आभाळच फाटले तर?

कपडे फाटले तर ते शिवून वापरता येतात, घर गळायला लागले तर डागडुजी करुन नीट करता येते, शेत नापीक असेल तर मशागत करुन सुपीक बनवता येते अशा अनेक गोष्टींना उपाय असतात पण कल्पना करा जर आभाळच फाटले तर? त्याला शिवणार कोण? कोण लावू शकेल त्याला ठिगळ? आणि जरी प्रयत्न केला तरी ते शक्य होईल का?

पाऊस यावा म्हणुन आतुरतेने वाट पाहिली जाते, कारण पाऊस आला तरच प्यायला पाणी मिळेल, शेतास पाणी मिळेल. थोडक्यात जीवनदान मिळेल. पण हेच जीवनदान देणारे पानी जेव्हा नाकातोंडात जाऊन त्यात गटांगळया खाण्याची वेळ येते तेव्हा? गेल्या एक शतकाचा विक्रम मोडुन पावसाने जे थैमान घातले आहे ते पाहून खरोखरीच आभाळ फाटले की काय असे मनात येते. या विक्राळ रुप धारण केलेल्या पावसाने काय काय नाही केले? सर्व ठिकाणी हाहाकार माजवला, कित्येक जणांचे संसार आज याच्या पाण्याबरोबर वाहून गेलेत. काय नसेल केले त्या लोकांनी आपला संसार थाटायला? एक एक वस्तू जमवताना किती कष्ट घ्यावे लागले असतील त्यांना? आणि कष्टातून उभे केलेले सर्व असे डोळयादेखत पाण्याबरोबर वाहून जाताना किती यातना झाल्या असतील त्यांच्या मनाला? सर्वस्व हरवून बसलेल्या आणि लेकरांना घेऊन आसऱ्यासाठी एखाद्या धर्मशाळेत उद्याची चिंता करत असणाऱ्यांचे मन काय म्हणत असेल?

ज्यांनी अशा परिस्थितीत घरच्यांशी ताटातूट होऊन जो वेळ बाहेर काढला अशांची परिस्थिती काय झाली असेल? मनाची किती तगमग झाली असेल त्यांच्या? कुणाची लहान मुले घरी एकटीच होती तर कुणाचे म्हातारे आईवडिल. मदत तरी कोणाला मागणार? कारण प्रत्येकालाच पुढ़े संकट होते. काही ठिकाणी दरड कोसळुन कुटूंबच्या कुटूंब त्याखाली गाडले गेले अशावेळी मरणाचे दु:ख करायला सुध्दा कुणी मागे उरले नाही याला काय म्हणायचे? मागच्या जन्मीचे पाप ज्यामुळे असा मृत्यु आला की ह्या जन्मीची पुण्याई ज्यामुळे आपल्या माणसाच्या मरणाचे दु:ख सोसायलाही कुणी मागे राहिले नाही. रात्री गाढ़ झोपेत जेव्हा पायाला काहीतरी ओले लागल्याचा भास होऊन जाग येते आणि उठून पाहिले तर सर्व घर पाण्याने वेढ़लेले असते तेव्हा मृत्युच साक्षात पुढ़े ठाकल्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावाचून राहिला नसेल.

स्वत:ची मोटार गाडी असणे हे भुषणावह मानले जाते पण अशा विपत्तीच्या काळात रस्त्यावरच पावसात अडकून पडली आणि पाण्यात बुडून त्यातच जलसमाधी मिळाली तर किती भयानक दृष्य असेल ते? बाहेर पाऊस पडतोय म्हणून शाळेतच आसऱ्याला थांबलेली लहान लहान मुले शाळेचीच भिंत अंगावर कोसळून त्याखाली गाडली गेली ही घटना किती मोठी कळ आणते ह्रदयात. काय दोष होता त्या चिमुरडया जीवांचा की ज्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली? काही ठिकाणी स्कुलबस मधे छोटी छोटी मुले नेत असताना समोरचे पावसाचे भयानक रुप पाहून बसचा चालकच गाडी रस्त्यात सोडुन स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळाला असेल तर गाडीतील त्या चिमुरडयांनी काय केले असेल अशा वेळेला? जेव्हा बऱ्याच जणांच्या घरात पाणी शिरत होते तेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर एखाद्या लहान बाळाचे प्रेत जर घरात आले तर काय झाले असेल त्या घरातील लोकांचे? आणि काय झाले असेल त्या आईचे जिचे ते चिमुकले पिल्लू असेल? कुठे शोधले असेल तिने त्याला अशा स्थितीत?

अफवा ही सर्वात लवकर आणि दुरवर पसरणारी गोष्ट आणि अशाच परिस्थितीत सुनामीच्या अफवेमुळे विनाकारण धावपळ होऊन अनेक लोकांना प्राण गमवावे लागले.

या ह्रद्यद्रावक परिस्थितीत काही लोकांनी खरोखरीच मनापासून कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता सकंटग्रस्तांना मदतीचा हात दिला आणि माणुसकीचे दर्शन घडवून दिले, पण काहींनी अशा परिस्थितीतही दु:खी लोकांना लुटण्याचे सोडले नाही आणि त्यांच्यातील राक्षसी वृत्तीचे दर्शन घडवले, काय म्हणायचे याला?

या निसर्ग कोपामुळे भयानक हानी झाली आहे, प्रत्येकजण ह्यात होरपळून निघाला आहे. अशा परिस्थितीत आलेली वेळ निघून जाईल, पहिल्यासारखे नसले तरी एक नवीन जीवन सुरू होईल पण काळाने जे हिरावून घेतले ते पुन्हा कधी मिळेल काय?

– सौ. मनिषा नवले, पुणे