूर्ण झाला. या दौऱ्यात पुन्हा तुझी कामगिरी तशी बरी झाली नाही. बरोबर ना… मला माहित आहे की तू नाही म्हणशील पण ही वस्तुस्थिती आहे रे… त्यात याच दौ-यात सचिनसारख्या खेळाडूला २०० धावा न करू देण्याचा गुन्हा घडला. आता तो कोणी घडवून आणला…. का घडवून आणला? याची उत्तरं मोघम का होईना पण लोकांना मिळाली. संशयाचे ढग तुझ्याभोवतची फिरत होते. तू किंवा कोणीही अजून याबद्दल सफाई दिलेली नाही पण बरेचसे क्रिकेटशौकीन याप्रकारामुळे चिडले. तशातच नंतर तुझ्यावर शिस्तभंगाच्या बऱ्याच कारवाया झाल्या. तुझा फॉर्म हरपला. कर्णधार होण्याआगोदर पहिल्या 36 कसोटीत तुझी सरासरी ५० धावांच्यावर होती. पण आज ती ४१ च्या आसपास येऊन पोहचली आहे. यावरून एक उखाणा आठवतो.
‘लाकडाची बॅट,
त्यावर प्रायोजकांचे वेष्टण,
………….रावांचे रन १०,००००,
पण करंट फॉर्मच टेन्शन’.
आखूड टप्प्यांची गोलंदाजी आणि लेग स्टंप हे सौरवला आऊट करण्याचे किंवा सौरवच्या धावा रोखण्याचे दोन मार्ग आहेत. हे तर आज कोणीही सांगेल. पूर्वी तुझी बॅट सोना चांदी च्यवनप्राशमधील जाहिरातीत तू जशी तलवार चालवायचास तशी चालायची पण आता ह्रतिकबरोबर हिरो होंडाच्या जाहिरातीत नाचताना कसा नवख्यासारखा भासत होतास, कसा गोंधळला होतास अगदी तशी ती मैदानावर भासतेय. आठव बघू आणि सांग शेवटची उंच सिक्सर फिरकी गोलंदाजाला पुढे सरसावत येऊन केव्हा मारली होतीस तू? टाटा इंडिकॉमची जाहिरात करताना तू हाइएस्ट टॉकटाईमबद्दल बोललास परंतु मैदानावर फलंदाजीला आल्यावर किती कमी वेळ काढतोस? सध्या झालेल्या झिंबाम्बे दौरा तुझ्या नेतृत्वाखाली आपण जिंकलोच पण तिथे ‘एका कसोटीत शतक मारल्यानंतर मला कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आलं होतं’ असं सांगितलस आणि पुन्हा वादाला तोंड फोडलसं. तू शतक मारलसं ते (खर म्हणजे एकदाच केलस असच म्हणायला पाहिजे ते तू ज्या प्रकारे केलसं ते बघता) पण तब्बल तेरा कसोटी सामने आणि दोन वर्षानंतर. तो दौरा तर तसा विजयी ठरला पण आपले प्रशिक्षक चॅपेल सर मात्र पेटले. आणि त्यांनी एक ई-पत्र आपल्या बोर्डाचे अध्यक्ष रणबीरसिंगाना लिहिलं. पण ते पत्र फुटलं. (पेपरफुटी एकली होती पण एवढी प्रसिध्द झालेली ई-पत्रफुटी मात्र पहिलीच बाबा). त्या पत्रात त्यांनी संघात तू पसरवत असलेल्या दुहीबद्दल, तू गोलंदाजांना देत असलेल्या अवास्तव महत्त्वाबद्दल, काही खेळाडूंना सतत सापत्नभावाने बघण्याच्या तुझ्या वृत्तिबद्दल आणि काही खेळाडूंना सतत पाठीशी घातल्याबद्दल लिहिलं. त्यांनी लिहिलेलं एक वाक्य फारच बोल्ड आहे. ‘द टीम हॅज बीन मेड टू बी फियरफुल ऍण्ड डिसट्रस्ंटिग बाय रुमरमॉरगरिंग ऍण्ड इज सौरव मोडस् ऑपरेंडी ऑफ डिव्हाईट ऍण्ड रूल’. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या खेळाच्या तीनही भागांसाठी आम्ही ठराविक मापदंड ठरवले आहेत. आणि सौरवची कामगिरी या तीनही प्रकारात आपण ठरवलेल्या किमान मापदंडांच्या जवळपासही पोचणारी नाही. माझ्या मते चॅपेल सरांचे हे मत तुझ्यासारख्या खेळाडूला नक्कीच शोभण्यासारखे नाही.
