अध्यात्म आणि विज्ञान परस्परांना पूरकच

एकीकडे बुध्दीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे भारतीय समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्दा, बुवाबाजी असे चित्र दिसते. भारतीय समाजाची मानसिकता दर्शवणाऱ्या या परस्पर विरोधी चित्रांमुळे ‘अध्यात्म’ आणि ‘विज्ञान’ यांच्यातील परस्पर संबंधाविषयी समाजाने पुन्हा नव्याने जाणून घेण्याची गरज आज निर्माण झाल्याचे जाणवते. सर्वात प्रथम ‘अध्यात्म’ आणि ‘विज्ञान’ यांच्या व्याख्या समजून घेऊन, त्यांचा उद्देश काय आहे ते लक्षात घेऊ. ‘अध्यात्म’ (अधि + आत्मन्) म्हणजे स्वतःसंबंधीचा अभ्यास होय. यात देहापासून आत्म्यापर्यंतचा (‘मी’ पर्यंतचा) अभ्यास अपेक्षित आहे. ‘विज्ञान’ याचा अर्थ विशिष्ट ज्ञान किंवा विशेष ज्ञान होय. अनेक वेळा अनुभव घेऊन हे ज्ञान सिध्द होतं. आजचं सायन्स विश्वामागची जी चालक शक्ती शोधण्याचं काम करत आहे, त्या शक्तीचा शोध भारतात फार प्राचीन काळीच अध्यात्माने ‘ईश्वर’ (अधिकार गाजवणाऱ्यातील श्रेष्ठ) या नावाने घेतला होता. आध्यात्मिक भाषेत सगळया विश्वात एकच ‘आत्मा’ भरून राहिलाय हे जाणणं म्हणजे ‘ब्रह्मज्ञान’ होय असं मानतात.

न्यूटनच्या काळात विज्ञान विश्वात विद्युत, चुंबकीय, यांत्रिक अशा अनेक शक्ती आहेत असं मानत असे. अधिक संशोधनानंतर या विविध शक्ती ग्रव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटीक फोर्स, ब्रीक न्युक्लीअर फोर्स व स्ट्राँग न्युक्लिअर फोर्स या चार मूलभूत शक्तींची उपांगे आहेत असं सिध्द झालं. हे मत १९८० पर्यंत प्रचलित होतं. अधिक नवीन संशोधनानुसार ह्या चारही मूलभूत शक्ती एकाच शक्तीची उपांगे आहेत हे आज सिध्द झालेलं आहे. विज्ञानाने ह्या शक्तीला अजून नाव दिलेले नाही. प्राचीन भारतात वेदांपासून या शक्तीलाच ईश्वर किंवा परब्रह्म म्हटलेले आहे. यावरून अध्यात्म आणि विज्ञानामध्ये परस्पर विरोध नसून परस्पर पूरकता असल्याचे दिसून येते. प्राचीन भारतीय ज्ञानमय वैदिक संस्कृतीने त्यामुळे निव्वळ एकांगी अशा आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष न देता वैज्ञानिक प्रगतीची आवश्यकता लक्षात घेऊन विज्ञानाचा सखोल अभ्यास केल्याचे पुरावे पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांच्या या विषयीच्या संशोधनातून समोर येतात. वेदांमध्ये क्लोनिंगचा उल्लेख सापडतो. ऋभु नावाच्या तीन भावांनी एका घोडयापासून दुसरा घोडा बनवला तसेच गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय बनवली असा स्पष्ट उल्लेख आहे. दुसऱ्या महिन्यात मानवी गर्भाचे हृदय चालू होते हे ऐतदेय व भागवत पुराणात असलेले ज्ञान विज्ञानाने १९७२ नंतर सिध्द केले. इ. स. पूर्व ५००० मध्ये पतंजलींनी पातंजलयोग दर्शनामध्ये समाधिमधून ध्रुव ताऱ्याच्या गतीचे ज्ञान प्राप्त होते असे म्हटले आहे. विज्ञानाने ध्रुव ताऱ्याला गती नाही असे मानून fixed star असं नाव दिलं होतं. विसाव्या शतकात ध्रुवाला गती असते हे सायन्सला समजले. प्राचीन भारतीय वेद, उपनिषद व पुराणांमध्ये कानांमुळे दिशा कळतात असं स्पष्टपणे म्हटलं आहे. १९३५ नंतर कानामधील लॅबिरिंथमुळे दिशाज्ञान होते हे सायन्सच्या लक्षात आलं. सुश्रूत संहितेत सांगितलेली कापलेलं नाक पुन्हा बनवण्याची पध्दत १९६८ नंतरच्या प्लॅस्टिक सर्जरीत सर्वमान्य झालेली आहे. याप्रमाणे प्राचीन भारतीय ग्रंथातून त्या काळातील वैज्ञानिक प्रगतीचे असंख्य पुरावे जागोजागी विखुरल्याचे डॉ. प. वि. वर्तकांनी शोधले आहेत. परंतु अध्यात्माविषयी जेव्हा बुध्दीनिष्ठ दृष्टीकोनातून विचार करण्याची वेळ येते त्यावेळी तथाकथित विज्ञानवादी यासंबंधी तटस्थपणे विचार करणे तर राहिले दूरच, अध्यात्म वगैरे सब झूठ आहे, थोतांड आहे अशा चुकीच्या अभिनिवेशामुळे काहीही ऐकून घेण्यास तयार नसतात.