या सर्व तमाशात तुला नाही वाटत की, तु कुठेतरी चुकलास? भारतातल्या तमाम क्रिकेट शौकिनांनी या सर्वच प्रकारात तुझ्यावरच आगपखाड केली. प्रसिध्दीमाध्यमांनी तुझी बाजू उचलून धरण्यास नकारच दिला. तू एकटा पडलास. हरभजनने तुझी बाजू घ्यायचा प्रयत्न केले पण बोर्डाने त्याला फटकरलं व सांगितलं की जास्त बोललास तर सरळ हरीभजन करायलाच पाठवू. तोही गप्प बसला बापडा. या सगळयातच मग इंग्लंडचा खेळाडू फ्लिंटॉफनेही तुझ्यावर आगपखाड केली.
माणसाचे दिवस वाईट असले की असच लोक झोडतात. तुझी अवस्था पाहून मला एक आधुनिक म्हण आठवते. ‘आधीच सेंट्रल रेल्वे त्यात इंडिकेटर बिघडलेला.’ सौरवदादा, मी म्हणतोय कशाला हवाय हा कर्णधारपदाचा काटेरी मुकूट?….एक खेळाडू म्हणून संघात खेळलास तर काय बिघडतं रे? खेळाडू म्हणून खेळलास तर टेन्शन फ्री राहशील, मोकळा खेळशील, तुच म्हणाला होतास की विश्वचषक भारतात आणणं ही तुझी इच्छा आहे. सचिन, तू, द्रव्रिड आणि प्रत्यक्ष दस्तुरखूद्द चॅपेल असताना आपण विश्वचषकात न जिंकणे म्हणजे इंटेलचा प्रोसेसर, एच.पी. चा कॉम्युटर, नॉर्टनचे ऍण्टिव्हायरस पॅकेज आणि जोडीला मायक्रोसॉफ्टची सिस्टीम असतानाही कॉम्युटर हँग होण्यासारखे आहे बरोबर ना…..
आता सध्या तुला टेनिस एल्बोचा त्रास जाणवतोय. या टेनिस एल्बोचीही गंमतच आहे नाही? तो टेनिसपटूंना जितका छळत नाही तितका क्रिकेटपटूंना छळतो. आता जर का तो एखाद्या टेनिसपटूला झाला तर त्याला क्रिकेट एल्बो म्हणतील कदाचित.
असो, नुकतच तु दुलिप ट्रॉफित शतक झळकवलस आणि संघात येण्यासाठी तू किती आसूसलेला आहेस हे दाखवलस. पण ‘बसेन तर खुर्चीवर’ हा तुझा हेका तु सोडायला हवास. सध्याच्या जगात ‘मोडेन पण वाकणार नाही’ यापेक्षा ‘वाकेन पण मोडणार नाही’ या उक्तीला जास्त महत्व आहे. संघात पुनरागमन केलस तर बॅटने बोल, फक्त बॅटने बोल. तुला माहीत आहे का की तुला वन डे क्रिकेटमध्ये 100 झेल घेण्यासाठी सहाच कॅचेस घ्यायचेत. गोलंदाजीत 100 बळीचा आकडा पार करण्यासाठी सातच बळीची गरज आहे. याहीपेक्षा अनेक गोष्टी तुझ्या मनात घर करून असतीलही. पण त्यासाठी तुला संघात पुनरागमन करून चांगलाच खेळायला हवं. सचिन, राहूल, लक्ष्मण तसेच संघातल्या इतर खेळाडूंनी तुला जसे सहकार्य केल तसच तु त्यांना करायला हवं. पुन्हा जुना/सुरुवातीचा सौरव गांगुली बनायला हवस. सध्या तुला सर्व ‘वा ए ए ए सौरव’ अस म्हणत आहेत. त्यांना ‘वा! सौरव’ असं कसं म्हणायला लावायचच हे तू चांगलच जाणतोस.
माझं हे पत्र समजून घेण्यासाठी तुझ्या बंगालच्या संघात खेळणाऱ्या एका मुंबईकराची मदत घेतलीस. तर अतिउत्तम तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
तुझा एक मुंबईकर चाहता
– मंदार माईणकर