विज्ञान आपल्या मर्यादेत ज्ञानाचा सतत शोध घेत असते, त्यामुळे त्यांची ही वृत्तीच विज्ञानाच्या विरोधात जाणारी आहे असे म्हणता येईल. संकुचित मनोवृत्तीमुळे हे तथाकथित विज्ञानवादी स्वतःहूनच ज्ञानसंपादनाचे काही मार्ग कायमचे बंद करताना दिसतात. अध्यात्म म्हणजे नेमकं काय हेच जाणून न घेता, त्याचा अभ्यासही न करता केवळ विरोधासाठी विरोध करत असतात. जेथून मिळेल तेथून ज्ञान प्राप्त करून आत्मोन्नती साधणं हे मनुष्याचे कर्तव्य असायला पाहिजे, मग तो मार्ग विज्ञानाचा असो वा अध्यात्माचा, मार्ग महत्त्वाचा नाही तर ज्ञान आणि ध्येय महत्त्वाचे आहे. एकारलेल्या, चुकीच्या विज्ञानवादी अभिनिवेशामुळे हेच नेमकं त्यांना समजत नाही. याउलट अध्यात्माचा खरा अर्थ न समजलेले दांभिक अध्यात्मवादी सुध्दा विज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळालेले सर्व फायदे उपभोगत असतानाच दुसरीकडे विज्ञानाची टिंगल करू बघतात. स्वतः भ्रमित झालेले, अज्ञानाच्या खोल चिखलात रुतलेले हे तथाकथित बुवा-महाराज सामान्य लोकांपुढे अध्यात्माच्या नावाखाली अंधश्रध्दांना खतपाणी घालत, भलत्यासलत्या आश्वासनांची खैरात करत स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ साधताना दिसतात. मोक्षाची दुकाने थाटून विकृत अध्यात्माचा धंदा मांडतात. हे स्वार्थांध भोंदू साधू समाजाला विकृत अध्यात्माचा डोस पाजून त्याच्या सारासार विचारशक्तीवरच घाव घालून पंगू बनवतात. समाजात विज्ञान म्हणजे विच्छेदक ज्ञान असा चुकीचा समज पसरवतात. अध्यात्माचे जेवढे नुकसान या विकृत अध्यात्मवादींमुळे होताना दिसते. तेवढे अध्यात्माला विरोध करणाऱ्यांकडूनही होत नाही.

भारताच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास अशा विकृत अध्यात्मवाद्यांकडून अहिंसेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे घडून आलेल्या हिंसेमुळे जी मोठी किंमत देशाला चुकवावी लागली त्याचे चित्र सहज स्पष्ट होते. यावरून असे म्हणता येईल की आज खरी गरज आहे ती अभिनिवेशरहीत ज्ञानपिपासू संशोधक दृष्टीने प्राचीन भारताच्या या ज्ञानभांडाराकडे डोळस विज्ञाननिष्ठ भूमिकेतून बघून, प्राचीनांनी कष्टाने कमावलेल्या ज्ञानाचा आधुनिक भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उपयोग करण्याची, प्राचीनांनी आध्यात्म व विज्ञानामध्ये साधलेला सुसंवाद लख्ख ज्ञानप्रकाशात एकदा लक्षात आला की आपोआपच संकुचित, क्षुद्र, दुराग्रही भूमिका गळून पडून आध्यात्म व विज्ञान परस्परांच्या विरोधात नसून, फार पूर्वीपासूनच भारतात मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रगतीसाठी उपयोगात आणलेले दोन मार्ग आहेत हे लक्षात येण्यास वेळ लागणार नाही.

– दुलारी रंगनाथ देशपांडे